अनुभव -26
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jun 7, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
* मार्गदर्शक सद्गुरू *
जय गजानन!मी वैशाली फाटक,'सांगली 'माझं माहेर आणि 'पोफळी'माझं सासर,1974 ला माझं लग्न झालं. मागील पंचेचाळीस,शेहेचाळीस,वर्षांपासून मी गजानन महाराजांच्या अनुसंधानात आहे. गजानन विजय ग्रंथाची आजपर्यंत एकासनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने खूप पारायणं पूर्ण झालीत,चिंतन झालं,आता मनातून पटायला लागलं आहे की,सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून रहा ते तुम्हाला मार्गावरून ढळू देणार नाहीत.तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आणि दुःख वाट्याला आलंच तर ते भोगण्याची शक्ती तुम्हाला प्रदान करतील. अशा तीनही बाबतीतील अनुभव जीवनात माझ्या वाट्याला आलेत.
जीवनात सुख दुःखाचं मिश्रण असायचंच,1995 साली माझ्या मोठ्या मुलाचं,डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असताना अपघाती निधन झालं,मी पूर्ण हलून गेले,हळवं मन आतून बाहेरून रडायचं ,गजानन महाराजांना मी उभं राहण्याची शक्ति मागत होते.माझ्या काही मैत्रिणी मला म्हणू लागल्या 'अगं तू कुणाला गुरू कर 'मनाला आधार मिळेल,पण मला ते पटत नव्हतं मी म्हणायची गजानन महाराज आहेत,तेच माझे गुरू. एका मैत्रिणीने खूप आग्रह धरला की चिपळूणला एक जण आहेत ते तुम्हाला हवा तोच गुरू मंत्र देतात,ते ऐकून मला हसायला आलं,पण सगळ्याच म्हणू लागल्या की या गुरूपौर्णिमेला तू तिथे जा मी भांबावल्या सारखं होऊन तिला हो म्हटलं आणि साधारण एक तासाभरात मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं,एक पिवळं कापड,त्यावर साधारण फूटभर लांबीची चिलीम,गंधाचे ओढलेले पट्टे,त्यावर हळदीकुंकवाची बोटं,असं दृश्य एकसारखं नजरेसमोर यायला लागलं,मला अन्य काही दिसेना ,सुचेना,यात बराच वेळ गेला आणि मला पुंडलिक भोकरे आणि भागी ठाकरीणीची गोष्ट आठवली,मी लगेच महाराजांच्या फोटो समोर हात जोडून उभी झाले,म्हटलं हा मी संकेत समजते,मी कुठेही जाणार नाही. तुम्हीच माझे गुरू तुमचे चरण हेच श्रद्धा स्थान. माझी प्रार्थना झाली आणि अक्षरशः क्षणातच ते दृश्य नजरेसमोरून बाजूला झालं आणि मी नाॅर्मल झाले. सद्गुरूंनी मार्गावर सांभाळून ठेवलं.
माझ्या लग्नाला जेमतेम एक महिना झाला होता,एके रात्री यांना अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले,ते काही केल्या थांबेनात.कमालीचा अशक्तपणा येऊन यांना दवाखान्यात भरती करावं लागलं,सलाईन लावावं लागलं,डाॅक्टरांना सहजी निदान होईना डाॅक्टर म्हणाले बाकी काॅम्पलिकेशन्स झाले नाही म्हणजे मिळवलं. पाहू गाॅड इज ग्रेट!मग काय माझा गाॅड एकच. मी महाराजांना म्हटलं संध्याकाळपर्यंत यांना घरी येऊ दे,मी गजानन विजयची एकवीस पारायणं करीन. डाॅक्टरांना निदान होऊन औषध लागू पडलं आणि ह्यांना संध्याकाळी डिसचार्ज मिळाला. यांच्यावर आलेलं गंडातर टळलं होतं.
मी एकट्यात विचार करीत असते तेव्हा मला कधी कधी वाटतं गजानन महाराजांच्या चरणाशी किती विविध प्रकारच्या मागण्या घेऊन भक्त येत असतात. महाराजांना सगळ्यांकडेच लक्ष द्यावं लागतं. मी एकदा महाराजांना एक विचित्र मागणी केली,कदाचित असं कुणीही मागितलं नसेल,अगदी आगळी वेगळी मागणी.
मला पाच नणंदा होत्या आणि एक दीर होते,सासरे हयात असताना तिघींची लग्न झालीत दीराचही लग्न नंतर झालं,आम्हाला दोन मुलं आणि एक मुलगी आणि दीरांना दोन मुलच होती. असं म्हणतात की कन्या दानाचं सौभाग्य लाभावं तो एक चांगला योग समजतात. मला मनातून वाटायचं की जर दोन्ही नणंदांच एकाच दिवशी लग्न होण्याचा योग आला तर एकीचं कन्यादान दीर जावेला करता येईल. मी तशी इच्छा कुटुंबात व्यक्तही करून दाखविली,मुळात लग्न ठरणच महत्त्वाचा टप्पा ,तेच सहजासहजी शक्य नाही त्यात एकदम दोन लग्न आणि तेही एकाच दिवशी?मला सर्वांनी वेड्यात काढलं. मी म्हणायची 'सहाय्य होतो जगजेठी/हेतू शुध्द असल्यावर. 'मी गजानन महाराजांना रोज तशी प्रार्थना करायची,म्हणायची यात माझा काही स्वार्थ नाही मी त्यांच्या साठी अशी इच्छा धरून आहे. महाराजांनी माझी मनोकामना पूर्ण केली. 27 जुलै 1987 रोजी माझ्या दोन्ही नणंदांची लग्न,एकाच तारखेला,एकाच वेळी,एकाच ठिकाणी,गजानन महाराजांच्या कृपेने व्यवस्थित पार पडली आणि त्यात एकीचं कन्यादान आम्ही केलं आणि एकीचं कन्यादान दीर-जावेनी केलं आणि त्या दिवसापासून माझ्या जावेची महाराजांवर श्रद्धा दृढ झाली.
माझ्या मनातील अनेक इच्छा महाराजांनी वेळोवेळी पूर्ण केल्यात. अगदी मनोवांछित अपत्य प्राप्ती पासून तर ह्यांची नोकरी परमनंट होईपर्यंत,मीही अनेक वेळा महाराजांच्या चरणी एकवीस पारायणंरूपी दुर्वांची जुडी अर्पण केली आणि हे सर्व होत असताना माझ्या नकळत महाराज माझ्या मनावर संस्कार करते झाले. कदाचित पुढे मला फार मोठ्या संकटाला सामोरं जायचं आहे म्हणून की काय 2008 च्या सुमारास एक वाक्य राहून राहून माझ्या मनात घोळायला लागलं 'देवा जशी तुझी इच्छा,त्यातच माझं भलं!' मग हळू हळू मनातून काही मागू नये असं वाटायला लागलं . मे 2008 मधील ती घटना. तिसरा अध्याय वाचत असताना..... हे गंडातर रुपाचे/मृत्यू दोन प्रकारचे/भौक्तिक आणि दैविक साचे/हे आहेत ख्यात जगी/मृत्यू जो का अध्यात्मिक/तो कवणाच्याने न टळे देख/पाहा अर्जुनाचा बालक/कृष्णा समक्ष पडला रणी/ या ओव्यांवर मन घुटमळायला लागलं. एकसारख्या त्याच ओव्या डोळ्यासमोर नाचत होत्या. 27 मे 2008 रोजी हे घरातच ब्रेन हॅमरेज होऊन जमिनीवर कोसळले,यांना दवाखान्यात आय.सी .यू .मधे हलविण्यात आले पण तिथेही रक्ताची उलटी होऊन हे सगळ्याच्या पलीकडे पोहोचले,29 मे रोजी ह्यांनी जगाचा निरोप घेतला आणि मृत्यू जो का अध्यात्मिक/तो कवणाच्याने न टळे देख/ या ओव्या माझ्या नजरेसमोर वारंवार का येत होत्या याचा उलगडा झाला. महाराजांनी ते दुःख भोगण्याचे धैर्य मला प्रदान केलं होतं.
चौतीस वर्षे साथ देऊन अचानक मिस्टर निघून गेल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असणारे धैर्य महाराजांनी मला देऊन आज माझ्या मनाची घडण अशी तयार केली आहे की,त्यांच्या समोर प्रार्थनेला उभी राहिले की एकच मागणं मागितल्या जातं, गजानन महाराजा तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ द्या. तुमची इच्छा तीच माझी इच्छा असू द्या!अर्थात आज ही इच्छा आनंददायी वाटते याचं कारण महाराजांविषयी मनात सातत्याने चालणारे चिंतन आणि त्या चिंतनाला आधार असणार्या दोन गोष्टी,एक म्हणजे गजानन विजय ग्रंथाचे पारायण आणि दोन,महाराजांचा मनात सतत सुरू असलेला जप श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--श्रीमती वैशाली विलास फाटक, पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
Comments