अनुभव - 34
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 34 🌺 )
* ते नाणं , ' भाव भक्तीचं ' *
जय गजानन! आपण गजानन महाराजांची भक्ती करतो, गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो. पण बरेचदा माझ्या मनात येतं , आपण ओवी वाचतो,पण त्यावर मनन किती करतो?ओळ वाचतो पण पचवतो का?अर्थात हे माझं मनोगत आहे. त्यामुळे मी माझ्या पुरतं बोलतो आहे. मी अनेकदा पोथीत भाऊ कवरांचा प्रसंग वाचला आहे.... गुरुराया कृपारासी/नको उपेक्षू लेकरासी/ही शिदोरी सेवण्यासी/यावे धावून सत्वर/थोर आपुला अधिकार/क्षणात पाहता केदार/मग या या येथवर/का हो अनमान करीतसा/.... हे मी वाचतो पण प्रत्यक्षात काय झालं की मी वयानी मोठा होत असताना आणि चांगला इंजिनिअर होत असताना,माझ्यातील भाबड्या भक्तीने मला सुचवलं की आपण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो तर सोबत गजानन विजय ग्रंथ घेऊन फिरायचं आणि त्या माध्यमातून गजानन महाराजांना त्या ठिकाणाचं दर्शन करण्यासाठी न्यायचं. मग काय?सात आठ ज्योतीर्लिंग ,द्वारका,बदरीनाथ, वृंदावन,मथुरा आणि कळस म्हणजे पंढरपूर सुध्दा. अशा प्रत्येक ठिकाणी विजय ग्रंथ रुपात महाराजांना घेऊन गेलो. अशा रीतीने एकदा केदारनाथला पोहोचलो. महाराजांशी संवाद केला..'महाराज हे केदारनाथ ' आमचं दर्शन झालं आणि मी बाहेर पडलो,मागे असलेल्या शंकराचार्य मठात दर्शन घेऊन परत फिरलो तो तिथे काही साधू बसले होते. मी तिकडे वळलो आणि एका साधू समोरच्या परातीत काही पैसे ठेवले आणि बाजूला होणार तोच चमकलो, माझ्या नजरेनी काही टिपलं,मी वाकून पाहिलं ,तिथे गजानन महाराजांची मूर्ती होती. एवढ्या दूर केदारनाथला गजानन महाराज?मी साधूला विचारलं 'साधू महाराज ये किसकी मूरत है? आप इन्हे जानते हो?' साधू म्हणाला 'हां बेटा ये शेगांवके गजानन महाराज है!'और इन्हे कौन नही जानता? बेटा ये तो सर्व व्यापी है. ये कहां नही?' हे सर्व ऐकून माझच मला हसायला आलं. 'क्षणात पाहता केदार ' ही ओळ मला त्या दिवशी समजली. तिथून पुढे हा दर्शन प्रकार कमी झाला आणि मनातील श्रद्धा जास्त झाली.
पुढे गजानन विजय ग्रंथाचं वाचन अधिक समरसून होऊ लागलं आणि महाराजांच्या कृपेने वेळोवेळी सुखद अनुभव सुध्दा वाट्याला आलेत.
इ.स. 1991 मधील घटना मला आठवते,त्या वेळी भारतात शेअर मार्केट मधे बूम पिरिएड होता,भरभराट होती. त्या वेळी मराठी माणूस शेअर्स वगैरे गोष्टींपासून दूरच होता. माझं शिक्षण सुरू होतं ,माझ्या मित्राच्या डोक्यात एक कल्पना आली. एका चांगल्या कंपनीचा शेअर मार्केट मधे येतो आहे ,तो विकत घ्यावा. हजार रुपये भरायचे होते. मला तेव्हा त्यातील काहीही कळत नव्हतं पण मी वडिलांना पैसे मागितले,त्यांनी अतिशय नाखुशीने हा आयुष्यातील पहिला व शेवटचा चेक,असं म्हणून माझ्या कडे चेक सुपूर्द केला. मी गजानन महाराजांचं नावं घेऊन फाॅर्म भरून दिला आणि मित्रानी असे आठ दहा मित्रांचे चेक कंपनीकडे पाठविले. शेअर्स अॅलाॅट व्हायला बरेच दिवस लागणार होते त्यामुळे ती गोष्ट माझ्या विस्मरणात गेली. मी आपला अभ्यासात गुंतून गेलो.
महाराजांचा प्रगट दिन जवळ येत होता. माझं गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू होतं.प्रगट दिन कशा पद्धतीने करावा?थोडे जास्त लोक प्रसादासाठी बोलवता येतील का?पण आपण विद्यार्थी आहोत वगैरे विचार डोक्यात घोळत होते. प्रगट दिनाच्या काहीच दिवस आधी,मला पहाटेच्या सुमारास स्वप्न पडलं. मला दिसलं की मी शेगांवला गेलो आहे. दर्शनाच्या बारीतून फिरून माझं दर्शन पूर्ण झालं. गादीचं दर्शन घेऊन मी आवारात आलो आणि भिक्षुकाच्या रुपात महाराज माझ्या समोर आले,मी त्यांना काही पैसे दिले. वास्तविक पैसे घेऊन त्यांनी निघून जायचं पण तसं न होता ते म्हणाले हात पुढे कर,तुला मी पैसे देतो आहे. 'हा पैसा तुला प्रगट दिनासाठी वापरायचा आहे.चांगल्या पध्द्तीने प्रगट दिन साजरा कर !' असं म्हणून त्यांनी माझ्या हातावर पुर्वी चलनात होतं तसं पंचवीस पैशाचं नाणं, 'चार आणे ' माझ्या हातावर ठेवले. मी नाण्यासह मूठ बंद केली आणि मला जाग आली. आतून आनंदाच्या ऊर्मी उठत होत्या. मी सकाळीच वडिलांना स्वप्न सांगितलं,त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रगटदिन करुच असा निर्णय घेतला. आमच्या गप्पा होत असतानाच ज्याने माझ्याकडून शेअर्स साठी हजार रुपयाचा चेक नेला होता तो मित्र आला,त्यानी आनंदाची बातमी आणली होती. त्याने भरलेल्या आठ नऊ फाॅर्मस् पैकी फक्त मला शेअर्स अॅलाॅट झाले होते आणि ते विकल्यास हजार रुपयाचे तब्बल साडे दहाहजार रुपये मिळत होते. महाराजांनी संकेत केला होताच,आम्ही शेअर्स विकून आलेल्या पैशातून 'प्रगट दिन 'मोठ्या प्रमाणावर करण्याच्या तयारीला लागलो.
त्यावर्षी प्रगट दिन चांगलाच मोठ्या प्रमाणावर झाला. भजन,पूजन,आरती,महाप्रसाद, सर्व साग्रसंगीत पार पडलं. अहमदाबाद सारख्या शहरात त्याकाळी 'गजानन महाराज', 'प्रगट दिन ' या विषयी फारशी माहिती नव्हती. त्या कार्यक्रमाचा परिणाम असा झाला की अनेकांनी आपुलकीने चौकशी करून पुढील वर्षापासून सर्व लोकांनी मिळून कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. आज पंचवीस वर्षे झालीत,महाराज दरवर्षी आमच्याकडून वाढत्या प्रमाणावर प्रगट दिन करवून घेताहेत. पण या सर्व पार्श्वभूमीवर मला 1991 साली घडलेली एक गोष्ट आजही अगदी जशीच्या तशी आठवतेय.
मला आठवतं त्या दिवशी साडेतीनशे लोक महाप्रसादा साठी आले होते,पुजेकरीता आम्ही एका गुरुजींना बोलावले होते. मोठ्या प्रमाणात आरती झाली.आरतीच्या वेळी लोकांनी तबकात पैसे टाकले,आता सर्व कार्यक्रम संपत आला होता. आम्ही महाप्रसादाच्या तयारीला लागलो. आम्ही गुरुजींना म्हटलं तबकातील पैसे दक्षिणा म्हणून ठेवून घ्या. गुरूजींनी त्याप्रमाणे तबक रिकामं करून फोटोच्या बाजूला ठेवून दिलं. महाप्रसाद घेऊन आणि पुढील वर्षी प्रगट दिन करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी निरोप घेतला. मी एकटा महाराजांच्या फोटो समोर उभा झालो. कार्यक्रमाच्या यशाने मन समाधानाने भरून आले होते आणि डोळे भक्तीभावाने डबडबले होते. महाराजांना म्हटलं तुम्ही सुचविल्या प्रमाणे दिलेल्या पैशातून प्रगट दिन करण्याचा प्रयत्न केला तो गोड मानून आशीर्वाद द्या आणि मी गुडघ्यावर झुकून मस्तक टेकविलं, माझं लक्ष तबकाकडे गेलं. तबकात एक नाणं होतं,मला ते पाहिल्यासारखं वाटलं,मी उत्सुकतेने ते नाणं उचललं. ते पंचवीस पैशाचं नाणं होतं,ते चार आणे होते,ते तेच चार आणे होते जे महाराजांनी मला देऊन प्रगटदिन करण्याचा आशीर्वाद दिला होता,ते नाणं मी हृदयाशी कवटाळून धरलं आणि महाराजांचा आशीर्वाद म्हणून पाकीटात ठेवून दिलं, खरं सांगतो त्या दिवसा पासून माझं पाकीट रिकामं नाही झालं.
आजही ते नाणं माझ्या पाकीटात आहे. लोकांसाठी जरी ते चलनातून बाद झालेलं नाणं असलं तरी माझ्या साठी मात्र त्या नाण्याचं वर्णन आहे.. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- शैलेश देशकर ,'विश्वस्त '
'सद्गुरू धाम 'गजानन महाराज मंदीर
अहमदाबाद
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसल्यासस्वागतआहे..
Comments