अनुभव - 53
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 12, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय ( अनुभव 53🌺)
* श्रीगजानन विजय ग्रंथाचा विजय असो *
जय गजानन! भक्ती,श्रध्दा,विश्वास, या सर्वाचं महत्व मानवी जीवनात फार मोठं आहे असं मला आपलं नेहमीच वाटत आलं आहे. माझ्या व्यक्तीगत जीवनात माझ्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण ही फार मोठी गोष्ट आहे. तो मला फार मोठा आधार वाटतो आणि ती गोष्ट मला माझ्या मोठ्या बहिणीकडून मिळाली हे सांगण्यात मला नेहमीच आनंद मिळतो.
मी सौ.विजया मनिष प्रभुणे, राहणार तळेगाव दाभाडे जि.पुणे. पुर्वाश्रमीची विजया आपटे. आम्ही चार भावंडं,दोन भाऊ दोन बहीणी.माझे वडील कै. मुकुंदराव आपटे, राहणार उत्तूर जि.कोल्हापूर हे त्याकाळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत फार मोठं प्रस्थ होतं. आमचं घर नेहमी येणारा जाणार्यानी गजबजलेलं असायचं पण 1993 साली वडिलांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि घरच्या परिस्थितीत परिवर्तन झालं. मी तेव्हा वीस एकवीस वर्षांची होते. वडिलांचा भक्कम आधार गेला आणि उदास वाटायला लागलं, तेव्हा मानसिक उदासीनतेवर उपाय म्हणून संध्या ताईने श्री गजानन विजय ग्रंथ माझ्या समोर केला,त्याआधी दोन चार वेळा माझं वाचन झालं होतं,पण त्या दिवशी मी अधिकच श्रध्देने तो वाचायला घेतला आणि खरोखरच त्या वाचना पासून मला पुढे प्रत्येकच वाचनाचे अधिकाधिक उत्तम फळ मिळत गेले.
एक तर सर्वप्रथम पारायण करीत असतानाच मनात विचार येऊ लागला की तुझ्या तरूणपणी तुझे वडील गेले. तू काही अगदीच लहान नव्हती. हे चालायचच,याला जीवन ऐसे नाव आणि त्या विचाराने खरोखरच मनाला उभारी मिळून माझ्या मानसिक उदासीनतेवर मी विजय मिळविला.
पुढे स्वाभाविकपणेच त्या काळानुसार लग्नाचं वय झालेलं असल्यामुळे घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. समोरच्या पक्षाला माझी जन्म पत्रिका हवी होती. पण ती काही केल्या सापडेना .घराचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला पण पत्रिका काही सापडली नाही. संध्या ताई म्हणाली अगं तू पारायण करून बघ,महाराजांना म्हणून तर बघ. मग काय बसले पारायण करायला .पोथी वाचताना बंडूतात्याला जमीनीखालचं धन महाराजांनी सांगितल्याची गोष्ट वाचली तेव्हा स्वाभाविकच गजानन महाराजांना म्हटलं,तुमच्या पासून काय लपून राहिलं आहे? पत्रिका सापडली तर फार छान होईल. तिसरे दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर आतून वाटलं की चारवेळा जुनी ट्रंक शोधली आहे तरीही पुन्हा एकदा पहावी आणि पूर्ण ट्रंक रिकामी केली तर त्यात जीर्ण अवस्थेतील कुंडलीचा शोध लागला.
आता लग्न जमेल तेव्हा जमेल पण एरवी घरी नुसतं बसून काय काय करणार असं वाटून कुठेतरी नोकरी करायला हवी या विचाराने मनात उचल खाल्ली आणि अर्थात ती कौटुंबिक,आर्थिक,मानसिक गरजही होती. मी सरळ श्रीगजानन विजय ग्रंथ वाचायला घेतला. पारायण पूर्ण झालं त्याच दिवशी आमच्या परिचयातील सौ.ढोले यांनी मला निरोप दिला की 'भूदरगड' नागरी सहकारी पत संस्थेच्या महाव्यवस्थापकांनी भेटायला बोलावलं आहे. मी त्याप्रमाणे भेटायला गेले तेव्हा तिथेच माझ्याकडून अर्ज लिहून घेतला आणि जाॅईनिंग लेटर माझ्याकडे देऊ केलं.
इ.स.1995 मधे महाराजांच्या कृपेने माझ्या लग्नाचा योग जुळून आला आणि लग्नाचा आनंद द्विगुणीत झाला जेव्हा मला कळलं की माझे पती,सासू,आणि नणंद हे सर्वच गजानन महाराजांचे भक्त आहेत. लग्न ठरलं तरी सासरच्या लोकांच्या अनुमतीने,मी नोकरी करावी असं आम्ही ठरवलं. मात्र मी जुनी नोकरी सोडून एका कन्स्ट्रक्शन कंपनीत तळेगाव दाभाडे येथे नोकरी स्विकारली. आनंदाची गोष्ट म्हणजे माझी महाराजांची भक्ति सासरीही कायम राहिली,किंबहुना अधिक जोमाने ती सुरू झाली. सासूबाईंनी नामस्मरणाचा सल्ला दिला.
नोकरीत माझ्याकडे रोखपाल अर्थात कॅशियरचं काम होतं. रोज वेगवेगळ्या कारणांनी कॅश यायची आणि विभिन्न कारणांसाठी शोधन करावं लागायचं. एकदा कामाची खूप गर्दी होती. अनेकांना पैसे दिले,अनेकांकडून पैसे स्विकारले आणि त्या गडबडीत आलेल्या दहा हजार रुपयांची नोंद करायची राहिली. ही गोष्ट संध्याकाळी कॅश मोजत असताना लक्षात आली आणि ते दहा हजार रुपये कुणी दिले ते काही केल्या आठवेना. पुढे दोन दिवस कॅश टॅली होत नव्हती,कॅश वाढत होती,काही सुचत नव्हतं .मग नेहमी प्रमाणे महाराजांचा धावा सुरू केला. मला आठवतं त्या गुरुवारी गुरूपुष्यामृत योग होता. मी संकल्प करून पारायणाला सुरूवात केली. पारायण करीत असताना अगदी प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढ्या मोठ्या पोथीत कधीना कधी आपल्याला डोळयात झोप जाणवते. त्याही दिवशी अचानक डोळ्यांवर झापड आली. पण त्या दिवशीची गोष्ट थोडी वेगळी होती मला पोथीतील अक्षरांच्या ऐवजी कॅशबुक,रिपोर्ट बुक असं दिसायला लागलं आणि जी एन्ट्री व्हायला हवी होती जिचा संबंध होता ते सगळं स्पष्टपणे नजरेसमोर दिसायला लागलं. पुढे पारायण व्यवस्थित पूर्ण झालं. मी ऑफिसला जाऊन खातरजमा केली असता मला त्या दहा हजार रुपयांची नोंद करण्याचं उमजलं आणि माझं कॅश बुक टॅली झालं.
माझ्या जीवनात असं अनेकदा झालं आहे की काही अडचण आली, काही समस्या उभी राहिली की मी महाराजांना प्रार्थना करून विजय ग्रंथाचं वाचन करावं आणि ती समस्या दूर व्हावी.
मला आठवतं एकदा संध्याकाळी उशीरा मला एका पार्टीनं पन्नास हजार रुपये आणून दिले. माझ्या कामाची पध्दत अशी होती की रोज संध्याकाळी उरलेली कॅश सीलबंद करून,साहेबांकडे सोपवून दुसरे दिवशी सकाळी ती कॅश परत घेऊन कामाची सुरूवात करायची. त्या संध्याकाळी मी ते पन्नास हजार रुपये (सर्व पाचशेच्या नोटा) नोटा मोजायच्या मशीन मध्ये लावल्या, मोजल्या. जमा कॅशमधे हिशेबात घेतल्या पण प्रत्यक्षात कॅश साहेबांना दिली तेव्हा त्या नोटा मशीनवरच राहिल्या. दुसरे दिवशी पन्नास हजार रुपये कमी भरले तेव्हा लक्षात आलं आणि हेही लक्षात आलं की सकाळी आपल्या आधी येणारा माणूस म्हणजे साफ सफाई करणारा. त्याने नोटांचा सफाया केला आहे. मी आमच्या वरचे अधिकारी ज्यांना आम्ही 'अण्णा' म्हणतो त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पण संबंधित माणसाने सपशेल नकार दिला आणि कानावर हात ठेवले.
कामाच्या ठिकाणी माझ्यावर सर्वांचा विश्वास होता पण तरीही एवढी मोठी रक्कम कमी म्हटल्यावर 'ठपका ' येणारच. माझे मिस्टर मला म्हणाले आपण रक्कम भरून टाकू आणि तू ही नोकरी सोडून दे. मी म्हटलं हे सर्व ठीक आहे,पण पोथीत म्हटलं आहे 'अब्रूदारास बेइज्जत हेच मरण आहे.'तेव्हा मी एकदा प्रार्थनापूर्वक गजानन विजय पारायण करते. शेवटी महाराजांची इच्छा!
पुन्हा संकल्पासह पारायण सुरू केलं,महाराजांना म्हटलं,तुम्ही सर्व जाणताच. तुमच्या पासून काय लपून राहिलं आहे?माझं हे पारायण तुमच्या चरणी अर्पण करते!
तुम्हाला सांगते तिसरे दिवशी पारायण पूर्ण झालं. त्याच रात्री अकरा वाजता अण्णांना संबंधित माणसाचा फोन आला आणि त्याने रक्कम घेतल्याचं कबूल केलं. ती रक्कम ऑफिसात जमा केली. पुन्हा एकदा गजानन विजय ग्रंथातून माझी भक्ती महाराजांपर्यंत पोहोचली. ते पैसे लाॅकर मधे ठेवताना माझं उर भरून आलं, महाराजांना म्हटलं,आम्हा सर्व भक्तांवर अशीच कृपादृष्टी नित्य असू द्या. असं म्हणून लाॅकर बंद केलं आणि किल्ली हातात घेताना मनापासून चांगलं जोरात म्हटलं..श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ. विजया मनिष प्रभुणे
तळेगाव दाभाडे. पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा..!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या..190.. सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.
Comments