अनुभव -28
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 7, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
* श्री गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद *
जय गजानन!संत कवी ह.भ.प.दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असताना असे अनेक प्रसंग आहेत की जिथे भक्तांनी केलेला धावा आणि महाराजांचं हाकेला धावून जाणं किंवा काही मार्गदर्शन करणं,याचं वर्णन वाचलं की मनातील भक्तिभाव प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. मग वाटतं धन्य ती भक्ती धन्य तो देव!पुढे असही वाटतं की आपलीही भक्ती अशी तीव्र होऊ शकेल का?
माझी एक मैत्रीण आहे तिची गजानन विजय ग्रंथाची शेकडो पारायणं झाली आहेत. तिला महाराजांविषयी अनेकदा असेच विलक्षण अनुभव आले आहेत. तिच्या एका अनुभवात ती,महाराज आणि मी असा संबंध आहे म्हणून तो अनुभव मला सांगावासा वाटतो.
एका पहाटे मैत्रिणीला स्वप्न पडलं. स्वप्नात येऊन गजानन महाराज तिला म्हणाले ..वंशाचा दिवा! वंशाचा दिवा! एवढं बोलून स्तब्ध झाले तिला प्रथम काही अर्थबोध होईना.नंतर म्हणाले, तुझी मैत्रीण जी मनिषा आहे,त्या मनिषाला उद्या सकाळी दिवा दे. मनिषा घोरपडे ला उद्या सकाळी दिवा द्यायचा आणि एवढं बोलून दिसेनासे झाले. सकाळ होतच आली होती,मैत्रीण जागी झाली,स्वाभाविकपणे तिच्या मनात विचार चक्र सुरू झालं ,आपण घरातीलच दिवा द्यायचा आहे का?त्या पेक्षा तुळशी बागेत जाऊन छान नवीन दिवा विकत घ्यावा व तो देणं केव्हाही चांगलं कारण हा महाराजांचा आदेश आहे. मैत्रीण स्नान पूजा करून तयार झाली आणि दारावरची बेल वाजली,मैत्रीणीनी दार उघडलं,दारात पोरगेलीशी स्त्री उभी होती, जिला चार पाच वर्षापूर्वी मैत्रिणीने काही सल्ला देऊन गजानन महाराजांची उपासना करण्याचा सल्ला दिला होता. त्या सल्ल्यानुसार केलेल्या गजानन महाराजांच्या भक्तीची प्रचिती आल्यामुळे तिने मैत्रिणीसाठी विनम्रपणे एक भेटवस्तू आणली होती. पाच वर्षाच्या कालावधीनंतर ती प्रथमच येत होती. तिने एक सुंदर चांदीचा दिवा आणला होता,तिचा भक्तीभाव,हातातील दिवा आणि दिवा येण्याआधीच दिव्या विषयी महाराजांनी केलेलं मार्गदर्शन,या तीनही कारणांनी मैत्रिणीचे डोळे पाणावले. मनिषाला कोणता दिवा द्यावा? या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं होतं.
मला मैत्रिणीचा निरोप मिळाला,मी दिवा घेऊन आले मला फारसं कळलं नाही पण मी महाराजांसमोर दिवा लावून प्रार्थना केली. दोन दिवसांनी तो दिवा मी बाजूला ठेवून दिला. माझा मोठा मुलगा मनोज,सून मानसी,आणि पाच वर्षाचा नातू मानस, असे तिघे तेव्हा बोरीवलीत राहत होते. माझा लहान मुलगा मयूर त्यांच्याकडे गेला होता. ते संध्याकाळी बाहेर फिरायला गेले आणि येताना मानस साठी तीन चाकी सायकल घेऊन आले. मानस स्वयंपाकघरात त्या सायकलवर उभा राहून फ्रीज वरून काही काढण्याचा प्रयत्न करीत असताना खाली पडला वरून एक बरणीपण खाली पडून फुटली तिची काच मानसच्या डोक्याला लागली जखम होऊन त्यातून चांगलच रक्त यायला लागलं आणि त्याला दवाखान्यात भरती करावं लागलं ,डाॅक्टरांनी सांगितलं 'याला अंडर आॅब्झर्व्हेशन ठेवावं लागेल.' मला ही सर्व घटना फोनवरून समजली आणि 'वंशाचा दिवा 'या शब्दाचा थोडा उलगडा झाला.
मी लगेच मैत्रिणीशी फोनवर संपर्क साधला आणि तिला ही घटना सांगितली ,तेव्हा मी नियमितपणे मारुती स्तोत्र म्हणत असे. आम्ही दोघी थोडं सविस्तर बोललो. मी तो दिवा पुन्हा धुवून पुसून,तेलवात करून सिध्द केला. महाराजांसमोर शांतपणे संकल्पासह बसले,शेगांवचा औदुंबर वृक्ष आणि त्याही पुर्वीपासून असणारा मारुतीराया
नजरेसमोर आला आणि महाराजांच्या साक्षीने त्या दिव्याच्या शांत प्रकाशात भीमरुपी स्तोत्राचं अकराचं एक आवर्तन,अशी अकरा आवर्तने केलीत. आम्ही उभयतांनी महाराजांना हात जोडून वंशाचा दिवा तेवत रहावा अशी प्रार्थना केली आणि मुंबईला चौकशी साठी फोन केला. नातू नवीन सायकलवर बसून आनंदात खेळत होता.
महाराज स्वप्नात येऊन भक्तांना मार्गदर्शन करतात असे अनेक प्रसंग गजानन विजय ग्रंथात आहेत .
पेठकराचे ब्राह्मण भले/सांग कशाने राहिले?/अरे गजानन स्वामी गेले/त्या उभयतांच्या स्वप्नात,/ विसाव्या अध्यायात या ओव्या वाचताना,मला देखील महाराजांनी बरेचदा स्वप्नी येऊन प्रचिती दिल्याची जाणीव होते. मनोज मुंबईला असताना मला नेहमीच वाटायचं की याला पुण्याला नोकरी लागली तर बरे होईल. अर्थात आई बापांना मुले जवळ असलेली आवडतात हीच भावना त्यामागे होती. मी महाराजांना नेहमी तशी विनंती करायची
एकदा संध्याकाळी अशीच तीव्रतेने प्रार्थना केली आणि त्याच रात्री महाराज स्वप्नात येऊन मला म्हणाले 'अगं तुझा मनोज पुण्यात आला आहे तु काळजी का करतेस?मी मिस्टरांना सकाळी हे सांगितल्यावर त्यांनी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही पण थोड्या वेळात घरासमोर गाडीचा ओळखीचा हाॅर्न वाजला,मनोज आला होता,त्याला आम्हाला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता पण तो आत आल्या आल्या आम्हीच त्याच्या नवीन नोकरीचं विचारुन त्यालाच आश्चर्य चकित केलं. असे आहेत गजानन महाराज!
भक्त वत्सल गजानन महाराज केव्हा आणि कसे येऊन जातील हे कोण जाणू शकतो?म्हणून तर दासगणू महाराजांनी म्हटलं आहे...त्यांच्या दिनचर्येचा/नियम नव्हता एक साचा/प्रकार वायुच्या गतीचा/नये ठरविता कोणासी. /..मला आठवतंय मागे मी एकदा एकवीस पारायणांचा संकल्प केला आणि प्रत्येक पारायणानंतर मुद्दाम कुणाला न बोलावता पण प्रथम जो कुणी येईल त्याला असोला नारळ आणि सव्वा रूपया दक्षिणा देण्याचा निर्णय घेतला. माझी सहा पारायणं पूर्ण झालीत,सकाळी ऑफिसची घाई असायची,पण पारायण,पुजा,तुळशी समोर रांगोळी,सर्व उरकून ऑफिसला जात असे. सहा वेळा कुणी ना कुणी आलं होतं,सातव्या पारायणाच्या दिवशी आज कोण येईल?कोण असेल ती व्यक्ती?असा विचार,पुजेत,पोथीत सतत डोक्यात घोळत होता. रांगोळी काढून मी आत येतच होते तो दारात असतानाच बेल वाजली, खरं तर मी तिथेच होते पण कुणी आल्याची चाहूलही लागली नाही.वळून पाहते तो पांढरा पायजमा आणि शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला तो माणूस आत आला. मी विचारलं आपण कुठून आलात तर म्हणाला नागपूरहून येणं झालं नुकतच पारायण झालं होतं त्यामुळे मला तो चांगला योग वाटून मी त्यांनाच असोला नारळ व दक्षिणा दिली तर चालेल का?असा प्रश्न केला. त्यावर म्हणाले मी तेवढ्याच साठी आलो आहे मला घाई आहे लौकर द्या. मी नारळ दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार केला त्याचा स्वीकार करून घाईने निघूनही गेले.
ते गेले , मी भानावर आले आणि अनेक प्रश्न डोक्यात फेर धरून नाचू लागले. बाहेर लगेच जाऊन पाहिलं पण कुणीही दिसले नाही. आधी कधी पाहिले नाही पुन्हा कधी दिसला नाही,कोण होता तो माणूस?पण तसं पाहिलं तर आता या प्रश्नांना काहीच अर्थ नव्हता,सर्व विचार बाजूला सारून मी ऑफिसच्या तयारीला लागले आणि त्यांनी जिथे पाय ठेवले होते त्या जागेला पुन्हा नमस्कार करून मनापासून पुन्हा एकदा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं मनोमन स्मरण केलं श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- श्रीमती मनिषा मनोहर घोरपडे
सिंहगड रोड पुणे.
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comentários