top of page

अनुभव - 41

Updated: Jun 9, 2020

"श्री"

गजानन महाराज की जय!

* संकटाते टाळिती अगांतुक असल्यास ते *


जय गजानन!मी सौ.मानसी योगेश वाळूंजकर. पूर्वाश्रमीची मेधा करंबेलकर,मला गजानन महाराजांचं प्रेम माझ्या आई कडून मिळालं. मध्यंतरी मला गजानन महाराजांनी एका फार मोठ्या संभाव्य अपघातातून वाचवलं,त्या विषयी मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या पूर्वी माझ्या आईच्या ध्यानी मनी नसताना महाराजांनी त्यांची ओळख तिला कशी करून दिली ते सांगावंसं वाटतं.

माझी आई अगदी दोनच वर्षांची असताना तिचे वडील गेले. हा 1950 च्या आसपासचा काळ .माझ्या विधवा आजीला तिच्या तीन मुलींसह त्या काळात घरातून बाहेर काढण्यात आलं पण आजी कर्तृत्ववान होती, रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथे आजीने तेव्हा होस्टेलवर मेट्रन म्हणून काम केले आणि तिच्या तीनही मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले. आजीचं नेहमी सांगणं असायचं स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा एक अनामिक शक्ती तुम्हाला मदत करते. पुढे मुली मोठ्या झाल्या 1970-71 च्या सुमारास आईची मोठी बहीण अचानक वारली. आजीने आकाशाकडे पाहून प्रश्न केला. भगवंता तुला ही तरूण मुलगी दिसली? बस्स आणि आजी कार्यरत झाली,तिला तर उभं राहणं भागच होतं.

पुढे मुली मोठ्या झाल्या,आजीने दोन्ही मुलींची लग्न लावलीत. लग्नानंतर माझे आई बाबा आजीला घेऊन डोंबिवलीला रहायला आलेत. माझा जन्म 1978 चा,माझ्या जन्मा आधी दोन महिने आईला स्वप्न पडलं. स्वप्नात निळसर रंगाचा वेष परिधान करून एक गृहस्थ, ज्यांना आईनं या आधी कधीच पाहिलं नव्हतं आईच्या समोर उभे झाले आणि आईला व आजीला म्हणाले. मोठी मुलगी हवी आहे नं?मिळेल, मिळेल .

या स्वप्नानंतर काही दिवसांनी आमच्या शेजारच्या एक काकू,त्यांचं नाव शृंगारपुरे,आईकडे एक पोथी घेऊन आल्या आईच्या हातात ती पोथी देऊन म्हणाल्या ही पोथी वाचा सर्व सुरळीत पार पडेल. ती पोथी होती 'गजानन विजय ग्रंथ 'आई ती पोथी प्रथमच पहात होती. आईने उत्सुकते पोटी सहज पानं पलटंविली,चित्र पाहिलीत आणि आईला अर्थबोध झाला की तिच्या स्वप्नात गजानन महाराज येऊन गेले. आईचं वाचन सुरू झालं,सर्व सुरळीत पार पडलं माझा जन्म झाला काही दिवसांनी महाराज आईला स्वप्नात येऊन विचारून गेले,काय?मिळाली मोठी मुलगी?आईनं दुसर्याच दिवशी शेजारच्या काकूंना म्हटलं

'आमचं जमेल तेव्हा आम्ही शेगांवला निश्चितच जाणार पण तुमचं जाणं आधी झालं तर माझ्या साठी गजानन विजय ग्रंथ घेऊन या ' अशा रितीने तेव्हा पासून गजानन महाराज,गजानन विजय आणि आमचा सहप्रवास सुरू झाला. पुढे आई मोठ्या प्रमाणावर महाराजांचा प्रगट दिनही करु लागली आणि वेळोवेळी महाराजांचे अनुभव पण येऊ लागले.

आज सर्वत्र स्मार्ट फोनची संख्या भरपूर वाढली आहे.

मध्यंतरी जेव्हा व्हाट्सअॅपची लोकप्रियता खूप वाढीस लागली तेव्हा गजानन महाराजांच्या काही भक्तांनी त्याचा वापर गजानन विजय ग्रंथाच्या साखळी पारायणा साठी सुरेख रितीने करून घेतला. यात एकवीस वाचकांचा ग्रुप करून दर गुरुवारी प्रत्येकाने एक,याप्रमाणे संपूर्ण एकवीस अध्यायाचं पारायण करण्यात येतं आपला अध्याय वाचून झाला की तसं प्रत्येकाने ग्रुप प्रमुखाला कळवायचं. कुणाला काही कारणाने जर वाचन शक्य न झाले तर त्या अध्यायाची सोय प्रमुखाने करून घ्यायची. प्रत्येकाने पुढल्या गुरुवारी पुढचा अध्याय या क्रमाने वाचत जायचं. आज विविध भागात असे शेकडो ग्रुप दर गुरुवारी पारायण करून ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतात.

हे सर्व इथे सांगायचं कारण म्हणजे इ.स.2017 च्या आषाढ महिन्यात मी अशा एका पारायण ग्रुप मधे सहभागी झाले. दर गुरुवारी ह्या ग्रुप साठी म्हणून एक अध्याय वाचण्यास प्रारंभ झाला. अध्याय वाचण्याच्या संदर्भात मी एक ठरविलं होतं की शक्यतो अध्याय संध्याकाळी पाच सव्वापाचच्या सुमारास वाचायचा आणि वाचन करीत असताना मधे शक्यतो कुणाशी बोलायचं नाही,आपली जागा सोडायची नाही. आमचं घर पहिल्या मजल्यावर,समोरची खोली आकाराने थोडी मोठी जिथे आम्ही टी. व्ही. ठेवला आहे आणि जिथे मी पोथी वाचन करते ती खोली साधारण आठ बाय दहा फुटाची आहे. खोलीत भिंतीला लागून छोटसं देवघर,देवघरावर दोन मोठे फोटो आहेत,एक गोंदवलेकर महाराजांचा आणि एक गजानन महाराजांचा,देवघरासमोर बसलं तर मागे भिंतीला लागून आपल्या पाठीशी एक छोटं डायनिंग टेबल,त्या मागे छोट्या जागेत एक जास्तीचं सिलिंडर ,त्या मागे आडवा किचन ओटा,माॅड्यूलर टाईप किचन असल्याने कप्प्यात दारा मागे चालू सिलिंडर. जास्तीचं सिलिंडर आणि चालू सिलिंडरचं दार या मधल्या जागेत प्लॅस्टिकमधे भाजी,कांदा,लसूण इत्यादी.

मला आठवतं तो मार्गशीर्ष महिना होता म्हणजे आता मला आषाढ ते मार्गशीर्ष असे पाच सहा महिने दर गुरुवारच्या पोथी वाचनाचे होत आले होते. माझ्या संध्याकाळच्या नियमीत वेळेत माझं वाचन सुरू होतं,अन्य वेळेत मला शक्य नव्हतंच असं नाही पण मी आपली ती एक वेळ ठरविली होती.

14 डिसेंबर 2017,मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार, मार्गशीर्षातील गुरुवारी महालक्ष्मीची पुजा करण्याचा अनेक ठिकाणी प्रघात आहे. मीही त्या दिवशी देवघरा शेजारी चौरंगावर लाल मखमली वस्त्र अच्छादून त्यावर महालक्ष्मीचा फोटो ठेवला होता. बाजूला समई शांतपणे तेवत होती. त्या गुरुवारी माझ्यावर सहावा अध्याय वाचण्याची जबाबदारी होती.

दुपारी एक दीडची वेळ होती. मी आणि सासरे आम्ही दोघं बाहेर टी.व्ही. पहात होतो आणि मला आतून सूचना झाली की उठा आणि पोथी वाचायला घ्या. प्रथम मी त्याकडे लक्ष दिलं नाही,पण मग मला आतून अस्वस्थ वाटून एक सारखी सूचना होऊ लागली,पोथी वाच!मग मात्र मी उठले,दुपारी पावणे दोनला प्रथमच मी पोथी वाचायला सुरुवात केली. मंगलाचरण झालं आणि टायर मधून हवा बाहेर यावी तसा आवाज कानावर आला,मी चमकून मागे गॅस शेगडीकडे बघितलं पण बटणं बंद होती मी पुन्हा वाचू लागले. सहाव्या अध्यायातील त्या ओव्या..

आगट्या पेटल्या एकसरां / अजमासे हो दहा बारा/ तेणे डोंब झाला खरा / गगनोदरी धुमाचा /.. , आगीची सूचना पुन्हा तोच आवाज कानाला भासला आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. गॅस सिलिंडर लीक असावं. कधी नव्हे ते तडक उठले मागे टेबलला वळसा घालून पुढे झाले

सिलिंडरच्या कप्प्याचं दार उघडलं सिलिंडर मधून गॅस बाहेर येत होता. ताबडतोब नाॅब बंद केलं. मग लक्षात आलं की समई शांत करायला हवी पुन्हा टेबलच्या बाजुने समईच्या दिशेने यायला निघाले तो टेबल खालून वायुगतीने आणि वायुमार्गाने बाहेर आलेला गॅस समई पर्यंत पोहोचला आणि तेवढ्या भागात एकच भडका उडाला,वाटेतील कांदे,लसूण,प्लॅस्टिक आदी जळून काळं झालं. मी टेबलच्या या बाजूला असल्याने माझ्या नजरेसमोर ते घडलं पण मी बाजूला सुरक्षित होते.

नशीबानं जास्तीचं सिलिंडर रिकामं होतं त्याची ऑर्डर अजून द्यायची होती,महाराजांनी मला पोथी वाचायला घ्या अशी बुद्धी दिली म्हणून ठीक अन्यथा गॅस काही फार वेळ कोंडून थोडीच राहणार होता आणि समई तर तिथे होतीच. त्या दिवशी योगाने आलेला सहावा अध्याय,मला उठून गॅस पहाण्याची झालेली प्रेरणा,नाहीतर समई आणि गॅस यामध्ये मी होतेच की! या सर्वावर मात करणारा एक विचार म्हणजे चालू सिलिंडरचा केवढा मोठा स्फोट त्या दिवशी होऊ शकला असता.

पण आता ते सर्व टळलं होतं. मार्गशीर्षातील त्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी आई तर मला पावलीच आणि सद्गुरू श्री गजानन महाराज रक्षणाकरीता मार्गदर्शक ठरले. गजानन महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहे या पेक्षा अन्य कुठली भावना माझ्यासाठी श्रेष्ठ ठरणार होती? मी मनातून महाराजांचे आभार मानले आणि एकच म्हटलं.. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!


🌺 अनुभव--सौ.मानसी योगेश वाळूंजकर

डोंबिवली पूर्व

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page