अनुभव - 35
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 35 🌺 )
* श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा *
जय गजानन! कोकणातील रायगड जिल्ह्यात माणगाव या छोट्या गावात माझं बालपण गेलं.लहानपणी आजीच्या मागे मागे फिरत असताना तिच्या मनात असणारी गजानन महाराजांची भक्ती आणि गजानन विजय ग्रंथाचं वाचन ,माझ्या कडे केव्हा आलं कळलच नाही. मी माहेरची अस्मिता शेठ,लग्नानंतर झाले लीना धारिया. म्हणजे तसं पाहिलं तर मी गुजराथी पण आम्ही सगळे घरी मराठीच बोलतो. या मराठीचा उल्लेख मी याच्या साठी करते आहे की संत कवि दासगणू महाराजांचं रसाळ मराठी 'गजानन विजय 'ग्रंथाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं,हे मी माझं भाग्य समजते.गेली अनेक वर्षे मी रोज एक अध्याय या प्रमाणे पारायण करते शिवाय महिन्यात एकदा तरी एक दिवसीय पारायण करते.
लग्नानंतर मला वाटायचं की माझ्या मिस्टरांनीही गजानन विजय ग्रंथ वाचावा जेणेकरून त्यांना गजानन महाराजांचे महात्म्य कळेल व त्यांच्या मनात महाराजां विषयी भक्तिभाव जागृत होईल. मी त्यांना अनेक वेळा तसं म्हटलंही पण त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अर्थात ते त्यांच्या व्यवसायात अतिशय व्यस्त असतात हे त्यामागचं मोठं कारण होतं. मिस्टर वाचनाचं मनावर घेत नाही हे लक्षात आलं तेव्हा महाराजांना म्हटलं माझी प्रामाणिक इच्छा तुम्ही जाणताच बाकी आता तुमची मर्जी.
महाराज आपल्या लहान लहान इच्छा पूर्ण करुन त्याचा परिणाम मात्र छान घडवून आणतात, असं बरेच वेळा लक्षात येतं. गेली पंधरा,सोळा वर्षे झालीत ,आम्ही गणपतीच्या दहा दिवसात केव्हातरी एकदा सगळे मिळून शेगांवला जातोच तसं 2009 साली आम्ही दोघं, मुलगा, माझी बहीण तिचे मिस्टर,लहान बहीण,असे सर्व शेगांवला दर्शनासाठी पोहोचलो. दर्शनानंतर मनातआलं की आज 'बंकट सदन' पहावं म्हणून आम्ही सर्व तिथे पोहोचलो. आम्ही तिथे असताना अचानक एक गृहस्थ तिथे आले. उंच, पांढरा शुभ्र पायजमा आणि अंगात पांढरा फुलशर्ट असा पोशाख होता. त्यांच्या हातात एक लहान पोथी सारखं साहित्य होतं त्यावर लिहिलं होतं 'सुख शांती समाधान व सुख समृद्धीत वाढ करणारे गजानन महात्म्य '
त्यांचं व्यक्तिमत्व प्रसन्न होतं. ते आम्हाला म्हणाले या मी तुम्हाला बंकट सदना विषयी माहिती सांगतो,मग त्यांनी महाराजांना त्याकाळात आंघोळ कशी घातली,तो आंघोळीचा दगड,बैठक,महाराजांच्या लीला,या विषयी पाच मिनिटे माहिती दिली आणि मग त्यांनी ते पुस्तक माझ्या मिस्टरांना देऊन म्हटलं,तुम्ही फार व्यस्त असता पण हे रोज वाचा. फार वेळही लागणार नाही आणि तुम्हाला गजानन महाराजांविषयी माहितीपण होईल. मिस्टर ते पाहून हो म्हणाले आणि ते गृहस्थ निघून गेले. पुस्तक पाहून बहिणींना मोह झाला की आपल्याही जवळ हे पुस्तक असावे,म्हणून मग आम्ही बरीच दुकानं फिरलो पण पुस्तक काही मिळालं नाही .तेव्हा माझ्या लक्षात आलं की...ते गृहस्थ निरपेक्षपणे पुस्तक देऊन निघून गेले, ते पुस्तक सहज उपलब्ध होईलसे दिसत नाही,आमच्या सोबत दोघंजण होते,नेमकं यांनाच कसं पुस्तक दिलं?हे फार व्यस्त असतात हे त्यांना काय ठाऊक?आजुबाजुला बाकी लोक होते हे नेमके आमच्या कडे कसे आले? मला या पार्श्वभूमीवर पोथीतील ओवी आठवली..... समर्थ वाक्य खोटे झाले/ऐसे कोणी न कधी ऐकिले/असो शेगांवचे लागले/लोक भजनी स्वामींच्या/..मनात म्हटलं बघूया काय होतंय ते. आज ही गोष्ट जुनी झाली पण मी प्रांजळपणे सांगते की तेव्हापासून मिस्टरांचं वाचन सुरू झालं आणि ते महाराजांच्या प्रेमात पडले,स्वामींच्या भजनी लागले.
आता गजानन स्वामी आमच्या सगळ्या घराचंच दैवत झालं. मी,हे,मुलगी,मुलगा. आम्हा सगळ्यांनाच शेगांव,गजानन महाराज,गजानन विजय ग्रंथ,हा आवडीचा विषय झाला. महाराजांनी अनेक वेळा लहान,सहान प्रसंगातून आमचं हे प्रेम वाढीस लावलं.
एक आई म्हणून मला इ.स.2012 मधे घडलेला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो. 2 मार्च 2012 रोजी आमच्या लग्नाच्या एकविसाव्या वाढ दिवसाला महाराजांनी एक अनुभव दिला. त्या रात्री आम्ही दोघे आणि मुलगा रोहन हाॅटेलमधे जेवायला गेलो .उत्तम दर्ज्याचं हाॅटेल होतं .आम्ही तिघही एकाच टेबलवर जेवलो,जेवण झालं आणि घरी यायला निघालो तो रोहनला अस्वस्थ वाटू लागलं,वाटलं,थोडी अॅसिडीटी असावी,म्हटलं घरी जाऊन एखादी गोळी घेतली की होईल ठीक.पण प्रत्यक्षात घरी जाताना गाडीतच त्याला भडभडून उलटी झाली,इतकी की गाडी पूर्ण घाण होऊन गेली. घरात शिरलो तो त्याच्या अंगावर पूर्ण रॅश आला,सर्वांगाला खाज सुटू लागली,खाजवल्यावर अंगावर चट्टे पडले. अतिशय काळजी करण्यासारखी सगळी लक्षणं होती. रात्रीचे दहा वाजून गेले होते. मला रोहनची तगमग पहावत नव्हती, एका आईच्या हृदयात भावनांची विचित्र कालवा कालव होत होती,रडायला येत होतं पण रडताही येत नव्हतं. आईच रडली तर मुलाचं काय?आई साठी एकच मार्ग होता 'गजानन महाराजांचा धावा 'काळजीत हेही होते पण यांनी लगेच निर्णय घेऊन आमचे फॅमिली डॉक्टर,डाॅक्टर लाहोटींना फोन केला. नशीबाने ते दवाखान्यातच होते,म्हणाले ताबडतोब घेउन या. गजानन महाराजांचा धावा करतच आम्ही दवाखान्यात पोहोचलो. तिथे टेबलवर मला 'गजानन आशिष' मासिकाचा अंक दिसला,त्यावर असलेला गजानन महाराजांचा फोटो पाहून जीवात जीव आला. डाॅक्टरांनी लगेच रोहनला तपासलं ,त्याला फूड पाॅयझनींग झाल्याचं निदान केलं. त्यानंतर डाॅक्टर जे बोलले ते ऐकून आम्ही आश्चर्य चकित झालो. म्हणाले तुमच्यावर देवाची कृपा आहे. आजच सकाळी एका कंपनीचा माणूस माझ्याकडे आला आणि अन्नातून होणार्या विषबाधेवर या दोन गोळ्या आणि मलम देऊन गेला. जणू त्या तुमच्या साठीच कुणीतरी पाठवल्या कारण ही काही वारंवार येणारी केस नसते. शिवाय या गोळ्या अजून बाजारात यायच्याच आहेत तुम्हाला कुठेही मिळणार नाही. एवढंच काय माझ्याकडे देखील तुम्हाला द्यायला तिसरी गोळी नाही,अर्थात त्याची गरजही नाही. ते ऐकून माझ्या तोंडून सहज निघालं 'गजानन महाराज की जय 'मी गजानन आशिषचा तो अंक,महाराजांचा फोटो डोक्याला लावला आणि दोन दिवसांसाठी अंक द्या म्हणून डाॅक्टरांची परवानगी घेतली.
एक गोळी डाॅक्टरांनी तिथेच दिली,दुसरी घरी आल्यावर द्यायची होती,शिवाय मलम होतेच आश्चर्य म्हणजे तासाभरातच रोहन एकदम ठीक झाला.
दुसरे दिवशी त्या गोळ्यांचा आम्ही बाजारात खरोखरच शोध घेतला. खूप दुकानं पालथी घातलीत पण आम्हाला त्या कुठेही मिळाल्या नाहीत. एवढच काय दुकानदारांनी ते नावही ऐकलं नव्हतं. खरं म्हणजे आपण एखादी वस्तू शोधतो तेव्हा ती मिळाली की आपल्याला आनंद होतो पण इथे उलटच होतं. त्या गोळ्या बाजारात नाहीत आणि केवळ आपल्याच डाॅक्टरांकडे नेमक्या त्याच दिवशी , आपल्याच साठी कुणीतरी त्या आणून ठेवाव्यात याचा अर्थ माझ्या दृष्टीतून तरी एकच होता..तो म्हणजे .. श्री गजानन !जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ.लीना धारिया पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comments