अनुभव -59
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jun 13, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
*प्रत्यक्षापरी प्रकार,येथे होती वरच्यावर *
जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज इ.स.1878 ला माघ वद्य सप्तमीला शेगावी प्रकटले आणि शेगांव श्री क्षेत्र शेगांव झाले. इ.स.1910 ला महाराज समाधिस्त झाले. या बत्तीस वर्षात महाराजांनी ज्या लीला केल्यात त्यामुळे तेव्हा तर अनेक भक्तांना भक्तीचा मार्ग गवसलाच पण समाधी नंतरही आणि आजही महाराज भक्ती मार्ग प्रदीप आहेत. संत कवी दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथाच्या एकविसाव्या अध्यायात म्हटलं आहे..' प्रत्यक्षापरी प्रकार/येथे होती वरच्या वर/म्हणून म्हणणे आहे सार/अवघ्यांचे या अध्याया/... अर्थात प्रत्यक्ष हयात असताना महाराजांच्या लीलांमुळे ,भक्तांना तेव्हा जसा लाभ झाला,तसा अनुभव निष्ठेने भक्ती केल्यास, श्रध्देने शरण गेल्यास आजही भक्त अनुभवताहेत.
1985-86 ची गोष्ट असावी,तेव्हा मी आठव्या वर्गात होतो.शाळेत मधल्या सुट्टीत मुलांची खेळण्याची धामधूम सुरु असते,तशी आमच्याही शाळेत सुटीच्या काळात मुलं खेळत असायची,त्या दिवशी वर्गातील बाकी मुलं बाहेर खेळत होती,आम्ही दोन चार मुलं वर्गात होतो. दोन मुलं अचानक वर्गात धावत आलीत,समोर धावत असलेल्या मुलानी मागील मुलाच्या मार्गात अडथळा निर्माण व्हावा म्हणून वाटेतील एक डेस्क धावता धावता हाताने मधे ओढला,मी बाजूलाच उभा होतो. त्या डेस्कचा कोपरा जोरात माझ्या पोटात डाव्या बाजूला खाली लोअर अॅब्डाॅमेनच्या भागात जोरात लागला,मी कळवळून ओरडलो आणि पोटावर दोन्ही हात धरून खाली बसलो. त्या दिवशी मरणप्राय वेदना झाल्यात. सर्व मित्र,शिक्षक बाजूला जमा झालेत,साधारण अर्ध्या तासात दुखणं थांबलं,पण त्यानंतर त्या दुखण्यानी बरीच वर्षे माझा पिच्छा पुरविला. केव्हाही अचानक पोटात दुखायचं,म्हणजे एक प्रकारे दुखण्याचा अटॅक आल्या सारखं होऊन जमिनीवर गडबडा लोळण्याची वेळ यायची,दुखणं असह्य व्हायचं आणि असा दुखण्याचा अटॅक केव्हा येईल हे काही ठरलं नव्हतं ,कधी पंधरा दिवसांत तर कधी एखाद दोन महिन्यात अचानक असं व्हायचं. डाॅक्टर झालेत,सर्व टेस्ट झाल्यात पण नेमकं काही निदान होऊ शकलं नाही. लक्षण मात्र तसंच राहिलं. दरवेळी दुखणं उमाळून आलं की पाच ते दहा मिनिटं दुखणार मग पुन्हा पूर्ववत होणार.
आमच्या घराजवळ एक कमलताई विद्वांस म्हणून राहतात,त्या गजानन महाराजांच्या भक्त!आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आषाढी एकादशी साठी शेगांवहून गजानन महाराजांची वारी पंढरपूर साठी रवाना होत असते. सोबत अनेक वारकरी असतात ते ठरलेल्या मार्गाने पंढरपूरला पोहोचतात आणि आषाढी एकादशी नंतर ती वारी शेगांवसाठी परतीच्या प्रवासाला निघते.ठरलेल्या मार्गाने प्रवास करीत वारी साधारण नागपंचमीच्या दुसरे दिवशी खामगावहून शेगांवला पोहोचते. खामगाव-शेगांव हे अंतर साधारण सोळा सतरा कि.मी. आहे. खामगावहून शेगांवला जेव्हा वारीचा प्रवास सुरू होतो तेव्हा महाराज आज पंढरपूरहून परतणार या भावनेने,हजारो लाखो भक्तगण स्वागतासाठी सज्ज असतात. तो एक अभूतपूर्व सोहळा असतो. वाटेत प्रचंड उत्साहाचं दर्शन होत असतं. भक्तीमय वातावरणात सर्व
'गजानन' चिंतनात मग्न असतात. खामगाव-शेगांवपायी वारी हा एक वेगळाच अनुभव असतो.
कमलताई ज्यांना आम्ही कमूताई असं म्हणतो त्यांनी सोळा वेळा ती वारी अनुभवली होती. इ.स.2013 ची ही गोष्ट. निदान एकवीस वेळा ही वारी व्हावी असा त्यांचा मानस होता. त्या मला नेहमी म्हणायच्या 'हेमंत' तू खामगाव-शेगांव वारीला चल ,तो एक अवर्णनीय आनंद असतो. मात्र चलायचं तर अनवाणी चलशील. मला मनातून वाटायचं माझी ही अशी पोटदुखी, जावं की न जावं?मला वाटेत त्रास झाला तर कमूताईंच्या वारीत बाधा नको आणि असं वाटून मी स्वस्थ बसायचो. पण 2013 साली मी मनाचा निर्धार केला आणि निश्चय केला की आपण ही वारी करायचीच. पाहू तर खरं महाराज काय करतात,कमूताईंना म्हटलं चला मी येतो वारीला.
तुम्हाला सांगतो मी खामगावहून वारीत सामील झालो, अहो काय तो उत्साह,काय ती भक्ती. कितीतरी लोक वारीतील वारकर्यांची सेवा करायला तयार,वाटेत रांगोळ्या,सडा घालून सगळे स्वागतासाठी सज्ज. अगदी दासगणू महाराजांनी म्हटलं आहे नं की 'संतांचं कामच वेगळं,सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्यापुढे ' अगदी तसं! अतिशय आनंदात आमची वारी पूर्ण झाली. शेगांवात केव्हा प्रवेश झाला,कळलच नाही.
मी दर्शनासाठी बारीत उभा झालो. माझं दर्शन झालं. मी विसरून गेलो होतो की 'माझं पोट दुखतं ',मला कधी दुःख अचानक उमाळून येतं, .मी समाधी दर्शन पूर्ण करून बाहेर प्रांगणात आलो आणि अचानक मला पोटदुखीचा अटॅक आला. पोटात प्रचंड दुखायला लागलं,पण यावेळी माझ्या पोटात खूप मुरडून आलं,केव्हा एकदा संडासला जातो असं झालं,मी घाई घाईने संडास गाठला,त्या दिवशी पोट एकदम साफ झालं. इतकं साफ झालं की पोटात असलेली व्याधीही शौच्यावाटे निघून गेली. हे मला त्याच दिवशी जाणवलं,कारण पोटात काहीतरी वेगळीच जाणीव झाली. पण त्या दिवशी मी अंदाज करू शकत होतो. आज मात्र मी तीच गोष्ट अधिक आत्मविश्वासानं सांगू शकतो आहे.
आज इ.स.2018 ,मी वारीला गेलो ते 2013 साल होतं. आज पाच वर्षे पूर्ण झालीत,त्या दिवसानंतर पुन्हा पोट दुखलं नाही. म्हणजे अक्षरशः असं झालं की 'खामगाव-शेगांव वारी झाली आणि शौच्या वाटे व्याधी गेली. '
लक्ष्मण घुडेचीही व्याधी अशीच शौच्या वाटे गेली होती पण पुढे महाराजांनी घेतलेल्या परीक्षेत तो नापास झाला होता,त्यामुळे महाराजांना माझी नेहमीच कळकळीने प्रार्थना आहे की व्याधी नष्ट झाली इतपतच साम्य असू द्या!मात्र पुढे माझी बुद्धी योग्य मार्गावर असू द्या आणि कुठल्याही लोभापासून मला दूर ठेवून माझ्या मुखी सतत तुमचं नाव येऊद्या ...श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--हेमंत राऊत.
नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे .
🌸अवश्य वाचा--!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त..
Comments