अनुभव - 43
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 9, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
* त्रिकालज्ञ गजानन महाराज *
जय गजानन! गजानन विजय ग्रंथात एकोणीसाव्या अध्यायात,नागपूरातील ज्या सीताबर्डीत महाराज आल्याचा उल्लेख आहे त्याच सीताबर्डीत आणि महाराज ज्या भागात होते साधारण त्याच भागात माझ्या वडिलांनी 8 जुलै 1925 रोजी,त्यांच्या मोठ्या भावाला मदतीला घेऊन एक पुस्तक विक्रीचे दुकान काढले.वडिलांच्या मेहनतीमुळे दुकान खूप चालले,नावारुपाला आले. मात्र पुढे माझे काका आणि काकू दोघांचेही निधन झाले. वडिलांनी भावाच्या मुलांप्रती असलेली जबाबदारी स्वीकारून दोन मुलांना दुकानात भागीदार म्हणून घेतले मात्र पुढे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी कौटुंबिक कलह उद्भवलाच आणि वडिलांनाच दुकानातून दूर सारण्याचा प्रयत्न होऊन वडील हताश झाले. 1925 ते 1962 तब्बल सदतीस वर्षे ज्या दुकानासाठी रक्त आटवलं ते दुकान सोडून देऊन वडील घरी बसले आणि मानसिक आघातामुळे पार मोडून गेले.
आज माझं वय 75 च्या पुढे आहे. पण तेव्हा मी तरूण होतो. मी खूप समजावून पाहिलं,त्यांना म्हटलं बाबा 'बंदूक लढत नसते तर त्या बंदूकी मागे असणारा सैनिक लढत असतो. 'आपण नवीन दुकान काढू,पण एक ना दोन, ऐकायलाच तयार नव्हते. माणसाला अशा वेळी श्रध्दा खूप बळ देते पण त्यांचा संत,देव,मूर्तीपूजा यावर अजिबात विश्वास नव्हता. ते कधी मंदिरात जायचे नाही की घरी देवपूजाही करायचे नाही.
माझी आई मात्र 1950 पासूनच गजानन महाराजांची भक्त होती. जमेल तसं पारायण करणं आणि त्या काळी शेगांवहून प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी भक्तांना मनीऑर्डर फाॅर्म येत असे त्यातून अकरा रुपये शेगांवला पाठविणे व तिथून आलेला प्रसाद श्रध्देने घेऊन आम्हालाही ती देत असे. आईच्या नातेवाईकांमधेही गजानन महाराजां विषयी श्रध्दा होती. मला आठवतं तेव्हा इंदोरहून आईचे काही नातेवाईक शेगांवला जाण्यासाठी म्हणून नागपूरला आले होते. त्यांनी वडिलांना खूप आग्रह केला. म्हणाले अहो प्रवासासाठी म्हणून तरी आमच्या बरोबर शेगांवला चला तेवढंच तुमच्या मनाला बरं वाटेल. कसे बसे ते तयार झाले, सर्व लोक शेगांवला गेले. दोन दिवस तिथे राहिले. परत येताना वडील चक्क फ्रेम केलेला महाराजांचा फोटो आणि श्रध्दा घेऊनच परतले .काय चमत्कार झाला कुणास ठाऊक,अक्षरशः पंधराव्या अध्यायातील त्या ओव्या खर्या ठरल्या.. पश्चिमेला मावळला/तोच पूर्वेकडे आला/विचार सुर्य त्याचा भला/श्रीधरा सुखी करण्यास/एक संता वाचून /विचाराचे परिवर्तन/कोणी न करु शके आन/ सत्य एक त्यांनाच कळे /..
वडिलांनी जुन्या दुकानावरील हक्क सोडून दिला आणि ताराबाई बुटींकडे दुकानाचा गाळा आरक्षित केला. महाराजांच्या फोटो समोर दुकानाच्या नावाच्या अनेक चिठ्ठ्या टाकून त्यातील एक मला उचलण्यास सांगितली आणि मी उचललेल्या चिठ्ठीत नाव होतं"सेन्ट्रल बुक स्टॉल" तो फोटो कुलस्वामिनीच्या फोटो सोबत आजही आमच्या दुकानात आहे. दुकान सुरू झालं ,मी शेगांवला जाऊन गजानन महाराजांना वृत्तांत कथन केला आणि दुकानाकडे व माझ्याकडे लक्ष देण्याची प्रार्थना करून आलो. त्यांच्या कृपेने दुकान इतकं भरभराटीला आलं की आजही नागपूर आणि पुस्तक असा विषय निघाला की जाणकारांच्या तोंडून सेन्ट्रल बुक स्टॉल नावाचा उल्लेख होतो.
दुकानाच्या वाटचालीत महाराजांचा आशीर्वाद सतत माझ्या सोबत होता माझी पण शेगांव वारी आणि वाचन अशी सेवा होत होती. वडील गेल्यावरही दुकानाची वाटचाल माझ्या कडून त्यांनी योग्य रितीने करवून घेतली.
माणसाच्या आयुष्यात सगळे दिवस सारखेच येतील हे संभवत नाही. मात्र संकटाच्या काळात भगवंताचं अधिष्ठान टिकून राहिलं तर माणूस खंबीर पणे उभा राहू शकतो.
इ.स.1995 चा फेब्रुवारी महिना होता. दुपारची वेळ होती एक माणूस दुकानात आला,गर्दी असली तरी आपलं येणार्या जाणार्याकडे लक्ष असतंच. धोतर, पांढरा झब्बा, उंच, भेदक दृष्टी.असा तो माणूस माझ्या कडे एकटक पहात होता, त्याची नजर मला अस्वस्थ करीत होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर मी त्याला विचारलं 'आपल्याला काय हवं आहे?' तो म्हणाला मला तुमच्या साठी एक पूजा बांधणं आवश्यक वाटतंय,मला एकावन्न रूपये द्या. जास्त उहापोह न करता मी त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि तो निघून गेला. ती गोष्ट माझ्या विस्मरणात गेली.
सुमारे आठ दिवसांनी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तोच माणूस पुन्हा दुकानात आला. त्याच भेदक दृष्टीने माझ्या कडे पहात होता. दुकानात आतल्या बाजूला थोडं निवांतपणे बोलता येतं,मला खुणेनी तो आत घेऊन गेला. गंभीर आवाजात म्हणाला "तुमच्या जीवनात अत्यंत गंभीर आणि दारूण प्रसंग घडणार आहे. तुमच्यावर जीव जाईल इतकं मोठं संकट येणार आहे. हे संकट मी टाळू शकत नाही, त्याची तीव्रता थोडी कमी करू शकतो." त्यानी एक लाल कापडात घट्ट आवळलेली पुरचुंडी मला देऊन सांगितलं की सदैव जवळ बाळगा,संकट गेल्यावर या पुरचुंडीला नर्मदेत सोडून द्या. नर्मदा आणि महाराज हा संबंध मनात येऊन महाराजांचं नाव घेऊन मी ती पुरचुंडी पॅन्टच्या चोर कप्प्यात ठेवणं सुरू केलं.
25 एप्रिल 1995 ला काही कामासाठी मला इंदोरला जाण्याचा योग आला. तिथून 30 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता सरकारी बसने भोपाळला जायचं होतं. मी तिकिट घेतानाच एक गृहस्थ भेटले, म्हणाले,मलाही भोपाळला जायचं आहे. आम्हाला ड्राइव्हरच्या मागच्या लाईनीत बसच्या मधोमध दोन जागा मिळाल्या मी खिडकी जवळ बसलो. आमचा प्रवास सुरू झाला.
'सिहोर'च्या आधी एका वळणावर आमची बस आणि लोखंडी सळाकी असलेला एक ट्रक यांची जबरदस्त टक्कर झाली,वेगामुळे खिडक्या कापून सळाकी आत शिरल्या .माझ्या समोरील व्यक्तीचं शीर कापले जाऊन धडा वेगळं होऊन माझ्या मांडीवर येऊन पडलं,माझा उजवा हात खिडकीत होता तो कापल्या जाऊन माझ्या डाव्या हातात आला,माझ्या मागील सीट वरील माणसाचं शीर वेगळं होऊन मागे जाऊन पडलं. किंकाळ्यांनी वातावरण हादरून गेलं. सर्वत्र रक्ताचा सडा पडला.
आम्हाला दुसर्या बसने प्रथम सिहोरच्या हाॅस्पिटल मधे आणि तिथे सोयी नसल्याने नंतर अॅम्ब्युलन्सने भोपाळच्या हमीदीया हाॅस्पिटलमधे नेण्यात आलं. तो अनोळखी माणूस पूर्णवेळ सावली सारखा माझ्या सोबत होता. त्याच्या हातात माझी बॅग होती कारण माझ्या हातात माझा हात होता. त्याही स्थितीत माझं महाराजांचं स्मरण सुरू होतं. प्रचंड रक्तस्त्राव होऊनही मी बेशुद्ध झालो नाही ही महाराजांचीच कृपा. त्या माणसाला मी घरचा आणि दुकानातील नंबर देऊन वृत्त कळविण्याची विनंती केली. नागपूरहून भोपाळला निरोप पोहोचल्यावर भोपाळचे नातेवाईक आल्यानंतरच त्या माणसाने स्वतःचे नाव गाव काहीही ओळख न देता माझी बॅग त्यांच्याकडे सोपवून निरोप घेतला.
वेळेत उपचार न मिळाल्याने माझा हात तसाच राहिला. बाकी उपचार पूर्ण होऊन मी एकहाती नागपूरकडे निघालो येताना हुशंगाबाद येथे ती लाल पुरचुंडी नर्मदेत सोडून दिली.
घडून गेलेल्या त्या प्रसंगात मी जर बेशुद्ध झालो असतो तर मी बेवारसच ठरण्याची शक्यता होती. पण महाराज सतत सोबत होते. मी जे दृश्य पाहिले ते पाहून धडधाकट माणूसही शुध्द हरपेल अशी स्थिती होती. मांडीवरील शीर पाहून क्षणभर वाटलं मीच गेलो की काय?प्रचंड रक्त जाऊनही मला शुद्धीवर ठेवणारं कोण होतं?
आज ती घटना घडून वीस बावीस वर्षे होऊन गेलीत, पण आठवणीनं आजही थरकाप होतो.महाराजांसमोर गुडघे टेकवून मी नमस्कार करतो तेव्हा माझा एकच डावा हात नमस्कारासाठी समोर येतो तेव्हा महाराजांना मनात म्हणतो,माझा उजवा हात तुम्ही व्हा आणि माझ्या कडून नमस्कार करवून घ्या आणि सतत नामस्मरणाची बुद्धी देऊन माझ्या कडून तुमचं नाव ओठावर येऊ द्या.. श्री गजानन !जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- उल्हास ( बाबू ) मुजुमदार
नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे..
" श्री गजानन अनुभव "
Comments