अनुभव - 30
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 30 🌺 )
* अगाध करणी तुझी गुरूवरा न कोणा कळे *
जय गजानन! माणसाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्या नेहमीकरीता लक्षात तर रहातातच, पण जर आपण त्यापासून काही धडा घेतला तर त्या घटना आपल्याला बरच काही शिकवून जातात. सद्गुरू गजानन महाराजांची भक्ती करणारे आपण सर्व भक्त अशा काही अनुभवांमधून गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवून भक्ती करीत राहिलो आणि महाराजांची लीला,त्यांची करणी,आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे,हे जर समजून घेऊ शकलो तर संत म्हणतात त्या प्रमाणे आपली वाटचाल योग्य दिशेने होते आहे,असं आपण म्हणू शकू.
मी माझं भाग्य समजते की मी गजानन महाराज आणि गजानन विजय ग्रंथाच्या संपर्कात आले. मी आठव्या वर्गात होते,आम्ही ज्यांच्या घरी भाड्यानी रहायचो त्यांच्या घरी गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. त्या काकू आईला म्हणायच्या,तुमच्या दोन्ही मुलांना ( मी आणि माझा भाऊ) प्रगट दिनाला पोथी वाचायला लावा. तिथून माझी पोथी सुरू झाली,ती लग्नानंतरही सुरूच राहिली. अगदी मिस्टरांच्या नोकरीच्या बदली मुळे वेगवेगळ्या गावीही महाराजांच्या कृपेने 'गजानन विजय 'वाचन सुरूच राहिले आणि शेगांवला गेल्यावर प्रथम समाधीला यथाशक्ती प्रदक्षिणा व नंतर गादी समोर पारायण,असा आनंदही महाराजांनी मला अनेक वेळा प्राप्त करून दिला. पारायणाच्या आनंदासह महाराजांनी प्रचिती पण अनेक वेळा दिली. गजानन महाराजांविषयी आलेल्या अनेक अनुभवांपैकी सोमवती अमावस्येला आलेला एक अनुभव नेहमी करीता लक्षात रहावा असाच आहे.
2016 ची ही गोष्ट आहे. मिस्टरांची बदली झाल्यामुळे त्यांना औरंगाबादहून कोल्हापूरला शिफ्ट व्हावं लागलं. मी मात्र दोन मुलांसह औरंगाबादलाच रहात होते. तेव्हा मी घरी महाराजांचा प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा करीत असे. त्या वर्षी प्रगट दिन एक मार्च ला आला होता. महाराजांसमोर काय करता येईल?यावर विचार सुरू होता. असं वाटलं एकवीस दिवसात एकवीस पारायणं करावीत,एकविसावं पारायण प्रगट दिनाला करू या. ते लीप इयर असल्याने फेब्रुवारी एकोणतीस दिवसांचा,म्हणजे 10 फेब्रुवारी पासून पारायणाला सुरुवात करावी लागणार.
असा सर्व तारखांचा हिशेब मनात सुरू होता आणि 25 जानेवारी ला नागपूरात सासर्यांचं निधन झालं. अंत्यविधी आणि पुढील क्रियांसाठी म्हणून मी व मुलं घरच्या गाडीने नागपूरात हजर झालो. आता सहा सात फेब्रुवारीला तेरावा चौदावा व पुढे 'उदकशांत.' मात्र आठ फेब्रुवारीला अमावस्या येत होती, 'सोमवती अमावस्या 'त्यामुळे दिरांनी उदक शांत 9 फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात विचारांचं द्वन्द्व सुरू झालं. जर आपण 10 फेब्रुवारीला इथून निघालो तर एकविसावं पारायण प्रगट दिनाला कसं येऊ शकेल?मग दुसर्या मनाने उचल खाल्ली की आपण 8 फेब्रुवारीलाच निघू औरंगाबादला पंधरा दिवस घर बंद आहे तेव्हा 9 फेब्रुवारीला साफसफाई करून घेऊ म्हणजे 10 पासून पारायणं सुरू करता येतील.
8 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता मी आणि दोन मुलं,आम्ही औरंगाबादसाठी अमरावती रोडने निघालो. अमरावती रोड फोर लेन आहे मधे डिव्हाइडर,आणि दोन्ही बाजूंनी वेगाने वाहतूक सुरू असते. साधारण एकशे तीस कि.मी.अंतरावर 'तिवसा 'हे गाव येतं ते क्राॅस करून आम्ही पुढे निघालो ,80,90.च्या स्पीडने गाडी पुढे जात होती,मोठा मुलगा श्रीराम बाजूला सीट वर होता तर धाकटा 'तेजस 'गाडी चालवत होता. मी मागच्या सीटवर होते. समोर डॅशबोर्डवर गजानन महाराज विराजमान होते. माझे विष्णू सहस्त्र नामाचे पाठ सुरू होते,मुलगा रामरक्षा मारुती स्तोत्र म्हणत होता. गजानन विजय ग्रंथही जवळ होता. अशा वातावरणात प्रवास सुरू होता. फोर लेन रस्ता असल्याने वाहतुकीत अडथळ्याची शक्यता कमी होती. पण वाहतूक नियम धाब्यावर बसवणारे लोक केव्हा कुणाला कसे अडचणीत आणतील सांगता येत नाही. वाटेत एका ठिकाणी डिव्हाइडरवर वाढलेल्या झाडामागून अचानक एक ट्रॅक्टर रस्त्यावर आला. आता ब्रेक दाबून गाडी थांबविणे शक्य नव्हते,गाडी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली असती. म्हणून मुलाने गाडी डावीकडे घेतली जेणेकरून गाडी ट्रॅक्टरच्या समोरून पुढे निघेल,तशी ती निघालीही पण डावीकडे खोल खड्डा आणि त्याला लागून शेत होतं. म्हणून रस्त्यावर आणण्यासाठी गाडी उजवीकडे घेतली,आता ती डिव्हाइडरवर आपटण्याची भिती होती म्हणून गाडीला ब्रेक लावत पुन्हा डावीकडे वळवली आणि काय होतय हे कळण्याच्या आत पुन्हा शेतीच्या बाजूला येत गाडी डाव्याबाजूला पलटली,मग गाडी पूर्ण उलटी झाली,मग उजवी बाजू खाली झाली मग पुन्हा एकदा कुस बदलावी तशी पलटून गाडी सरळ होऊन थांबली. पुढची दोन चाकं खड्ड्यात मागील दोन चाकं उंचवट्यावर अशी तिरपी गाडी. हे सगळं काही मिनिटात घडलं. त्या काही मिनिटात एक मुलगा ड्रायव्हींगवर लक्ष देण्याचा प्रयत्न करीत होता,मोठा मुलगा आई गं,'धावरे गजानन बाबा', असं ओरडत होता आणि मुलांची आई गजानन महाराज तुम्हीच आहात आता तुम्हीच आहात असं म्हणत होती. गाडी थांबली आम्ही तिघं गाडीतून खाली उतरलो तिघांनाही साधा ओरखडाही आला नव्हता. गाडीच्या उजव्या बाजूच्या आणि मागील बाजूच्या काचेचा पूर्ण चुराडा झाला होता. ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटच्या मधील छताचा भाग दगडावर आपटून सहा इंच खाली आला होता. आता बघ्यांची गर्दी जमा होऊ लागली होती. अर्थात मदतही मिळाली,मिस्टर आणि दीर लगेच यायला निघाले.
आम्ही गाडीच्या बाजूला उभे होतो,मुलगा अस्वस्थपणे मला म्हणाला आई डॅशबोर्डवर गजानन महाराज दिसत नाहीत. मग आम्ही तिघांनीही आजूबाजूला,गाडीत,बराच शोध घेतला पण ते कुठेच दिसले नाहीत आणि तेव्हा ते एक गुढच राहिलं. नंतर मिस्टर आणि दीर आल्यावर कार कंपनीत फोन करून गाडीची पुढील व्यवस्था करायला सांगितली आणि आम्ही एफ. आय. आर. साठी तिवसा पोलीस स्टेशन गाठलं. तिथला पोलीस यांना म्हणाला,'साहेब तो स्पाॅट डेंजरस आहे. 'मी मागील दीड वर्षापासून इथे आहे,या काळात तिथे बरेच अपघात झालेत आणि ते सर्व फॅटल होते. (जीवाची हानी होणारे)इतक्या मोठ्या अपघातात या लोकांना साधा ओरखडाही येऊ नये,हे कल्पनेच्या बाहेरचं आहे.
सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही पुन्हा नागपूरला परतलो. मी मुलांना म्हटलं मोठ्या संकटातून महाराजांनी तारलं आहे,आता प्रथम शेगांवला दर्शन घेऊन नंतरच मी औरंगाबादला येणार. 9 तारखेला उदक शांत होऊन आम्ही बसनी शेगांवसाठी निघालो .दहा तारखेला शेगांवला पारायण केलं पुढील पारायणं रीतसर ठरल्या प्रमाणे घरी पार पडलीत आणि प्रगट दिन एकविसाव्या पारायणाने साजरा झाला.
पोथीमधे बाळाभाऊंनी भाऊ कवरांना म्हटल्याचा उल्लेख आहे की.....मानवाचे अवघे बेत/सिध्दीस जाणे अशक्य/संतांच्या जे असेल मनी/तेच येत घडोनी/भरवसा त्यांचे चरणी/ठेवून स्वस्थ असावे.. महाराजांनी मला उदक शांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवून,पारायणाची सुरुवात शेगांवहून करून घेतली,कल्पनाही केली नव्हती असा सुंदर प्रगट दिन पण करवून घेतला. म्हणूनच महाराजांसमोर हात जोडले की तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडतात 'अगाध करणी तुझी गुरूवरा न कोणा कळे '
कार कंपनीच्या वर्कशॉपमधे गेली होती,ती पुढे पूर्ण चांगली होणार होतीच,चार दिवसांनी तिथल्या वर्क मॅनेजरचा फोन आला,मॅडम लवकरात लवकर गाडी करण्याचा प्रयत्न करतो,आणि हो..तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी चेक केलं,डॅशबोर्डला थोडी गॅप होऊन आत गजानन महाराजांची मूर्ती अगदी सुखरुप आहे. मी मुलांना ती माहिती दिली आणि स्वाभाविकपणेच आम्ही एकत्र जय घोष केला..श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ.अंजली प्रशांत पट्टलवार.
औरंगाबाद.
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comments