top of page

अनुभव - 37

"श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 37 🌺)

* गुरु तत्वाचे आकर्षण *


जय गजानन! माझं नाव सीताराम स्वामी. आन्ध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 'नरसापूरम' या लहान गावात माझा जन्म झाला. माझं बालपण आणि शिक्षण आन्ध्र प्रदेशातच पार पडलं. माझी मातृभाषा अर्थातच 'तेलगू ' माझं इंजिनिअरींग विशाखापट्टणमला झालं मी केमिकल इंजिनिअर आहे .हे सर्व ऐकून तुम्ही म्हणाल या माणसाचा संबंध शेगांवच्या गजानन महाराजांशी कसा? तर त्याचं असं आहे की प्रत्येकाचे सद्गुरू ठरलेले आहेत. सद्गुरूंमधील गुरुत्वाकर्षण शिष्याला योग्य पध्द्तीने गुरुंकडे आकर्षित करून घेतं.

मला नोकरीच्या निमित्ताने 1985 साली वडोदरा (बडोदा)येथे जाण्याचा योग आला. तिथे मी एका मराठी कुटुंबाशी जुळल्या गेलो आणि 1988 साली 'विमल' शी विवाह होऊन मी त्यांचा जावई झालो. विमलची मोठी बहीण आणि तिचे मिस्टर गजानन महाराजांचे भक्त! ते मला वारंवार गजानन महाराजांविषयी सांगायचे ,अशात आम्ही इ.स.2000 च्या सुमारास अष्टविनायक,पंढरपूर,शिर्डी,शेगांव अशा स्थळांचं दर्शन घेतलं आणि त्या लोकांनी मला गजानन विजय ग्रंथाची इंग्लिश आवृती घेऊन दिली व हे वाचा तुमचं भलं होईल असा सल्ला दिला. मी ते पुस्तक स्वीकारलं आणि कपाटात ठेवून दिलं मी अनेक वेळा पुस्तक हाती धरायचो पण कधी चार ओळी वाचून तर कधी एखादं चित्र पाहून कपाटात ठेवून द्यायचो वास्तविक मला वाचनाची प्रचंड आवड पण त्या पोथीचा योग महाराजांच्या मनात काही वेगळा होता.

पोथी घेऊन जवळपास दोन वर्षं होत आलीत अजूनही वाचनाचा योग आला नव्हता आणि महाराजांनी एक विलक्षण योग जुळवून आणला. 2002 ची ती गोष्ट असावी. आता मी इंडियन ऑइल कार्पोरेशन मधे रुजू झालो होतो उत्तर प्रदेशातील आग्रा येथून जवळ 'तुंडला' नावाचं गाव आहे तिथे आमच्या प्लांटचं काम सुरू होतं कंपनीने मला तिथे इन्स्पेक्शन साठी पाठविलं. दूर अज्ञात गावी एकटं जायचं आहे म्हणून घरच्यांनी माझ्या सामाना सोबत मला पोथी दिली,मी पण ती आधार म्हणून ठेवून घेतली. मी 'तुंडला' येथे पोहोचलो हाॅटेलवर सामान ठेवलं आणि प्लांटला भेट दिली. मला तिथलं वातावरण वेगळं,संशयास्पद आणि भयावह वाटलं. मी थोडा वेळ तिथे घालवून संध्याकाळी परत येतो असं सांगून हाॅटेलवर परतलो,त्या दिवशी प्रथमच मला जाणवलं की इथे आपल्याला एकच आधार आहे आणि तो म्हणजे 'गजानन महाराज ' मी सामानातून पोथी बाहेर काढली आणि चक्क चार अध्याय वाचूनच पोथी बाजूला ठेवली. मनातून महाराजांचा खूप आधार वाटू लागला. मी संध्याकाळी पुन्हा कामाच्या ठिकाणी गेलो,मी टेबलशी बसलो असतानाच अचानक सहा सात गुंड प्रवृत्तीची माणसं चक्क हातात बंदूक घेऊन आत शिरली,त्यांनी माझ्या कानशिलाला बंदूक लावली. त्यांच्या मते त्यांना आमच्या कंपनीकडून वीस ते पंचवीस लाख रुपये घ्यायचे होते. ते म्हणाले आम्ही तुम्हाला इथून बाहेर जाऊ देणार नाही जास्त गडबड केली तर मारुन टाकू त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच महाराजांचा धावा सुरू केला. थोडा धीर आला मग परिस्थिती समजावून घेतली. माझ्या लक्षात आलं आमच्या सब काँट्रॅक्टरनी पैशाचे गैरव्यवहार करून त्यांचे पैसे दिले नाहीत. गजानन महाराजांच्या स्मरणामुळे मी धैर्याने प्रसंगाला सामोरा जाऊ शकलो. माझी बाजू त्यांना पटली. त्या दोन तीन दिवसांत एकीकडे हाॅटेलवर सकाळ संध्याकाळ मिळून मी पारायण पूर्ण केलं आणि दुसरीकडे महाराजांच्या कृपेने परिस्थिती निवळत गेली. हा माणूस आपल्या हितासाठी काही करेल अशी त्यांना खात्री पटली आणि तो दौरा संपला. तिथून माझं रोज एक 'चॅप्टर' प्रमाणे पारायण सुरू झालं .दुसर्या पारायणाचे वेळी एकविसाव्या चॅप्टर मधे दशमी एकादशी द्वादशी ला पारायणाचे महत्त्व असा उल्लेख आला तेव्हा मला सहज वाटलं की 'तुंडला' येथे कोणत्या तीन दिवसांत आपण पारायण केलं?मी आश्चर्य चकित झालो जेव्हा मी कॅलेंडरमध्ये तपास केला,महाराजांनी माझ्या कडून आयुष्यातील पहिलं पारायण योगा योगाने दशमी एकादशी द्वादशीलाच करवून घेतलं होतं .

माझी निष्ठा आता गजानन महाराजांच्या चरणी जडली. मला मनातून वाटू लागलं की 'अम्मा 'ला देखील महाराजां विषयी काही कळावं,पण त्यासाठी आवश्यक होती तेलगू पोथी. त्या साठी मी शोध घेतला पण तेलगू पोथी काही मिळू शकली नाही,ही 2007 ची गोष्ट आहे. मी त्या विचारात असतानाच मला कामासाठी जपानला जाण्याचा योग आला. मला आठवतं तो मे महिना होता,मी महाराजांसमोर उभा राहिलो की मला जणू ते सुचवायचे की अम्मासाठी तूच तेलगूतून पोथीचं भाषांतर कर. प्रथम मी हा विचार बाजूला सारला कारण गेली पंचवीस वर्षे माझी तेलगू लिहीण्याची सवय सुटली होती..पण एकदा रात्री दोनच्या सुमारास माझ्या कानात कुणीतरी म्हटलं 'उठ पोथीचं तेलगू भाषांतर कर.' मी खडबडून जागा झालो आणि कागद घेऊन रात्रीच भाषांतर सुरू केलं. त्या नंतर मला लगातार रोज रात्री बरोबर दोन वाजता कुणी तरी उठवल्या सारखी जाग येत राहिली आणि मी भाषांतर करीत राहिलो. आषाढी एकादशीच्या दिवशी माझं 'रफ' काम पूर्ण झालं.मी महाराजांच्या चरणी ती पोथी ठेवून प्रार्थना केली. म्हटलं 'महाराज तुम्ही सुचविल्या प्रमाणे हे काम केलं आहे याला पूर्ण चांगल्या रुपात मी गणपती बसतील त्या दिवसापर्यंत पूर्ण करून त्या दिवशी पूजेत ठेवून अथर्वशीर्षाची एकवीस आवर्तनं करीन मात्र आता मला हे काम संध्याकाळी ते रात्री साडे दहा पर्यंत करण्याची अनुमती द्या आणि ही पोथी मी अम्माला शेगांव इथे देऊ इच्छितो ते तुम्ही घडवून आणा.' महाराजांनी ही विनंती मान्य केली त्याच रात्री पासून मला कुणीही उठवलं नाही आणि माझ्या अम्मासाठी तेलगू पोथी तयार झाली. पुढे भारतात परतल्यावर मी,विमल,मुलगा आनंद,आणि आमचे लिमकर म्हणून एक स्नेही आम्ही अम्मा ला घेऊन शेगांवला पोहोचलो तिथे प्रथम ती पोथी खाली महाराजांच्या चरणाला लावून वर श्रीराम मंदिरात अम्माला पोथी देऊन नमस्कार केला. अम्माला म्हटलं पारायण गृहात बसून आज एकविसावा अध्याय वाच,उद्यापासून रोज एक अध्याय वाचशील. ही मी जपानहून तुझ्यासाठी आणलेली भेट आहे. ऐकून तिचे डोळे भरून आले आणि मीही कृतकृत्य झालो.

पुढे बदलीच्या कारणाने इ.स.2015-16 ला मी चेन्नई येथे वास्तव्यास होतो . महाराजांनी माझ्याकडून इंग्लिश मधून तेलगू भाषांतराचं काम करवून घेतलं होतं आणि आता मी देवपूजेला बसल्यावर मला वारंवार आतून अशी सूचना होऊ लागली की 'साईबाबांवर' एक छोटी तेलगू पोथी आहे,त्या पोथीचं इंग्लिश मधे भाषांतर कर. वारंवार अशी प्रेरणा होऊ लागल्यामुळे मी तेलगू मधून इंग्लिश भाषेत ती छोटी पोथी भाषांतरीत केली. मात्र पुढे काही प्रेरणा न झाल्याने मी ते तसच ठेवून दिलं. मला 18 फेब्रुवारी 2016 रोजी बडोदा इथे जाणं आवश्यक होतं तेव्हा मनात विचार आला की हे भाषांतर चेन्नई मधील साई मंदिरात दाखवून बडोदा येथून येताना शेगांवला महाराजांच्या चरणी लावू जेणेकरून महाराजांनी केलेल्या सूचनेची अंमलबजावणी पूर्ण होईल. मी गजानन महाराजांना तशी प्रार्थना केली आणि म्हटलं 'तुम्ही सगळं जाणताच तुम्ही तुमच्या योजने नुसार योग्य काय ते करून घ्यालच'असं म्हणून नमस्कार केला.

10 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी उठतानाच महाराजांनी प्रेरणा दिली की भाषांतरित पोथीचं प्रिंटआऊट काढून तयार ठेव. वाटलं आपण शेगांवला त्या स्वरुपात काम नेण्यासाठी ही सूचना असावी म्हणून त्या प्रमाणे मी प्रिंटआऊट तयार केलं. मी 11 फेब्रुवारी ला ऑफिसला गेलो आणि महाराजांची योजना पाहून मी थक्क झालो. ध्यानी मनी नसताना एक सहकारी माझ्या जवळ आला,माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला 'स्वामी यार आय वाॅन्ट वन फेवर 'म्हटलं काय?म्हणाला 'ऑन थर्टीनथ् आय अॅम गोईंग टू शिर्डी आय वाॅन्ट युवर कंपनी ' तुझं प्लेनचं तिकीट मी काढीन पुण्याला जाऊन टॅक्सी ने शिर्डी ला जाऊ.

शिर्डीला दर्शनाला जाताना मी छातीशी कवटाळून काही प्रिंटेड कागद आणलेले मित्राने पाहिले,मी श्रद्धापूर्वक ते साईंच्या चरणावर ठेवले तेव्हा त्यानी विचारलं,हे सर्व काय आहे? तेव्हा त्याला गजानन महाराज आणि साईबाबांची ती संयुक्त योजना समजावून सांगितली. ऐकून त्याचे डोळे भरून आले.माझे डोळे तर घळघळा वाहत होते.

मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं की गजानन महाराजांनी समाधी घेतली तेव्हा शिर्डी ला साईबाबा अस्वस्थ झाले होते आणि साईनाथांपाशी ज्ञानदृष्टी असल्याचा उल्लेख गजानन महाराजांच्या तोंडी 'गजानन विजय' ग्रंथात आलाच आहे.

शेवटी आपण सामान्य माणसं,आपल्याला यातलं फारसं काही कळत नाही. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 'त्यामुळे संतांच्या चरणी दृढभाव ठेवा आणि मुखाने नाम जप चालू ठेवा.. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--सीताराम स्वामी .चेन्नई/वडोदरा

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

 
 
 

Recent Posts

See All
🌺अनुभव १७५🌺 हाकेला धावणारा देव

" श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १७५) हाकेला धावणारा देव जय गजानन! मागील पंचवीस तीस वर्षांच्या काळात अनेक ठिकाणी गजानन महाराजांची...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page