top of page

अनुभव - 47

Updated: Jun 10, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* चिंता सार्या दूर करी,संकटातूनी पार करी *


जय गजानन! मी सौ. आरती कोकर्डेकर वडोदकर,1997 ला माझं लग्न झालं,1998 ला मोठी मुलगी सायली चा जन्म झाला. यांची खाजगी नोकरी पगार फारसा असा नव्हताच पण 2004 साली बाॅसशी तात्विक वादविवाद होऊन तीही नोकरी सुटली आणि आमच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. आपल्या मूळ गावी परतावं म्हणून नाशिकहून आम्ही नागपूरला परतलो.

पूर्वी हिंदी सिनेमात हिरो नोकरीसाठी वणवण फिरतो हे पाहिलं होतं पण प्रत्यक्ष जीवनात नवर्यावर ती वेळ आली तेव्हा देव आठवू लागले. मला एका खाजगी शाळेत अत्यंत तुटपुंज्या पगारावर नोकरी मिळाली शिवाय दोन चार लहान मुलांना शिकवून ते पैसे जोडून केवळ दोन घास पोटात ढकलण्याची सोय झाली. पण आपण बायकोच्या भरवशावर जगतोय या कल्पनेतून नवर्याचं मानसिक खच्चीकरण होऊन नको ते विचार त्याच्या डोक्यात घर करू लागले. स्वाभिमानी वृत्तीमुळे कुणाला काही मागण्याचा प्रश्नच नव्हता,उलट भावाबहिणींनी आपुलकीनं विचारलं तरी 'दयेची भीक 'या कल्पनेनी जीव नकोसा व्हायचा. एकदा दूध आणायलाही पैसे नव्हते ,मग आम्ही काळाच चहा पीत होतो तेव्हा मुलं म्हणाली आई आम्हालाही काळा चहा चालेल.

त्या संध्याकाळी धरमपेठ येथील गजानन महाराज मंदिरात जाऊन महाराजांसमोर बसून मी खूप रडले, मग मी रोज मंदिरात जाऊन महाराजांशी बोलू लागले,कधी रडायची कधी बोलायची कधी चिडायची.निदान लहान मुलांची तर कीव करा असं म्हणायची.

2006 मधे यांना नोकरी मिळाली,वाटलं आता ठीक होईल पण 2008 ला ती कंपनी बंद पडली. पुन्हा बेकारी. पण आता कदाचित महाराजांना दुसर्या आघाडीवर माझी परीक्षा पहायची होती. लहान दीरांनी ऑफिस मधे ह्यांच्या विषयी बोलून ठेवले होते,त्याचा फायदा होऊन ह्यांना औरंगाबाद येथे नोकरी मिळाली आणि आम्ही सर्व औरंगाबादला आलो. ह्यांची नोकरी सुरू झाली.

डिसेंबर 2009.सायलीची तब्येत बिघडली म्हणून तिला जवळच्या डाॅक्टरांना दाखविलं त्यांना वेगळा संशय येऊन त्यांनी डाॅ. पारगावकर यांच्याकडे पाठविलं,तिथे तिचं पूर्ण चेकअप केल्यावर तिच्या हृदयात छिद्र असल्याचं लक्षात येऊन त्यांनी औरंगाबाद मधील 'कमलनयन ' येथील डाॅ. आनंद देवधर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डाॅक्टरांनी रिपोर्ट पाहून 23 डिसेंबरला अॅडमिट होऊन 24 डिसेंबरला ऑपरेशन करावं लागेल अन्यथा मुलगी हातची जाईल,असं सांगितलं. 23 तारखेपर्यंत दीड लाख रुपयांची सोय करावी लागेल हेही सांगायला डाॅक्टर विसरले नाहीत. त्या अनोळखी गावात परिस्थिती कठीण झाली पण आमचे घरमालक 'राव 'म्हणून होते ते म्हणाले आम्ही पाठीशी आहोत,ह्यांच्या ऑफिसमधे मेडिक्लेमची सोय होती परंतू लगेच पैसा मिळेल ह्याची शक्यता कमीच होती. हे सकाळी महाराजांसमोर बसले,म्हणाले ही स्थिती निर्माण करणारा तूच आहेस तर मार्ग काढणाराही तूच आहेस. मेडिक्लेमच्या ऑफिसातून फोन आला 75 % रक्कम मिळू शकेल.

24 डिसेंबरला डाॅक्टर म्हणाले 50-50 चान्सेस आहेत. दहा वर्षांच्या सायलीला,ऑपरेशन थिएटर मधे नेताना कल्पनाही नव्हती की तिला किती दिव्यातून जायचं आहे. तिचा निष्पाप चेहरा दाराआड गेला आणि आम्ही उर फुटून रडायला लागलो. 5,6 तास ऑपरेशन चाललं मला एकदा सायली आणि एकदा गजानन महाराज आलटून पालटून दिसत होते. डाॅक्टरांनी बाहेर येऊन ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगितलं तेव्हा आम्ही दोघांनीही महाराजांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. प्रथम 42 तास अतिदक्षतेचे आणि नंतर दोन वर्ष काळजी घ्यावी लागेल असा सल्ला दिला.

कधी कधी मनाला वाटतं महाराजांनी आपल्याला विद्यार्थी म्हणून स्वीकारले आहे की काय. कारण वेगवेगळ्या प्रकारे सारखी आमची परीक्षा सुरू असते,अर्थात पास होण्यासाठी मार्गही तेच दाखवितात म्हणा.

त्यांनी आर्थिक परीक्षेत पास केलं. आम्ही 2010 मधे गाडी घेतली,2012 मधे स्वतःचा फ्लॅट घेतला.

आमच्या तिरुपती पार्क येथील सोसायटीत काही वर्षांपूर्वी 2016 मधे एक विचित्र अपघात झाला. सोसायटीत सिन्टेक्सच्या 2000 लिटरच्या जुन्या टाक्या विक्रीस काढल्या. सर्व टाक्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर होत्या. पाच सहा लोक दोरीच्या सहाय्याने टाक्या खाली उतरविण्याचे काम करीत होते. खाली मुलं खेळत होती म्हणून मिस्टर मुलांना बाजूला करण्यासाठी खाली गेले होते,फ्लॅट मधील लोक गॅलरीतून हे सर्व पहात होते.दोरीच्या सहाय्याने एक एक टाकी खाली घेण्याचं काम होत होतं आणि अचानक दोर तुटला,ती एवढी मोठी टाकी वरून खाली यायला निघाली,सगळ्यांच्या लक्षात आलं की ही टाकी आता माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडणार, भितीमुळे सर्व ओरडू लागले,मी जोरात 'गजानन महाराज धावा 'महाराज धावा 'असं जीवाच्या आकांताने ओरडत खाली धावले. टाकी कशावर तरी आपटल्याचा जोराचा आवाज कानावर आला,हे पालथे गेट जवळ पडले होते. पाहून काळजात धस्स् झाले. टाकीचे दोन तुकडे झाले होते. पण महाराजांच्या कृपेने हे सुरक्षित होते. आता माझ्या सोबत फ्लॅट मधील सर्वच लोक खाली जमा झाले होते. झालं असं की टाकी लोखंडी गेटवर पडून तिचे दोन तुकडे झाले,ह्यांना स्पर्श करून एक तुकडा बाजूला पडला. ह्यांना थोडासा धक्का बसल्या सारखं झालं ,ह्यांना उठवून आम्ही उभं केलं,आम्ही फ्लॅट मधे 2014 पासून गजानन महाराज प्रगट दिन साजरा करत होतो अर्थात गजानन महाराज हेच दैवत हे सर्व जाणून होते. मी जोरात ओरडले 'गजानन महाराज की' उपस्थितांनी प्रतिसाद दिला, जय!त्या दिवसापासून उपस्थित सर्वांचीच महाराजांवर श्रध्दा दृढ होऊन आम्ही अधिक उत्साहाने प्रगट दिनसाजरा करण्यास प्रारंभ केला.

आता महाराजांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित सुरू आहे. नाही म्हणायला कंपनीत थोडा पगाराच्या अनियमिततेचा प्रश्न आहे पण महाराज ठीक करतीलच असा विश्वास आहे. बाकी मधे मधे महाराज काही आनंदाचे क्षण देत असतात,ते क्षण जीवन जगण्याचा उत्साह वाढवित असतात.

2017 च्या प्रगट दिनाला आम्हाला वृध्दी असल्यामुळे केवळ कुणाकडून नैवेद्य दाखवून महाप्रसाद व्हावा असा निर्णय ठरला. पारायण सध्या करू नये असं काही पोक्तांनी सांगितलं. प्रगट दिन आहे आणि महाराजांसमोर पारायण नाही या कल्पनेने मी अस्वस्थ झाले. मी महाराजांसमोर उभी झाले,त्यांना म्हटलं महाराज मी प्रसंगी तुमच्याशी भांडले,तुम्हाला कधी दोन शब्द बोलले पण ती परिस्थितीच तशी होती. मी इतकी कठोर नाही हो!तुमच्या समोर प्रगट दिनाला गजानन विजय ग्रंथ पारायण नाही ,ही कल्पनाच मला बेचैन करते आहे. आता तुम्ही बघा काय ते,काही मार्ग काढता आला तर उत्तम!प्रार्थना करून मी झोपी गेले.

प्रगट दिनाला सकाळी मला एक फोन आला,तो नागपूरच्या श्री अभय अंजीकर यांचा होता. 'आरती आम्ही औरंगाबादला आलो आहोत,आज प्रगट दिन आहे. मी सोबत गजानन विजय ग्रंथ आणला आहे. मला एक शांत जागा हवी आहे,जिथे मी पारायण करू शकेन.'ते ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. घराचा पत्ता नीट समजावून मी फोन खाली ठेवला. प्रगट दिनाला घरी पारायण होणार होतं.

दोन हातांनी दोन्ही डोळे पुसले आणि मनातल्या मनात महाराजांचे आभार मानून हात जोडून म्हटले..

श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--सौ आरती कोकर्डेकर वडोदकर

औरंगाबाद.

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

!!श्री गजानन अनुभव!!

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page