अनुभव - 42
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 9, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
* 'त्याचे नियोजन' हाच अनुभव *
जय गजानन! आपण गजानन महाराजांचे अनुभव ऐकतो, वाचतो,अनुभवतो.आपण बरेचदा त्या घटनांमधे चमत्काराचा शोध घेतो. पण या सर्वावर मी विचार करते, तेव्हा मला नेहमी वाटतं की एखादी गोष्ट सुरळीतपणे पार पडणं,एखाद्या कामात कुणी अचानक सहाय्यभूत ठरणं,कुणाकडून वेळेवर मोलाचा सल्ला मिळणं,कुणी अचानक मदतीला धावून येणं,हे सर्व त्याच्याच योजनेतून होत असतं. तोच त्याचा अनुभव असतो.
मी मॅट्रीकला असतानाची,म्हणजे साधारण 1978- 79 ची गोष्ट आहे. तेव्हा परीक्षेत मिळणार्या गुणांच्या टक्केवारीची वेडी शर्यत सुरू व्हायची होती. पहिल्या झटक्यात मॅट्रीक पास हीच फार मोठी गोष्ट होती. पण तेही कठीण होतं. आमच्या कुटुंबात आत्ते,मामे,मावस,चुलत अशी बरीच भावंडं होती. त्यांच्या पैकी कुणीही मॅट्रीकला पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला नव्हता आणि आता माझी वेळ होती. घरची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आई चौथी शिकलेली, शिकवणीचं खुळ तेव्हा नव्हतं आणि असतं तरी घरी पैसा नव्हता त्यातून माझं इंग्लिश आणि गणित बेताचच होतं. म्हणजे मी पण पहिल्या प्रयत्नात निघणं जरा कठीणच होतं.
आई तेव्हा गजानन विजय ग्रंथाचं नियमित वाचन करीत असे त्यामुळे पोथीतील कथांमुळे आणि चित्रांमुळे महाराज ऐकून माहीत होते. परीक्षा अगदीच जवळ आली होती आणि एकेरात्री महाराज स्वप्नात आले,मी त्यांना नमस्कार केला,ते मला म्हणाले काळजी करू नकोस मी आहे ना? घाबरतेस कशाला? सर्व ठीक होईल,अडचणी दूर होतील. दुसरे दिवशी दुपारी मी ते स्वप्न आईला सांगतच होते तो माझी खास मैत्रीण जयश्री सावंत माझ्याकडे आली, मला म्हणाली 'साधना माझा मावस भाऊ गणित खूप छान शिकवतो तो आपल्याला शिकवायला तयार आहे आणि पास होण्यासाठी आवश्यक ते इंग्लिशही शिकवेल'. झालं! ज्या विषयांची भिती होती त्यांचीच सोय झाली. आता प्रश्न होता वेळेचा,म्हणजे फार वेळ शिल्लक नव्हता, तर तीही अडचण दूर झाली कारण तितक्यातच शिक्षकांच्या राज्यव्यापी संपाची घोषणा झाली, त्याचा परिणाम म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन आवश्यक तो वेळही उपलब्ध झाला आणि आम्हा सर्व भावंडांमधे मी पहिली ठरले की जिने पहिल्याच प्रयत्नात मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण केली. मी मॅट्रीक पास होणं हा माझ्यासाठी महाराजांचा फार मोठा अनुभव होता त्यामुळे मनात त्यांच्याविषयी श्रध्दा दृढ झाली नसती तरच नवल.
पुढे 1986 ला माझं लग्न झालं आणि लग्नानंतर आमच्या 'ओमकार 'चा जन्म झाला. माझ्या मनातील श्रध्देपोटी मी महाराजांना बोलले की आम्ही दोघं मुलाला घेऊन शेगांवला दर्शनासाठी येऊ. मी त्याबद्दल मोहन म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं. त्यांनी महाराजांचं नाव ऐकलं होतं परंतु त्यांना फारशी माहिती नव्हती अनुभव नव्हता. त्यांचा देवावर विश्वास पण बुवाबाजीवर नाही त्यामुळे मनात थोडी शंका घेऊनच ते माझ्या नवसासाठी म्हणून शेगांवला यायला तयार झाले. मला आपलं नेहमी वाटतं की कुणी साशंक मनाने शेगांवला जात असेल तर महाराजांचं ब्रीद वाक्य आहे "अरे तू शेगांवला ये तर खरं बाकी पुढे पाहू!'
तो 1990 चा मे महिना होता,आम्ही प्रथम मुंबईहून जळगावला माझ्या मावशीकडे पोहोचलो व दुसरे दिवशी जळगावहून शेगांवला जाण्याचं ठरविलं, तेव्हा जळगावला थांबत असलेल्या गाड्या अगदी अल्प होत्या. एखादी गाडी सुटली की दुसर्या दिवसावर बेत ढकलण्याची वेळ असायची. शेगांवहून 2.30 ला परतीची गाडी होती. आम्ही दोघं मुलासह शेगांवला पोहोचलो.स्टेशनवर घोषणा झाली की 2.30 ची गाडी भरपूर लेट असून ती संध्याकाळी पाच पर्यंत सुटेल. म्हणजेच आम्हाला दर्शनासाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. आमचं शेगांव दर्शन छान झालं. मिस्टरांनाही प्रसन्न वाटलं. गाडी लेट असली तरी कधी कधी ती वेळेच्या आधी पण येऊ शकते या विचाराने आम्ही स्टेशनची वाट धरली. आम्ही पुलावर होतो तोच समोरून एक गबाळ वेषातील खेडवळ माणूस धावत आमच्याकडे आला,आम्हाला म्हणाला 'तुम्हाला जळगावला जायचे आहे ना?चला लवकर ती पहा खाली जळगावची गाडी उभी आहे. ती सुटेलच आता चला घाई करा.' ऐकून आम्ही पळत सुटलो,गाडीत कसाबसा प्रवेश मिळाला आणि गाडी सुटली. गाडी सुटली आणि आम्ही भानावर आलो. कोण होता तो? त्याला कसं माहित आम्हाला जळगावला जायचे आहे? मुळात आपण तर मुंबईचे,बरं आपण तर कुठे बोललोही नाही. आपल्या दोघां शिवाय हे कुणालाच माहिती नाही ..पण आता या प्रश्नांना तसा काहीच अर्थ नव्हता. गाडीच्या वेगा सोबत प्रश्न बाजूला जाऊन त्यांची जागा श्रध्देने केव्हाच काबीज केली होती.
असो तर अशी मी एक महाराजांची श्रध्दाळू भक्त राधिका आचरेकर,मुंबईला चेंबूर येथे रहाते. 2006 ची एक घटना सांगते आणि तुमची रजा घेते. तेव्हा माझे दोन भाऊ नंदू आणि राविन नवी मुंबई वाशी च्या पलीकडे जुईनगर येथे रहात होते सोबत आई होती. चेंबूर-जुईनगर हे अंतर जवळपास वीस कि.मी. त्या दिवशी आषाढी एकादशी होती. नंदू ने सेकंडहॅन्ड मारुती व्हॅन घेतली होती त्या दिवशी संध्याकाळी नंदू, त्याची बायको दर्शना मुलगा सोहम आणि रविन त्याची बायको तनुजा आणि त्यांचा चार महिन्याचा मुलगा देवम असे सगळे 'सानपाड्याला' खरेदी उरकून माझ्याकडे आले. आई घरीच होती ,रविनला अंगात ताप होता.ते रात्री माझ्याकडे 8वाजता आले आणि फराळ उरकून व आईसाठी फराळाचं घेऊन रात्री उशिरा माझ्याकडून परतीसाठी निघाले,परतीचा प्रवास जास्तीत जास्त पाऊण तासाचा पण रात्रीचे बारा वाजत आले तरीही पोहोचल्याचा फोन आला नाही. मी इकडे अस्वस्थ झाले. बाराच्या सुमारास रविनचा फोन आला 'ताई वाशी टोल नाक्याजवळ आमची गाडी बंद पडली आहे. नंदू आणि वहिनी मेकॅनिकला शोधायला गेले आहेत. लहान मुले,स्त्रिया,अपरात्रीची वेळ. मी बेचैन झाले. पुन्हा थोड्या वेळाने फोन आला मेकॅनिक कुठे मिळत नाही आहे आणि गाडी सुरू होत नाही आहे,आम्ही जिथे फोन ठेवतो तिथेच गजानन महाराजांची मूर्ती आहे. मी महाराजांना म्हटलं महाराज तुम्हीच यातून काही मार्ग काढू शकता. माझ्या हातात तुम्हाला म्हणणं हाच मार्ग आहे. काही तरी मदत त्यांना मिळू दे.मी प्रार्थना करून अस्वस्थपणे आत बाहेर फिरत होते मधेच मूर्ती समोर बसून पुन्हा प्रार्थना करीत होते.
साधारण अर्ध्या तासाने फोन आला,ताई आम्ही घरी पोहोचलो. मी विचारलं गाडी सुरू झाली का? त्यावर रविननं सांगितलं,अगं नाही विरुद्ध दिशेने एक मारूती सर्व्हिस व्हॅन आली त्यांच्या कडूनही गाडी सुरू झाली नाही, मग त्यांनी टो करून आम्हाला घरी सोडलं. मी त्यांना विचारलं तुम्ही आमच्या पर्यंत कसे पोहोचलात? तर त्यांनी सांगितलं 'आम्हाला वर्कशॉपला एक फोन आला की अमुक ठिकाणी गाडी बंद पडली आहे,त्यात लहान मुले आणि स्त्रियाआहेत. तुम्ही जाऊन मदत करा.' आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कोण? त्यावर त्यांनी सांगितलं' मी बस मधील एक प्रवासी आहे गाडीच्या बाजूने आमची बस गेल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं. तुम्ही कृपया त्यांना मदत करा. फोन ठेवला आणि लगेच आम्ही निघालो.
सगळे घरी सुखरूप पोहचले होते. वेळेवर मदत मिळायला कुणीतरी निमित्त ठरला होता. कुणीतरी अचानक सहाय्यभूत ठरणं हा त्याच्याच योजनेचा भाग.
त्या रात्री पहिले अस्वस्थपणाने झोप येत नव्हती आणि नंतर गजानन महाराजांच्या स्मरणात झोप हरवली होती. गादीवर पडून जप मात्र सुरू होता. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ.राधिका मोहन आचरेकर
चेंबूर, मुंबई
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
Commentaires