top of page

अनुभव - 32

Updated: Jun 18, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* मी गेलो ऐसे मानू नका,भक्तीत अंतर करू नका *


जय गजानन! शेगांवच्या वाटेवर चालायला मला माझ्या आईनं शिकवलं. माणसाच्या मनात प्रबळ निष्ठा असेल आणि दैवतावर निस्सीम प्रेम असेल तर बाह्य परिस्थिती माणसाच्या भक्तीत फारसे अडथळे आणू शकत नाही. वास्तविक आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती,आईला नोकरी करणं भाग होतं. ती रेल्वे मेन्स प्रायमरी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. गजानन महाराज तिचं दैवत! आम्ही जिथे रहायचो तिथून शाळा तीन ते चार कि.मी.अंतरावर होती. बस आणि रिक्षाचे पैसे वाचवून आई रोज पायी शाळेत जायची ते पैसे बाजूला ठेवून शेगांवच्या तिकीटाचे पैसे जमले की शेगांवची वारी करायची.

अस्मितेने जगा,आपलं गार्हाणं सांगायचच झालं तर गजानन महाराजांना सांगा,आर्ततेने हाक मारा,ते तुमच्या हाकेला ओ देतीलच अशी शिकवण देत देत तिनं आयुष्य घालवलं. 2008 साली आईने जगाचा निरोप घेतला.

वडील एका टाॅकीज मधे बुकींग क्लर्क होते,चार मुली एक मुलगा,घरभाडे,अत्यल्प मिळकत,ह्या सर्व रेट्यात त्यांचा प्रवास 2003 मधेच पूर्ण झाला. कशी बशी बहिणींची लग्न झालीत. खाजगी पध्द्तीने मला थोडेफार पैसे मिळू लागले होते आणि मीही लग्नाच्या बेडीत अडकलो.

इ.स.2015 ची ही गोष्ट आहे,मी,बायको आणि आमची एक मुलगी,आम्ही तिघं भाड्याच्या घरात रहात होतो. कसा बसा संसाराचा गाडा रेटत होतो. जे काही थोडंफार कमवत होतो तो पैसाही कमी मिळू लागला. उधारी वाढत गेली,घरभाडं थकत गेलं,अनेक महिन्यांचं भाडं थकलं. घरमालक चांगला म्हणूनच त्यानी रस्त्यावर काढलं नाही,त्यालाही कळत होतं की याची नियत चांगली आहे,हा काम शोधतो आहे,पण नशीब साथ देत नाही. मी ही शरीराने आणि मनाने थकून गेलो होतो. नको ते विचार मनात डोकावू लागले आणि आईच्या शब्दांची आठवण झाली. मी माझी कैफीयत शेगांवला जाऊन सांगण्याचं ठरवलं. बायकोला सांगितलं मी एक आठवड्यात परत येतो. जेमतेम एक वेळच्या तिकीटाचे पैसे आणि फार तर दहा वीस रुपये वरती,एवढेच पैसे होते .एका शबनम बॅग मधे दोन चादरी आणि एक ड्रेस ठेवला आणि शेगावची वाट धरली.

शेगांवला पोहोचताच नाग मंदिराच्या बाजूला जो मोकळा हाॅल आहे तिथे चादर घालून निवार्याची जागात निश्चित केली. त्यानंतर पुढील सात दिवस,चार सव्वाचारला उठणे,नंतर शुचिर्भूत होऊन पहाटे पाच वाजता खाली मूळ स्वरूपातील मूर्तीचं दर्शन घेणे आणि नंतर पारायण गृहात गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणे,नंतर महाप्रसाद घेऊन तृप्त होणे. जवळ पैसे नव्हते त्यामुळे संध्याकाळी जेवणाचा प्रश्नच नव्हता. पूर्ण सात दिवस एकवेळ जेवून महाराजांच्या अनुसंधानात घालविले, त्यांच्याच कृपेने तब्येतही ठीक राहिली. सातव्या दिवशी निरोप घेण्यासाठी महाराजां समोर उभा झालो,डोळ्यातून अश्रू वाहत होते,महाराजांना म्हटलं,आज मी परत निघतोय,तुम्ही जाणताच तिकीटाचेही पैसे जवळ नाहीत पण सांभाळून घ्या. मी शुध्द मनाने निघतो आहे. मला माझं पुण्य किती,माहिती नाही,पण मला वाटतं माझ्या आईची पुण्याई खूप होती. तिच्या सल्ल्यानुसार माझं गार्हाणं तुमच्या समोर मांडलं आहे,आता अधिक काय बोलू? येतो मी.

मी परतीच्या प्रवासात ठरवलं होतं की टी. सी. आलाच तर त्याला सगळं खरं सांगायचं,खोटं बोलायचं नाही. जे होईल ते होऊ दे. जनरलच्या त्या डब्यात त्या दिवशी टी.सी. आला पण आश्चर्य म्हणजे माझ्या आजूबाजूला सर्वांकडे तिकीटाची चौकशी केली,पण माझ्याकडे पाहिलंही नाही आणि निघून गेला. गाडी नागपूर स्टेशनला थांबली मी सुखरुप बाहेर पडलो. मी 'सिताबर्डी 'भागात येऊन पोहोचलो,तिथे कसं काय कोण जाणे अचानक अशी प्रेरणा झाली की 'राजाराम वाचनालयात जा'! मी पंचवीस वर्षांपूर्वी लहानपणी कधी तिथे गेलो होतो,माझी पावलं त्या दिशेने वळली .तिथे समोर मला वर्तमान पत्र दिसले मी ते चाळू लागलो आणि माझी दृष्टी एका चौकटीवर येऊन थबकली,तिथे लिहीलं होतं 'सहकार नगर गजानन महाराज मंदिरात पुजारी हवा 'अपेक्षा-पूजेचे कार्य व्यवस्थित करणे. निवासाची सोय मंदिरातर्फे करण्यात येईल..फोन नं.'.. मी त्या नंबर वर फोन केला,त्यांनी दोन दिवसांनी भेटीला बोलावले.

शेगांवला महाराजांनी माझं गार्हाणं ऐकलं,सात दिवसाच्या आत माझा प्रश्न मार्गी लावला.अनेक लोकांमधून गजानन महाराजांच्या मूर्तीची पूजा करण्याची जबाबदारी माझ्या वर टाकण्यात आली. निवासाचा प्रश्न सुटला. नागपूरात सहकार नगरला गजानन महाराज मंदिराची विस्तीर्ण जागा आहे.

रस्त्याला लागून थोडं आत मंदिराचा मुख्य प्रवेश दरवाजा,तिथून तीन चार पावलावर तुळशी वृंदावन ,तिथून तीन चार पावलावर मंदिराच्या पायर्या आणि दार. आत मंदिरात प्रवेश केला की साधारण पंधरा पावलावर पादुका,पुढे गाभारा आणि त्यात महाराजांची मूर्ती. पायर्या चढून मंदिरात आलं की उजव्या कोपर्यात एक तक्तपोस ठेवला आहे,तिथे वर महाराजांचा मांडी घालून प्रसन्न चित्त बसलेला मोठा फोटो आहे. तिथेच कोपर्यात एका छोट्या रॅकमधे काही गजानन विजय ग्रंथ ठेवले आहेत. मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा आरती होते,दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या गुरूवारला भरपूर असतेच पण अन्य दिवशी पण बरेच भाविक येतात. सकाळी बाराच्या सुमारास नियमाने सहा सात भाविक दर्शनाला येतात,मी साधारण त्याच सुमारास पादुकांच्या भोवती स्वच्छ पुसून,मंदिराचं दार बंद करून पुन्हा संध्याकाळी दर्शनासाठी उघडतो.

शुक्रवार,20 ऑक्टो.2017 ची ही गोष्ट,दिवाळी पाडव्याचा तो दिवस होता. आदल्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने मंदिरातील फोटोंना हार घातले होते, बरेच लोक दर्शनाला येऊन गेले होते, त्या दिवशी साधारण साडेअकराच्या सुमारास मला काही तरी विचित्र वाटायला लागलं,मंदिरात एक अस्वस्थ करणारी गूढ शांतता जाणवत होती. मंदिरात अन्य कामासाठी असलेला एक कर्मचारी आवारात दूर कुठे गेला होता. पावणे बारा वाजत आलेत,पण त्या दिवशी नेमाने येणार्या भाविकांपैकी एकही मंदिरात वळला नाही. मी पादुकांच्या बाजूला खाली मान करून साफ करीत उभा होतो,अचानक कुणी ट्रक भर गुलाबाची फुलं बाजूला ठेवावीत असा घमघमाट सुटला,कुणीतरी बाजूला आहे असं जाणवलं,मी बाजूला पाहिलं आणि नखशिखांत शहारलो,मी खालून वर पहात गेलो,प्रथम गुडघ्या पर्यंत आलेले हात दिसले,बाजूला एक सहा फूट उंच अजानुबाहू पुरूष उभा होता. अंगात मळकट गुंड्या तुटलेला हाफ शर्ट,खाली बरमुडा वजा पैजामा,डोळे असे भेदक की नजर आपल्या शरीराला भेदून आरपार निघून जाईल. मला एक उष्णता जाणवायला लागली. काय बोलावं सुचेना कसं तरी मी म्हटलं मी येथील पुजारी आपण..मला तोडत म्हणाले हो आम्ही सर्व जाणतो!तुमच्या आईच्या पुण्याईने तुम्ही आहात. बरं,हिशेब वगैरे ठेवता की नाही?काही पैसे द्यायचे आहेत,काढा पावती पुस्तक असं म्हणून एक खुर्ची ओढून त्यावर बसले. अंगातील शर्ट काढून टाकला,म्हणाले हां आता कसं आम्ही आमच्या वेषात आलो. खांद्यावरील बॅग मधून दोन हजाराच्या चार नोटा काढल्या आणि पाचशेच्या सहा. मग म्हणाले हं आता आम्हाला आवडणारा आकडा झाला. हे घ्या अकरा हजार. मी म्हटलं नाव काय लिहू?म्हणाले लिहा. 'गजानन महाराज 'मी म्हटलं अहो असं नाव नाही लिहिता येणार तर म्हणाले न लिहायला काय झालं? सगळीकडे आमचं नाव मिरविता मग इथे का नाही?ठीक आहे असं करा शेगांवला आम्हाला नारायण म्हणतात तुम्हीही नारायण लिहा. मी सवयीने पावती आणि खडीसाखर त्यांना देऊन नमस्कारा साठी खाली वाकलो, जय गजानन म्हटलं आणि त्यांचा स्पर्श माझ्या डोक्याला जाणवला,जणू प्रचंड विद्युत प्रवाहाचा संचार व्हावा तसं होऊन मी घामाघूम होऊन गेलो. ते उठले कोपर्यातील फोटो कडे त्यांनी पाहिलं,म्हणाले हा हार आमचा आहे मग म्हणाले गजानन विजय ग्रंथ मिळेल का?मी यंत्रवत पुढे होऊन एक पोथी काढली आणि त्यांना देणार तोच फोटोचा हार आपोआप खाली पडला,त्यांनी झटकन जमिनीवर टाकलेला शर्ट,पोथी,आणि तो हार जवळच्या पिशवीत ठेवला. म्हणाले येतो आम्ही आणि मी पहाताच राहिलो तुळशी वृंदावनापर्यंत ते गेले आणि दिसेनासे झाले. मला काही सुचेना,भानावर आलो आणि वरती घरात शिरलो,बायको वेड्यासारखी माझ्या कडे पहायला लागली तिला म्हटलं मला आंघोळ करायची आहे. आंघोळकरून शरीर थोडं शांत झालं,बायकोला सगळा प्रकार कथन केला,मग मनही थोडं शांत झालं. त्या दिवशी आईच्या पुण्याईने मला महाराजांनी प्रचिती दिली होती. 'मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. '

आम्ही मंदिरातील सी. सी. टी.व्ही. कॅमेरा चेक केला तर त्यात फक्त माझ्या हालचाली दिसल्या. अन्य कुणीच दिसलं नाही. मी प्रसाद देताना दिसलो,पण कुणाला दिला ते दिसलं नाही. पैसे घेताना दिसलो,पण अकरा हजार कुणी दिले ते दिसलं नाही. मंदिराच्या व्यवस्थापनाने ते अकरा हजार रुपये महाराजांचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवावे असं ठरवलं आहे. आणि हा सर्व प्रसंग आयुष्यभर जपून ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी सहाय्यभूत ठरणारा जप सोबत असणारच आहे... श्री गजानन ! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव-- जितेन्द्र विनायक करमरकर नागपूर

शब्दांकन --जयंत वेलणकर 9422108069

आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसल्यासस्वागतआहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Commentaires


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page