अनुभव - 54
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 54 🌺)
* तुझी कृपा त्याच परी ! शरणांगताते समर्थ करी !! *
जय गजानन! मध्यंतरी आम्ही काही गजानन महाराज उपासक,महाराजांच्या महती विषयी गप्पा करीत होतो. कुणीतरी म्हणालं,अरे महाराजांचे उपासक देश विदेशात पसरले आहेत. अगदी विदेशात देखील ऋषीपंचमी आणि प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. ते ऐकून सगळेच आनंदीत झाले. मग त्या गप्पांच्या ओघात मी म्हटलं,देश विदेशात महाराजांचे भक्त आहेत ही निश्चितच आनंदाची बाब आहे पण मला तर वाटतं की अगदी लहानात लहान गावात,दूरवरच्या खेड्यातही महाराजांचे भक्त आहेत ही देखील तेवढीच उल्लेखनीय बाब आहे आणि शेवटी तसा विचार करता या गावाच्या,देशाच्या सीमा आपल्यासाठी झाल्या. त्या ब्रह्मांड नायकासाठी कशाची आली सीमारेषा? तो तर इथेही आहे तसाच तिथेही आहे. तो सर्वत्र आहे .जिथे तुम्ही त्याला हाक माराल,तिथे तो तुमच्या मदतीला आहेच.
आता माझ्याच आईचं उदाहरण घ्या. वर्धा जिल्ह्यातील तरोडा नामक अत्यंत लहान गावातील माझी आई,तिच्या अगदी लहानपणापासून श्री गजानन महाराजांची भक्ती करीत असे. श्रीगजानन विजय ग्रंथाचं पारायण करीत असे. लग्न होऊन ती नागपूर जिल्ह्यातील काटोल या तहसिलीच्या गावी आली तेही तेव्हा छोटंच गाव होतं. तर तिला तिची सासू ,म्हणजे माझी आजी नित्य नियमाने गजानन महाराजांची भक्ती करणारीच मिळाली.
इ.स.1983 सालची ही गोष्ट आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळची ही गोष्ट. अर्थात मला हे सर्व घरातील मोठ्या लोकांकडून नंतर कळलं. विशेषतः माझी आत्या. ती मला नेहमीच माझ्या जन्माच्या वेळची ही गोष्ट, म्हणजेच गजानन महाराजांचा आलेला अनुभव रंगवून सांगत असते.
1983 साली माझ्या वेळेस आईला दिवस होते. काटोल हे गाव तसं आजही काही फारसं प्रगत झालं आहे अशातली गोष्ट नाही. पण 1983 म्हणजे तीस पस्तीस वर्षा पूर्वी तर काहीच सोयी नव्हत्या. एक सरकारी दवाखाना होता,पेशन्टच्या तब्येतीत थोडे काॅम्प्लीकेशन्स झाले की साठ पासष्ट किलोमीटर वर थेट नागपूरला धाव घ्यावी लागायची. तेव्हा वाहतूकीची साधनही मर्यादित होती. सिझेरियनची सोय अर्थातच नव्हती. मार्चचा पहिला आठवडा होता. महाराजांच्या प्रकट दिनाच्या आदल्या रात्रीची गोष्ट. आईचे दिवस भरत आलेले,वडील शेतीच्या कामासाठी बाहेर राहणार. घरी आई,आजी आणि आत्या. म्हणजे मनुष्य बळाचा प्रश्न,आर्थिक स्थिती साधारण. अर्थातच आईला आणि आजीला एकच आधार आणि तो म्हणजे 'गजानन महाराज '!
त्या रात्री आईला पोटात कळा सुरू झाल्या आणि आई त्या वेदनांमुळे कासावीस होऊन रडू लागली. आजीने या आधी बाळंतपणं पाहिली होती. ती अनुभवी होती. पण हा अनुभव तिला वेगळाच वाटू लागला. आई प्रत्येक वेदने सोबत आर्ततेने किंचाळत होती आणि तो आवाज आजी आणि आत्याच्या हृदयात कालवाकालव करीत होता. रात्र बरीच झाली,आईचा आवाज आमच्या समोरच्या घरात ऐकू जाऊन तेथील 'सावल 'बंधू मदतीला धावून आले. आजी आर्ततेने गजानन महाराजांचा धावा करीत होती .आईला सरकारी दवाखान्यात नेलं तर तिथे कुणीही डाॅक्टर उपलब्ध नाही,मग डाॅक्टरांच्या घरी जाऊन त्यांना बोलवावं लागलं .इकडे आईची प्रकृती ढासळत होती. डाॅक्टर म्हणाले सिझेरियन ताबडतोब केलं नाही तर बाळ बाळंतीण दोघंही दगावण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तज्ञ डाॅक्टर हवा, आजी जोरात ओरडली 'महाराज आता आमची लाज तुमच्या हाती आहे. ' आई पोटावर हात ठेवून महाराज सोडवा असं ओरडत होती आणि महाराज हाकेला धावले. कुणीतरी सांगितलं उद्या इथे कसलीशी काॅन्फरन्स आहे त्यासाठी नागपूरहून डाॅक्टर आले आहेत आणि त्यापैकी एकजण हे सिझेरियनचं काम पार पाडण्यास सक्षम आहेत. रात्री बारा वाजता आईला टेबलवर घेण्यात आलं आणि साडेबारा वाजता म्हणजे प्रकट दिनाला सुरुवात होत असताना माझा जन्म झाला.
पण जन्म झाला म्हणजे मी केवळ आईच्या पोटातून बाहेर आलो. मात्र मानेला नाळ वेढून त्याने मी निळा झालो होतो. आईचा जीव वाचला होता पण माझ्यात मात्र जीव आहे की नाही अशी संशयास्पद स्थिती होती.
मी गेलो नव्हतो म्हणून मी जिवंत होतो. पूर्ण तीन दिवस निपचित पडून होतो. आजी मला मांडीवर घेऊन त्या काळात महाराजांचा धावा करीत होती. तीन दिवसा नंतर माझा रंग बदलला. मी नाॅर्मल दिसायला लागलो. पण फक्त दिसायला नाॅर्मल होतो. रडत नव्हतो माझ्या तोंडून काहीही आवाज निघत नव्हता. कसं बसं चमच्याने दूध देऊन मला जिवंत ठेवल्या जात होतं आणि प्रत्येक चमच्याच्या वेळी आजी म्हणत होती 'गजानन महाराजा याला सांभाळा. लेकरू जिवंत ठेवा. सव्वा महिन्याचा होईल तेव्हा तुमच्या चरणावर ठेवण्यासाठी घेऊन येईन.'
लेकरू मुकं आहे की काय?जातं की काय?अशा दडपणाखाली सव्वा महिना संपला आणि आजी,आई,बाबा व आत्या मला घेऊन श्री संत नगरी शेगांवयेथे उपस्थित झाले. तेव्हाच्या मंदीर रचनेत मला घेऊन खाली उतरले आईने आणि आजीने रडत रडत मला पुजार्याच्या हाती देऊन,याला समाधी चरणावर ठेवा अशी विनंती केली. पुजार्यानं मला घेऊन चरणावर ठेवलं आणि मी रडलो!दवाखान्यात मुलाचं रडणं ऐकून लोकांना मूल झाल्याचं कळतं. मी झाल्याचं त्या दिवशी माझ्या आईला कळलं! तिथून पुढे मी रडलो,हसलो,बोललो अगदी गायलो सुध्दा! महाराजांनी मला पुढील आयुष्यात सुरेल आवाज प्रदान केला. कदाचित ते म्हणाले,तुला आवाज दिला आहे माझं भजन म्हणून दाखव.
तेव्हा महाराजांनी माझा जीव वाचविला आणि पुढे एकदा मला जिवावरच्या दुखण्यातून वाचवलं. इ.स.2010 मधे माझी प्रकृती खूपच बिघडली,मी अंथरुणाला खिळलो
डाॅक्टरांनी निदान केलं की मला पाठीच्या मणक्याचा क्षय झाला आहे. मला वर्धा येथील सावंगी मेघे,आचार्य विनोबा भावे रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डाॅक्टरांनी सांगितलं मणक्याचं ऑपरेशन करून कमरेत राॅड टाकावा लागेल. मात्र सध्या याची तब्येत इतकी नाजूक आहे की ऑपरेशन शक्य नाही. तेव्हा सहा महिने रेस्ट घेऊन औषधोपचाराची याला प्रथम ऑपरेशन योग्य करून नंतर ऑपरेशन!तेही जर यशस्वी झालं तर ठीक अन्यथा कमरेखालचा भाग लुळा होईल. म्हणजे मी असाही आणि तसाही मृत्यूच्या दारात उभा होतो.
अंथरूणावर पडल्या पडल्या गजानन महाराजांचा 'आठव 'या शिवाय माझ्या जवळ काहीच शिल्लक नव्हतं . त्यांना म्हटलं महाराज मी गेलो तरी चालेल. मला तुमच्या चरणाशी जागा द्या. पण कमरेखालचा भाग लुळा पडलेला मी मला नको. तेवढं ऐका. जगलो वाचलो तर तुमच्या भक्तीत चार गाणी गाईन!पण तब्येतीचं रडगाणं गाण्यासाठी जिवंत ठेवू नका.
महाराजांनी ती प्रार्थना कबूल करून डाॅक्टरांच्या हाताला यश दिलं. आज पाठीत राॅड आणि स्क्रू आहे पण माझ्या हालचाली व्यवस्थित सुरू आहेत. अगदी स्कूटर चालवण्यासाठी महाराजांनी मला सक्षम ठेवलं आहे. स्वतःचा चरितार्थ चालविण्यास योग्य ठेवलं आहे.
हा सगळा महाराजांचा कृपाशिर्वाद आहे. आजी आणि आई कडून चालत आलेली गजानन महाराजांची भक्ती पुढे सुरू रहावी,हेच त्यांच्या जवळ नित्य मागणं आहे.
माझ्या वाढदिवसाला,पण त्याहीपेक्षा त्यांच्या प्रकट दिनाला यथाशक्ती अन्नदान करताना, मनाला खरोखरच आनंद मिळतो आणि तो आनंद द्विगुणीत होतो,जेव्हा माझा मुलगा,मुलगी आणि त्यांची आई माझ्या सुरात सूर मिळवून म्हणतात. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--वैभव विक्रम देवपुजारी
ता.काटोल जि. नागपूर
शब्दांकन --जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा..!! श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.
コメント