अनुभव -56
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 56 🌺)
*तुम्ही खरेच गजानन, विघ्नांचे करीतसा कंदन *
जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणावर डोकं ठेवण्याचा योग मला माझ्या आयुष्यात वयाच्या बावीसाव्या वर्षी आला. जीवनात लहान सहान,छोट्या मोठ्या अडचणी बहुतेकांच्या जीवनात येतातच. माझ्याही जीवनात आल्या. मी त्या अडचणींना तोंड देत असतानाच माझी ओळख सौ.मीनाक्षी मनोहर ह्या मैत्रिणीशी झाली. तिने मला गजानन विजय ग्रंथाविषयी माहिती देऊन रोज एक अध्याय वाचण्याचा सल्ला दिला. मी उत्सुकतेने तो ग्रंथ वाचावयास घेतला. त्यातून रोज मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा क्रम सुरू होऊन एखाद्या दिवशी न गेले तर अस्वस्थ वाटायला लागलं आणि पुढे माझ्या अडचणी सांगण्यासाठी मला एक हक्काचं स्थान मिळालं याकरीता मी स्वतःला नशीबवान समजू लागले.
मी स्वाती सिनकर,सी बी डी बेलापूर येथे वास्तव्यास असते. 1987 साली माझा विवाह झाला. लग्नानंतर प्रथम मोठ्या स्वप्नीलचा जन्म झाला आणि त्यानंतर त्याच्याहून धाकटा महेश जन्माला आला. माझ्या आयुष्यात गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांचा मला परिचय झाल्यानंतर अनेक प्रसंगी माझ्यासाठी महाराजांनी धाव घेतली. पण एका कठीण प्रसंगी एका आईच्या हाकेला एका माऊलीनी दिलेली साद मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा केव्हा तो प्रसंग मला आठवतो तेव्हा आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय रहात नाही.
माझी दोन्हीही मुलं खेळकर होती,लहान महेश सहा वर्षांचा असतानाची म्हणजे 1998 च्या मार्च महिन्यातील घटना,तो शिशुमंदिर शाळेत होता. 22 मार्चला तो नेहमी प्रमाणे शाळेत गेला,पण थोड्या वेळात त्याला शाळेतच भडभडून उलटी झाली. शिक्षकांनी लगेच दोन चार मुलांसोबत त्याला घरी पाठवून आमच्या नावे चिठ्ठी देऊन त्यावर घरी पोहोचल्याची नोंद मागवून घेतली. महेशला घरी येतानाच पुन्हा उलटी झाली आणि काही केल्या त्याची उलटी बंद होईना,आम्ही त्याला लगेच लहान मुलांचे तज्ञ डाॅक्टर मोरलवार यांचेकडे घेऊन गेलो. त्यांनी त्याला ताबडतोब एक इंजेक्शन देऊन,आराम होईल असं सांगितलं. आम्ही घरी परतलो,महेश ने नारळ पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून आम्ही त्याला नारळ पाणी दिलं पण ते लगेच उलटून पडलं आणि त्यानंतर उलटी काही थांबेना. त्यानंतर त्याला संध्याकाळ ते रात्रभरात वीस ते पंचवीस वेळा उलटी होऊन अंगातील पाणी निघून गेल्यामुळे अंगात अजिबात त्राण उरले नाही,त्याला ग्लानी आली आम्ही सकाळीच त्याला हातावर आडवं घेऊन एम. जी. एम. हाॅस्पिटल मधे गेलो डाॅक्टरांनी इमर्जन्सी वार्डात त्याला दाखल करून लगेच ट्रीटमेन्ट सुरू केली. तिथे बालरोग तज्ञ डाॅक्टर काळे होते. एव्हाना महेश चांगलाच तापाने फणफणला होता. डाॅक्टरांच्या मते त्याला मेनेन्जेटीस झाला होता. महेशचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. त्याला अक्षरशः उघडा, नागडा,चक्क बर्फावर ठेवून आजूबाजूला,वर बर्फ ठेवून फुल स्पीडनी पंखे सुरू केले तरी त्याचा ताप उतरला नाही. त्याच्या मणक्यातून पाणी काढण्याचा निर्णय घेऊन, त्याला कमरेतून गोल वाकवून पाठीतील कण्यातून इंजेक्शननी पाणी ओढून काढलं. तो जोरजोरात ओरडत होता. त्याच्या वेदना पहावत नव्हत्या. तशातच तो बेशुद्ध झाला अन् काही केल्या शुद्धीवर येईना. नाही म्हणायला हाक मारली की डोळ्याची पापणी हलायची पण अन्यथा अगदी निपचित पडून होता. आता डाॅक्टरांनी सांगितलं की याला सायन हाॅस्पीटल मधे हालवावं लागेल. त्यांनी तिथे तसा फोन केला,आम्ही सर्व अॅम्ब्युलन्सने महेशला ऑक्सिजन लावलेल्या स्थितीत सोबत एक डाॅक्टरघेऊन सायन हाॅस्पिटल मधे गेलो. पण मधल्या काळात महेशच्या गालावर बरीच सूज आली,सायन हाॅस्पिटल मध्ये डाॅक्टरांनी त्याला तपासून सांगितलं की याला गालगुंड झाले आहेत आणि असे पेशन्ट आम्ही ठेवून घेणार नाही,याला कस्तुरबा हाॅस्पिटल मधे घेऊन जा. एव्हाना अॅम्ब्युलन्स निघून गेल्यामुळे आम्ही टॅक्सीने कस्तुरबा हाॅस्पिटल मधे पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडे दहा वाजले होते. त्यांनी महेशला वार्ड नंबर दहा मधे अॅडमिट केलं,तो सिरियस पेन्शटचा वार्ड होता. आम्ही येण्याआधी नुकतीच तिथे दोन मुलं दगावली होती,तिसरी मुलगी आमच्या डोळ्यासमोर गेली. डाॅक्टरांनी एम. जी. एम. हाॅस्पिटलची फाईल पाहून आम्हाला म्हटलं,हीच ट्रीटमेन्ट आम्ही देणार आहे,तेव्हा याला परत त्याच हाॅस्पिटल मधे घेऊन जा. आता महेश एखादं वाक्य बोलू लागला होता,रात्रीचे साडेबारा वाजले आम्ही टॅक्सीने पुन्हा परत निघालो. महेश एकच वाक्य सतत म्हणत होता,'आई मला घरी जायचं आहे '.आम्ही निर्णय घेतला सकाळ पर्यंत काही तासांचाच प्रश्न आहे,जगला वाचला तर सकाळी दवाखाना आहेच अन्यथा त्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही घरी परतलो. पूर्णपणे भितीच्या दबावात आणि थोडसं भगवंताच्या स्मरणात आम्ही ती रात्र काढली.
सकाळी एम. जी. एम. हाॅस्पिटल गाठलं,डाॅक्टरांना म्हटलं तुम्ही तुमचे उपाय करा,आम्ही नामस्मरण करतो ,जे होईल ती त्याची इच्छा!डाॅक्टर म्हणाले हा वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. वाचला तरी मंदबुध्दी होण्याची शक्यता आहे,बघू या काय होतं?बेड नंबर सात वर महेश सलाईन लावलेल्या स्थितीत निपचित पडून होता. एखाद दुसरा दिवस झाला असेल,बाजूलाच खिडकी होती,मला अचानक कानावर शब्द आले. श्री गजानन!जय गजानन! झांजांचा आवाज कानावर आला ,मी चमकून खिडकीतून बाहेर पाहिलं. बाजूला डी वाय पाटील यांच्या "ज्ञानपुष्प" शाळेत गजानन महाराजांची पालखी आली होती. मी भान हरपून महेशला उचललं,सलाईनला ताण पडला,नर्स म्हणाली अहो मॅडम तुम्ही काय करता?पण मला कशाचच भान नव्हतं ,डोळ्यात पाणी आणून मी महेशचं डोकं खिडकीत टेकवलं आणि म्हटलं,हे गजानन महाराजा माझी उपेक्षा करू नका,मी तिथवर येऊ शकत नाही आहे,पण माझ्या महेशला बरं करा. मी तुमची मूर्ती शेगांवहून आणून आमच्या सी बी डी बेलापूर येथे लोकांच्या दर्शनार्थ ठेवीन. तुम्ही परम कृपाळू आहात,हे मी ऐकत आले आहे. माझ्या महेशवर कृपादृष्टी असू द्या .
प्रार्थना संपवून मी महेशलाअंथरुणावर ठेवलं,दोन दिवसानी महेशनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला,त्याच्या कमरेत व मानेत शक्ती नव्हती,अजून चार पाच दिवसांनी त्याला दवाखान्यात व्हीलचेअर वर बसवून खोलीतच फिरवलं. महेश जिवंत रहाणार हे तर चित्र स्पष्ट झालं होतं. कसा रहाणार यावर प्रश्न चिन्ह होतं .पूर्ण एकवीस दिवस झाले,आता महेश हळूहळू एकेक पाऊल टाकत होता. जणू नव्यानं चालणं शिकत होता. डाॅक्टरांनी डिसचार्ज दिल्यावर एक दिवस महेशने हळूच दवाखान्याच्या बाहेर पाऊल ठेवले.
महेश चालला,महेश धावला,महेश बोलला आणि महेश डोक्याने उत्तम विचार करू लागला आज महेश सव्वीस वर्षांचा आहे. एका कंपनीत चांगली जबाबदारी सांभाळतो आहे.
मीही महाराजांची मूर्ती तेव्हा शेगांवहून आणली आणि सी बी डी बेलापूर येथे डोंगरावर ती स्थापित केली. पुढे तिथेही महाराजांनी मला बरेच स्मरणात ठेवण्यासारखे अनुभव दिलेत.संधी मिळाली तर पुढे अवश्य सांगण्याचा माझा प्रयत्न राहील.
सध्या एवढंच सांगते की आज महेशकडे पाहिल्यानंतर कुणाला त्याच्या पुर्वायुष्यात घडलेला प्रसंग कळणारही नाही,पण माझ्यापुरते बोलायचे तर त्या दिवशी गजानन महाराजांची पालखी खिडकीतून पाहिल्यावर मी महेशचं डोकं महाराजांसाठी त्या खिडकीत टेकवलं होतं तोच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता आणि माझ्यासाठी तेव्हा कानावर पडलेले ते शब्द अमृततुल्य होते,जे मला आजही जसेच्या तसे ऐकू येताहेत..
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ.स्वाती सिनकर
सी बी डी बेलापूर.
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-- !!श्रीगजानन अनुभव !!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.
Comments