अनुभव - 46
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 10, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय
* बांधीत असता मंदीर *
जय गजानन! 8-9-1910 रोजी ऋषीपंचमीच्या पावन मुहूर्तावर ,समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी श्री क्षेत्र शेगांव येथे समाधी घेतली. शेगांवचे मंदीर आम्हा सर्व भक्तांसाठी एक श्रध्दास्थान आहे. मंदीर बांधीत असतानाचे काही अनुभव ह.भ.प.संतकवी दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात कथन केले आहेत. आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मिळून महाराजांची शेकडो मंदीरं आहेत आणि जवळपास प्रत्येक मंदीर बांधीत असताना,काही ना काही अनुभव भक्तांना आला आहे.
जसे उदा..अमरावती जिल्ह्यातील डोमक येथे नुकतेच 2017 साली संत गजानन महाराज सेवा समिती डोमक तर्फे महाराजांचे मंदीर बांधीत असताना गावातील लोकांना वाटलं,बांधकामात आपण सेवार्थ श्रमदान करावं आणि चारशे ते पाचशे तरूणांनी स्लॅबच्या दिवशी कुणी दोन कुणी चार घमेली काॅन्क्रीट टाकलं ते पाहून तेथील मिस्त्री आणि सेंटरींगवाला म्हणाले आज आम्हीही निशुल्क सेवा देणार. ही गोष्ट मंदिराच्या इतिहासात नमूद करण्यासारखी ठरली.
तर मुद्दा असा आहे की इ.स.2005 च्या सुमारास अहमदाबाद येथे गजानन महाराजांचे मंदीर बांधीत असताना आम्हाला आलेले काही अनुभव प्रातिनिधिक स्वरूपाचे म्हणून आम्ही सांगू इच्छितो. पण आम्हाला खात्री आहे की तुम्ही कुठेही मंदीर बांधा महाराज तुम्हाला अनुभव समृद्ध करणारच.
तर झालं असं की 1991 ला अहमदाबाद येथे प्रगट दिनाचा कार्यक्रम एका ठिकाणी व्यक्तीगत स्वरूपात सुरू झाला,नंतर 1994 ते 2004 आम्ही सामुहिक कार्यक्रम केला आणि सर्वांच्या मनात आलं की आपण गजानन महाराजांचं मंदीर बांधावं,त्या प्रमाणे अहमदाबाद येथील चांदखेडा जवळ,त्रागड येथे मंदिरासाठी जागा घेण्यात आली. अक्षय तृतीयेच्या दिवशी अहमदाबाद मधील स्वामी नारायण सांप्रदायाचे संत पुरुषोत्तमदास यांच्या हस्ते भूमीपूजन करण्याचं ठरलं.
भूमीपूजनाच्या आदल्या दिवशी इतका जोरदार पाऊस पडला की त्या जागेत जवळपास कमरेइतकं पाणी जमा झालं. आता या तलावात भूमीपूजन व्हावं कसं?कार्यकर्त्यांनी महाराजांना प्रार्थना करून श्रमदानाची शक्ती मागितली. मैदानातच एकीकडे मातीचा बंधारा टाकून त्या पलीकडे पाणी फेकणं सुरू केलं,कार्यकर्त्यांनी सात आठशे बादल्या पाण्याचा उपसा केला,पूर्ण पाणी काढून टाकलं,पाऊस थांबला,ऊन आलं. दुसरे दिवशी तिथे भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला तेव्हा काल इथे तळं होतं,हे सांगूनही खोटं वाटलं असतं. महाराजांनी परीक्षा घेतली खरी पण पाठीशी असल्याचा प्रत्ययही दिला.
आता भूमीपूजन तर झालं पण विरोधाभासातील गंमत बघा,त्या दिवशी तिथून पाणी बाहेर फेकले आणि आता बांधकामासाठी पाण्याची गरज होती. त्या साठी ग्रामपंचायतीत अर्ज केला,तेथील अधिकार्याने अर्ज तर स्वीकारला नाहीच उलट 'मी तुम्हाला त्या जागेवर मंदीर बांधू देणार नाही 'असं धमकावून आम्हाला बाहेरचा रस्ता दाखविला .
आम्ही टॅंकरने पाणी आणवून पायथ्यापर्यंत बांधकाम केले. आम्ही असं ठरविलं होतं की गजानन महाराजांच्या या मंदिरात श्री दत्त,स्वामी समर्थ,साईबाबा,मारूती, गणपती ,महादेवाची पिंडी या सर्वाची स्थापना करावी. हे सर्व काम सुरळीत व्हावे म्हणून 'गजानन युवा वर्गातील'एक सदस्य सहपरिवार गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन अष्टविनायकाच्या यात्रेला गेला. त्याने प्रत्येक ठिकाणी गणपती समोर मंदीराच्या कामात येणार्या अडथळ्यांच्या विषयी माहिती दिली आणि तेथील पुजार्या कडून एक श्रीफळ मागून घेतले. परत आल्यावर आम्ही संभाव्य मंदीराच्या आठ दिशांना ती आठ श्रीफळं जमीनीत पुरली आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन बांधकाम सुरू केले. काहीच दिवसात आम्हाला कळले की आम्हाला परवानगी नाकारणारा अधिकारी बदलून कुठे दूर गेला आहे आणि नवीन अधिकारी आम्हाला परवानगी देण्यास उत्सुक आहे. मंदीराचं बांधकाम वेगानं सुरू झालं आणि एक दिवस काही मजूर अचानक घाबरून उठले,एक आठ फुटी नाग तिथून सळसळ करीत जाताना त्यांनी पाहिला, काही दिवसांनी पुन्हा तेच झालं. नंतर तो मधे मधे दिसत राहिला,बांधकाम करणार्यांमधे त्याची दहशत निर्माण झाली,तो चर्चेचा विषय झाला. मग आम्ही सर्वांनी महाराजांना प्रार्थना केली 'महाराज निश्चिंत पणे काम होऊ द्या.'त्या प्रार्थनेनंतर नाग पुन्हा आला नाही,पण या गोष्टीला केवळ योगायोग म्हणता येणार नाही कारण मंदीरावर ज्या दिवशी कळसारोहण झालं त्या दिवशी नागराजांनी पुन्हा दर्शन दिलं,किंबहुना त्यांनी कळसाकडे पाहिलंआणि ते निघून गेले.
मंदिराचं काम होत असतानाच आम्ही जयपूरला सर्व मूर्त्यांसाठी आमची मागणी नोंदविली होती. त्या प्रमाणे मूर्ती तयार झाल्याचा निरोप आल्यावर आम्ही गाडी करून जयपूरला गेलो. गाडीचा ड्राइव्हर म्हणाला,साहेब येताना ऑक्ट्राय आणि चेकिंग साठी आपल्याला थांबावं लागेल, कमीत कमी तीन तास आपले तिथे जातील,म्हटलं ठीक आहे. आम्ही जयपूरला पोहोचलो,त्या सुंदर मूर्ती पाहून आम्ही भावविभोर झालो. मूर्तींसह आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आम्हाला कुठेही कुणीही थांबविलं नाही. तो ड्राइव्हर म्हणाला 'सहाब पिछले दस बीस सालसे गाडी चला रहा हूँ. ऐसा कभी नही हुआ.'त्याच्या या बोलण्यावर आम्ही नुसतेच हसलो आणि मागे गाडीत असलेल्या सर्व देवतांना नमस्कार केला.
आता मंदीर दर्शनासाठी खुले झाले. आम्ही अभिषेका साठी म्हणून देवतांच्या लहान पंचधातूच्या मूर्ती तयार करवून घेतल्या,मात्र काहीच दिवसात मंदिरात चोर येऊन त्या पंचधातूच्या मूर्ती चोरीला गेल्या. आम्ही पोलिसात तक्रार केली पण काही फायदा झाला नाही. मग आम्ही गजानन महाराजांना प्रार्थना केली. 'महाराज चोरांनी त्या मूर्ती विकल्या तर हरकत नाही,त्यांचं भलं होवो पण त्या मूर्ती खंडित होऊ नयेत. बाकी तुम्ही समर्थ आहात.'या गोष्टीला तीन वर्षे झालीत आणि एका ऋषीपंचमीच्या दिवशी मंदिरात नामस्मरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजारच्या मंदिरातील एक माणूस आम्हाला बोलवायला आला 'आपके चिलीम वाले बाबाकी मूरत हमारे मंदीरमे कोई रखके गया है. आम्ही ताबडतोब त्या मंदिरात पोहोचलो. चोरीला गेलेल्या सर्व मूर्त्या तो चोर तिथे ठेवून गेला होता..महाराजांनी आमची प्रार्थना ऐकली होती.
तर एकंदरीत आम्ही गजानन महाराजांचे मंदीर बांधीत असताना आम्हाला आलेला हा अनुभव आहे आणि सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे तो प्रातिनिधिक आहे. बाकी कुठे पैशाची समस्या,कुठे जागेची समस्या,कधी बांधकाम साहित्याची समस्या,कुठे मूर्तीविषयक बाब,एक ना अनेक सर्वच बाबतीत महाराज कुठल्या ना कुठल्या रुपाने सहाय्य करीतच असतात,मार्ग दाखवितच असतात. आपलं काम इतकंच की त्यांच्या समोर भावपूर्ण अंतःकरणाने उभे रहा आणि मनापासून म्हणा . श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ वंदना शैलेश देशकर
सद्गुरूधाम गजानन महाराज मंदीर अहमदाबाद.
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
!! श्री गजानन अनुभव!!
Yorumlar