top of page

अनुभव - 36

" श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 36 🌺)

* सेवा हीच अनुभूती *


जय गजानन! गजानन विजय ग्रंथात वाचकाला आर्थिक,सामाजिक,अध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन मिळूशकेल अशा अनेक ओव्या आहेत. एकोणीसाव्या अध्यायात बाळाभाऊंना उपदेश करताना महाराज जेव्हा म्हणतात... आम्ही ही भावंडे सारी/येतो झालो भूमीवरी/ कैवल्याच्या मार्गावरी/भाविक आणून सोडावया/.. हे ऐकून बाळाभाऊंच्या डोळ्याला प्रेमाश्रूंचा पूर येतो,हे वर्णन पारायणात मी जेव्हा वाचते,तेव्हा माझे डोळे पाणावतात आणि महाराजांना विनंती केल्या जाते. 'महाराज मला कैवल्याच्या वाटेवर घेऊन चला. '

मी एकांतात जेव्हा विचार करीत असते तेव्हा मला नेहमी वाटतं, भक्ती साठी भक्ती,नामा साठी नाम आणि गजानन महाराजांची सेवा,हेच असावं काम! 'महाराजांची अखंड सेवा घडो ' हेच मी महाराजांना लहानपणापासून मागत आले आहे आणि महाराजांनीही त्याकडे लक्ष दिले आहे. बाकी बाबतीत त्यांनी अनेक प्रसंगी माझ्या इच्छा पूर्ण केल्याच पण आज मी जे काही इथे सांगू इच्छिते त्यात 'सेवा घडू द्या 'ही माझी विनंती महाराजांनी मान्य केली त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून ही सेवा अखंड घडत राहो अशी विनम्र प्रार्थना त्यांच्या चरणी करणं,हा माझा शुध्द हेतू आहे.

दहा वर्षांपूर्वी एकदा माझ्या मनात तीव्रतेने असा विचार आला की आपण शेगांवची पायी वारी करावी,पण हे जमणार कसं?मी एक स्त्री,घरून परवानगी मिळणे दूरची गोष्ट,पण मनात इच्छा तीव्र होती. परिणामी महाराजांनी असा काही योग जुळवून आणला की आम्ही काही समविचारी लोक एकत्र येऊन इ.स.2009 ला आमचा कल्याण ते शेगांव पायी वारी करण्याचा योग जुळून आला आणि हे पायी वारी प्रकरण तिथेच न थांबता महाराजांच्या कृपेने दर वर्षी जानेवारी महिन्यात 1 ते 17 तारखेच्या दरम्यान आम्ही एकवीस भाविक कल्याण-शेगांव पायी वारी करीत आहोत. आज दहा वर्ष या वारीला पूर्ण झालीत.सोळा ते सतरा दिवस पायी चालून आम्ही शेगांव गाठतो. वारीत एकवीसच भाविक असावेत असं काही आम्ही ठरविलेलं नाही, परंतु वाटेवर कधी कधी अगदी लहान गावात रात्री मुक्काम असतो. अशा वेळी भक्त आमची निजण्याची सोय महाराजांवरील भक्ती पोटी करतात,अशात घर लहान असेल तर थंडीचे ते दिवस असल्यामुळे आम्हाला घरात निवारा देऊन स्वतः मात्र बाहेर झोपतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही वारीतील संख्या वाढविण्याचा प्रयत्न करीत नाही. एक मात्र निश्चित आहे की महाराजांच्या भक्तांनी केलेल्या आदरातिथ्यामधे अनेक हृदयस्पर्शी प्रसंग आम्हाला अनुभवायला मिळाले आहेत आणि ते सर्व महाराजांच्या भक्तीत वाढ करणारे आहेत.

इ.स.2015 ची ही गोष्ट,आमची कल्याण-शेगांव पायी वारी पूर्ण झाली,मुंबईला असणारे आमचे स्नेही आणि गजानन महाराजांचे भक्त श्री. माधवकाका जोशी यांची मी नित्याप्रमाणे भेट घेतली,त्यांनी आशिर्वाद देऊन पुढील वारीच्या आधी गजानन विजय ग्रंथाची 501 पारायणं पूर्ण कर असं सांगितलं. तिथे समोरच महाराजांचा फोटो होता, माझे हात नमस्कारासाठी जुळले ,मनावर आलेल्या दडपणा सह माझ्या तोंडून प्रश्न निघाला 365 दिवसात 501 पारायणं?हे मी कसं करू शकणार? माधवकाका आत्मविश्वासाने उद्गारले 'तू हे करू शकशील!' त्यांचं ते वाक्य मनात घोळतच मी घरी पोहोचले,माझे मिस्टर 'जय' यांच्या कानावर मी ती गोष्ट घातली,माझे मिस्टर बंगाली आणि मी मराठी. माझं पाहून त्यांनी इंग्रजीतून महाराजांची पोथी वाचणं सुरु केलं होतं. ते म्हणाले महाराजांची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही.

मी 22 जानेवारी 2015 रोजी 501 पारायणं करायला सुरुवात केली. कधी दिवसाला दोन तर कधी एका दिवसात तीन पारायणं महाराज माझ्याकडून करवून घेत होते. असं करत माझी 480 पारायणं पूर्ण झाली आणि मला लक्षात आलं की मला पोथी पाठ झाली आहे. मग मी सर्वानुमते असा निर्णय घेतला की बाकी पारायणं शेगांव मंदीराला प्रदक्षिणा घालीत पूर्ण करायची. मी 24 नोव्हेंबर 2015 ते 16 डिसेंबर 2015 या काळात शेगांव भक्त निवास क्र. एक येथील खोली क्र. एकोणीस मधे वास्तव्यास राहीले. संस्थानमधे तसा वेगळा फाॅर्मभरून दिला. दर चोवीस तासांनी तेथील वास्तव्यासाठी सूचना देऊन प्रदक्षिणा करीत,करीत माझी एकवीस पारायणं पूर्ण झालीत. महाराजांनी एका वर्षात माझ्या कडून 501 पारायणं पूर्ण करण्याची सेवा करवून घेतली.

महाराजांची सेवा,महाराजांचाच आशीर्वाद घेऊन केली तर महाराजच ती पूर्ण करवून घेतात असं अनुभवास येतं.

मी मुंबईला डोंबिवली इथे असते. पाच वर्ष झालीत मी दर गुरुवारी शेगांवला दर्शनासाठी येऊन जसं जमेल तसं तिथे पारायण करण्याचा माझा प्रयत्न,महाराजांच्या कृपेनेच पूर्ण होऊ शकला. इ.स.2010 ला महाराजांनी माझ्या कडून तीन दिवसात,पहिल्या दिवशी नऊशे,दुसरे दिवशी आठशे व तिसरे दिवशी चारशे. अशा एकवीसशे प्रदक्षिणा पूर्ण करवून घेतल्या.

माझ्या कडून महाराजांची सेवा घडत होती पण मी तसा नवस मात्र कधी बोलले नव्हते, मात्र इ.स.2013 ची गोष्ट असावी,माझी आई,जिच्या कडून माझ्या कडे ही भक्ती चालून आली,ती साधारण 74 वर्षांची असताना एक दिवस घरातच पाय घसरून पडली. तिचं मणक्याचं ऑपरेशन करावं लागलं,एकीकडे तिला मधूमेहही होता,ती अंथरुणाला खिळल्या सारखी झाली तेव्हा मात्र मी शेगांवला येऊन महाराजांना विनंती केली की,एकतर आईला पायावर उभे करा अथवा सोडवा. मी 1008 प्रदक्षिणा करीन. महाराजांनी माझं ऐकलं,आई चालू लागली आणि मी नवस फेडण्यासाठी शेगांव गाठलं. तो मे महिना होता. नेमका दशमी,एकादशी,द्वादशी असा योग आला. मी त्या तीन दिवसांत,एकीकडे पारायण गृहात हजेरी लावली आणि मला आठवतं एकादशीच्या त्या दिवशी काही अध्याय वाचून,मी दुपारी बाराच्या सुमारास 1008 प्रदक्षिणा घालायला सुरूवात केली. मे महिना म्हणजे ऐन उन्हाळा,त्या दिवशी महाराजांचं सानिध्य अवती भवती जाणवत होतं,त्यामुळे उन्हाची दाहकता कमी आणि भक्तीची शीतलता जास्त असा योग जुळून आला होता. महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे याची जाणीव होत होती,त्या दिवशी गजानन महाराजांनी कुठली अचाट शक्ती प्रदान केली,ते तेच जाणोत,पण अक्षरश: ना भूक,ना तहान,ना बाथरूम ना काही,कुठलाही खंड न पडता ,रात्री जवळपास एकच्या सुमारास प्रदक्षिणा पूर्ण करूनच मी थांबले. महाराजांना नमस्कार केला. अष्टसात्विक भाव दाटून आले होते आजूबाजूला कुणीही नव्हतं मग तिथे अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही मिनिटांनी लक्षात आलं,आता आपल्याला भक्त निवास चार मधील खोली क्र. पाच मधे परतायला हवं आणि जाणीव झाली आज आपण काहीही खाल्लं नाही. आता तर सर्वत्र सामसूम झाली,सगळं बंद,याच विचारात मी मुख्य प्रवेश दाराच्या बाहेर आले आणि अचानक कुठुनसे एक म्हातारे बाबा, मळकट धोतर,अंगात पांढरा सदरा समोर उभे झाले,मला विचारलं 'बेटा चहा घेणार?"मी म्हटलं बाबा थोडा गोड चहा मिळेल?म्हणाले पाच मिनिटं! पाचच मिनिटात एक मोठा काचेचा ग्लास भरून गोड चहा आणि दोन बिस्किट पुडे मला देऊ केले. चहा पिणार्यांना चहा नेहमी चांगलाच वाटतो,पण त्या रात्रीचा तो चहा आणि ती बिस्किटं माझ्या साठी विलक्षण शक्तीदायी ठरलं. मी पैशाचं काही विचारण्या आधीच ते ग्लास घेऊन निघूनही गेले .

मी भक्त निवासात पोहोचले,निवांतपणे अंघोळ केली,महाराजांसमोर उभी झाले. सेवा घडली म्हणून कृतज्ञतेने नतमस्तक झाले,पुढेही अशीच सेवा हातून घडू द्या म्हणून प्रार्थना केली आणि अंथरुणावर पहुडले. माझा डोळा लागला.पहाटे-पहाटे, अर्धवट स्वप्नावस्था, अर्धवट जागृती अशा अवस्थेत एक मंद सुवास खोलीत दरवळला. माझ्या कानावर आवाज आला 'घाबरु नकोस मी आहे' आणि मला महाराज दिसले.फक्त काही क्षण.

माझ्या 1008 प्रदक्षिणा आणि एका वर्षात 501 पारायणांचा प्रसादच जणू महाराजांनी दिला होता. महाराज जणू मला सांगून गेले ..दुःख न करावे यत्किंचित/ आम्ही आहो येथे स्थित/तुम्हा सांभाळण्या प्रती सत्य/तुमचा विसर पडणे नसे/..

उन्हाळ्याच्या दिवसात दिवसभर चालल्या नंतर वास्तविक शरीराला आणि मनाला दुसर्या दिवशीही थकवा जाणवायला हवा होता,पण तसं काहीही लक्षण नव्हतं शरीराने आणि मनानेही मी पूर्ण प्रफुल्लित होते. ती द्वादशी होती,मला पारायण पूर्ण करायचं होतं. मी पारायण गृहात गेले. वाचन सुरू करण्यासाठी पोथी माथ्यावर धरली आणि गादीवरील फोटोकडे बघून मनात जयघोष केला..

श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव-- अस्मिता सेन डोंबिवली पूर्व

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

 
 
 

Recent Posts

See All
🌺अनुभव १७८ --महाराजांचा अंगारा

"श्री" गजानन महाराज की जय! (🌺अनुभव १७८) महाराजांचा अंगारा जय गजानन! मी पूर्वाश्रमीची लीना पारखी, अकोला माझं माहेर! लग्नानंतर मी झाले...

 
 
 

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page