top of page

अनुभव - 33

" श्री "

गजानन महाराज की जय ( अनुभव 33 🌺 )

* अगाध सत्ता संतांची *


जय गजानन! माणसाच्या आयुष्यात ज्या काही बर्या वाईट घटना घडतात त्याचा परिणाम होऊन माणसाचं व्यक्तिमत्व घडत जातं. माझ्या आयुष्यात अनेक वेळा मी शारिरीक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या पार तुटून जाण्याचा योग आला पण गजानन महाराजांच्या कृपेने मी त्यातून सावरल्या गेले मात्र त्याचा परिणाम असा झाला की आता मी त्यांच्या समोर बसते, संभाषण करण्याचा प्रयत्न करते,तेव्हा जसं एखाद्या मुलीनी तिच्या वडिलांशी किंवा आजोबांशी बोलावं,किंवा प्रसंगी थोडं भांडल्याचा स्वर असावा,तसं काहीसं माझं होतं. ते नेहमी माझं ऐकतातच असं नाही,पण तिथे आपल्या लक्षात येतं की 'बालकाचे हित माऊलीवीण कोण जाणे?' पण बहुतांश वेळा ते आपला प्रामाणिक हट्ट ऐकतात. अर्थात हा अनुभव माझ्यासह अनेक गजानन महाराज भक्तांचा आहे. गजानन महाराज त्यांच्या भक्तांसाठी जीवन जगण्याचा एक फार मोठा आधार आहे.

इ.स.2005 मधे मी माझ्या दोन मुलींसह वर्ध्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात ऑडीट सेक्शनला नोकरी मिळाली. साधारण त्याच सुमारास सीमालाही तिथेच नोकरी लागली. ती माझ्या पेक्षा दहा वर्षानी लहान,पण चांगली मैत्री व्हायची असेल तर वय कधीच आड येत नाही. सीमा मला मॅडम म्हणू लागली पण आमची मैत्री दृढ झाली. सीमाचं लग्न इ.स.2004 मधे झालं. सर्वसामान्य स्त्रीला मातृत्वाची ओढ असते तशी ती तिलाही होती. तिची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्यामुळे तिला नोकरी करणं भाग होतं,अशात तिने स्वतःच्या पसंतीने लग्न केल्यामुळे घरुन फारसं सहकार्य असं नव्हतं.

लग्नाला चार वर्ष होत आलीत,या काळात सीमाला मिसकॅरेज होऊन चार ते पाच वेळा मातृत्व पदाने हुलकावणी दिली. सीमा मानसिक दृष्ट्या पार खचून गेली,तिचा धीर संपत चालला. ती माझ्या जवळ तिचं मन मोकळं करायची,म्हणायची मॅडम गजानन महाराजांजवळ माझ्या साठी काही बोला नं!तशात 2008 साली वर्ध्याला गजानन महाराजांवर एक मोठ्या प्रमाणावरील नाटकाचा शो जाहीर झाला. मी आग्रहाने सीमाला नाटक पाहण्याचा सल्ला देऊन नाटकाच्या उत्कट क्षणी महाराजांना विनंती करण्याचा सल्ला दिला. सीमा तिच्या सासूबाईंसोबत त्या दिवशी नाटकाला गेली अन् फारच प्रभावित झाली. सर्व उपस्थितांना झुणका भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला.

योग चांगला जुळून आला,सीमाने काहीच दिवसात मला गुड न्यूज दिली. त्या दिवशी माझ्या गळ्यात पडून ती खूप रडली. म्हणाली मॅडम मला मुलगी हवी आहे,पण या आधी झालं तसं व्हायला नको. तुम्ही प्लीज गजानन महाराजांना माझ्या साठी साकडं घाला. म्हटलं ठीक आहे, उद्या अनायास गुरूवार आहे,सकाळी प्रथम महाराजांच्या मंदिरात जाऊ,नंतर डाॅक्टरांकडे. डाॅक्टरांचा पूर्ण सल्ला नीट ऐकायचा. म्हणाली ठीक आहे उद्या साडेनऊला मंदिरात भेटू या!

दुसर्या दिवशी सकाळी मगनवाडी येथील गजानन महाराज मंदिरात मला चक्क साडी परिधान केलेली पाहून सीमा कुतुहलाने पाहू लागली,तिला म्हटलं बाई गं आज तुझ्या साठी मी अक्षरशः महाराजांसमोर पदर पसरून मागणी करणार आहे आणि आजच नाही,इथून प्रत्येक गुरूवारी मी महाराजांसमोर हे मागणं मागणार आहे. तेथील पुजारी हे सगळं ऐकून प्रसन्न हसले आणि मनोमन आम्हाला साथ देण्याचं ठरवून म्हणाले ,आत या आणि जे काही बोलायचं ते बोला. मनात म्हटलं देव पावला. मी महाराजांसमोर बसले,उदबत्ती ओवाळली,सीमा लक्षपूर्वक ऐकत होती,..'महाराज तुम्ही सर्व जाणताच. तुम्हीच सर्व ठीक करणार आहात,पण तरीही सध्या चार गोष्टी तुम्हाला सांगते आहे. एक.. या वेळी आधी सारखं न होता गोष्ट पूर्णत्वास न्या. दोन..तिची आर्थिक स्थिती तुम्ही जाणता या सगळ्यात तिची नोकरी सुटायला नको. तीन.... बाळंतपणाचा खर्च आम्हाला फार झेपणार नाही तिकडेही लक्ष असू द्या आणि चार..तिला मुलगी झाली तर आम्हाला आनंद होईल. ' बाळंतपणानंतर मी स्वखर्चाने तिच्या बाळाला दर्शनासाठी शेगांवला घेऊन येईन.माझी प्रार्थना संपली,मिनिटभरानंतर मी डोळे उघडले,म्हटलं चला डाॅक्टरांकडे जाऊ. आमची नोकरी तिथेच असल्यामुळे डाॅक्टरांनी आपुलकीनी तपासलं. केस हिस्ट्री समजून घेतली आणि प्रथम दोन महिने बेड रेस्ट सांगितली. या सगळ्या काळात बाकी लोकांसह ऑफिसनी छान साथ दिली. तिथे राहून तिला काम करण्याची अनुमती दिली. दोन महिन्यानंतर डाॅक्टरांनी तपासून सांगितलं की केस कठीण आहे. आम्हालाही शिकण्यासारखं यात आहे. सारखं सारखं ब्लिडींग हा काळजीचा विषय आहे. धिस सिम्टम इज रेअर,बट इट इज देअर. आपण काळजी घेऊच. त्या लक्षणा सह आणि चिंतायुक्त काळजीसह सीमानी नवव्या महिन्यात प्रवेश केला. बाकी कुणी काही उत्साह दाखविणार नव्हतंच त्यामुळे मी तिचा पाळणा करण्याचा निर्णय घेतला. घरच्या गच्चीवर,जुलै शेवट किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा होता. तो दिवस आला,संध्याकाळी कार्यक्रम होता. पावसाळ्याचे दिवस,विदर्भात खूप पाऊस होतो असं नाही पण जुलै ऑगस्ट या काळात येणारा पाऊस कधी झड लागणारा तर कधी धो,धो .नेमका त्या दिवशी सकाळपासून पावसानी जोर धरला. काळेभोर ढग. धो धो पाऊस. थांबायचं नाव नाही,मी सगळ्यांना निरोप देऊन ठेवले होते. माझा महाराजांवर पूर्ण भरवसा होता. मी पोथी वाचायला बसले. तेरावा अध्याय वाचायला घेतला... तै महाराज म्हणाले झ्यामसिंगा/ऐसा सचिंत होसी कागा/तुला न उद्या देईल दगा/हा पर्जन्य कधीही/आताच मी वारितो त्यासी/ऐसे बोलून आकाशासी/पाहू लागले पुण्यराशी/तो आभाळ फाकले/मेघ क्षणात निघून गेले/सर्व ठायी उन पडले/हे एका क्षणात झाले/ अगाध सत्ता संतांची/....महाराजांना म्हटलं हा पावसाळा आहे हे खरंच .पाऊस यायलाच हवा. पण मी तुम्हाला सांगून कार्यक्रम ठरवला ,आता सर्व जबाबदारी तुमची. मी पुढील कामाला लागते..मी रेनकोट चढवला ,लाईट वाल्याच्या दुकानात पोहोचले. संध्याकाळी दोन लाईट लावायला सांगितले , त्याने प्रथम आभाळाकडे मग माझ्याकडे पाहून चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणले त्याला सांगितलं बाकी चिंता करण्याचं तुमचं काम नाही. तीच गोष्ट कॅटरिंगचं काम करणार्या बाईंची आणि सजावट करणार असलेल्या व्यक्तीची झाली. सीमाचा फोन आला तिलाही सांगितलं 'तू साडेपाचला माझ्याकडे येते आहे,'पावसाची काळजी गजानन महाराजांवर सोपवली आहे आणि फोन बंद केला

साडेपाच वाजले आणि पाऊस अचानक थांबला. नुसता थांबला नाही तर रात्री साडेआठ पर्यंत सुंदर कार्यक्रम पार पडला,सीमाला घेऊन तिचा नवरा घरी परत पोहोचला आणि पुन्हा धो धो पाऊस सुरु झाला.

नउ महिने पूर्ण झाले होते,3 सप्टेंबर 09 सिझेरियनची तारीख ठरली. मी मंदिरातून अंगारा घेऊन दवाखान्यात पोहोचले,विशेष अनुमतीने अंगार्याचं बोट मी पोटाला लावलं,सीमानी डाॅक्टरांना सांगितलं की माझं बाळ सर्वात पहिले स्वाती मॅडमच्या हातात द्यायचं. मधल्या काळात आम्ही पेशंटची आर्थिक स्थिती आणि तो इथलाच कर्मचारी आहे हे लक्षात घेऊन फी आकारण्याची विनंती करून ठेवली होती. त्या दिवशी सीमाला कन्या रत्न प्राप्त झालं,सीमाची नोकरीही टिकून राहिली आणि तिच्या बाळंतपणाचं बिल काढण्यात आलं रू.सहाशे. या वेळी महाराजांनी माझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. मी स्वखर्चाने सीमाला बाळासह शेगांवला नेऊन माझा नवस पूर्ण केला. त्यावेळी तिचा नवरा शेगांवला आला नाही,पण आज परिस्थिती बदलली आहे. सर्व कौटुंबिक वातावरण चांगलं होऊन पूर्ण कुटुंब गजानन महाराजांच्या भक्तीत रस घेऊ लागले आहे.

सीमा तर या सर्व प्रसंगात गजानन महाराजांच्या कृपेने इतकी आनंदीत झाली की मॅडमचं स्वाती नाव आहे त्यातील अक्षर तरी आपल्या मुलीच्या नावात असावं म्हणून तिने तिच्या मुलीचं नाव 'स्वरा 'ठेवलं. बारश्याच्या दिवशी सीमा मला म्हणाली मॅडम तुम्ही काही तिच्या कानात बोलानं,मी लगेच खाली वाकले आणि स्वराच्या कानात हळूच सांगितलं...श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--स्वाती देशमुख वर्धा

शब्दांकन --जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

1 Comment


Veena Karandikar
Veena Karandikar
Jul 03, 2020

श्री गजानन विजय ग्रंथ व आत्मचिंतन - भाग 1 सोडवल्यावर भाग 2 चे प्रश्न whatsapp वर येत नाहीत.

भाग 2, तसेच 3, 4, 5....... कसे सोडवता येतील?

माझा whatsapp No. 9821404409

Like

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page