top of page

अनुभव - 49

Updated: Jun 5, 2020

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 49 🌺)

* ऐसी कृपा देव संतांची *


जय गजानन! मी एक आयुर्वेदिक डाॅक्टर आहे. 1976 ला पुणे येथून आयुर्वेदातील पदवी प्राप्त केली. लग्नाचा योग लगेच जुळून आल्याने 1977 ला नागपूरातील करूणा समर्थ हिचे सोबत माझा विवाह झाला. तेव्हा करूणाची नोकरी नागपूरला सेन्ट्रल टेलिग्राफ ऑफिसला होती. मला कुठेतरी दवाखाना सुरू करायचा तर नागपूरलाच करू या विचाराने आम्ही नागपूरला स्थायिक झालो.

गजानन महाराजांविषयीचं प्रेम मला माझ्या वडिलांकडून आलं आणि त्यात वाढ होण्याचं कारण असं झालं की 1985 च्या सुमारास मला कळलं की रामदासपेठ भागात श्री आबा अष्टेकर म्हणून आहेत त्यांच्याकडे गुरुवारी सत्संग असतो. मी तिथे जाऊ लागलो त्यामुळे मला गजानन महाराजांच्या काही भक्तांची संगतही प्राप्त होऊ शकली,सोबत महाराजांविषयी प्रेमही वाढीस लागलं. त्या सर्वाचा चांगला परिणाम होऊन मी गांधीनगर येथील फ्लॅट मधे एका आटोपशीर खोलीत जयपूरहून एक साधारण दीड फूट उंचीची महाराजांची संगमरवरी मूर्ती आणून तिची स्थापना केली आणि रोज सकाळी मी छान साग्रसंगीत पूजा करण्याचा आनंद घेऊ लागलो. गजानन विजय ग्रंथाचं नित्य पारायण होऊ लागलं.

आपल्याला माहिती आहे की दहाव्या अध्यायात लक्ष्मण घुडेचा एक प्रसंग आहे. त्यात त्याच्या पोटदुखीवर महाराज प्रसाद म्हणून त्याच्या पत्नीकडे आंबा फेकतात आणि तो आंबा ती त्याला खाऊ घालते,त्या वेळच्या ओव्या आहेत..

हे वैद्यांनी जई ऐकले/तई त्या वाटले वाईट/अहो बाई तुम्ही काय/केलेत हे हाय हाय/आंबा हेच कुपथ्य होय/या पोटातील रोगाला/माधव निदानी हेच कथिले/सुश्रुतांनीही वर्णिले/निघंटाने कथन केले/शारंगधर म्हणे ऐसेच/ऐसे वैद्य बोलले/परी झाले अघटित/लक्ष्मणाचे पोट सत्य/रेच होऊन अकस्मात/मऊ होऊन गेले हो/सौच्या वाटे व्याधी गेली/हळूहळू शक्ती आली/निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी/तेथे उपयोगी पडते खरी/कृपा देव संतांची/

निघंटू म्हणजे औषधांवरील पुस्तक. वरील ओव्यात आलेली जी नावे आहेत ते उच्च कोटीचे आयुर्वेद जाणकार आहेत,त्यात सांगितलेली माहिती सत्यच आहे पण त्याही पलीकडे देव संतांची कृपा कधी कधी चमत्कारिक परिणाम घडवून आणते. हे सर्व मी इथे सांगण्याचं कारण मलाही असाच काहीसा अनुभव आला.

ब्लड प्रेशर हा शब्द आता आपल्यासाठी काही नवीन नाही. डाॅक्टरांनी ब्लड प्रेशर मोजले की ते म्हणतात नाॅर्मल आहे,अगदी 120/80 छान!.वाढत्या वयात हेच 140/90 असलं तरी नाॅर्मल समजल्या जातं. त्याच्या पेक्षा अति वाढलं तर हाय ब्लड प्रेशर आणि कमी झालं तर लो ब्लड प्रेशर. तब्येतीला दोन्ही घातकच! अजून एक ,वरच्या प्रेशरला सिस्टाॅलिक म्हणतात आणि खालचा आकडा डायस्टाॅलिक म्हटल्या जातो. आता या पार्श्वभूमीवर मी अनुभवलेली इ.स.2001 ची घटना सांगतो.

31 डिसेंबर 2001 ला आम्ही काही भक्त मंडळींनी एकत्र येऊन संध्याकाळी सत्संग करून छान भजनादी कार्यक्रम केला आणि प्रसाद ग्रहण करून जो तो आपल्या घरी परतला. 1 जानेवारीचा दिवस,सकाळी मी लवकर उठलो खरा,पण पोटात काहीसं अस्वस्थ वाटायला लागलं मी नित्याप्रमाणे पूजा करायला मूर्ती समोर आलो पण आतून काही वेगळी जाणीव होऊ लागली आणि जोरदार उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पार गळून गेलो महाराजांना कसे बसे हात जोडले,पुन्हा बाथरूममध्ये जाऊ लागलो आणि नशीब असं की दार लावायचं सुचलच नाही. मी धाडकन तिथेच कोसळलो. कसाबसा घरी असलेल्या मुलाला आणि बायकोला आवाज दिला. त्यांनी मोठ्या मुश्किलीने मला अंथरुणावर आणून ठेवलं आणि माझी एक मानलेली बहिण जी व्यवसायाने नर्स आहे तिला ताबडतोब येण्यासाठी निरोप दिला. तिने येता क्षणीच प्रथम माझी पल्स (नाडी)पाहिली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली ताबडतोब डाॅक्टरांना बोलवायला हवं. सौ ने ताबडतोब माझे मित्र आहेत नांदेडकर म्हणून त्यांच्या डाॅक्टर मुलाला अनिरुद्धला फोन केला. तो त्याच्या अजून एका डाॅ. मित्रालाच घेऊन लगेच आला. त्याच्या डाॅक्टर मित्राने सर्व प्रथम ब्लड प्रेशर तपासलं आणि तो हादरलाच,त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता कारण तेव्हा माझं ब्लड प्रेशर सिस्टाॅलिक म्हणजे वरचं प्रेशर फक्त 40 होतं. मग खात्री करण्यासाठी अनिरुद्धनेही तपासलं त्यालाही परिस्थिती लक्षात आली. अनिरुद्धने प्रसिद्ध डाॅक्टर निखिल बालंखे यांना फोन लावला,तेव्हा ते कुणाचीतरी अॅन्जिओग्राफीच करीत होते. म्हणाले ताबडतोब घेऊन या. मधल्या काळात त्यांनी त्यांच्या डाॅक्टर पत्नीला सर्व सांगून मला अॅडमिट करण्याची सोय केली. डाॅ. अनिरुद्ध गाडीत एक सारखं मागे माझ्या पत्नीला,करूणाला विचारून कदाचित,मी अजून आहे नं याची खात्री करून घेत होता.

मला तपासून डाॅ. बालंखे म्हणाले काहीही सांगता येत नाही. त्या दिवशी नेमकी अडचण अशी झाली की श्री व सौ बालंखे यांना हैदराबाद येथे काॅन्फरन्स साठी जाणं भाग होतं. त्यामुळे मला रामदासपेठ येथील अर्नेजा हार्ट हाॅस्पिटल मधे हलविणे आवश्यक ठरले.

माझी तब्येत थोडी सुधारली पण धोका टळला नव्हता. मला आय सी यू मधे ठेवण्यात आलं. माझ्या अंगावर हाॅस्पिटलचा ड्रेस चढविण्यात आला. माझ्या पत्नीने विशेष परवानगी घेऊन शर्टाच्या वरच्या खिशात गजानन महाराजांचा एक लहान फोटो आणि अंगारा ठेवला व मला माझ्या कानात तसं सांगितलं.

डाॅक्टरांनी ब्लड प्रेशर अति कमी झाल्यामुळे हृदयाला इजा झाली आहे,म्हणजे सी.ए.डी. काॅरोनरी आर्टरी डीसीस असे निदान केले. त्या रात्री मला आय सी यू मधे स्वप्न पडलं,स्वप्नात मला न्यायला यमदूत आलेत,ते माझ्यावर झडप घालणार,तो मी खिशातील महाराजांचा फोटो त्यांना दाखविला,ते घाबरून पळून गेले असं दोन तीनदा झालं. मग मी तो फोटो नमस्कार करून खिशात ठेवून दिला. तोच पुन्हा ते आले पण यावेळी श्री गजानन महाराज त्या यमदूतांना रागावून म्हणाले 'तुम्ही माझ्या अशोकला नेऊ शकत नाही "मग ते यमदूत निघून गेले. पुढे आठवड्याभरातच मी पूर्ण बरा होऊन डाॅक्टरांनी आयुष्यभर घ्या म्हणून सांगितलेल्या गोळ्या थोड्या सोबत घेऊन घरी परतलो. मात्र त्या गोळ्या घेऊन मला डोके दुखीचा त्रास सतावू लागला,म्हणून मी डाॅक्टर बालंखेंना फोन केला ते म्हणाले एकदा अॅन्जिओग्राफी करून घ्या.

एकविरा हाॅस्पीटल मधे प्रख्यात हृदयरोग तज्ञ डाॅक्टर अजीज खान यांनी अॅन्जिओग्राफी केली. ती सुरू असतानाच त्यांनी माझं अभिनंदन केलं. म्हणाले,'डाॅक्टर आपके हार्टको कुछ भी नहीं हुआ है. अगले बीस साल तक वह फिट रह सकता है !काॅन्ग्रॅच्युलेशन्स!

डाॅक्टर बालंखेनी तो रिपोर्ट पाहून माझी सर्व औषधं बंद केली आणि मी पूर्ण ठीक झालो.

वरचं ब्लड प्रेशर फक्त चाळीस असताना कुणी चांगल्या पद्धतीने जिवंत राहील ही कल्पनाच चमत्कारिक वाटते पण आपण पारायणात नेहमीच वाचतो नं की 'निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी,तेथे उपयोगी पडते खरी कृपा देवसंतांची.' या शिवाय मी तरी काय वेगळं म्हणू शकतो ?

हां एवढं मात्र म्हणतो की संकटकाळी महाराजांनी अशीच कृपा सर्व भक्तांवर ठेवावी आणि भक्तांनीही त्यांचं नित्य स्मरण करीत त्यांचं नाव घ्यावं,...... .श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- डाॅ. अशोक ब्राह्मणकर

पुणे/ नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

!!श्री गजानन अनुभव!!

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page