अनुभव - 5
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jul 2, 2020
“ श्री “
गजानन महाराज की जय
पादुकांचा प्रसाद पावला
आज माझं वय सत्तरीच्या घरात आलं. माझे मिस्टर रेल्वेत नोकरीला होते, त्यामुळे लग्नानंतर बदलीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आणि पुढे नागपूरला स्थायिक झालो. मुला मुलींची लग्न झालीत हे निवृत्त झाले. आमच्या कुटुंबात देवा धर्माचं करणे,मोठ्यांना मान देणे ही रीत नेहमीचीच त्याच परिपाठात एकदा माझ्या मुंबईच्या भाचे जावयांनी अमरावती जवळील झीरी येथील एकमुखी दत्ताला अभिषेक करण्याचा आणि त्या निमित्ताने तिथे सर्व नातेवाईकांना एकत्र बोलावण्याचा कार्यक्रम आखला. अर्थातच आम्हालाही त्याने आमंत्रण दिले. पण मला मात्र तिथे जाणं जमणार नव्हतं त्याला कारणही तसंच होतं.....
इ.स.2007 च्या सुमारास घडलेली ही गोष्ट आहे. आम्ही नाशिकला किर्ती कडे म्हणजे आमच्या मुली कडे गेलो होतो. माझी मोठी मुलगीही नाशिकला किर्तीच्या घरासमोरच रहायची तिच्याकडे एक जर्मन शेफर्ड जातीचा मोठा कुत्रा होता. तो आम्हाला ओळखत होता एक दिवस आम्ही मोठ्या मुली कडे गेलो. आम्ही तिच्या कडे पोहोचलो आणि प्रेमानी तो यांच्या अंगावर झेपावला पण त्या धक्क्याने यांचा तोल जाउन हे मागे पडले यांच्या डोक्याला मार बसला, आणि त्या सर्वाचा परिणाम होऊन यांना पॅरेलेसिस चा अटॅक आला. आणि हे अंथरुणाला खिळले..उपचार सुरू झाले,डाॅक्टर सर्वतोपरी प्रयत्न करीत होते,पण प्रगती अगदी संथ होती. बरेच दिवस लोटले आता हे जेमतेम वाॅकरच्या सहाय्याने एखाददुसरं पाउल टाकू शकत होते,त्यांच्याकडे लक्ष देणे माझे कर्तव्य होते. हे लहान पणा पासून गजानन महाराजांचे भक्त, नित्य नियमाने गजानन विजय ग्रंथाचे वाचन, त्यांचाच विचार!आणि त्याचा परिपाक म्हणून असेल त्यांनी महाराजांवर एक स्तोत्र केलं त्याच्या शेकडो प्रती छापून आम्ही वाटल्या. पण हे सगळं असलं तरी दैवयोग कुणाला चुकला आहे?
कार्यक्रमचा दिवस उजाडला,आज दत्त दर्शनाचा योग आपल्या नशिबात नाही याची सल मनात होती, तशातच मी देवपूजेला बसले, माझी देव पूजा पाय तुझे गुरू राया! म्हणत दत्तात्रयाला वंदनकेलं. देवा दत्तात्रया आशीर्वाद असू द्या अशी प्रार्थना केली. आणि गजानन महाराजांच्या फोटोकडे पाहू लागली. वास्तविक आपण रोज पुजा करतो पण प्रांजळपणे कबूल करायचं तर प्रत्येक वेळी आपलं मन पुजेत असतंच असं नाही पण त्या दिवशी कुणास ठाऊक अशी मनाची तंद्री लागली की काय सांगू डोळे भरून आले भावना दाटून आल्या आणि मी सहज पणे बोलून गेली..
"गजानन महाराज तुम्ही यांना चालण्याची शक्ती द्या मी तुमच्या पादुका देवघरात ठेवून त्यांना अभिषेक करीन "
मनाच्या त्याच अवस्थेत पुजा पूर्ण झाली,डोळे पुसले आणि आरती करून आम्ही दोघांनी साखरेचा नेवैद्य घेतला. तो दिवस महाराजांच्या नामस्मरणात सरत आला,आणि फोनची घंटी खणाणली...
फोनवर पलीकडून माझा नागपूरचा भाचा बोलत होता,जो झीरी ला कार्यक्रमा साठी गेला होता. तो मला सांगत होता "मामी तुझ्या साठी शेगांवहून पादुका आल्या आहेत "माझा क्षण भर माझ्याच कानावर विश्वास बसेना. मी विचारले काय म्हणालास? तो सांगू लागला अगं जिजाजींनी ठरविलं की झीरी च्या दत्तात्रेयाचा आशीर्वाद घेऊन काही जेष्ठ लोकांना शेगांव ला ज्या चांदीच्या पादुका मिळतात त्या प्रसाद रूपाने द्यायच्या. तुझ्या साठी द्यायला त्या पादुका त्याने मला दिल्या आहेत. ऊद्या मी प्रसाद आणि पादुका घेऊन येतो..
दुसर्या दिवशी मी पादुकांना अभिषेक करीत होते तेव्हा आनंदाने ऊर भरून येत होतं आणि आनंदाश्रूंनी डोळे. गजानन महाराजांनी चोवीस तासाच्या आत पादुका समोर हजर केल्या होत्या आणि जणू ते म्हणत होते कर बाई कर होऊन जाऊ दे अभिषेक सर्व ठीक होईल...
त्या नंतर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली त्यांना चालणंही शक्य झालं आणि बोलणंही शक्य झालं. आम्हाला दत्तात्रेयांचा आशीर्वाद ही प्राप्त झाला आणि गजानन महाराजांच्या पादुकाही चालून आल्यात. आणि गजानन विजय ग्रंथातील शब्द आठवले...
देव तेची असती संत ! आणि संत तेची देव साक्षात..
आणि लक्षात आलं गुरू तत्व एकच आहे. गरज असते ती आपण तळमळीने प्रार्थना करण्याची आणि त्यांना मनापासून हाक मारण्याची!..अधिक काय सांगू?.. एवढंच म्हणते...श्री गजानन. जय गजानन..
अनुभव...
सौ. उषा भास्कर दिक्षित.
शब्दांकन..जयंत वेलणकर. 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असतील तर स्वागत आहे..
Comentários