अनुभव 3
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jun 5, 2020
"श्री "
🙏🙏जयगजानन🙏🙏
* गजानन महाराजांची लीला अपरंपार. *
आज माझं वय 85 वर्षा पेक्षा जास्त आहे. अगदी तरुण वयापासून मी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करीत आले आहे. 'गजानन महाराजांची लीला अपरंपार आहे ' हे ऐकत आले आहे. वाचत आले आहे., एवढंच काय त्याचा अनुभव देखील अनेक वेळा घेतला आहे. पण माणसाचं मन असं आहे की प्रत्येक वेळी ते साशंक झाल्याशिवाय राहत नाही. गजानन महाराज करतील ते चांगल्या साठीच,हे माहित असुनही मध्यंतरी मला आलेल्या एका अनुभवानी मला हलवून टाकलं.
झालं असं की माझा मोठा मुलगा अभय याला गजानन महाराजांचं अतिशय वेड होतं. इतकं की घराच्या बाहेर जाताना दारात उभं राहून..अनंत कोटी ब्रह्मांड नायक....हा जयघोष केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा त्याचा नेम होता पण दैव योग काही वेगळाच होता. अभयची तब्येत बिघडत जाऊन एक दिवस त्याला गजानन महाराजांनी त्यांच्या जवळ बोलावून घेतलं. तो गजानन महाराजांचा भक्त,जाऊ नये अशा वयात गेला, त्याच्या स्मृतीत गजानन महाराजांचं काही करावं असं माझ्या मनात आलं...
आमच्या वस्तीत एक हनुमान मंदिर आहे. मला वाटू लागलं की या मंदिरात जर गजानन महाराजांची मूर्ती स्थापन केली तर वस्तीतील गजानन महाराज भक्तांना निश्चितच आनंद होईल,मंदिरात तशी जागाही आहे. या कल्पनेने माझ्या मनाचा भार थोडा कमी झाला. मी तसं स्वप्न मनात रंगवू लागले. त्यातच मार्च 2016 मधे आम्हाला शेगांवला जाण्याचा योग आला. आम्ही तवेरा गाडी करून शेगांव दर्शनासाठी गेलोआणि अनायसेच मोठी गाडी नेल्यामुळे आणि शेगांवहून गजानन महाराज येणार या भावनेनी येताना तिथून मंदिरात शोभून दिसेल अशी सुंदर संगमरवराची महाराजांची मूर्ती घेऊन आलो. दुसर्या दिवशी मंदिराच्या विश्वस्थांशी बोलून मूर्ती स्थापन करण्याची कल्पना त्यांच्या समोर मांडली,स्थापनेचा खर्च,कामाचा खर्च,सर्वमहाराजांच्या कृपेने आम्ही करू शकतो हे देखील बोलून झालं. ते म्हणाले आम्ही विचार करून तुम्हाला कळवतो आणि दोन दिवसांनी त्यांनी मला कळवलं.. आम्ही मंदिरात गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना करणार नाही!आम्हाला ही मूर्ती नको.!
माझ्या सर्व उत्साहावर पाणी फिरलं,चेहरा एकदम उतरला,त्यांना दहादा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणून पाहिलं पण त्यांनी म्हटलं तुम्हाला मूर्ती बसवायची तरमंदिराच्या बाहेर एका कोपरयात बसवा पण मंदिरात हे शक्य नाही आणि त्या नंतर सुरू झाले माझ्या कसोटीचे क्षण. आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून झाली परंतु कुठे काही सकारात्मक चिन्ह दिसण्याचे नाव नाही आणि माझ्या मनावरील दडपण वाढू लागलं,दिवस तर कुणाशी बोलण्यात निघून जायचा पण रात्र झाली की ती पॅकबंद अवस्थेतील मूर्ती समोर पाहून रडू यायला लागलं, एकच प्रश्न मी विचारू लागली..महाराज माझं काही चुकलं का?तुमची इच्छा काय आहे?वेड्यासारखं रात्री त्यांच्याशी बोलायचं आणि दिवसभर त्या अनुषंगाने आल्या गेल्याशी चर्चा करायची दिवसागणिक मनावर दडपण वाढत होतं,महाराजांची काय योजना आहे कळत नव्हतं. तशात एक महिना पूर्ण झाला. 13 मार्च ते 12 एप्रिल 2016 आणि 12 एप्रिल च्या रात्री मनात एक विचार आला, आपल्या वस्तीत वेलणकर रहातात. त्यांच्या घरी मागे गजानन विजय ग्रंथ पारायण कार्यक्रम झाला होता त्यांना मूर्ती विषयी विचारून पहावे आणि मग ती रात्र संपली आणि 13 एप्रिल च्या दुपारी माझ्या सुनेची मोठी बहीण आहे बल्लाळ म्हणून तिचे मिस्टर आमच्या घरी आले त्यांच्या कानावर मी ती गोष्ट घातली,त्यावर ते म्हणाले अहो मावशी मी त्यांना ओळखतो त्यांच्याकडे दर एकादशी ला गजानन महाराजांची उपासना होत असते. आपण त्यांना अवश्य विचारू जर त्यांच्याकडे ही मूर्ती राहील तरमहाराजांच्या कृपेने सर्वच प्रश्न सुटतील.....आणि मग काय?महाराजांच्या कृपेने तसच झालं आणि माझ्या लक्षात आलं की महाराजांनी गेल्या महिनाभर मला रडवलं,माझी परीक्षा पाहिली,पण आज घडून गेलेल्या गोष्टींचा मी विचार करते तेव्हा लक्षात येतं की आपल्याला समजत नाही पण महाराजांची लीला खरंच अगाध आहे!काय झालं या काळात ?काय योजना होती महाराजांची?
1..महाराजांनी आधीच ठरवले होते की आपण कुठे आणि केव्हा प्रस्थान ठेवणार. महाराजांनी तिथे प्रस्थान ठेवलं ती तारीख 14 एप्रिल 2016,वार गुरुवार, योग गुरू पुष्यामृत. ( आणि महाराज त्या साठी स्वतः नाही का बंदिस्त अवस्थेत राहीले? )
2...दर एकादशीला मूर्ती समोर ऊपासना आणि नामस्मरण होतं.
3..गुरू पुष्यामृत योगावर मूर्ती समोर पारायणाचा कार्यक्रम झाला.
4...मागील चातुर्मासात महाराजांच्या मूर्ती च्या साक्षीने गण गण गणात बोते चा 6कोटी पेक्षा जास्त जप झाला.
5...यंदाही जप सुरू आहे.
6...महाराजांच्या साक्षीने विद्याताई पडवळ यांच्या गजानन विजय मुखोद् गत पारायण कार्यक्रमाला पाचशे लोकांची उपस्थिती राहून भव्य कार्यक्रम झाला. मला त्यात अन्नदानाचा आनंद घेता आला.
या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा लक्षात येतं की महाराजांनी माझी परीक्षा पाहिली खरी,पण खरं सांगायचं तर माझाच विश्वास कमी पडला,महाराज करतात ते चांगल्या साठीच ही खूण गाठ आता तरी मी मनात बांधू शकले तरी मिळवलं.
त्यामुळे दासगणूंच्या शब्दात सांगायचं तर मी एवढेच म्हणीन.....
ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोर साचे !
ते साकल्ये वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य..!
अनुभव.. उषा दत्तात्रेय बडकस.
शब्दांकन....जयंत वेलणकर. 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजां विषयी काही अनुभव असतील तर स्वागत आहे..
......................................जय गजानन.
१२ ऑगस्ट २०१७
Comments