top of page

अनुभव -27

Updated: Jun 7, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* जय जय स्वामी गजानन *

जय गजानन! जामनेर तालुक्यातील तोंडापूर या गावी एका गरीब कुटुंबात या 'पुंडलिकाचा ' जन्म झाला. वडिलांचं नाव 'रामकृष्ण' माझ्या नावाला साजेलसं वातावरण मला आमच्या कुटुंबात लाभलं. 1966 चा तो काळ,त्या काळात शोभून दिसेल अशी आमची कुटुंब संख्या मोठी होती. आम्ही दोन भाऊ चार बहिणी,भावंडात अंतर जास्त त्यामुळे 1978 साली माझ्या मोठ्या बंधूंचं लग्न झालं तेव्हा मी लहान बारा वर्षांचा होतो .विवाहानंतर नवीन वर-वधू दर्शनासाठी तीर्थस्थानी जाण्याची प्रथा आमच्या परिवारात सुरुवातीपासून होती,त्यानुसार भाऊ उत्तमराव व सौ.चंद्रकला वहिनी यांच्या सोबत घरातील एक जेष्ठ सदस्य आणि मी आम्ही दर्शनासाठी शेगांवला जावे असे ठरले,20 एप्रिल 1978 ला शेगांवी मी प्रथमच गजानन महाराजांच्या समाधीवर मस्तक टेकले व मनाने ठरविले,महाराज!आजपासून मी तुमचा भक्त.

1989-90 साली मी महाराजांच्या कृपेने बी.एड. झालो आणि शिक्षकी पेशा स्वीकारला,त्यानंतर मी शिक्षक म्हणून विविध संस्थामधून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने फिरलो. 16 फेब्रुवारी 1993 ला माझा विवाह संपन्न झाला आणि परंपरेनुसार सपरिवार गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांव गाठलं. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की आता आपल्याला नोकरीच्या निमित्ताने खूप दूर जावे लागणार आहे.

श्रीं चे दर्शन घेऊन परतलो आणि 22 फेब्रुवारी 1993 ला जवाहर नवोदय विद्यालय कीर्तनपूर जि.बहराईच उ.प्र. येथे शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी ऑर्डर हातात पडली. मार्च 93 ला मी कीर्तनपूर येथे सेवेत रुजू झालो. घरापासून तेराशे कि.मी. लांब उत्तर प्रदेशात. आता निदान काही वर्षतरी तिथे रहाणं भाग होतं कारण शाळेच्या प्रशासनात विशिष्ट काळानंतरच बदली साठी अर्ज करता येतो,त्यामुळे मनातून तो बदल स्वीकारला पण मनाला रुखरुख याची होती की शेगांवला दर्शनासाठी जाणं सहजासहजी शक्य होणार नव्हतं शिवाय तिथे महाराजांचं मंदीरही नव्हतं मंदीर तर असू द्या पण फोटो देखील मिळू शकला नाही.मग मी शेगांव संस्थानला एक विनंतीवजा पत्र लिहिलं आणि मला शेगांव व्यवस्थापनाचं कौतुक वाटलं,वास्तविक तिथे शेकडो पत्र त्या काळात येत असत,परंतु त्यांनी माझ्या पत्राची योग्य ती दखल घेऊन मला महाराजांचे दोन सुंदर फोटो पाठविले. पुढे रोज फोटो समोर उभा झालो की सूप्तमनात एक विचार येऊनच जायचा 'महाराज किती दूर पाठवलं मला,आता पुढील बदली तरी अशा ठिकाणी होऊ द्या की सहजपणे तुमच्या दर्शनाला येणे शक्य व्हावे.'

मार्च 2001 मधे आम्हाला बदली साठी अर्ज करता येत होता,अर्ज भरत असताना महाराजांना प्रार्थना करता करता मी लिहिले 'महाराष्ट्रात कुठेही 'आणि अर्ज दिला, मे महिन्यातील सुट्यामधे प्रथम शेगांव दर्शनाला पोहोचलो तेव्हा महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि पुढील आदेशाची वाट पाहू लागलो ,20 जुलै 2001 ला माझी बदली नवोदय विद्यालय,नवसारी,अमरावती येथे झाली. माझी मनोकामना पूर्ण झाली.

शेगांवची वारी करता येते या आनंदात सहा वर्षे कशी निघून गेलीत कळलच नाही आणि पुन्हा बदली होण्याचे दिवस आले,पुन्हा फाॅर्मभरावा लागला,यावेळी दुसर्या प्रदेशात जायचे होते. सर्वांचा नंबर लागून माझ्यासाठी शेवटच्या दोनच जागा शिल्लक उरल्या,त्या म्हणजे उ.प्र. तील 'हरदोई 'व जम्मू जवळ 'कठूआ '! नाईलाजाने कठूआ साठी पसंती नोंदविली.शेगांव पासून खूप दूर जाण्याचा योग येत होता. मन नाराज झालं चेहर्यावर उदासी आणि मनात शेगांव आलं. जून महिन्यात शेगांवी जाऊन महाराजांना साकडं घातलं की एक वर्ष माझी बदली पुढे ढकला.29 जून 2007 ला समितीच्या संकेतस्थळावर आमच्या बदलीची यादी जाहीर होणार होती, 29 जूनला विद्यालयात जाऊन संगणकावर यादी पाहिली,माझाच विश्वास बसेना,माझी बदली टळली होती. नाव न आल्याने मला आपोआप तिथेच एक वर्षाचं एक्सटेंशन मिळालं होतं

मी दरवर्षी शेगांवला दर्शनासाठी जातच होतो,जसं जमेल तसं,आतापर्यंत अनेक वेळा जाणं झालं पण 6 जून 2012 ला झालेली शेगांव वारी एक वेगळ्या कारणाने आजही माझ्या स्मरणात आहे. मला आठवतं संध्याकाळी साडेसात वाजता भुसावळ स्टेशनवरून पॅसेंजरनी आमचा प्रवास सुरू झाला पण काहीच वेळात काळेकुट्ट ढग,विजांचा लखलखाट,गडगडाट होऊ लागला. गाडी बोदवड स्टेशनात शिरत होती आणि धो धो पाऊस सुरु झाला. गाडी बराच वेळ तिथे थांबून होती अर्थातच पुढील प्रवासाला विलंब होऊन,रात्री साडे अकराच्या सुमारास आम्ही शेगांवला उतरलो.बाहेर पडताच संस्थानची बस आम्हाला मिळाली,मंदीर परिसरात पोहोचतात भक्त निवास क्र. पाच मधे चौकशी केली असता रुम शिल्लक नाही असे असे विश्वस्त सूत्रांनी सांगितले. आम्ही भक्तनिवास एक मधे चौकशी केली,तिथेही जागा नव्हती. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते,त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती,मग आम्ही गाद्या भाड्यानी घेऊन मंदीर प्रांगणातच झोपलो. रात्री दीड वाजता पावसाने सर्व भक्त गणांना जागे केले आणि सर्वांनाच आजूबाजूला जागा शोधून झोपण्याची सोय करणे क्रमप्राप्त झाले.

रात्री साडेतीन,चार च्या सुमारास मला जाग आली पाहतो तो पत्नीच्या उशाशी असलेली बॅग गायब झाली होती,माझी झोप पार उडाली कारण बॅगमधील वस्तूंची यादी मला आठवू लागली,पैशाची पर्स,घड्याळ,मोबाईल,एटीएम कार्ड,पॅनकार्ड,ड्रायव्हींग लायसन्स व मतदान कार्ड. मी बायको मुलांना जागं केलं,आजूबाजूला चौकशी केली पण व्यर्थ. प्रत्येक जण वेगवेगळा सल्ला देऊ लागला. मग क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि म्हटलं,आपण पहिले महाराजांचं दर्शन घेऊ नंतर पोलिसांच्या कानावर घालू , महाराजांसमोर त्या दिवशी फार काही बोलणं सुचलंच नाही. एकच म्हटलं 'गजानन बाबा तुम्ही सर्व जाणताच,आज माझ्याजवळ काहीच नाही,बाकी सामान गेलं तर जाऊ द्या,पण कागद पत्र फार महत्त्वाची आहेत,ती मिळाली तर खूप बरं होईल.'

दर्शन घेऊन आम्ही सकाळी सातच्या सुमारास पोलिस स्टेशन गाठले तिथे श्री शेख हवालदार ड्युटीवर होते,त्यांना सर्व हकीकत सांगितली,त्यांनी मी सांगितलेल्या नंबरवरफोन केला. दुसर्या तिसर्या रिंगच्या वेळी फोन उचलल्या गेला. तो हाॅटेलचा वेटर होता त्यानी सांगितलं ही बॅग पायरीवर ठेवलेली दिसली,त्यात हा फोन वाजला म्हणून मी उचलला. श्री शेख यांनी त्याला पत्ता विचारला, आम्ही लगेच तिथे पोहोचलो.बॅग पाहून मला आनंद झाला पण एक शर्ट,पैशाची पर्स,आणि कागद पत्र त्यात नव्हते. पुन्हा थोडा निराश झालो पण आता अन्य काही करण्यासारखे नव्हते,हरवलेल्या कागदपत्राचा एफ. आय. आर. नोंदविला,तिथल्या फौजदार साहेबांनी चौकशी करून वाटेत अडचण आलीच तर त्यांच्या सही शिक्क्यासह एक पत्र दिलं व काही पैसे देऊ केले मी पत्र घेतले पण पैशाला विनम्र पणे नकार देऊन 'गजानन महाराजांची इच्छा 'असं स्वगत बोलून स्टेशनचा मार्ग धरला.

पाय स्टेशनची वाट चालत होते आणि विचार पुढे धावत होते. मिळतील का कागद पत्र?की डुप्लीकेट करावे लागतील?पण आपण तर गजानन महाराजांना सांगितलं आहे?कोण आणून देईल?की पोलीसांचा फोन येईल?...विचारांच्या तंद्रीतच स्टेशन आलं,समोर एक कार्ड पडलेलं दिसलं,ओळखीचं वाटलं,पाहिलं तर माझंच पॅनकार्ड होतं,पुढे दोन पावलावर निवडणूक कार्ड आढळलं,पाहतो तो काय माझे सर्व कागदपत्र एका रेषेत पडलेले आढळले. मग काय आनंद गगनात मावेना. भराभर एकेक कागद उचलत गेलो आणि प्रत्येक वेळी महाराजांचे आभार मानत मुखाने नाम घेत गेलो.......

श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--पुंडलिक रामकृष्ण डोड .

खुरई जि. सागर म. प्र.

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page