top of page

अनुभव - 24

Updated: Jun 18, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* महाराजांचा कृपा प्रसाद *


जय गजानन! माझं माहेर म्हणजे 'नायगाव 'उस्मानाबाद जिल्ह्यातील अगदी लहान गाव. माझ्या बालपणी आई गजानन विजय ग्रंथ वाचायची तेव्हा तिच्या बाजुला बसून पोथीतील चित्र पाहता पाहता आणि आईकडून ती गोष्ट समजून घेताना गजानन महाराजांची भक्ती माझ्या मनात केव्हा रुजली ते कळलच नाही आणि अगदी अकरावीत असताना पासूनच माझी विजय ग्रंथाची पारायणं सुरू झालीत. माझ्या सोबत असणार्या मैत्रिणींना माझ्या कडूनच गजानन महाराजांविषयी माहिती झाली. त्याचं मला कधी कधी थोडं कौतुकही वाटायचं की आपल्यामुळे यांना 'शेगांव ' समजलं. मी जेव्हा मॅट्रीक झाले तेव्हा आमच्या गावात काॅलेज नसल्यामुळे सात किलोमीटर दूर लातूर जिल्ह्यातील मुरूड या गावी मला काॅलेज मधे प्रवेश घ्यावा लागला,तिथे होस्टेल होतं पण मी रोज बसने जाणं येणं करीत असे. मला आठवतं मी सेकंड इयरला असतानाची ही गोष्ट आहे. त्या दिवसात आमच्या घरात काही बांधकाम होत होतं,आदल्याच दिवशी बांधकाम पूर्ण करून कामगार निघून गेले होते त्यामुळे बरीच धूळ घरात होती. ती माघ वद्य सप्तमी होती अर्थात 'गजानन महाराजांचा प्रगट दिन'.

पण कसं काय कोण जाणे त्या दिवशी प्रगट दिन आहे,याचं मला स्मरणच राहिलं नाही आणि सकाळी मला होस्टेल मधून माझ्या मैत्रिणीचा,आशाचा फोन आला. 'सारिका अगं आज महाराजांचा प्रगट दिन आहे नं काय करता येईल आपल्याला?'मी तिला म्हटलं मी काॅलेजला येते मग आपण बोलू. मी फोन ठेवला आणि आत विचारांची विचित्र कालवा कालव झाली. जिला महाराजांविषयी माहिती मी दिली तिला प्रगट दिन लक्षात आहे आणि आपल्याला विस्मरण व्हावं?त्याच विचारात मी काॅलेजला निघण्याची तयारी करू लागले ते पाहून आई म्हणाली अगं घरात एवढी कामं पडली आहेत आणि तुला काॅलेज काय सुचतंय?त्यावर मी आईला तावा तावात सांगून टाकलं आज मी घरी आल्यावर तुला घरातील फरशी धुवून स्वच्छ पुसून देईन ! आणि असं सांगून मी काॅलेजसाठी बाहेर पडले. मनाचं संतुलन ढळलं की मोठ मोठ्यांची गडबड होते,मी तर लहानच होते.काॅलेजमधे मैत्रिणीनी कागं !प्रगट दिनाला काय करावं?असा प्रश्न पुन्हा विचारला तेव्हा आज आपण दिवसभर महाराजांचं स्मरण करु!असं सांगून स्वतःला मोकळं केलं आणि काॅलेज मधील सर्व वर्ग अटेन्ड करून परतीच्या बसची वाट पाहू लागली. परतीचा प्रवास सुरु झाला आणि मनातील आंदोलन गतीशील झालं. पश्चात्तापानी दग्ध झालेलं मन म्हणू लागलं 'महाराज माझी चूक झाली 'महाराज माझी चूक झाली 'आणि याचं परिमार्जन कसं करता येईल हा विचार मनात येऊन मी महाराजांना म्हटलं महाराज आज दिवसभरात जर मला प्रगट दिनाचा प्रसाद मिळाला तरच मी भोजन करीन नाही तर आज मी जेवणार नाही.

मी घरी पोहोचले,वास्तविक मला भूक अजिबात सहन होत नाही,पण आईनी जेवणाचं विचारलं तेव्हा बाहेर खाऊन आले आहे,असं सांगून फरशी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. भुकेने जीव कासावीस झाला होता,पण आज महाराजांना मी काही बोलले होते. बसून फरशी पुसताना पायात गोळे आले,प्रत्येक वेळी फडकं फिरवताना मी मागे सरकत होते आणि विचार पुढे धावत होते. माझं मन म्हणू लागलं 'अगं वेडे तू हे काय बोललीस?जेमतेम पाच सहा हजार लोकसंखेचे हे गाव,गावात एकही महाराजांचं मंदिर नाही,गावात गजानन महाराजांची फारशी माहिती नाही,जेमतेम बोटावर मोजता येतील एवढ्याच ठिकाणी पोथी वाचन होतं,तुला प्रगट दिनाचा प्रसाद मिळेलच कसा?या विचारांनी रडायला येऊन महाराजांना म्हणत होती आज माझ्या सोबत तुमचीही परीक्षा आहे,आज प्रसाद मिळाला तरच मी भविष्यात तुमच्या समोर पदर पसरविण्याच्या मनस्थितीत राहीन नाही तर माझी हिम्मत तुटून जाईल. तुम्ही बघा काय ते.

माझं काम आटोपलं ,संध्याकाळ झाली होती. मी हात पाय स्वच्छ धूवून कपडे बदलले,मला वाटलं मैत्रिणीकडे जाऊन थोडं मन हलकं करावं. तेवढंच भुकेकडे तरी निदान दुर्लक्ष करता येईल. मी आईला विचारून दिपालीच्या घरी गेले,तर ती आमच्या दुसर्या मैत्रिणीकडे,वंदना कडे गेलेली!म्हणजे अजून काही अंतर चालणं आले. पण म्हटलं चला आज महाराजांनी परीक्षाच घ्यायची ठरवली आहे. दोन पावलं अजून चालू. मी तिथे पोहोचताच आतून दिपाली बाहेर आली. मला पाहून म्हणाली सारिका तू किती भाग्यवान आहेस गं! अगं आज लातूरला गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनाला माझ्या आत्या तर्फे महाप्रसाद होता. तिने एवढ्या पन्नास किलोमीटर दूर अंतरावरून हा डबा माझ्याकडे पाठविला तोच प्रसाद घेऊन मी इथे आली आहे .हा घे प्रगट दिनाचा प्रसाद!ते ऐकताच मी दिपालीच्या गळ्यात पडून रडायला लागले. तिला सर्व कहाणी सांगितली आणि म्हटलं दिपा असं म्हणतात की तुम्ही दोन पावलं देवाच्या दिशेने चाला,तो तुमच्या साठी दहा पावलं समोर येईल. पण इथे तर मला दोन पावलं जास्त चालवून माझे गजानन महाराज माझ्या साठी पन्नास किलोमीटर धावून आले. त्या दिवशी माझ्यासाठी त्या प्रसादाची गोडी अवर्णनीय होती.

महाराजांनी प्रगट दिनाचा प्रसाद देऊन माझ्यावर कृपा केली,त्या कृपा प्रसादाच्या योगाने माझ्या भक्तीत वाढ झाली हे तर खरेच पण पुढे वेळोवेळी मला तशी प्रचितीही दिली. माझं लग्न ठरत असताना आलेला एक अनुभव मला सांगावासा वाटतो,पुढे शिक्षणाच्या निमित्ताने मी माझ्या मोठ्या बहिणीकडे पुण्याला जाऊन राहीले. एकीकडे माझं शिक्षण पूर्ण होत आलं आणि दुसरी कडे माझ्या साठी लग्नाची स्थळं पाहणं सुरू झालं. एका ठिकाणाहून मला होकार आला आणि घरच्यांना खूप आनंद झाला,पण तो थोडाच काळ टिकला,कारण तिकडून रोज नवीन निरोप रोज नवीन मागणी सुरू झाली.सोनेच द्या,पैसे द्या,फाइव्ह स्टार हाॅटेल बुक करा.घरचे परेशान झाले आणि इकडे त्या पंधरा दिवसांत माझ्याही मनाची अवस्था विचित्र झाली. रोजच्या मनाच्या हेलकाव्यांनी मी त्रस्त झाली आणि एका रात्री मी गजानन महाराजांच्या फोटो समोर हात जोडून उभी राहिले,म्हटलं महाराज मला हा त्रास सहन होत नाही. यातून काही मार्ग काढा,मला ही अस्वस्थता आणि अस्थिरता नको,तुमची जशी इच्छा तसं होऊ द्या पण मला उद्याच्या दिवसात याचं उत्तर मिळायला हवं. एवढं म्हणून मी झोपी गेले.

दुसरे दिवशी सकाळी,मी,माझी बहीण,आणि तिची नणंद. आम्ही तिघी अंगणात गप्पा करीत असताना,एक उंच सावळ्या रंगाचा माणूस समोरून जात होता,तो माझ्या कडे पाहून बडबड करू लागला..'ए बाई..मोडलं!मोडलं तुझं लग्न!' त्याचं ते बोलणं ऐकून बहिणीची नणंद म्हणाली अगं त्याच्याकडे लक्ष नको देऊ. हे लोक पैश्यासाठी असं काही करतात. त्यावर तो बोलला,अहो बाई पैशाचा प्रश्न येतोच कुठे?प्रश्न उत्तराचा आहे,ते देतो. बाईचं लग्न मोडलं !जाऊ द्या बाईचं लग्न मोडलं!असं बोलत तो निघून गेला.

बातमी लग्न मोडल्याची होती पण ती महाराजांच्या योजनेतून होती,त्यामुळे ती चांगलीच असणार,पुढे खरोखरच त्या स्थळाशी संबंध तुटले आणि नंतर समजलं की की त्यांनी अशाच कारणानी किमान चाळीस ठिकाणी मनस्ताप दिला होता.

असो महाराजांच्या आशीर्वादाशिवाय अजून काय हवं होतं,पुढे त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या ठिकाणी योग्य जुळून आला. आज मी पोथी वाचायला घेते तेव्हा माझी मुलगी मला पोथीतील चित्र दाखविण्याचाआग्रह करते. मी पण प्रेमाने तिला चित्र दाखवून तिच्याकडून म्हणून घेते..श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--सौ.सारिका सुमीत समदानी

घोडेगाव, ता. नेवासा

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comentarios


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page