अनुभव - 50
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
" श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 50 🌺)
* श्री गजानन महाराजांची उपाय योजना *
जय गजानन! गजानन विजय ग्रंथाच्या चौथ्या अध्यायात
महाराजांच्या चिलीमीसाठी विस्तव मागण्याकरीता लहान मुले जानकीराम सोनाराकडे जातात. जानकीराम अक्षय तृतीयेचा सण म्हणून विस्तव देण्यास नकार देतो. तेव्हा मुलं त्याला म्हणतात 'गजानन महाराज देवांचेही देव जाण.' हा उल्लेख जेव्हा माझ्या नजरेखालून जातो,तेव्हा मला माझ्या आजीची (आईची आई)प्रकर्षाने आठवण येते, कारण आजीचा एक फंडा होता, ती म्हणायची 'देव म्हणजे गजानन महाराज!' तिची एक फिलाॅसाॅफी होती. तिच्या समोर जर कुणी म्हटलं की गजानन महाराजांनी मला अमुक दिलं तमुक नाही दिलं, तर ते तिला आवडायचं नाही ती म्हणायची. महाराजांनी मला काय दिलं?हाच हिशोब. पण मी महाराजांना काय दिलं?याचं काय?मी त्यांची उपासना करतो का?मी दर्शनाला गेलो?मी मनापासून पारायण केलं?मी नामस्मरण करतो का? मुळात महाराजांनी भक्तीमार्ग सोपा असं म्हटलं. परंतु तो साधण्यास कठीण आहे,असंही सांगितलं आहे. त्यासाठी आवश्यक असणारं आचरण महाराजांनी सांगितलं,ते आपलं असावं. आपण त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. बाकी सर्व गोष्टी त्यांच्यावर सोडून द्याव्यात. असं तिचं म्हणणं असायचं,असो. आजीच्या त्या गोष्टी उत्तमच होत्या. मला त्या किती जमणार आहे देव जाणे,पण एक मात्र झालं. आजीमुळे गजानन महाराजांची भक्ती मात्र जीवनात स्थिरावली. इतकच नाही तर महाराज योग्य वेळी भक्ताची काळजी घेतात असा अनुभवही आला.
दोन अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. एक 2001 चा आहे तर दुसरा 2005 चा आहे. प्रथम 2005 चा अनुभव सांगतो नंतर 2001 चा.
गजानन विजय ग्रंथाचं पारायण हा माझ्या जीवनातील अविभाज्य भाग झाला. मी पोथीत म्हटलेल्या विशिष्ट दिवसांना पारायण करून आनंद प्राप्त करू लागलो.गुरू पुष्य योगावर पारायण हाही नेहमीचा भाग झाला. एकदा नेमकी गुरु पुष्य योगावरच यवतमाळ येथे कंपनीने मिटींग ठेवली,आम्ही गेस्ट हाऊस मधे उतरलो होतो. मिटींग सकाळी 9.30 वाजता होती. तो ऑगस्ट सप्टेंबर मधील काळ होता,मला निश्चित तारीख आठवत नाही,पण त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होता.मला पारायणासाठी चार तास लागतात. अर्थात मिटींगच्या आधी पारायण पूर्ण करायचं तर पहाटे लवकर उठणं आवश्यक होते. माझी खोली पहिल्या मजल्यावर होती. मी संध्याकाळी गेस्ट हाऊस वर असलेल्या माणसाला बोलावून सांगितलं मला उद्या पहाटे साडे चारला उठवशील. तो म्हणाला ठीक आहे साहेब. त्याला विचारलं तुझं नाव?तो म्हणाला 'गजानन 'निजण्यापूर्वी महाराजांना प्रार्थना करताना म्हटलं, त्या गजाननाला सांगितलं आहे उद्या लवकर उठवायला. मिटींगच्या आधी पारायण होईल तर बरे! गुरुवारी पहाटे बरोबर साडेचारच्या सुमारास मला कुणीतरी आवाज दिला .. उठा. माझी झोप चाळवली,पुन्हा आवाज आला.. उठा पारायणला बसायचंयना?मला जाग आली मी उठून बाथरूमला गेलो. चेहर्यावर पाण्याचा हबका मारून फ्रेश होऊन बाहेर बाहेर येऊन पाहिलं ,दार आतून जर बंद आहे तर मला आवाज दिला कुणी?कारण दार वाजवून तर मला कुणी उठवलं नाही!मी आंघोळ करून पूर्ण तयार झालो तुळस अथवा फूल मिळालं तर पहावं म्हणून दार उघडून जिन्याने उतरतच होतो तर गजानन घाई घाईने डोळे चोळत वर येत होता. मला म्हणाला साहेब माफ करा मला जागच आली नाही. मी त्याच्याकडे पाहून फक्त स्मितहास्य केलं.मी त्याला फुलं आणण्यासाठी पाठविलं. महाराजांनी माझा फुलं आणण्याचा वेळ वाचविला होता. त्या दिवशीच्या पारायणात एका वेगळ्याच पातळीवरील एकाग्रता साधली होती.
ऑक्टोबर 2001 ची घटना,दिवाळसण होता. त्या दिवशी आईला ऑफिस होते. ती पी. डब्लू .डी.मधे नोकरीला होती. तिला आणायला दुपारी एकच्या सुमारास सिव्हील लाईन्स भागाकडे चाललो होतो. बोले पेट्रोल पंपाजवळ मी शांतपणे स्कूटरने सरळ जात होतो. पुढे दोन दारूडे सायकल वेडीवाकडी कशीतरी चालवित जात होते. त्यातील एक माझ्या स्कूटर वर धडकला,त्या धक्क्याने दोघेही खाली पडले. वास्तविक मी सरळ निघून गेलो असतो तर चालले असते. पण मी त्यांना काही लागले तर नाही ना हे पाहण्यासाठी उतरलो. त्यांना काहीही झालं नव्हतं,पण जमलेल्या गर्दीत कुणीतरी एक दगड माझ्या डोक्याला मारला. मागे डोक्याला जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. सर्व गर्दी पांगली मला शर्टवर रक्त दिसू लागलं .काही बघे तिथे उभे होते,कुणी मदतीला येईना,तोच एक ऑटो रिक्षा तिथे थांबली. ऑटो मधून एक माणूस खाली उतरला. अधिकार वाणीने किल्ली मागून माझी स्कूटर बाजूला लावली माझा दंड धरून मला ऑटोत बसण्याची सूचना केली. वेगानं ऑटो लता मंगेशकर हाॅस्पिटल कडे वळविला पण तिथे ओ.पी.डी. ला डाॅक्टर त्या दिवशी त्यावेळी उपलब्ध नव्हते म्हणून मूर मेमोरियल हाॅस्पिटल मधे मला घेऊन गेला. तिथे मी त्याला सासरच्या लोकांचा लॅन्डलाईन नंबर दिला आणि मी बेशुद्ध झालो.
खोल जखम होती,डाॅक्टरांनी जखमेला टाके घातले. काळजीचं कारण नाही म्हणाले. मी शुद्धीवरआलो. आजूबाजूला असलेल्या नातेवाईकांकडे ऑटो वाल्याची चौकशी केली. तो ते लोकं येईपर्यंत थांबला होता. त्यानी सर्व वृतांत सांगितला आणि 'जिस काम के लिए मै आया था वह हो गया 'असं म्हणून एकही पैसा न घेता सब ठीक हो जाएगा!असा आशीर्वाद देऊन चालता झाला.
माझी जखम ठीक झाली,पण डोकं दुखू लागलंआणि ते काही केल्या थांबेना. गोळी घेतली की तेवढ्यापुरत थांबून पुन्हा डोकं दुखणं सुरू.हा डाॅक्टर तो डाॅक्टर कुणी म्हणे क्लाॅट असेल,कुणी म्हणे स्कॅनिंग करा. सर्व झालं पण काहीच आराम नाही. औषध बदल झाला,डाॅक्टर बदल झाला. अन्य उपाय झाले पण काहीही आराम नाही. मी बेजार झालो,कामात लक्ष लागेना,अशात दोन महीने गेले असतील मधे मधे महाराजांची आठवण होतच होती. पण आता मात्र निर्धार केला. सौ ला म्हटलं चल शेगांवला जाऊन महाराजांना दाखवून येऊ,सांगून येऊ.
दुपारी शेगांवसाठी बसने निघालो. वाटेत बस फेल झाली बर्याच वेळाने दुसर्या बसने सोय होऊन रात्री शेगांवला पोहोचायला बराच उशीर झाला. रात्र बरीच झाली होती. भक्त निवास जवळील सेवेकरी म्हणाले,खोली देता येणार नाही. मंदिरात कार्यालयात अध्यक्ष बसले आहेत त्यांची चिठ्ठी आणा. आम्ही कार्यालयात गेलो तिथे माननीय शिवशंकरभाऊ होते,त्यांना भेटल्यावर ते म्हणाले काही बोलू नका मी सर्व जाणतो. बाजूला बसलेल्या कुणाला तरी ते म्हणाले,चिठ्ठी लिहा मी सही करतो. भक्त निवास क्रमांक पाच मधे आम्ही विसावलो.
दुसरे दिवशी पहाटे उठून तेव्हा असलेल्या त्या लहान दारातून, पूर्व दारातून आत आणि पश्चिम दारातून बाहेर या पध्दतीने मी सहा फूट उंच माणूस दर्शनासाठी खाली उतरलो. महाराजांसमोर हात जोडले,सर्व व्यथा सांगितली म्हटलं तुम्ही सर्व जाणताच. आज मुद्दाम या कारणाने मी आलो आहे. 'रक्षण करा 'असं सांगून पायरी चढून वर आलो आणि दारातून बाहेर पडत असताना,डोकं थाडकन दारावर आपटलं. प्रचंड झिणझिण्या उठल्या,दोन्ही हाताने डोकं धरून बाहेर पडलो. काही सेकंद डोकं खूप दुखलं,पण ते मार लागल्यावर दुखावं तसं दुखलं आणि थांबलं .थांबलं म्हणजे असं थांबलं की आज त्या गोष्टीला पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला पण माझं डोकं दुखणं बरं झालं आहे.
मोठ मोठ्यांना जिथे निदान झालं नव्हतं ते गजानन महाराजांना क्षणात समजलं होतं. किंबहुना ते आधीच सर्व जाणून होते.
शेगांवहून परतल्यावर मित्रांनी विचारलं ,कारे काय झालं शेगांवला?मी म्हटलं काही नाही डोकं दुखायचं थांबलं!म्हणाले थांबलं?कसं काय?त्यावर मी आकाशाकडे पहात दोन्ही हात वर करून उत्तर दिलं....
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--समीर दामले
नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.
!!श्री गजानन अनुभव!!
Comentários