अनुभव - 29
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 29 🌺 )
* जय जय सद्गुरू गजानना रक्षक तुची भक्तजना *
जय गजानन! 1969 सालची ही गोष्ट ,तेव्हा मी सहा वर्षांची असेन, वडिलांची अमरावतीहून नागपूरला बदली झाली,वडील गजानन महाराजांचे भक्त त्यामुळे स्वाभाविकपणे नागपूरात आल्यावर पहिली चौकशी जवळपास गजानन महाराजांचे मंदीर आहे का?
आम्हाला जिथे घर मिळालं ,तिथून साधारण दोन कि.मी.अंतरावर धरमपेठ येथील झेंडा चौकात गजानन महाराज मंदीर आहे असं वडिलांना समजलं. आज नागपूरातील अत्यंत जुन्या गजानन महाराज मंदिरात या मंदिराची गणना होते. वडील तिथे नियमाने दर्शनाला जाऊ लागले.
एक दिवस अचानक माझे डोळे आले आणि डोळे बंद झाले. वडील मला घेऊन डाॅक्टरांकडे पोहोचले,डाॅक्टरांनी एक औषध दिलं आणि म्हणाले हे दोन दोन थेंब डोळ्यात घालायचं. पण औषध घालणार कसं ?माझे डोळे तर बंद. मी काही केल्या डोळे उघडेना. मग काय वडिलांची श्रद्धा, ते म्हणाले मी हिला गजानन महाराजांच्या दर्शनाला नेतो,डोळ्यासारखा नाजूक भाग,उगाच हयगय नको. संध्याकाळी वडिलांनी मला कडेवर घेतलं आणि मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं मुखाने महाराजांचा नामजप सुरू ठेवला. वडील देवळात पोहोचले,तेथील अंगारा लावला,थोडा सोबत घेतला आणि प्रार्थना केली की,सर्वस्वी तुमच्या हाती आहे. माझ्या मुलीचे डोळे उघडू द्या. संध्याकाळी दर्शन घेऊन आम्ही घरी गेलो आणि सकाळी माझे डोळे आपोआप उघडले,त्यानंतर पुढील औषधोपचार सोपा होऊन आठवड्याभरात डोळे पूर्ववत झाले.
असे अनेक लहान मोठे अनुभव वडिलांना अनुभवता आले आणि महाराजांच्या चरणी त्यांची श्रद्धा दृढ होत गेली. गजानन विजय ग्रंथाच्या सोळाव्या अध्यायात शेवटी म्हटलं आहे.....प्रचीती वीण कवणाची/परमार्थी न निष्ठा बसे/ती एकदा बसल्यावर/मग मात्र होते स्थीर/संत सेवा महाथोर/हे भाविक जाणती/
वडिलांना जशी प्रचिती आली तशीच त्यांच्या सान्निध्यात राहून आम्हा तीन बहिणींना पण ती जवळून अनुभवता आली. वडील नियमाने विजय ग्रंथाचे पारायण करायचे. मी लहानपणापासून त्या गोष्टीची साक्षीदार आहे. वडिलांची पारायण करण्याची पध्दत काही औरच होती. पारायण करीत असताना,कुणी मनातल्या मनात वाचतं. कुणी हलकीशी ओठांची हालचाल करीत वाचतं. कुणी वेगाने ओळींवरून बोटं फिरवून पारायण करतात. कुणाचा गुणगुणल्या सारखा आवाज येतो. वडील अत्यंत भावपूर्ण,मोठ्याने,रसाळ पध्द्तीने पारायण करायचे. आजूबाजूनी कुणी नवखा माणूस गेला तर त्याला ते ऐकावसं वाटायचं. शेजारचे लोक नेहमी असं बोलून दाखवायचे. वडिलांचं मत असं, की जे करता ते भावपूर्ण अंतःकरणानी करा.
एक मात्र निश्चित की आम्ही तिघी बहिणी वडिलांमुळे गजानन विजय ग्रंथाच्या संपर्कात आलो आणि पुढे आम्हीही पारायण करु लागलो. जसा माझ्या तब्येतीच्या बाबतीत अनुभव आला तसाच वेगवेगळ्या वेळी घरच्या बाकी सदस्यांनाही महाराजांच्या कृपाप्रसादाचा लाभ झाला.
माझ्याहून लहान आमची दोन नंबरची बहीण,तिच्या तब्येतीच्या बाबतीत आलेला अनुभव सांगताना तर आजही अंग शहारून येतं. 1976 सालची ही गोष्ट आहे प्रथम बहिणीला ताप आला,तसे आमचे नेहमीचे डाॅक्टर होते डाॅक्टर एम. एन.मोरे पण त्यावेळी योग काही वेगळा असावा,काही कारणाने आम्ही एका वेगळ्या डाॅक्टरांना बहिणीची तब्येत दाखविली आणि त्यांचं औषध सुरू केलं
पण त्यांना काही निदान होईना आणि बहिणीची तब्येत बिघडतच गेली,ताप नाॅर्मल होत नव्हता,तिचं खाणं पिणं कमी होत गेलं, कमालीचा अशक्तपणा आला,ती बोलेनाशी होऊन शांत निपचित पडली. डाॅक्टरांना विचारलं तर ते म्हणाले, ती अशक्तपणामुळे झोपली आहे. आई वडिलांना वाटलं, असेल अशक्तपणा,काही वेळानी दादांनी (वडील) सहज अंगाला हात लावून पाहिला आणि पहाताच दादांना धस्स् झालं. अंग थंड झालं होतं आणि तिच्या ओठांच्या बाजूला दोन चार मुंग्या फिरताना दादांना दिसल्या,त्यांचा समज झाला मुलगी गेली,ते जोरात ओरडून आईला म्हणाले 'आपली मुलगी गेली 'आवाज ऐकून शेजारचे लोक आत आले. दादा घाईघाईने डाॅक्टर मोरेंना बोलवायला रवाना झाले आणि डाॅक्टरांना घेऊनच ते घरी आले. डाॅक्टरांनी तपासलं,डाॅक्टर म्हणाले ती कोमात गेली आहे. आपल्यापाशी अठ्ठेचाळीस तास आहेत या काळात ती शुद्धीवर आली तर वाचली,आपण प्रयत्न करू बाकी परमेश्वराची इच्छा. डाॅक्टरांनी तिला घरीच सलाईन लावलं आणि औषधोपचार सुरू केले. तिच्यावर सतत लक्ष ठेवून रहा हे सांगायला डाॅक्टर विसरले नाहीत.
वडिलांनी गजानन महाराजांना कळवळून प्रार्थना केली गजानन विजय ग्रंथ माथ्याला टेकला आणि उदबत्ती ओवाळून वडिलांचं पारायण सुरू झालं. निपचित पडून असलेली बहीण,आणि बाजूला चिंताग्रस्त बसलेले लोक. त्या दिवशी वडिलांच्या आवाजात एक वेगळीच आर्तता सगळ्यांना जाणवू लागली. प्रत्येक अध्यायानंतर बहिणीच्या अंगावर अंगार्याचा हात मायेने फिरत होता.दासगणूंचे रसाळ वर्णन भावनेला हात घालत होते.
...येवीतेवी मरते पोर/माझे आता साचार/पाहू करून एकवार/उपाय हा शेवटचा/ या ओव्या ऐकताना तर वडिलांसह बाजूला बसलेल्यांना हुंदका आवरणं कठीण झालं. अगदी पोथी सारखीच परिस्थिती होती. पुढे ओव्या आल्या....अमृततुल्य तुझी दृष्टी/त्याची करावी आज वृष्टी/नको करूस मला कष्टी/महापुरुषा गजानना/..
भावनांच्या हिंदोळ्यावर मन खाली वर होत होतं. पुन्हा सगळे आशावादी होत होते आणि मनापासून तब्येतीसाठी प्रार्थना करीत होते. ती प्रार्थना महाराजांच्या चरणाशी पोहोचली. डाॅक्टरांच्या उपचाराला यश आलं,दिलेला अवधी संपण्याच्या आधीच बहीण शुद्धीवर आली. तो टाईफाॅईड असल्याचं निदान झालं,अर्थातच पुढे योग्य कालावधीत तिची तब्येत ठणठणीत झाली.
आज आम्हा सर्व बहिणींची आणि आमच्या कुटुंबियांची गजानन महाराजांवर श्रद्धा आहे. आजही आम्ही एकत्र गप्पा करीत असतो तेव्हा गजानन महाराजांचा विषय निघाला की मागे घडून गेलेल्या बर्याच प्रसंगात महाराजांचा प्राप्त झालेला कृपाशीर्वाद आठवतो आणि सर्वच मनोमन महाराजांचे आभार मानून त्यांचं स्मरण करतो .श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ.अनघा विजय जलतारे. नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comments