अनुभव - 52
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 52 🌺)
ऐसी गजानन माऊली भक्त वत्सल खरोखरी *
जय गजानन! माहेरची मी सुमन पाटगावकर आणि सासरची मी सौ. आशा पै इ.स.1972 साली आम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहावयास आलो तोपर्यंत आम्हाला गजानन महाराजांविषयी काहीही माहिती नव्हती. माझे वडील,ज्यांना मी तात्या म्हणते ते सोलापूर विभागात रेल्वेत स्टेशन मास्तर होते. त्यांची दर तीन वर्षांनी बदली होणार,तेव्हा आम्हा भावंडांचं,चौघी बहिणी एक भाऊ,शिक्षण व्यवस्थित व्हावं या उद्देशाने आई आम्हा मुलांना घेऊन बार्शी येथे स्थिरावली. बार्शीला भगवंत मंदीर नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदीराच्या जवळच आमचं घर होतं. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की अंबरीश राजा आणि दुर्वास ऋषी यांच्या वादात श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी इथे आले. मंदिरात श्री विष्णूंच्या मागे श्री लक्ष्मी आहे जी आपल्याला आरशात दिसते. या भगवंत मंदीरातश्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या प्रवासात थांबते आणि या मुक्कामात संध्याकाळी मंदिरात वारकरी भजन,किर्तन ऐकण्याचा योग आम्हा सर्वांना येऊन आम्हाला गजानन महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यातून गजानन महाराजांविषयी आकर्षण निर्माण झालं. 1978 ला शेगांवला महाराजांचा प्रगट दिन शताब्दी सोहळा होता. (1878-1978)तेव्हा आई आणि तात्या शेगांवला जाऊन आले व अतिशय प्रभावित झाले. त्यातून आम्ही सर्वांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केव्हा सुरू केलं ते कळलच नाही. तेव्हा आम्हाला कोणताही छोटा मोठा प्रश्न आला,परीक्षा आली,कुणी आजारी झालं की लगेच आम्ही महाराजांना पारायण मागून घ्यायचो आणि त्यातून बाहेर पडलो की लगेच पारायण पूर्ण करायचो. अर्थातच महाराजांच्या आशीर्वादाने परीक्षा पास होत शिक्षण पूर्ण झालं आणि 1980 साली मला मुंबई येथे सारस्वत बॅन्केत नोकरी लागली. बार्शी पासून मुंबईला जायला रेल्वेने बारा तास लागतात,तो प्रवास पूर्ण करून मी कांदिवली येथील शाखेत रुजू झाले. आमच्याच बॅन्केत मला महाराजांच्या कृपेने जीवनाचा जोडीदार मिळाला आणि मी सौ आशा पै म्हणून बॅन्केच्या गोरेगाव शाखेत कॅशियर म्हणून काम पाहू लागले. मात्र ही सर्व प्रगती होत असताना प्रामाणिकपणे सांगायचं तर विजय ग्रंथाचं पारायण दुर्लक्षित झालं. माझ्या जवळ महाराजांची पोथीच नव्हती. सासरचे लोक महाराजांविषयी अनभिज्ञ होते. अर्थात मनात महाराजांचा वास होता, आहे आणि राहील. त्यामुळे प्रातःस्मरणात आणि संध्याकाळी, रात्री नमस्कार महाराजांनाच होत होता. इ.स.1983 च्या डिसेंबर महिन्यातील गोष्ट,कॅश काऊंटर वर असल्यामुळे आली गेली कॅश पहाण्याची जबाबदारी होती. एक दिवस काम करीत असताना एका सातशे रुपयाच्या चेकचे पेमेन्ट मी चुकीने एक हजार सातशे रुपये केले. स्वाभाविकच आहे की संध्याकाळी कॅश टॅली करीत असताना मला एक हजार रुपये कमी आहेत असे लक्षात आले. पस्तीस वर्षापूर्वीचा तो काळ.आमच्या दृष्टीने हजार रुपये फार मोठी रक्कम होती. मनावर दडपण आलं,त्यातून मी दुसर्यांदा प्रेग्नंट होते ,घरी सासू सासरे होते. मी गजानन महाराजांचा धावा सुरू केला,सर्व व्हाउचर्स,चेक्स वगैरे पाहिल्यावर लक्षात आलं की एका पार्टीला सातशे ऐवजी एक हजार सातशे रुपये दिले आहेत कारण चेकच्या मागे पेमेन्ट केलेल्या नोटा नमूद होत्या. डिनाॅमिनेशन्स लिहीले होते. अर्थात आता त्या पार्टीनं हे मान्य करण्यावर सगळं अवलंबून होतं. त्या पार्टीकडे जाणं आवश्यक होतं,आम्ही निघालो मला सहकार्यांनी सहाय्य केलं. मी महाराजांचा धावा करीत होते महाराजांना म्हटलं महाराज माझं चुकलं, पारायणात खंड पडायला नको होता. माझ्या जवळ पोथी नाही पण ही माझीच चुक नाही का?मी पोथी मिळविण्याचा प्रयत्न करीन लवकरात लवकर माझ्या कडून पारायण करून घ्या.समोरच्या पार्टीला सद्बुध्दी द्या. आम्ही त्या पार्टीकडे जाऊन पोहोचलो. महाराजांचे आभार!त्यांनी मला थोडफार ऐकवलं पण हजार रुपये देऊ केलेत. त्या आनंदात मी घरी पोहोचले. मिस्टर बॅन्केतच असल्याने त्यांना झालेली घटना सांगितली पण बाकी उगाच चर्चा नको म्हणून आम्ही दोघंही शांत राहिलो. मिस्टरांना मी गजानन विजय ग्रंथाविषयी तेव्हा कानावर घातलं,गजानन महाराज या विषयावरही मी तेव्हा त्यांच्याशी बोलले. त्यांनीही ऐकून घेऊन ठीक आहे तुला ग्रंथ मिळेल तेव्हा लगेच पारायण कर असं म्हणून धीर दिला आणि कमी पडलेली कॅश,गजानन महाराज,श्री गजानन विजय,या सगळ्याचा विचार करीत असतानाच केव्हातरी रात्री उशिरा माझा डोळा लागला. दुसरे दिवशी सकाळी सात साडे सातचा सुमार असेल,दाराची कडी वाजली म्हणून मी दरवाजा उघडला,पाहते तो दारात तात्या उभे. तात्या बार्शीहून मुंबईला आले?काहीच न कळवता?सणवार नाही काही कळवलं नाही हे अचानक आले?मी आश्चर्ययुक्त आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले. तात्या तुम्ही?मी विचारलं.त्यावर त्यांनी मला आश्चर्याचा जबरदस्त धक्का दिला,मला विचारलं,तू कॅशवर आहेस का?तुला काही प्रॉब्लेम आला का? मी थक्क होऊन पाहतच राहिले. 1983 साली मोबाईल तर जाऊच द्या,साधे फोन देखिल फार तुरळक ठिकाणी होते. कालचीच ही घटना.आम्ही कुणाशी बोललो नाही. बार्शीहून मुंबईला यायला स्टेशन ते घर सगळा हिशेब करता चौदा तास लागणार. सगळ्या त्या बुचकळ्यात टाकणार्या गोष्टी,त्यातून थोडी सावरले अन् तात्यांना आत या म्हणून आतल्या खोलीत बसायला पाट दिला. पायावर पाणी घेऊन तात्या येऊन बसले आणि मला सांगू लागले. दरम्यान आम्ही सर्वच तिथे जमा झालो. तात्यांनी पिशवी उघडली,पिशवीतून गजानन विजय ग्रंथ बाहेर काढला म्हणाले हे घ्या आणि गजानन विजय ग्रंथ दोन्ही हातांनी माझ्या समोर धरला. मी आणि मिस्टर समोर झालो,मिस्टरांनी चमकून माझ्याकडे पाहिलं, तात्या बोलू लागले… अगं यंदाच्या आषाढीला जेव्हा वारी परतीच्या प्रवासात बार्शीला आली तेव्हा तुझ्या आईला वाटलं आपल्या सुमेकडे,आशाकडे गजानन विजय ग्रंथ नाही तेव्हा जर पालखीत तो मिळाला तर पहावा म्हणून आई पालखी दर्शनाला गेली आणि ग्रंथ आहे का विचारणा केली,तिथल्या लोकांनी ग्रंथ नाहीत म्हणून सांगितलं. ऐकून आईचा चेहरा पडला इतक्यात एक सेवेकरी सदृश्य गृहस्थ तेथे आले आईला म्हणाले थांबा त्यांनी कुठूनशी एक पोथी आईला आणून दिली,तो हा ग्रंथ!आता मी आज इथे कसा?हे विचारशील तर त्याचं असं झालं की कालच पहाटे एक गृहस्थ तुझ्या आईच्या स्वप्नात आले,तिला म्हणाले आशाला कॅश मधे प्रॉब्लेम आहे. तिला पोथी हवी आहे लगेच तिला पोथी पोहोचव. तात्यांनी दोन्ही हातात धरून ठेवलेली ती पोथी मी डबडबलेल्या डोळ्यांनी दोन्ही हातात घेऊन नमस्कारार्थ कपाळाला लावली आणि मिस्टरांकडे पाहिलं,त्यांचेही डोळे भरून आले होते. ते पाहून मात्र माझा बांध फुटला,मला जोरात हुंदका आला. मला असं रडयला का आलं याचं कारण तिथे उपस्थित असलेल्यांपैकी फक्त मिस्टरच जाणू शकत होते आणि माझे तात्या! त्या दिवसापासून मिस्टरही महाराजांचे भक्त झाले आणि पुढे क्रमाने आमचं सर्व कुटुंब गजानन महाराजांच्या भक्तीत रंगून गेलं. आजही मुलगा,मुलगी,जावई,सून, नातवंड गजानन महाराजांच्या भक्तीत आहेत हे पाहून मन समाधानानी भरून येतं आणि हे समाधान अधिकच वाढीस लागतं जेव्हा केव्हा, जिथे कुठे. शब्द कानावर येतात श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन! अनुभव–सौ आशा पै गोरेगाव मुंबई शब्दांकन– जयंत वेलणकर 9422108069
Comments