top of page

अनुभव - 25

" श्री "

गजानन महाराज की जय ( अनुभव 25 🌺 )

* वैद्यराज,नागराजआणि महाराज *


जय गजानन! मी प्रवचनकार संजय देशमुख,माझा प्रवचनाचा विषय असतो 'मोरया 'अर्थात श्री गणेश! या विषयावर प्रवचन करण्यासाठी माझं रक्षण केलं संत शिरोमणी गजानन महाराजांनी. मी असं म्हणतो याचं कारण माझ्या आईला माझं संगोपन करताना वेळोवेळी गजानन महाराजांचा भक्कम आधार मिळाला नसता तर मी आजचा दिवसच पाहू शकत नव्हतो.

माझी आई गजानन महाराजांची निस्सीम भक्त होती,त्यांच्या वर तिची अढळ श्रद्धा होती. अगदी तिच्या बालपणापासून! माझे वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांची शिफ्ट ड्युटी असायची. माझी आई मला माझ्या लहानपणची घटना नेहमी सांगायची,मी तेव्हा साधारण वर्षाचा असेन आम्ही तेव्हा चंद्रपूर येथे रहात होतो. एक दिवस माझी तब्येत बिघडली,जुलाब व्हायला लागले,आईने घरच्यांना म्हटलं,कुणा डाॅक्टरला बोलवायला हवं, पण घरच्यांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही .खरं तर आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत असल्याने घरी बरेच लोक होते पण आईकडे पहाण्याची सासरच्यांची दृष्टी म्हणावी इतकी सहानुभूतीपूर्ण नव्हती आणि वडील ड्युटीवर गेले होते. अशात संध्याकाळ झाली पण लक्षणं काही घरगुती उपायांनी ठीक होईनात. आईनी पुन्हा म्हणून पाहिलं पण घरच्यांनी आईच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून,आम्हाला मुलं झाली नाहीत का?आम्ही वाढवलीत नं त्यांना?एखादी गुटी दे,होईल तो ठीक! असं म्हणून आईचं म्हणणं उडवून लावलं,रात्र झाली थोड्या वेळात सगळी कडे निजानीज झाली. आई मला मांडीवर घेऊन एकटी जागी होती. गुटी देऊन झाली पण लक्षणं काही कमी झाली नाहीत,उलट आता अंगही गरम वाटू लागलं रात्री तीन साडेतीन चा सुमार असेल मी हात पाय वाकडे करून डोळे फिरवले,आई घाबरली,तिला आता कुणाचा आधार होता?आईनी मला खाली ठेवलं,ती उठली,देवात गजानन महाराजांचा फोटो होता,आईनी रडत रडत,तो फोटो उचलला,एका परातीत पाणी टाकलं आणि तो फोटो भिंतीशी परात ठेवून पाण्यात उभा केला,आता मी रडत नव्हतो,किरकिर करत नव्हतो,शांत होतो आता आई रडत होती,फोटो समोर बसून तिचा संवाद आता गजानन महाराजांशी सुरू झाला होता. ती म्हणत होती 'मान्य आहे मला आमची हय गय झाली पण तू पाहतो आहेस मी कुठे हलू शकत नव्हते,घरच्यांनी मी सांगूनही ऐकलं नाही,पण मला सांग यात त्या बाळाची काय चूक आहे?आमच्या चुकीची शिक्षा त्याला का?त्याचं रक्षण कर मी तुला शरण आहे,या शिवाय मी काय करू शकते,रक्षण कर!असं म्हणता म्हणता रात्र भराच्या जागरणात काही क्षण तिला ग्लानी आली,जेमतेम उजाडू लागलं होतं आणि घराच्या दाराशी एक बैलगाडी येऊन थांबली त्यातून एक गाडीवान आणि दाढी वाढलेले,शुभ्र धोतर आणि पांढरी बंडी परिधान केलेले एक,असे दोघेजण उतरले,घरात आले, ते आईला म्हणाले मला कळलं तुझ्या बाळाची तब्येत ठीक नाही,मी त्याच्या साठी औषध आणलं आहे. हे घे ह्या तीन पुड्या. एक लगेच दे पाण्यातून,एक दुपारी,एक संध्याकाळी,बरं वाटेल तुझ्या बाळाला. असं म्हणून ते जाऊ लागले आईला वाटलं ह्यांना निदान रुपयातरी द्यावा,

त्या काळी खूप किंमत होती रुपयाला,आईने शोध सुरू केला पण सहजपणे रूपया काही सापडला नाही ते

' वैद्यराज 'म्हणाले हे बघ मला काहीही नको,तुझं पोरगं बरं झालं की पाठवून दे एक रुपया,ते लगेच निघालेआणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज दूर दूर गेला.

आईने मला लगेच एक पुडी दिली आणि मला काहीच मिनिटात स्वस्थ झोप लागली,उरलेल्या दोन पुड्यांनी मला पूर्ण तंदुरुस्त केलं.

सकाळ झाली,सूर्य वर आला,घराला जाग आली,आईला प्रश्न पडला होता ते वैद्यराज आले कसे?घरच्यांनी कुणाला सांगण्याची शक्यता नव्हतीच तरीही आईने सर्वांना विचारलं की त्यांनी कुणाला निरोप दिला होता का? नव्हताच दिला!शेजारच्यांना फारसं माहिती नव्हतंच तरीही आईने आजूबाजूला विचारलं,वडील घरी आल्यावर त्यांनाही विचारलं,तेव्हा फोन नव्हतेच त्यामुळे बाकी कुणाला काही कल्पनाच नव्हती. कुणीही कुणाला सांगितलं नव्हतच,मग ते कोण होते?आई साठी शेवटपर्यंत तो प्रश्न अनुत्तरीतच राहिला. आईने फोटो पुसून जागेवर ठेवला पण तेव्हापासून खाली दोन इंच फ्रेम रंग जाऊन वेगळी दिसू लागली आणि आई त्या फ्रेमकडे पाहून तिच्या अनुत्तरीत प्रश्नाचं उत्तर शोधत राहिली.

पुढे सहा महिन्यानी वडिलांची बदली देवळाली,(नाशिक)इथे झाली. आम्ही रेल्वे क्वार्टर मधे रहायला गेलो. तिथे आजूबाजूला जंगल होतं,मागे डोंगर होता,तेव्हा तिथे वीज नव्हती,कंदील आणि चिमणी हेच काय ते प्रकाशाचं माध्यम. आई मला ही गोष्ट नेहमी सांगायची.दसरा येऊ घातला होता त्या निमित्ताने आमच्याकडे आजी आजोबा (आईचे आई वडील) आणि मावशी असे तिघेजण आले होते. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. वडील चार ते बारा ड्युटीवर गेले होते. महाराष्ट्रात बरेच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या मुलाला, मुलीला, ओवाळण्याची प्रथा आहे. त्याला आसनी असं म्हणतात.त्या संध्याकाळी आईनी सतरंजी पसरली,त्यावर पाट मांडला व औक्षवणासाठी तबक तयार केलं. हे सगळं कंदिलाच्या अगदी मंद प्रकाशात होत होतं. आईनी प्रथम देवाला ओवाळलं,महाराजांना ओवाळून संजयचा जीव त्या दिवशी तुम्हीच वाचवला त्याचं सदैव रक्षण करा,अशी प्रार्थना केली. मला पाटावर बसवलं,मला शेजारच्या आलेल्या मावशींसह सर्वांनीच औक्षवण केलं .औक्षवणाचं काम पूर्ण होताच आईने तबक देवासमोर ठेवलं आणि मला पाटावरून उचललं. आई मला घेऊन जेमतेम मागे सरकली असेल तोच पाटाखालून एक दोन फूट लांबीचा नाग अचानक पाटावर आला. थोडा पाटावर स्थिरावला,फणा काढून सगळ्यांकडे पाहिल्या सारखं केलं आणि निघून गेला. सगळे स्तिमीत होऊन फक्त पहात राहीले. नंतर कंदील घेऊन शोधा शोध केली पण तो कुठेही दिसला नाही. सगळे धास्तावल्या सारखे झाले. आजोबा आईला म्हणाले तू यावर विचार करून बघ याचे दोनच अर्थ निघतात एकतर महाराजांनी नागा पासून रक्षण केलं नाही तर महाराज त्या रुपात आशीर्वाद देऊन गेलेत. पण काहीही असो,मला तरी महाराजांच्या अस्तित्वाची ही प्रचिती वाटते. तू एक काम कर,मला एक रुपया दे मी शेगांवला जाणारच आहे,तेव्हा तुझ्यातर्फे तिथे देईन. आजोबांचं ते वाक्य ऐकून आई नखशिखांत शहारली,तिला त्या दिवशीच्या एक रुपयाची आठवण झाली,तिने लगेच एक रुपया महाराजांना देण्यासाठी आजोबांच्या हातावर ठेवला. ती दक्षिणा तिच्या डोळ्यातून आलेल्या थेंबांनी आपोआपच ओली झाली होती.

पुढे आम्ही मोठे झालो,आईने तोच फोटो पुढील पन्नास वर्षे देवात सांभाळून ठेवला. पुजा करताना तिच्या हातात तो फोटो पाहून आम्ही भावंड म्हणायचो,आई तो फोटो नवीन करायचा का?ती म्हणायची बिलकूल नाही. अरे तो महाराजांचा जागृत फोटो आहे!पुन्हा आग्रहपुर्वक म्हटलं की अगं ती फ्रेम तरी बदलवून घेऊ,त्यावर मात्र काहीच न बोलता त्या रंग गेलेल्या भागावर पकड मजबूत करून फक्त आमच्याकडे पहायची आणि म्हणायची..

श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--संजय देशमुख, नागपूर

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसल्यासस्वागतआहे..

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page