अनुभव - 45
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 45 🌺)
* अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे *
जय गजानन! मी अरूण कृष्णराव देशपांडे,माझं लग्न 1981 ला झालं. माझी पत्नी सौ. संध्या तिच्या माहेराहून सोबत गजानन महाराजांची भक्ती घेऊन आली. गजानन महाराजांविषयी काही तिने सांगितलं तर काही मी जवळून अनुभवलं,पण मी मात्र भक्ती गंगेच्या काठावरच उभं राहणं पसंत केलं.
तिच्या लहान भावाच्या मेडिकल प्रवेशाच्या वेळी तिनं महाराजांना साकडं घातलं की तो डाॅक्टर होताच मी त्याला दर्शनासाठी घेऊन येईन आणि मरेपर्यंत तुमच्या पोथीचं वाचन करीन. त्याप्रमाणे तो आज नांदेड येथे एक नामांकित हृदयरोग तज्ञ म्हणून आहे.
आमचा लहान मुलगा मयूर सातव्या वर्गात असताना मेंदूज्वराने आजारी झाला. 4,5 डाॅक्टर सतत प्रयत्न करीत होते पण काही केल्या ताप काही उतरत नव्हता,मी घाबरलो पण हिने धीर सोडला नाही. महाराजांच्या फोटोला पाहून ती बोलली 'देवा माझा दिवा वाचव,तो बरा होताच त्याला घेऊन मी तुझ्या दरबारात दिवा लावीन.' रात्री दोन वाजता त्याचा ताप उतरला,धोका टळला होता. रात्री दोन पर्यंत ती अखंड नामस्मरण करीत होती.
अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगातून तिची श्रध्दा वाढतच होती पण मी मात्र अजूनही कोरडाच होतो. इ.स. 1985 ची गोष्ट,तेव्हा मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात,वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होतो. त्यावेळी औरंगाबाद गृहनिर्माण मंडळात (म्हाडा काॅलनी) चार खोल्यांचा एक गाळा मी मोठ्या हिंमतीने बुक केला पण काम सुरू होताच काही अंतर्गत वादामुळे त्यावर न्यायालयाची स्थगिती आली. परिणामी ते काम रेंगाळलं, अशात ऑक्टोबर 1988 साली माझी बदली आंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली.
आर्थिक स्थिती ठीक नसेल तर सर्वसामान्य माणसासाठी 'अर्थकारण' एक तारेवरची कसरत असते. आमच्या घरी दोन मुलं, दोन मुली,मुलीच्या लग्नासाठी मी कसाबसा पैसा जोडीत होतो तो,जून 1991 साली गृहनिर्माण मंडळ औरंगाबाद यांचेकडून अचानक पत्र आलं की गाळा हवा असल्यास तात्काळ रुपये साठ हजार भरून गाळा ताब्यात घ्या. त्या काळात माझा भावठाणकर म्हणून एक मित्र माझ्या पाठीशी उभा राहिला,त्याने धीर दिला,म्हणाला गाळ्यासाठी पैसे भर,मुलीचं लग्न ठरलंच तर मी सहाय्य करीन. मी पैसे भरून गाळा ताब्यात घेतला.
' या गाळ्याचा मासिक हप्ता 1500 रुपये होता,तो माझ्या पगारातून भरणं मला शक्य नव्हतं,तेव्हा डोक्यात एक विचार आला की काही दिवस घर किरायानं द्यावं आणि एकाच्या मध्यस्थीनं दंडारे नामक लाईटचं काम करणार्या एका व्यक्तीला घर किरायानं दिलं. त्याला घर काय भाड्यानं दिलं तिथेच दुर्दैवं आड आलं,त्याने दोन तीन महिने किराया दिला पण नंतर पैसे देणं तर बंदच केलं उलट तो गाळा स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला .ही बाब माझ्या कानावर येताच मी शासकीय कर्ज काढून एक रकमी 1 लाख 80 हजार रुपये भरले व न्यायालयात खटला दाखल केला.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात,पण इलाज नव्हता. एकीकडे कोर्टाच्या तारखांवर तारखा,त्याच काळात म्हणजे 5 फेब्रुवारी 1992 ला मोठ्या मुलीचं लग्न,त्यासाठी कर्ज,घराचा हप्ता,त्यातच मातोश्रीला झालेला जीवघेणा कर्करोग. भरीस भर नांदेड येथे बदली,देव माझी कठोर परीक्षाच पहात होता. कधी कधी तर नांदेड -औरंगाबाद तिकिटासाठी पैसे नसत. अशी पाच वर्षं गेलीत. अत्यंत हलाखीत आम्ही दिवस काढीत होतो. ही मला धीर देत होती. म्हणायची महाराजांच्या चरणी नवस बोला.ते नक्कीच आपल्याला यातून मार्ग दाखवतील त्यांना म्हणा 'काम झाल्यावर शेगांवला एक दिवसाची प्रासादिक पंगत देऊ.' मी तिच्यावर चिडून म्हणायचो माझं काम झाल्याशिवाय मी महाराजांच्या दरबारात पाऊल सुद्धा ठेवणार नाही.
6 मार्च 1996 ला कोर्टात तारीख होती म्हणून मी औरंगाबादला जाऊन आलो पण घर मिळण्याचं काहीच चिन्ह नव्हतं,मी हताश झालो.
अशात 9 मार्च 1996 रोजी हिचा भाचा सचिन मान्नीकर याचं नागपूरला लग्न होतं. मुलाचं मॅट्रीकचं वर्ष असल्यामुळे मी आणि लहान मुलगी वैदेही आम्ही नागपूरला जावं असं ठरलं. मला आठवतं 7 मार्चला पहाटे मुलगा अभ्यास करतो आहे की नाही ते पहावं म्हणून उठलो आणि पुन्हा झोपलो. साडे चारला माझा डोळा लागला आणि त्या पहाटे मला स्वप्न पडलं. मी आणि मुलगी वैदेही स्टेशनवर बाकावर बसलो आहोत. पांढर्या शुभ्र वेषातील गजानन महाराजांसारखे दिसणारे एक गृहस्थ काठी टेकत माझ्याकडे आले आणि मला विचारलं कुठे निघालेत?म्हटलं नागपूरला!अच्छा,विदर्भातच जाता आहात,एक काम करा शेगांवला जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. मी त्यांना माझा निर्धार सांगणार,त्यापूर्वीच ते म्हणाले तुझं काम तर झालं आहे!जा शेगांवला जा!मला लगेच जाग आली,मी लगेच घरच्यांना जागं केलं आणि शेगांवला जाण्याचा निर्णय जाहीर केला. पत्नी म्हणाली तुम्ही ठीक आहात नं?कालच औरंगाबादहून कसे आलात आज हे काय? पण माझा निर्धार पक्का होता.
7 मार्च 96 ला रात्री नांदेडहून निघून 8 मार्चला आम्ही शेगांवला पोहोचलो, दर्शन घेऊन कार्यालयात गेलो,तिथे आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील होते. त्यांना सर्व हकीकत कथन केली आणि पंगत वाढण्याचा खर्च विचारला तो खर्च दहा हजार रुपये होता पण तेव्हा माझ्याजवळ सहाच हजार रुपये होते. पण भाऊंनी परिस्थिती समजून घेतली,मला म्हणाले ठीक आहे बाकी पैसे तुम्ही नंतर पाठवा. आमची माणसं स्वयंपाक करतील तुम्ही सर्वांनी पंगत वाढण्यात सहभाग घ्या. त्याप्रमाणे तेव्हाच्या पद्धतीने आम्ही पंगत वाढल्यावर,आमची वेगळी पंगत वाढून आमचं छान आदरातिथ्य केले,मला सोवळं,हिला साडी,चांदीच्या पादुका दिल्या. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही रात्री नागपूरला पोहोचलो.
लग्न घरी माझे मोठे मेव्हणे जे म्हाडाचे मोठे अधिकारी होते ते आले होते,त्यांनी विचारल्यावरून मी त्यांना शेगांवहून आल्याचे वृत्त कथन केले,ते मला म्हणाले काय हे?अहो या काळात स्वप्नावर विश्वास ठेवून तुम्ही नवस फेडून आले?असं म्हणून तिथे जमलेले सर्वच आमची चेष्टा करु लागले .मी मात्र निमूटपणे ऐकून मनात महाराजांचं स्मरण करीत निवांत राहिलो.
9 मार्च 96 रोजी विवाह आटोपून रात्रीच्या बसने आम्ही नागपूरहून नांदेड साठी निघालो. सकाळी ऑफिस मधे उपस्थित झालो. दुपारी लंच टाईमला घरी येऊन जेवून ऑफिसला परतलो तो सर्व सहकारी मित्रांनी एकदम भोवती गराडा घातला आणि ते मला पार्टी मागू लागले म्हटले कशाबद्दल तर म्हणाले पहिले पैसे हातावर ठेवा मग सांगतो,मी पैसे देताच माझ्या हातावर त्यांनी तार ठेवली,ती पहाताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. रातोरात दंडारेनी घर रिकामं करून तिथून पलायन केलं होतं,तार होती 'घराचा ताबा घेण्यास ताबडतोब या '. ही गोष्ट 10 मार्चची,मी 11 मार्च 96 रोजी माझ्या घराचा ताबा घेतला.
पाच दिवसात महाराजांनी इकडची गोष्ट तिकडे केली होती. स्वप्नात आलेले गजानन महाराजच होते यासाठी कुणाच्या साक्षी पुराव्याची गरज उरली नव्हती. आता पर्यंत कोरडा असलेला मी भक्ती गंगेत चिंब भिजून गेलो होतो,ज्याला त्याला हातावर पेढा देऊन एकच म्हणत होतो
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--अरुण कृष्णराव देशपांडे
औरंगाबाद.
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
!!श्री गजानन अनुभव!!
Comentários