अनुभव - 51
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 51 🌺)
* श्री गजानन महाराजांची भक्ती हाच उत्तम योग *
जय गजानन ! आपण जी साधना करतो,जे देवा धर्माचं करतो,ते करीत असताना त्यापासून लोकांना त्रास न होईल ,सर्वांच्या वेळा व्यवस्थित पाळल्या जातील अशी काळजी घेऊन जर हे सर्व केलं,तर त्या सर्वांचं महत्व अधिकच वाढतं. मी माझ्या आईला सर्व कामे वेळेत व्हावी म्हणून,पहाटे तीन वाजता उठून गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना पाहिलं आहे. तिला महाराजांची वेडी भक्ती होती असं म्हटलं तर त्यात फारसं वावगं होणार नाही. आम्हा सर्व भावंडांमधे माझ्या प्रकृतीच्या कारणाने तिचा माझ्यावर विशेष लोभ होता. किंबहुना माझं कसं होईल याची तिला काळजीच होती. लहानपणी अशक्त पणामुळे मी सारखी आजारी पडायची, 'रडकं, आजारी,अशक्त मूल आईचं 'असं म्हणतात. त्या म्हणण्या प्रमाणे ती गजानन महाराजांना सतत माझ्या विषयी सांगत असायची. आमचं घर नागपूरला वसंत नगरला आहे,तिथून धरमपेठ झेंडा चौकातील गजानन महाराज मंदीरात,दोन अडीच किलोमीटर अंतर ती दर गुरुवारी तिच्या एका मैत्रिणी सोबत पायी चालत जायची. उन्हाळा,हिवाळा, पावसाळा हा क्रम तिने कधी चुकवला नाही. ती महाराजांना नेहमी म्हणायची 'महाराज या निशीकडे लक्ष द्या!"(निशी म्हणजे मनिषा नावाचा प्रेमोच्चार) तिचं चांगलं होऊ द्या. चांगलं स्थळ मिळू द्या. तिच्या ह्या प्रार्थनेचा मला दुहेरी फायदा मिळाला. एकतर गजानन महाराजांविषयी माझ्या मनात भक्ती निर्माण झाली आणि दुसरं म्हणजे महाराजांनी माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं.
6 मार्च 1988 ला माझा साखरपुडा झाला आणि 5 जून 1988 ही लग्नाची तारीख ठरली. आमच्या आई-नानांनी ठरविलं की आपण शेगांवला प्रत्यक्ष जाऊन महाराजांना आमंत्रण करायचं.तेव्हा आजच्या इतक्या गाड्या किंवा खाजगी बसेस नव्हत्या,मोजक्या बसेस असायच्या. तसेही वडील म्हणजे माझे 'नाना 'एस. टी त नोकरीला होते म्हणून आम्ही एस. टी.बसने शेगांवला जाण्याचं ठरविलं. निघण्यापूर्वी आईनं महाराजांना प्रार्थना केली. महाराज तुमच्या कृपेनं निशीचं लग्न ठरलं आहे. प्रत्यक्ष पत्रिका घेऊन शेगांवला येतो आहे. तिच्या लहानपणा पासून तिची काळजी तुमच्याकडे सोपविली आहे. तिच्या कडे लक्ष असू द्या. '
आम्ही बसने प्रवासाला निघालो,ते सुट्यांचे दिवस होते त्यामुळे बसमध्ये बसायला जागा मिळणं मुश्किल,खूप गर्दी होती. पण लोक उतरत जातात ,जागा होत जाते,या आशेने आम्ही बसमधे चढलो,बस सुरू झाली. मी सर्वात समोर होते. आम्ही सर्व उभे होतो. आता मलाही महाराजांचं प्रेम लागलं होतं. मी मनात म्हटलं,महाराज लग्नाचं सांगायला शेगांवला येतो आहोत पण इथे तर कोण गर्दी आहे. संपूर्ण प्रवासात कसं होईल? हा मनात विचार आला तोच एका ठिकाणी एक माणूस उतरून जागा झाली. तिथे बसलेले गृहस्थ मला म्हणाले,इथे बस,मी आईकडे पाहिलं आईने नजरेनेच मला संमती दिली. त्याप्रमाणे मी बसले. त्यांनी माझी चौकशी केली मी त्यांना लग्न ठरल्या निमित्त शेगांवला जात असल्याचं सांगितलं. त्यांनी विचारलं तुमचं कुणी ओळखीचं आहे का शेगांवला?मी म्हटलं नाही आम्ही मंदिरात जागा पाहू. महाराज करतील काही सोय! त्यावर ते मला म्हणाले हे बघ माझं नाव 'वासनिक' आहे मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो ती तू शेगांव मंदिरात कार्यालयात दे म्हणजे तुमची सर्व व्यवस्थित सोय होईल.
त्यानंतर ते बहुधा अकोला असावं तिथे बसमधून उतरले,जाताना मला शुभेच्छा देऊन चिठ्ठी देण्याची आठवण दिली. आम्ही दुपारी शेगांवला पोहोचलो,चिठ्ठी द्यावी की न द्यावी अशा संभ्रमात वडील होते. मग म्हणाले महाराजांची इच्छा!देऊन तर पाहू. वडिलांनी कार्यालयात ती चिठ्ठी दाखवली आणि काय विचारता असा बडेजाव सुरू झाला...त्यांनी विचारलं कुणाचं लग्न ठरलं आहे?आई म्हणाली निशीचं,म्हणजे आमच्या मनिषाचं. मग काय?ते म्हणाले तुम्ही हात पाय धुवून या,आम्ही जेवायला वाढतो. आम्ही जेवायला बसलो. मला चांदीचं ताट चांदीची वाटी. वरण,भात,साजूक तूप,पोळी,भाजी,गोड शिरा. असं साग्रसंगीत जेवायला वाढलं. एका शब्दात सांगायचं तर माझं पहिलं केळवण गजानन महाराजांनी श्री क्षेत्र शेगांव येथे घडवून आणलं .रहाण्याची उत्तम सोय केली,दुसरे दिवशी गाडीतून वाटिका दर्शन घडवून आणलं तेव्हा 'वाटिका 'नव्याने बांधण्यात आल्याने आणि आजच्या सारखं आनंद सागर वगैरे नसल्यानं वाटिका दर्शनच महत्वाचं होतं. नंतर आम्हाला गाडीतून व्यवस्थित बस स्टॅंडवर सोडून छान निरोप दिला. इथे एक गोष्ट नमूद करणे गरजेचं वाटतं. त्यांच्या सर्व व्यवस्थेमुळे आम्ही प्रभावित झालो पण जेव्हा दर्शनाची वेळ आली,तेव्हा वडिलांनी त्यांना विनम्रपणे सांगितलं,की दर्शन आम्ही लाईनीतूनच घेणार,आजही आपण पहातो बारी मधे दर्शनासाठी भक्त शांतपणे उभे असतात. समोर घुसण्याचा अतिरेक करीत नाहीत आणि हेच शेगांवचं वैशिष्ट्य आहे. असो.
आईच्या पुण्याईने हे सर्व झाले. अविस्मरणीय अशी ती यात्रा झाली. वासनिकजींचं पहिलं नाव मला आठवत नाही पण महाराजांनी त्यांच्या माध्यमातून सर्व घडवून आणलं हे मी आजही विसरलेली नाही.
महाराजांनी माझ्या कुटुंबाकडे वेळोवेळी कृपादृष्टीनं पाहिलं. पहात असतात. माझ्या मिस्टरांची तब्येत इ.स.2000 ला खूप बिघडली होती पण महाराजांच्या कृपेने ते विघ्न टळलं. मी तर स्वतःला महाराजांची मुलगी मानते.
मध्यंतरी मी आणि मिस्टर आम्ही दोघे शेगांवला गेलो असताना मला वाटलं की त्या दिवशी पारायण करण्याच्या ऐवजी प्रदक्षिणा कराव्यात. जेवढ्या जमतील तेवढ्या करू ,या विचाराने प्रदक्षिणा सुरू केल्या आणि चक्क 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यात. आम्हाला दुपारच्या गाडीने भुसावळला जायचं होतं. आम्ही शेगांव स्टेशनवरयेऊन पोहोचलो.
प्रत्येकाची शारिरीक क्षमता वेगळीअसते,कुणाला कशाने त्रास होईल कुणाला कशाने,माझे पाय त्या दिवशी खूप दुखायला लागले. इतके की रडू यायला लागलं,आम्ही बाकावर बसलो होतो. स्टेशनवर गाड्या येत होत्या जात होत्या. काही फास्ट गाड्या थांबतही नव्हत्या. आमच्या गाडीला अजून बराच अवकाश होता. मी मिस्टरांना म्हटलं एखादी न थांबणारी गाडी थांबली तर किती बरं होईल नं? कारण भुसावळचा प्रश्न नव्हता,तिथे प्रत्येक गाडी थांबणारच होती. मिस्टरांनी मला वेड्यात काढलं ,म्हणाले काहीही वेड्यासारखं बोलू नकोस. मी महाराजांचं नाव घेऊन मुकाट बसले. इतक्यात एक गाडी येताना दिसली आणि थोडी गति कमी झाली,मी म्हटलं अहो कुणी सांगावं ही आपल्यासाठी सोय असू शकेल,तयार रहायला काय हरकत आहे आणि खरोखरच आश्चर्य झालं,न थांबणारी ती गाडी जेमतेम मिनिटभर शेगांवला थांबल्या सारखी झाली.फक्त आम्ही दोघेच गाडीत चढलो. जणू आमच्या साठीच महाराजांनी गाडी थांबवावी ,आमचा प्रवास सुरू झाला .आम्ही वेळेच्या बरेच आधी निघालो होतो. या सगळ्या सुखद प्रकाराने पायाचं दुखणं तसच कमी झालं.
मी समजू शकते की हा योगायोग असू शकेल. पण असे ना का ?खरं सांगायचं तर श्री गजानन महाराजांची भक्ती हाच उत्तम योग आहे. म्हणून महाराजांच्या चरणी माझं मागणं एकच की हे गजानन महाराजा असेच उत्तम योगायोग सर्वच भक्तांच्या जीवनात वारंवार घडून येवोत आणि त्यातून प्रेरित होऊन सर्व भक्त तुझा जयघोष करोत.
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ.मनिषा विंचुर्णे कोलनकर
नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्या अनुभवांचं संकलन असणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे
!!श्री गजानन अनुभव!!
Comments