अनुभव - 44
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jun 10, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
*देव तेची असती संत,संत तेची देव साक्षात *
जय गजानन! मी आज गजानन महाराजांविषयी अनुभव सांगायचं ठरविलं खरं,पण खरं सांगायचं तर मला माझ्या वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत ,गजानन महाराज कोण?कोठले?त्यांची समाधी शेगांवला आहे,ते शेगांवचे गजानन महाराज आहेत या बद्दल काही काहीच माहिती नव्हती. एवढेच काय मी तर त्यांचं नावही ऐकलं नव्हतं.
या भक्तीच्या वाटेवर प्रत्येकजण कोठल्या ना कोठल्या देवाचा भक्त असतो,त्यावर त्याची नितांत श्रद्धा असते,त्याप्रमाणे मी पण श्री गुरुदेव दत्तांची भक्त होते. त्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा होती. सांगलीला रहात असल्याने वरचेवर नृसिंहवाडीला जाणे होत होते. पण माझी श्रध्दा गजानन महाराजांच्या दिशेने वळविण्याचा योग भगवंतानेच घडवून आणला.
त्याचं असं झालं,माझे दीर हे पंढरपूरला बॅकेत नोकरीस होते. ते विठ्ठल भक्त!ते नियमित विठ्ठलाच्या दर्शनाला जात पालखीला जात. अन् एक दिवस त्यांना पालखीत ठेवलेली गजानन महाराजांची पोथी प्रसाद म्हणून मिळाली. ते अविवाहित असल्यामुळे त्यांनी ती पोथी माझ्याकडे आणून दिली,अन् सांगितलं,वहिनी हे गजानन महाराज खूप मोठे संत आहेत. त्यांची प्रचिती ताबडतोब येते.
मी पोथी हातात घेऊन कितीवेळ तशीच स्तब्ध बसून राहिले. त्यातील फोटो वगैरे बघितले आणि देवघरात पोथी ठेवून दिली. पण रात्री झोपताना मात्र सतत हा विचार होता की आता हे महाराज कोण?कुठले?मी तर दत्तगुरूंना मानते. त्यांना सोडून या महाराजांना?त्याच विचारात रात्री झोपी गेले .अन् काय नवल!मला पहाटे स्वप्न पडले. मी नरसोबा वाडीला गेले आहे. दर्शनाला गेले. प्रदक्षिणा घालताना माझी नजर शिखरावर गेली,तेथे पहाते तो शेगांवचे गजानन महाराज!
मला खूप आनंद झाला. पोथी घरात आल्या आल्या महाराजांची प्रचिती आली. 'दत्त आणि मी एकच!' हाच संदेश त्यांनी मला दिला असे मला वाटले. सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छती. या उक्तीची प्रचिती आली. लगेचच मी पारायणाला बसले,मग काय गजानन विजय ग्रंथाची ख्याती आपण सर्व जाणताच. एवढी त्यात गुंग होऊन गेले,मला भानच उरले नाही. मी दशमी,एकादशी,द्वादशी अशी पारायणं करण्याचा सपाटा लावला. तीन मुलींच्या पाठीवर मला मुलगा व्हावा ही माझी इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाली. 'मुलाला दर्शनासाठी आणीन ' हा माझा नवस पूर्ण
करण्याकरिता, आम्ही शेगांवला ऐन सिझनमध्ये रिझर्व्हेशन न करताच निघालो. मनात शेगांवला जायचे एवढेच काय ते होते. गाड्यांना तुफान गर्दी!माझ्या मैत्रिणीचे वडील म्हणाले सुध्दा,कोठे चाललीस?म्हटलं शेगांवला! रिझर्व्हेशन केलस का?म्हटलं नाही मग तुम्ही एवढे पाच सहा लोक कसं जाणार एवढ्या गर्दीत. माझ्या तोंडून सहज निघालं 'महाराज नेतील की! ' अन् ते अक्षरशः खरं झालं .एवढ्या गर्दीत आम्ही घाईघाईत एका रिझर्व्हेशनच्या डब्यात शिरलो तिथे एक संपूर्ण मोठा बाक रिकामा होता. मी पटकन म्हटलं अहो हे बघा महाराजांनी आपल्यासाठी जागा ठेवलीय. आम्ही सर्व त्या जागी विराजमान झालो. मी गजानन महाराजांचे मनोमन आभार मानले. पुढे टी.सी. डब्यात चढला.पुन्हा परीक्षा. मी महाराजांचा धावा सुरू केला. पण तो आमच्या कडे न येताच निघून गेला. मला आनंदानं रडू कोसळलं. ऐन सिझनमध्ये बिना रिझर्व्हेशनचे आम्ही रिझर्व्हेशनचे सुख अनुभवत दुसरे दिवशी शेगांवला पोहोचलो.
मंदिरात आलो तर भक्त निवास 'हाऊसफुल्ल'सर्वत्र तोबा गर्दी. लोक मंदिराच्या प्रांगणात बसून होते. तो 1980 चा काळ,तेव्हा आजच्या इतक्या भक्त निवासाच्या सोई व्हायच्या होत्या. मी ह्यांना म्हटलं तुम्ही लाॅज बघून या हे तिकडे गेले. मी मुलांना घेऊन सामानाजवळ महाराजांच्या स्मरणात बसून होते. सांगायची गंमत म्हणजे नवस फेडण्याच्या विचारात जसा रेल्वे गर्दीचा विचार डोक्यात आला नाही तसा दशमी,एकादशीचा विचार आला नाही. एकादशीला शेगांवला नेहमीच गर्दी असते. प्रचंड गर्दीमुळे यांची चिडचिड होत होती आणि मनातल्या मनात धास्तावून मी महाराजांचा धावा करीत होते. इतक्यात एक पंधरा सोळा वर्षांचा मुलगा एवढ्या गर्दीतून माझ्या कडे आला नि म्हणाला , तुम्हाला खोली पाहिजे नं? तो अकस्मात कसा आला,मलाच खोली विषयी कसं काय विचारतो आहे?काहीच न उमगून यंत्रवत हात समोर केला .त्यानं माझ्याकडे एक किल्ली दिली व सांगितले 45 नंबरची खोली आहे,आणि ताडकन निघून गेला. मी अवाक् होऊन बघतच राहिले. इतक्यात हे आले नि तावातावाने ओरडले ,तुला महाराजांनी दशमी एकादशीलाच बोलावले होते का?
मी काहीच न बोलता त्यांच्या कडे किल्ली दिली आणि सांगितलं 45 नंबरची खोली आहे. आता अवाक् व्हायची वेळ यांची होती. आम्ही सर्व तिथे गेलो,45 नंबरची खोली आमच्यासाठी उपलब्ध होती. काॅमन संडास बाथरूम असलेली,जुन्या पद्धतीची ती खोली होती,पण आमची सोय झाली होती. मी जाहीर केलं,दर्शन झाल्या शिवाय खाणेपिणे काही नाही. खूप लोक आले होते. रांगेत उभे राहून दर्शन घेतलं तेव्हा समाधान झालं.
त्या संध्याकाळी शेगांवला महाराजांची पालखी निघणार होती. ती माझ्या साठी एक पर्वणीच होती. माझ्या आग्रहाखातर आम्ही सर्व पालखी सोबत चालू लागलो,पालखी देऊळात परत येत असताना बाजूला असलेल्या एका मंदिराच्या शिखराकडे माझी नजर गेली आणि मी आतून मोहरून उठले. ज्या दिवशी प्रथमच माझ्या हातात गजानन विजय ग्रंथ आला होता त्या रात्री मला स्वप्नात नरसोबाच्या वाडीला मंदिराच्या शिखरावर
' शेगांवच्या' गजानन महाराजांनी दर्शन दिलं होतं,आज मला ' शेगांवला 'गजानन महाराजांचं दर्शन होत होतं. माझ्या तोंडून एकदम शब्द बाहेर पडले 'गजानन महाराज!
त्याबरोबर सर्वांचीच नजर तिकडे वळली आणि सर्वांनीच भक्तिभावाने हात जोडले .
त्या शेगांव वारीत आमचं दर्शन खूपच छान झालं. आज मी गजानन महाराजांशी जुळल्या गेल्यामुळे अत्यंत समाधानी आहे आणि या समाधानाचं श्रेय विठ्ठलाच्या वारीत पालखीतून मिळालेल्या त्या पोथीचं आहे याची मला मनोमन जाणीव आहे.
अर्थात ती पोथी माझ्यापर्यंत पोहोचविण्याची योजना ज्या गजानन महाराजांची आहे त्यांना माझं सदैव वंदन आहे. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ. प्रिया मोहन कुलकर्णी सांगली
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
"श्री गजानन अनुभव "
Comments