अनुभव - 55
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
"श्री "
गजानन महाराज की जय!(अनुभव 55 🌺)
* श्रध्दा आणि भक्ती गजानन भक्त अनुभवती *
जय गजानन! लहानपणी केव्हातरी,कुठेतरी,गजानन महाराजांविषयी ऐकलं आणि त्यातून मनात अंकुरलेली भक्ती पुढे तिला श्रध्दा आणि प्रचितीचं खतपाणी मिळून वाढत राहिली. नित्य नियमानं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण होत राहिलं. आज जेष्ठ नागरिकत्वाचा मान मिळवून जीवनाची वाटचाल महाराजांच्या कृपेने त्यांच्या नामस्मरणात सुरू आहे. आम्ही दोघं पती पत्नी नागपूरलाअसतो, मी सौ. उषा जोशी. आम्हाला एक मुलगा आहे तो नोकरीच्या निमित्ताने पुण्याला असतो. मुलाचं लग्न झालं आणि आम्हाला नात झाली,त्याला कन्यारत्न प्राप्त झालं .माझी नात आज अकरा वर्षांची आहे. नातीचा जन्म झाल्यानंतर आमच्या कौटुंबिक गप्पा रंगायच्या तेव्हा तिला भाऊ असावा असा विषय निघाला की महाराजांना तशी प्रार्थना करा असाही विषय असायचा.मी म्हणायचे महाराजांच्या इच्छेने जे व्हायचं तेच व्हावं. अशात इ.स.2013 साल उजाडलं,ऑगस्ट महिन्यातील गोष्ट असावी. एक दिवस सकाळी मी पोथी वाचत असताना अचानक सूनबाईचा फोन आला. वाचनात मधेच मला फोन घेणं भाग पडलं. पलीकडून सून सांगत होती,'आई आज मी प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पाॅझिटिव्ह आली आहे!'ते ऐकून माझ्या तोंडून वाक्य बाहेर पडलं. 'अभिनंदन!यावेळी तुला मुलगा होईल आणि मला नातू मिळेल. 'मी फोन बंद केला आणि पुढील वाचन सुरू केलं .30 एप्रिल 2014 रोजी सूनबाईला पुत्ररत्न प्राप्त झालं. तिला आश्चर्य वाटलं,ती मला विचारू लागली 'आई तुम्ही मुलाविषयी एवढं आत्मविश्वासानं कसं सांगितलं?' त्यावर मी तिला म्हटलं ते जाऊदे तू मुलाच्या बारशाला आंब्याचा रस कर आणि शक्यतो त्याच्या वाढदिवसाला आंब्याचा रस करीत जा. ते ऐकून तिची उत्सुकता अधिकच ताणल्या गेली,तेव्हा ती फार बोलली नाही पण बारशाच्या दिवशी मला आंब्याचा रस वाढून मात्र ती थांबली आणि आई तुम्हाला आज खुलासा करावाच लागेल असा आग्रह धरला. त्यावर मात्र अधिक ताणून न धरता मी म्हटलं,अगं काही नाही तुझा फोन आला त्यावेळी मी गजानन विजय ग्रंथातील सातवा अध्याय वाचीत होते. माझ्या नजरेसमोर ओव्या होत्या.....
तुला होईल बालक/भिक्या नाव ठेव त्याचे/पुत्र देणे माझ्या करी/सर्वतो परी नाही जरी/परी मी विनंती करीन खरी/तुझ्यासाठी परमेश्वरा/तो ऐकील माझी भीड/त्याला न हे काही जड/तू घरचा आहेस धड/रस आंब्याचा द्विजा घाली/हे मम मानी प्रमाण वचन/पुत्र होईल तुज कारण/आम्र रसाचे भोजन/दर साल घाली ब्राह्मणा// बस्स या गोष्टीला मी संकेत समजले आणि महाराजांचं नाव घेऊन तुला तसं बोलले आणि महाराजांनी प्रचिती दिली.
महाराज वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रितीने आपल्याला प्रचिती देतच असतात. कधी एखाद्या प्रसंगातून,कधी कुणाच्या रुपाने,कधी कुणाच्या मुखातून एखादी गोष्ट सुचवून,तर कधी स्वप्नात काही सुचवून. मला आठवतं इ.स.2012 ला मी निवृत्त झाले तेव्हाची गोष्ट. त्यावेळी महाराजांनी जवळपास दोन वर्ष माझी मानसिक आणि आर्थिक पातळीवर चांगलीच कसोटी पाहिली. मी शिक्षकी पेशातून निवृत्त झाले. माझं शालेय व्यवस्थापनाशी न जमल्यामुळे,मी निवृत्त झाले त्यानंतर सहा महिनेपर्यंत जिल्हा परिषदेकडे आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात आली नाहीत. नंतर पाठविली तेव्हा त्यात बर्याच त्रुटी होत्या त्यामुळे पेन्शन सुरू होऊ शकली नाही. इकडे माझे यजमान खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले त्यामुळे त्यांना पेन्शन नव्हतीच.भविष्य निर्वाह निधीचे पाचशे रुपये मिळायचे,तेवढीच काय ती मिळकत. साठवून ठेवलेला थोडाफार पैसा होता तोही संपला,मुलाला त्याचा संसार,माणसाला सर्व सोंग करता येतं पण पैशाचं सोंग काही करता येत नाही. दोन वेळा खाण्याची मारामार होऊ लागली. मी हताश होऊन गेले. एकदा संध्याकाळी मन उदास होऊन गेलं,महाराजांचं स्मरण करीत अंथरुणावर पडले होते. केव्हा डोळा लागला कळले नाही,त्या रात्री अडीच तीन च्या सुमारास मला स्वप्न पडलं,स्वप्नात एक म्हातारे गृहस्थ आलेत,त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, म्हणाले,अगं अशी हताश होऊ नकोस. विजय ग्रंथाचं पठण कर तुझ्या सर्व समस्या दूर होतील.
सकाळी मी माझ्या यजमानांना स्वप्नाबद्दल सांगितलं आणि माझ्या मनाने कौल दिला की ती वृद्ध व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नसून गजानन महाराजच असावेत. दुसर्याच दिवसापासून मी श्री गजानन विजय ग्रंथाचं तीन दिवसात एक याप्रमाणे पारायण सुरू केलं. माझं पाचवं पारायण पूर्ण झालं आणि त्याच दिवशी मला माझा भविष्य निर्वाह निधीचा चेक प्राप्त झाला आणि आर्थिक तणाव थोडा सैल झाला. माझं वाचन अखंड सुरू राहीलं,जसं जसं वाचन होत राहिलं तसं एकीकडे मानसिक शांती प्राप्त होऊ लागली तर दुसरीकडे गेल्या दीड वर्षात पेन्शन केस समोरच सरकत नव्हती तिथे हळूहळू समोरील मार्ग स्पष्ट होत गेला. मला योग्य दिशेने मार्गदर्शन मिळत जाऊन सरकारी फाईल वरील ही त्रुटी ती त्रुटी असे शेरे बाजूला होण्यासाठी मदत मिळू लागली आणि काही महिन्यात माझी पेन्शन रीतसर सुरू झाली. आयुष्याची गाडी मानसिक आणि आर्थिक दोन्ही रेषा सरळ होऊन सुरळीत धावू लागली.
स्वप्नात मला जे अभिवचन मिळालं होतं की 'अगं अशी हताश होऊ नकोस,विजय ग्रंथाचंपठण कर. तुझ्या सर्व समस्या दूर होतील!'ते पूर्णपणे सत्यात उतरलं.
तेव्हा पासून म्हणजे 2012 पासून मी नियमीत दर गुरुवारी,गुरूपुष्यामृताचे दिवशी,तसेच दशमी,एकादशी,द्वादशी ला श्रीगजानन विजय ग्रंथाचं पारायण करते आहे.
आता हळूहळू वयही वाढतं आहे आणि कदाचित महाराज वैचारिक परिपक्वताही वाढविण्यात मदतरूप ठरताहेत. असं मला वाटतं याचं कारण,माझी पेन्शन केस मार्गाला लागून सुरळीत झाल्यावर ,एक दिवस मला कुणीतरी,ज्याला केसमधे बरेच अडथळे आहेत याची खात्री होती त्यानं आत्मविश्वासानं विचारलं 'काय मॅडम केव्हा सुरू होतेय तुमची पेन्शन?'तेव्हा त्यावर अजिबात न चिडता,मी शांत चित्तानं उत्तर दिलं,'गजानन महाराजांच्या कृपेने मला पेन्शन मिळते आहे आणि तेवढ्याच शांतपणे पुढे माझं मनन सुरू झालं...श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ. उषा दिनकर जोशी नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
🌸अवश्य वाचा-
!!श्रीगजानन अनुभव !!
एकूण पृष्ठ संख्या--190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.
Comentários