अनुभव - 40
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 6, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
* क्षणात गमनाप्रती करिसी इच्छिलेल्या स्थला *
जय गजानन! माझ्या माहेरीच माझ्या आईने,माझी ओळख माझ्या गजानन महाराजांशी करून दिली त्यामुळे शाळेत होते तेव्हापासूनच गजानन विजय ग्रंथाची दशमी, एकादशी, द्वादशी .अशी त्रिदिवसीय पारायणं अनेक वेळा महाराजांनी माझ्या कडून करवून घेतली. मी "माझे गजानन महाराज "असं म्हटलं तेव्हा मला जाणीव आहे की असे हजारो भक्तआहेत की जे महाराजांकडे 'माझे महाराज' म्हणून पाहतात आणि त्यांना महाराज आपल्या सोबत आहेत अशी जाणीव सातत्याने होत असते,तशीच जाणीव मलाही होत असते. महाराजही एकाच वेळी अनेकांच्या प्रार्थनेला ओ देत असतात,प्रतिसाद देत असतात. ह्या प्रतिसादाचे पडसाद अनेक भाविकांपर्यंत पोहोचतात मग त्या भाविकांच्या मनातील महाराजांच्या सोबतीची जाणीव अधिकाधिक दृढ होत जाते.
असो,मी सौ. निलीमा महेश आमोणकर,सध्या पणजी गोवा येथे वास्तव्यास असते. माझं माहेर पुण्याला,तिथून शेगांवची पालखी जायची त्यामुळे आईचं गजानन विजय ग्रंथाचं वाचन आणि पालखीत गजानन महाराजांचं दर्शन,या दोन्ही गोष्टींमुळे महाराजांची भक्ती मनात रुळली. पुढे इ.स.1989 च्या 1 जानेवारीला माझं लग्न झालं पण अपत्यप्राप्तीचा योग मात्र नशिबात विलंबानेच होता. इ.स.2008 ला म्हणजे लग्नानंतर तब्बल एकोणीस वर्षांनंतर आम्हा दोघांसाठी डाॅक्टरांनी गुड न्यूज कन्फर्म केली. गुड न्यूजचं तर ठीक झालं पण अडचणी अजून बाकी होत्या.दिवस भरत आले होते. एक दिवस डाॅक्टरांनी परीक्षण केल्यानंतर त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले मॅडम एक प्राॅब्लेम वाटतोय,जुळी अपत्य आहेत आणि त्यातील एकाच्या बाबतीत थोडी काळजी वाटतेय. शक्य आहे की त्यात काही शारीरिक व्यंगही असू शकेल. आपण चांगल्यात चांगली व्यवस्था करूया,तुम्ही थोडं आधी हाॅस्पिटलला अॅडमिट व्हा बाकी गॅरंटी कशाचीच देता येत नाही.
आम्हा दोघांवर किती प्रचंड मानसिक दडपण आलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशा वेळी एकच आधार होता तो म्हणजे 'गजानन महाराज 'मी गजानन विजय ग्रंथ सोबत घेऊन पुणे येथे रुबी हाॅल मधे अॅडमिट झाले. मी दवाखान्यातच गजानन विजय ची पारायणं सुरू केली. महाराजांना म्हटलं महाराज मुलगा वा मुलगी यानी काही फरक पडणार नाही आहे,पण जे काही होईल ते बालक सुखरुप आणि योग्य होऊ द्या. एक दिवस पारायण करताना मी फारच भावुक झाले. रडायला येऊ लागलं आणि मी महाराजांना म्हटलं आता तुम्हीच रक्षण कर्ते! एका अपत्याची शाश्वती तर डाॅक्टरांनी दिली आहे दुसर्या विषयी त्यांना चिंता आहे पण मी तर म्हणते,दोन्हीचं रक्षण करणारे तुम्हीच आहात. दुसरं अपत्यही व्यवस्थित जन्माला येऊ द्या मी त्याच्या वजना इतकी चांदी शेगांवला तुमच्या चरणी अर्पण करीन.
11 ऑगस्ट 2008 रोजी डाॅक्टरांनी सिझीरियन करण्याचं ठरवलं,कृपासिंधू गजानन महाराज हाकेला धावून आले आणि दोन मुली,दोन्हीही सुदृढ अवस्थेत महाराजांनी माझ्या पदरात घातल्या. डाॅक्टरांनी आश्चर्यासह आमचं अभिनंदन केलं आणि महाराजांनी आमच्या कडून 2011 च्या डिसेंबर मधे चांदी समर्पणाचा माझा नवस पूर्ण करून घेतला.
माझ्या दोन मुली,'निती' आणि 'नेहा'. दोघीही माझ्या लाडक्या दोघींनाही माझा लळा .कधी कधी लहान मुलं त्यांच्या नकळत भविष्याची जाणीव आपल्याला करून देतात की काय असं वाटतं. त्याचं असं झालं,एकदा मी अंथरुणावर पहुडले होते. माझ्या बाजूला 'निती 'होती तिने माझ्या पोटावरून हात फिरवला अन् मला विचारलं आई तुझ्या पोटात काय आहे गं?मी दुर्लक्ष केलं. पुन्हा काही दिवसांनी तिनं हात फिरवून तोच प्रश्न केला पण लहान आहे म्हणून मी लक्ष दिलं नाही .काही दिवस मधे गेलेत माझ्या पोटात उजव्या बाजूला दुखायला लागलं. काही दिवसांनी ते दुखणं बरंच वाढलं. माझे मोठे दीर डाॅ. दिलीप आमोणकर गोव्याला सर्जन आहेत त्यांच्या सांगण्यावरून स्कॅनिंग करून घेतलं आणि पोटात लिव्हरला लागून ट्यूमर असल्याचं निदान झालं. पणजी येथे डाॅक्टरांचं म्हणणं होतं की छोटं ऑपरेशन लेझरनी करावं लागेल, पण माझे दीर सिनीयर डाॅक्टर ,त्यांना यात फार मोठी रिस्क वाटत होती. त्यांनी ठरविलं की गुडगाव-हरियाणा येथे मेदांता हाॅस्पिटल आहे ते लिव्हरसाठी नंबर एकचं हाॅस्पिटल आहे तिथे ऑपरेशन करायचं. कदाचित हे जीवावरचं दुखणं आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं.
इ.स.2016 च्या सप्टेंबर महिन्यात वीस तारखेला आम्ही दिल्ली येथे जाण्यासाठी गोवा विमानतळावर पोहोचलो. मुली घरीच राहणार होत्या,तिथे मला निरोप देताना जेमतेम आठ वर्षाच्या दोन्ही मुलींनी माझ्या कमरेला विळखा घालून माझ्याकडे पाहून मला प्रश्न केला
'आई तू परत येणार नं?'तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकानीच मान बाजूला वळवून आपले अश्रू दुसर्याला दिसू नयेत याची काळजी घेतली.
आम्ही गुडगावला मेदांता हाॅस्पिटलला पोहोचलो तेव्हा तपासणी नंतर तिथल्या डाॅक्टरांचं वाक्य ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली,त्यांच्या मते चांगला मोठा ट्यूमर लिव्हरला लागूनच आहे त्यामुळे ओपन सर्जरी करणं आवश्यक आहे. छाती पासून बेंबी पर्यंत ओपन सर्जरी!आठ ते दहा तास हे ऑपरेशन चालेल. 24 सप्टेंबरला आपण हे ऑपरेशन करू. मी पूर्ण हलून गेले,पण पर्याय नव्हता. गजानन महाराजांची पोथी घेतली आणि दवाखान्यात भरती झाले. मिस्टरांच्या मित्राची बायको 'मारीया 'म्हणून माझ्या सोबत होती.
24 सप्टेंबरला पहाटे तीन वाजता मला उठवण्यात आलं. आंघोळ झाली,पहाटे पाच वाजता ऑपरेशन थिएटर मधे नेण्यात आलं. आठ दहा तास ऑपरेशन होऊन दुपारी तीन वाजता मला बाहेर आणण्यात आलं एखादा पूर्ण वाढलेला मोठा लाल कांदा जसा दिसतो तसा ट्यूमर लिव्हरचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आला.मी दुसरे दिवशी दुपारी बारा वाजता शुद्धीवर आले.
पण..मला आता उलट्या सुरू झाल्या अन् त्या काही केल्या थांबेनात. चार दिवस उलट्या होत होत्या. स्कॅनिंग मधे आतड्याला गाठ पडल्या सारखं दिसलं. डाॅक्टर म्हणाले हे पुन्हा री ओपन करावं लागणार.
आता हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं. मी मिस्टरांना म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा,पण मला एकदा गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. ते म्हणाले की तू बरी झाली की जाऊ,पण मला शाश्वती वाटत नव्हती
अशात सकाळी डाॅक्टर आले त्यांनी माझ्या नाका तोंडात नळ्या घातल्या म्हणाले रात्री ऑपरेशन करू. मला मृत्यूचा आभास होऊ लागला.मला लक्षात आलं की आता महाराजांचं दर्शन होणे नाही. मी आतून कळवळून महाराजांना विनवत होते. मला गजानन अष्टकातील दासगणूंच्या ओळी आठवल्या "क्षणात जल आणिले नसून थेंब त्या वापीला/क्षणात गमनाप्रती करिसी इच्छिलेल्या स्थला/क्षणात स्वरूपे किती विविध धारिसी धीवरा/करी पदनता वरी बहू दया न रोषा धरा. / साधारण अकरा साडे अकरा ची वेळ असावी. मिस्टरखोलीत आले,त्यांनी सहज टी.व्ही. ऑन केला. माझी नजर तिकडे गेली मी हातानेच त्यांना टी.व्ही. राहू द्या म्हणून खुणावले,गजानन महाराजांचा सिनेमा सुरू झाला होता. महाराजांनी मला क्षणात दर्शन दिलं होतं. दूर गुडगावला त्या दवाखान्यात मी रडत रडत तो सिनेमा पाहिला. माझी प्रार्थना न बोलताच त्या दिवशी एका वेगळ्या पातळीवर पोहोचली होती. बाजूला मारीया उभी होती. तिला एवढंच समजलं होतं की महाराज माझं श्रद्धा स्थान आहे तिनं भावपूर्ण प्रार्थना करत पोथी माझ्या अंगावर फिरवणं सुरू केलं. संपूर्ण सिनेमा पाहताना डोळ्यातून भक्तिधारा वाहत होत्या. सिनेमा संपला. मलाच लक्षात नाही आलं,माझ्या उलट्या थांबल्या होत्या. संध्याकाळी डाॅक्टर आले त्यांनी तपासलं,आनंदानी नळ्या बाहेर काढल्या. माझ्या आतड्याची स्थिती ठीक झाली होती. आश्चर्य घडलं होतं. त्या रात्रीचं ऑपरेशन रद्द झालं होतं. आठ दिवसांनी त्या रात्री मी निवांत झोपी गेले. दुसरे दिवशी मी पूर्ण ठीक झाले होते. त्या दिवशी मी खायला मागितलं.
पहिला घास हातात घेतला अन बाजूला असलेल्या मारीया कडे पाहिलं,तीही आनंदाने माझ्या कडे पहात होती. तिनं माझ्या भावना जवळून अनुभवल्या होत्या,महाराजांच्या स्मरणार्थ हात कपाळावर गेला आणि मारीया कडे पाहून म्हटलं मारीया.. श्री गजानन !जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ.निलीमा महेश आमोणकर
पणजी, गोवा
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
コメント