अनुभव - 48
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 48 🌺)
* सद्गुरू वाचूनी सापडेना सोय *
जय गजानन! मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील 'होळी' हे एक माझं लहानसं गाव!माझं नाव धनंजय कुलकर्णी. आताशा गेल्या काही दिवसात जीवनात आर्थिक स्थैर्य येऊ पहात आहे,अन्यथा आतापर्यंत जीवन हलाखीच्या परिस्थितीतच व्यतीत केलं असं म्हणायला हरकत नाही.
आपण वाचक सर्व सूज्ञ आहात त्यामुळे एखाद्या ऑटो चालकाची आर्थिक स्थिती काय असावी हे मी आपणास सांगण्याची गरज नाही. त्यातून वेळोवेळी अडचणींची शर्यत असेल तर विचारूच नका. असो,आता आपला विषय. गजानन महाराजांविषयी मला आलेले अनुभव!
गजानन विजय ग्रंथात चौदाव्या अध्यायात बंडूतात्या कफल्लक होतो,सर्व पैसा संपून जातो,तेव्हा महाराज त्याला प्रेरणा देऊन,स्वतःकडे वळवून,तो त्यांना ओळखत नसतो तरी त्याचं भलं करतात. माझ्याही बाबतीत तसंच काहीसं झालं.
माझं लग्न 1983 साली झालं,तेव्हा मी बॅन्केत पिग्मी एजंट होतो पण काही एजंटनी मिळून घोटाळा केल्यामुळे बॅन्केने ती योजना बंद केली आणि मी ऑटो चालवू लागलो. एकीकडे उत्पन्न कमी तर दुसरीकडे घरात तीन मुली एक मुलगा असं मोठं कुटुंब.1995 च्या नोव्हेंबर मधील ही गोष्ट आहे. माझी लहान मुलगी आरती तेव्हा चार वर्षांची होती. तिला चालताना उजवा पाय टेकवणं त्रासदायक होतं आहे असं लक्षात आलं,वेदने मुळे ती रडायला लागली. कुणी म्हणाले 'कुरूप 'आहे कुणी म्हणालं पायात काटा किंवा काही गेलं असेल. ते दुखणं खूपच वाढलं म्हणून मग आम्ही तिला आंबाजोगाई रोड वरील डाॅ. व्यंकट येलाले,सर्जन ह्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी तपासून सांगितलं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तीन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे,दोन तीन दिवसात ऑपरेशन केलं तरी चालेल पण फार जास्त उशीर करायला नको. माझ्या डोक्यात तिच्या तब्येती सोबतच पैसा कुठून आणायचा हा प्रश्न उभा झाला मी कसंतरी करून याला माग त्याला माग करून पैसे जमा केले.
मधल्या काळात माझ्या परिचित सौ शकुंतला व्यंकटराव यादव यांच्याशी अचानक भेट झाली,त्यांना मी आरतीच्या ऑपरेशन विषयी सांगितलं. त्या मला म्हणाल्या
'एक काम कर,तू आरतीला घेऊन शेगांवला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाऊन ये ,महाराजांना तब्येती विषयी सांगून ये. 'मी म्हटलं अहो वहिनी मी शेगांवला जाईन तर ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणीन?यावर त्यांनी धीर देत म्हटलं. तू जाऊन तर ये,तिथे वाजवी तेवढाच खर्च कर परत आल्यावर ऑपरेशनसाठी कमी पडले तर मी सहाय्य करीन.
मी सहकुटुंब रात्रीच्या बसने शेगांवला निघालो. महाराजांचं शांतपणे दर्शन झालं. त्यांना प्रार्थना केली,रात्री बाजूला सभामंडपात एक रुपया प्रति गादी प्रमाणे दोन गाद्या घेऊन त्यावर झोपलो. मुलांना डोळा लागला,आम्ही चिंतेमुळे स्वस्थ झोपू शकत नव्हतो .मध्यरात्रीच्या सुमारास आरती आई पाय दुखतो आहे म्हणून रडू लागली. ही तिच्या पायावर हात फिरवून 'करतील हं बेटा गजानन बाबा ठीक 'असा धीर देत होती पहाटे केव्हा तरी डोळा लागला. अगदी उजाडतच होतं तर आम्हाला जाग आली, हिचं लक्ष सहज आरतीच्या पायाकडे गेलं,दुखर्या जागेतून काही बाहेर आल्यासारखं दिसत होतं. चार गव्हाएवढे फ्लेक्झिबल वायरचे तुकडे असावेत असे तुकडे बाहेर आलेले दिसत होते ते आम्ही बाजूला करून पाय स्वच्छ पुसला,पायाचं दुखणं थांबलं होतं. आरती उभी राहू शकत होती. ती म्हणाली आई गजानन बाबांनी माझा पाय ठीक केला.
लातूरला परतल्यावर डाॅक्टरांना दाखविलं त्यांनी सांगितलं ऑपरेशनची गरज टळली आहे. शकुंतला वहिनींच्या कानावर हे सर्व घातलं,त्यांनी गजानन विजय पोथी देऊन पारायण करायला सांगितलं आणि माझ्या जीवनात भक्तीचा उदय झाला.
मी त्या काळात 100 रुपये रोज प्रमाणे ऑटो किरायाने घेऊन चालवित असे म्हणजे तीन हजार रुपये महिना तो खर्च व्हायचा अशात मग उधार किराणा,कापड,अशी देणी डोक्यावर वाढत होती,लोकांचं देणं आहे ही कल्पना जीव नकोसा करीत होती,आमच्या गावाकडे मला वडिलोपार्जित चार एकर जमीन मिळाली होती मनात विचार आला की ती जमीन विकून लोकांचं देणं द्यावं आणि स्वतःचा ऑटो आणि एखादा फ्लॅट घ्यावा. त्या जमिनीचा दर तेव्हा सव्वा लाख रुपये एकर होता पण लोकांना माझी आर्थिक स्थिती आणि माझी पडती बाजू माहिती असल्यामुळे ते किंमत पाडून सौदा करीत होते,त्यामुळे माझं भरपूर नुकसान होत होतं. काय करावं?या विचारात असतानाच आपण हे गजानन महाराजांना सांगून पहावं असा विचार मनात आला,मी महाराजांसमोर उभा झालो,त्यांना कबूल केलं की जर योग्य किंमत प्राप्त झाली तर मी गजानन विजय ग्रंथाचं पारायण करून शेगांवला रुपये अकरा हजार अन्नदानासाठी देईन. खरं सांगतो दुसरे दिवशी सकाळी मी अक्षरशः झोपेत असतानाच एक पांडुरंग जाधव म्हणून गृहस्थ घरी आले आणि माझ्या समोर बाजार भावाप्रमाणे मी तुमची जमीन घेण्यास तयार असल्याचा प्रस्ताव मांडला.
मी शेगांवला अकरा हजार रुपये दिले तेव्हा मला मिळालेल्या चांदीच्या प्रासादिक पादुका आजही मी जेव्हा पाहतो तेव्हा महाराजांविषयी असलेल्या श्रध्देत निश्चितपणे वाढ होते.
आता अजून एक गोष्ट इ.स.2000 सालची,30 ऑगस्ट 2000 ला पहाटे चार वाजता मला बायकोने उठवलं,म्हणाली अहो माझं डोकं डाव्या बाजूला खूप दुखतंय आणि हे सांगत असतानाच डोक्याशी धरलेला तिचा हात खाली पडला,ती बेशुद्ध झाली मी ताबडतोब तिला उचलून ऑटो मधून आमच्या डाॅक्टरांकडे घेऊन गेलो,पण ते म्हणाले यांना ताबडतोब कृष्णा हाॅस्पिटल मधे डाॅ. सौ उज्वला कुलकर्णी यांच्याकडे घेऊन जा,मी लगेच त्या दवाखान्यात दाखल झालो. प्राथमिक तपासणीत पॅरेलेसिसचा अंदाज करून ब्रेन हॅमरेज आहे की काय ते पहावं लागेल. सकाळी एम आर आय करून घेऊ तीन हजार रुपये लागतील. असं सांगितलं. आता सकाळ होईपर्यंत शांत बसायचं होतं,हिला बेडवर ठेवलं होतं.मी दवाखान्याच्या पायरीवर बसून तब्येत आणि पैशांची चिंता करत दोन गुडघ्यांमधे दोन हाताच्या कोपरात डोकं ठेवून बसलो. मला डोळा लागला आणि स्वप्नात गजानन महाराज आले म्हणाले चिंता करू नकोस,तुझ्या बायकोला काहीही होणार नाही 'तिला पॅरेलेसिस नाही आणि ब्रेन हॅमरेजही नाही.'
सकाळ झाली मी माझे किराणा दुकानदार जवाहर बाहेती यांना भेटलो. त्यांनी एम आर आय साठी तीन हजार रुपये देऊ केले. सकाळी लवकरच विवेकानंद हाॅस्पिटल मधे एम आर आय करून त्या प्रमाणे डाॅक्टरांनी उपचार सुरू केले. दुपारी बाराचा सुमार असेल मी अस्वस्थपणे दवाखान्याच्या बाहेर चकरा मारीत असताना मला पोस्टमनने आवाज दिला,धनंजय कुलकर्णी आपणच का?शेगांवहून आपल्यासाठी अंगारा व प्रसाद आला आहे. मी यंत्रवत तो घेतला आणि तो पोस्टमन तिथून गेल्यावर मला लक्षात आलं मी तर शेगांवला पैसेच पाठविले नव्हते मग हा अंगारा कसा?दुसरं असं की पोस्टमन घरी येईल हे समजू शकतं,मी दवाखान्यात आहे हे त्याला कसं समजणार,मी ती पुडी कपाळाशी टेकली आणि माझी पावलं खोलीकडे वळली हिला अंगारा लावला अन् साखरेचा कण हळूच जिभेवर ठेवला.
काही तासात ही शुद्धीवर आली. फारच लवकर प्रगती होते आहे हे पाहून डाॅक्टरांनी समाधान व्यक्त केलं. सात दिवसात ही पूर्ण ठीक झाली. हिला पॅरेलेसिस नव्हता ते ब्रेन हॅमरेज नव्हतं. सात दिवसांचं संपूर्ण बिल लाखाहून थोडं जास्त झालं. त्यावेळी ऑटोतून शाळेत जाणार्या मुलांच्या पालकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या रुपाने महाराज पावले. पुढे हळू हळू सर्वांच्या ऋणातून मुक्त झालो. आज तीनही मुलींची लग्न झाली आहेत,मुलाचं लग्न झालं आहे आणि महाराजांच्या कृपेने गाडी रुळावर आहे .
अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--धनंजय कुलकर्णी
लातूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
!!श्री गजानन अनुभव!!
Comments