अनुभव -57
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 13, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय 🌺
*हे गजानन माऊली,निरंतर रक्षण करी *
जय गजानन!मी सौ स्वाती सिनकर,मार्च 1998 ला माझा लहान मुलगा महेश,गजानन महाराजांच्या कृपेने जिवावरील दुखण्यातून वाचला. एम जी एम हाॅस्पीटलच्या खिडकीतून बाजुलाच गजानन महाराजांची पालखी पाहून मी त्याला सलाईन लावलेल्या अवस्थेतच उचलून दूर पालखीतील गजानन महाराजांसाठी त्याचं डोकं खिडकीत टेकवून,मी महाराजांना त्यांची मूर्ती सी बी डी बेलापूर येथे लोकांच्या दर्शनासाठी असं बोलले होते.
महेशची प्रकृती ठीक झाली आणि मी शेगांवहून महाराजांची मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला,तेव्हा माझी आर्थिक स्थिती अगदीच बेताची होती,त्यामुळे भावनेला महत्व देऊन मी ऑफिसच्या लोकांकडून पैसे गोळा करुन मे 1998 ला शेगांव येथे एक लहान अठराशे रुपयाच्या मूर्तीची खरेदी केली.
मला वाटलं सी बी डी बेलापूर येथे डोंगरावर एक लहान मंदिर आहे त्यात आपण ही मूर्ती ठेवू ,त्या प्रमाणे आम्ही 10 मे ला ती मूर्ती डोंगरावर नेली,परंतु त्या मंदिरातील लोकांनी मूर्ती ठेवण्या मनाई करून तुम्ही स्वतः मंदिर बांधा व त्यात ही मूर्ती ठेवा असा आग्रह धरला. मी बाजूला जमीनीवर महाराजांची मूर्ती ठेवली,माझे डोळे भरून आले. मंदिर बांधणे हा काही पोरखेळ नव्हता. मी महाराजांना मनोमन प्रार्थना करून म्हटलं,आता आहे त्या स्थितीत तुम्हाला रहावं लागणार असं दिसतंय,तुमची इच्छा!माझा जी पी एफ पांच हजार रुपये आणि मेडीकल बिलाचे मिळालेले एक हजार रुपये, असे सहा हजार रुपये तेवढे जवळ होते.तेवढ्यात तिथे एक चौथरा बांधून आजूबाजूला व मागे कडप्पा ठेवून वर एक कडप्पा ठेवला
समोरचा भाग दर्शनार्थ म्हणून उघडाच ठेवला आणि आत मूर्ती ठेवून नमस्कार केला. मंदिराची पुढील दिशा आणि पुढील प्रगती तुमच्या हातात. मी तुम्हाला जे बोलले होते ते मी यथाशक्ती पूर्ण केले आहे. अशी प्रार्थना करून माघारी परतले. डोंगरावर असलेल्या त्या तथाकथित मंदिरात रोज दर्शनासाठी जाणं काही होत नव्हतं. स्वाभाविकपणे तिथे आजूबाजूला भरपूर गवत,झाडं झुडपं वाढणं,होणारच होतं. मला आठवतं मूर्ती ठेवून साधारण दोन महीने झाले होते. सात जुलैची सकाळ. खूप पाऊस पडत होता आणि माझ्या कानावर एकसारखे शब्द यायला लागले 'अगं मी भिजतोय 'मूर्ती पुसायला हवी नं?जेव्हा त्या शब्दांची वारंवारीता वाढली तेव्हा अस्वस्थपणे उठले आणि डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला. कुणालाही काही कल्पना न देता,महाराजांच्या मूर्तीच्या दिशेने हातात छत्री घेऊन वाटचाल सुरु झाली. तिथे पोहोचले आणि समोर जाऊ लागले,तो बाजूच्या मंदिरातील माणूस ओरडला 'अहो मावशी तिकडे जाऊ नका,तिथे आत्ताच एक मोठा साप गवतात शिरला आहे.'त्याचं वाक्य माझ्या कानावर आदळलं पण आत शिरलं नाही. मी समोर मूर्ती पर्यंत पोहोचले. तिथे एक लाल रंगाचं कापड मूर्ती पुसण्यासाठी ठेवलं होतंच. ते हाती घेऊन मी मूर्ती पुसू लागले,मूर्ती चांगलीच ओली झाली होती. मी ती पुसली. एकदा,दोनदा,तीनदा आणि प्रत्येक वेळी ओलं झालेलं फडकं हाताने पिळत होते. तिसरे वेळी पुसून झालं आणि मी एकेरी करून ते फडकं झटकलं आणि एकदम किंचाळून मागे सरकले. बाजूचा माणूस तिथे आला,तो आणि मी आम्ही समोर पाहू लागलो,एक मोठा काळेभोर विंचू त्या फडक्यातून बाहेर पडला होता.तो माणूस म्हणाला,मावशी हा जर तुम्हाला चावला असता तर तुम्हाला पाणी मागायलाही वेळ मिळाला नसता.इतका वेळ तो विंचू माझ्या हातात होता पण हातात जरी विंचू होता तरी डोक्यात मात्र महाराज होते म्हणूनच मी बचावले. महाराजांना मनोभावे हात जोडले आणि विनंती केली..महाराज येथून मोठ्या मंदिरात स्थानापन्न व्हा,भविष्यात महाराजांनी माझी प्रार्थना ऐकली. आज तिथे मूर्तीही मोठी आहे आणि मंदिरही मोठं आहे.
इ.स.2004 ची एक घटना मला इथे सांगण्याचा मोह होतो आहे ,तेवढी सांगते आणि थांबते. मी बरीच वर्षे घरी माघ वद्य सप्तमीला महाराजांचा प्रकट दिन साजरा करते आहे. प्रत्येक प्रकट दिनाला मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आली ती अशी की दर वर्षी प्रसादाच्या वेळी कुणी ना कुणी अनोळखी व्यक्ती प्रसादासाठी आल्याशिवाय राहत नाही. पहिले काही वर्ष हे माझ्या लक्षात आलं नाही पण तीन चार वर्षं लागोपाठ असं झाल्यावर मात्र माझ्या डोक्यात ती गोष्ट चांगलीच नोंदवल्या गेली आणि मग मला तशी सवय लागली आणि एक अलिखित नियम होऊन गेला की असं कुणी आल्याशिवाय मी प्रसाद ग्रहण करायचा नाही. मात्र इ.स.2004 च्या प्रकट दिनाला असं कुणीच आलं नाही. संध्याकाळहोऊन गेली माझं मन प्रसाद घ्यायला तयार होईना. म्हटलं मला भूक नाही, मी नाही घेणार प्रसाद मग आजूबाजूच्या सर्वांनीच समजावलं की हे बरोबर नाही तू प्रसाद ग्रहण कर. मग मी नाखुशीनेच पण प्रसाद ग्रहण केला. मात्र मन अस्वस्थ झालं. ती पूर्ण रात्र बेचैनित घालविली. वास्तविक गेल्या काही वर्षात योगायोगाने घडलेली गोष्ट यंदा मात्र घडली नाही याच अर्थाने त्याकडे बघायला हवं होतं,पण असो, माणसाचं मन मोठं विचित्र असतं,त्यातलाच हा प्रकार. असं एकीकडे मनाला समजावीत दुसरीकडे मात्र,महाराज माझं काही चुकलं असेल तर माफ करा,पण तुमची कृपादृष्टी असू द्या असं मनोमन चिंतन करीत मी झोपी गेले.
दुसरा दिवस उजाडला,दुपारी बाराच्या सुमारास घरचे सर्व इकडे तिकडे व्यस्त,वडील खाली बाहेर गेलेले,आई निजलेली,मी एकटीच महाराजांच्या मोठ्या फोटोसमोर उभी होते. फोटोचा हार काढावा म्हणून महाराजांकडे पाहिलं आणि डोअर बेल वाजली,दार उघडलं तो दारात एक फकीर सदृश्य गृहस्थ उभे होते,मला वाटलं काही मागण्यासाठी आलेत,म्हटलं पाच दहा रुपये द्यावेत म्हणून मी हो थांबा म्हणून मागे वळणार तोच त्यांनी म्हटलं 'रुको बेटा हमे कुछ नही चाहीए,सिर्फ कलका परशाद जो है,जो लड्डु आपने फ्रीज मे रखा है,ओ परशाद हमे दे दो. मी फ्रीज मधून लाडू काढून त्यांच्या हातावर ठेवला आणि ते निघून गेले. एखाद मिनीट मधे गेला आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. एक अनोळखी माणूस प्रकट दिनाचा प्रसाद घेऊन गेला होता. माझा प्रकट दिन साजरा झाला होता. माझी प्रार्थना महाराजांपर्यंत पोहोचली होती. पुन्हा महाराजांच्या त्याच फोटोसमोर उभी झाले,पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांमुळे महाराजांचा फोटो अस्पष्ट दिसत होता. अशात मी डोळे मिटले,माझ्या दोन्ही गालांवरून अश्रू खाली ओघळले. मला अवर्णनीय आनंद झाला होता आणि त्याच आनंदात मी गाऊ लागले...
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ स्वाती सिनकर
सी बी डी बेलापूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
🌸 अवश्य वाचा-- !!श्री गजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या-190
सहयोग राशी- रुपये पन्नास फक्त
コメント