top of page

अनुभव - 60

Updated: Jun 13, 2020

" श्री "

गजानन महाराज की जय

* अरे खुळ्यांनो 'ही गाय,अवघ्या जगाची आहे माय' *


जय गजानन! जेव्हा पासून मला कळायला लागलं तेव्हा पासून नेहमीच मला दोन गोष्टींविषयी आकर्षण राहिलं.त्यातील एक गोष्ट म्हणजे गजानन महाराज आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'गाय!' ,गजानन महाराजांविषयी सांगायचं तर कुठे त्यांच्या विषयी ऐकल्यामुळे असेल,सभोवतालच्या चर्चेमुळे असेल,गजानन महाराज हा विषय आत कुठेतरी भिडला आणि मी त्यांना नमस्कार करू लागलो. गजानन विजय वाचू लागलो. नंतर खामगाव शेगांव वारीत मला आलेल्या एका अनुभवातून ती श्रध्दा अधिकच दृढ झाली.

माझ्या लहानपणी माझ्या सुदैवाने मला 'भारत हा कृषीप्रधान देश आहे 'हे सांगण्यासाठी कुणा अन्य व्यक्तीची गरज नव्हती. आजूबाजूचं वातावरण आणि सभोवतालची परिस्थिती हे शिकविण्यासाठी पुरेशी बोलकी होती. अर्थात त्यातून लहानपणापासून 'गाय 'हा विषय मी बर्यापैकी जाणून होतो. आपल्याकडे पुढे एखादी गाय असेल तर किती छान अशी भावना मनात कुठेतरी होतीच.

इ.स.2014 ला भाद्रपदात ऋषीपंचमी नंतर येणारा 'जेष्ठा गौरी पूजनाचा दिवस होता '.मी पूजा करायला बसलो आणि माझ्या नजरेसमोर सातत्याने एक गायीचा चेहरा दिसू लागला आणि अंतर्मनातून वाटायला लागलं की आपण एक गाय घ्यावी या विषयीची ही सूचना आहे. मी आईजवळ ही गोष्ट बोलून दाखविली,आई म्हणाली अरे गायी विषयीचं प्रेम मी समजू शकते पण प्रत्यक्ष गाय पाळणं ,गायीचा सांभाळ करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आमच्या बहिणीच्या शेतावर तीन वर्षांपूर्वी गुरूपौर्णिमेला एका गायीचा जन्म झाला होता. बहिणीनं तिचं नाव मंगला ठेवलं होतं. गाय घेण्याविषयीची माझी इच्छा बहिणीच्या कानावर गेली तेव्हा ती म्हणाली,असं कर मी मंगलाला तुझ्याकडे पाठविते,ते ऐकून मला आनंद झाला,मी लगेच गजानन महाराजांना हात जोडून प्रार्थना करून म्हटलं महाराज आई म्हणते तसं खरोखरच 'गायीचा सांभाळ' कठीण गोष्ट आहे,पण तुमचा आशीर्वाद असेल तर ते का शक्य होणार नाही?

मग एक दिवस नागपूरहून जवळच असलेल्या सावनेर येथून मंगलाचं घरी आगमन झालं. आगमनानंतर लगेचच माझ्या लक्षात आलं की 'मंगला 'हे काही साधं प्रकरण नाही. ती काही कुणाला हात लावू देण्यास तयार नव्हती. माझ्या मोठ्या भावाला या गोष्टीची सवय असल्याने तो थोडंफार ते प्रकरण हाताळू शकत होता. दुसर्याच दिवशीची गोष्ट,भावानी मंगलाला घराबाहेर दाराशी बांधलं आणि तो बाहेर गेला. संध्याकाळ झाली ,भावाला घरी यायला उशीर होता. मंगलाला घरात आणणं आवश्यक होतं,मी बाहेर जाऊन दावणीला हात लावणार,तो ती मारायला समोर आली. एक दोन वेळा असं झाल्यावर मी मनात म्हटलं, 'हेमंत राव आज तुमची परीक्षा आहे. 'इथे तुम्ही हरलात तर गाय परत बहिणीच्या शेतावर जाणार आहे. या विचाराने मी अस्वस्थ झालो,अस्वस्थपणेघरात येऊन महाराजांसमोर उभा राहिलो ,त्यांना मनोमन प्रार्थना केली,महाराजांना म्हटलं,महाराज सुकलाल अग्रवालची गाय तुमचं दर्शन होताच मवाळ झाली. मी तुमचं स्मरण करून आता बाहेर जातो आहे,मंगलाला सद्बुध्दी द्या,असं म्हणून मी बाहेर आलो. एका हातात काठी होती,दुसरा हात रिकामा होता. बाहेर गायीसमोर उभा राहून मी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो. तिला म्हटलं,'बाईगं! मी पोथीत वाचत आलो आहे की गजानन महाराजांचं दर्शन होताच गाय गरीब झाली. तू पाहते आहेस माझ्या एका हातात ही काठी आहे,तू ऐकलं नाहीस तर नाईलाजाने मला याचा वापर करावा लागेल पण मला ते नको आहे.' पुढे तिला म्हटलं 'माय माझे!,महाराज म्हणतात...' ही गाय बिचारी साक्षात/तिला न ऐसे करणे बरे/अरे खुळ्यांनो ही गाय/अवघ्या जगाची आहे माय/तिला आताच करा मुक्त/ती न हुंदाडी कोणाप्रत/.'...

पुढे तिला म्हटलं आता मी महाराजांचं नाव घेऊन तुला आत नेणार आहे,तू ठरवायचं आहेस,'आता मी आत कसं जावं?' असं बोलून मी काठी बाजूला ठेवली,महाराजांचं स्मरण केलं आणि समोर झालो,तुम्हाला सांगतो,मंगलानी मान खाली घातली,शांत झाली आणि सावकाश तिने घरात प्रवेश केला.खरं सांगतो तो तिचा खर्या अर्थाने 'गृहप्रवेश 'ठरला. त्या दिवसापासून तिच्या स्वभावात थोड्या प्रमाणात का होईना पण निश्चितच बदल झाला. अर्थात अनोळखी माणसाला प्राणी सहजपणे हात लावू देत नाही या दृष्टीने मंगलाला हात लावणे सोपे नाहीच,पण माझ्या दृष्टीने तो बदल निश्चितच उल्लेखनीय होता.

आता 'मंगला' बरीच माणसाळली होती , गायीचा सांभाळ करणं सहज शक्य नाही याचा अनुभव मला अनेकवेळा आला. माझ्या प्रेमाला आता मंगलाही प्रेमळपणे प्रतिसाद देऊ लागली होती आणि एक दिवस मंगलाची तब्येत बिघडली,चांगलीच बिघडली. ती तापाने फणफणली. औषधोपचार सुरू झाले पण म्हणावा असा गुण येईना,एक दिवस तिचं सर्वांग थरथरायला लागलं. तिला एकशे सहा पर्यंत ताप चढला,तिला डोळ्यानी दिसेनासं झालं,ती अचानक जमिनीवर आडवी झाली,डाॅक्टरांनी सांगितलं आजची रात्र कठीण आहे,शिवाय तिला पुढे दिसेल की नाही तेही आज सांगू शकत नाही. एव्हाना मंगलाने मला चांगलाच लळा लावला होता.जे लोक प्राणी पाळतात त्यांना प्राण्यांचं प्रेम किती असतं हे तेच जाणू शकतात. माझ्याजवळ आता महाराजां शिवाय अन्य उपाय नव्हता .मी नेहमी जेव्हा केव्हा शेगांवला जातो तेव्हा महाराजांची विभूति आणि तीर्थ आणत असतो,त्या रात्री मी अंगणात बसलो,मंगलाची मान माझ्या मांडीवर घेतली,मधेच थंडी वाजावी असं तिचं अंग शहारून येत होतं. मी मधेच

महाराजांशी आणि मधेच मंगलाशी बोलू लागलो. मंगलाला म्हटलं 'तू त्या दिवशी महाराजांची शपथ दिल्यानंतर शांत झालीस नं?अगं महाराज तुझा विश्वास व्यर्थ नाही जाऊ देणार. होशील तू बरी',असं म्हणून दोन थेंब तीर्थ तिच्या मुखात सोडलं,चेहर्यावर विभूती लावली. मग महाराजांशी बोलू लागलो,त्यांना म्हटलं तुम्ही सुकलाल अग्रवालच्या गायीला तुमच्या पुनीत करांनी बंधन मुक्त केलं होतं,आज या मंगलाला तुमच्या कृपादृष्टीनं व्याधीमुक्त करा. प्रार्थना करता करताच माझा बसल्या बसल्याच डोळा लागला,थोड्या वेळानं मांडी अवघडल्या सारखी होऊन जाग आली,मी हळूच बाजूला सरकलो,मंगलाची तगमग शांत झाल्यासारखी वाटली,मी सावकाश आत गेलो,महाराजांना हात जोडले आणि अंथरुणावर आडवा झालो. सकाळी उजाडता उजाडताच गायीच्या हंबरण्याने मला जाग आली,बाहेर पाहिलं तर मंगला व्यवस्थित उभी होती,जवळ जाऊन मायेने तिच्या अंगावर हात फिरविला,ती बर्याच अंशी बरी होऊन तब्येत सुधारल्या सारखी वाटत होती. मी मानेच्या पोळीवरून हात फिरवू लागलो,तिने मान उंच केली,तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते, क्षणभर मला वाटलं ती समोरच्या खोलीतील महाराजांच्या फोटो कडे पहाते आहे, पुढे वाटलं कदाचित तिला तिच्या भावना व्यक्त करून म्हणायचं असेल...महाराज.. श्री गजानन!जय गजानन!

श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--हेमंत राऊत

नागपूर

शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोगराशीरुपयेपन्नासफक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page