top of page

अनुभव - 61

Updated: Jun 13, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय

* *श्री गजानन चिंतामणी* *


u जय गजानन! मी शेगांवला जेव्हा केव्हा गेलो तेव्हा माझ्या नजरेने एक गोष्ट टिपली,ती अशी की प्रत्येक वेळी तिथे काही ना काही सुधारणा,काही ना काही बदल किंवा निदान व्यवस्थापकीय योजनेतून रचनेतील परिवर्तन हमखास झालेलं असतं. मी इ.स.1991 ला सर्वप्रथम शेगांवला गेलो तेव्हा समाधी दर्शन,पारायण सभागृह,राम मंदिर,सभोवतालचं वातावरण, यामुळे तर माझं मन भारावून गेलंच पण भक्त निवासात उतरल्यावर तिथे जवळपास प्रत्येक खोलीवर कुणातरी भक्ताचं नाव आणि त्याने दिलेली देणगी वाचून तर मी अतिशय प्रभावित झालो.आणि माझ्या मनात विचार आला की असच कुठेतरी एखाद्या खोलीवर आपलं नाव असू शकेल का? पुढे प्रत्येक शेगांववारीत तो विचार अधिकाधिक मनात खोलवर रुजत गेला, अर्थात या विचाराला पैशाचं पाठबळ मिळाल्याशिवाय तो प्रत्यक्ष कृतीत येणं असंभव होतं. पण पुन्हा विचार आला की महाराजांनी आशिर्वाद दिलेत तर काय अशक्य आहे?मात्र तेव्हा म्हणजे 1995-96 च्या सुमारास मी एका खाजगी नोकरीत असताना,हे काही शक्य होणार नव्हतं .मी महाराजां समोर हात पसरलेत,म्हटलं तुम्हीच देणार तुम्हीच करवून घेणार. माझी इच्छा तुम्ही जाणता.

1990 ते 2004 पर्यंत मी एका कंपनीत नोकरीला होतो. 2004 पासून मी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केला. माझं राहणं 'सांगवी ' ला. कामाच्या ओघात डाॅ. उदय बडगे यांचे घर बांधण्याचा योग मला आला आणि पुढे सांगवी येथेच डाॅक्टर बडगे यांनी त्यांच्या हाॅस्पिटलचेही बांधकाम माझ्याकडून करवून घेतले. डाॅ. बडगे यांना माझं काम आवडलं,त्यांनी एकदिवस मला सांगितलं की त्यांचे तीन मित्र व ते असे चौघं डाॅक्टर मिळून एक हाॅस्पिटल बांधण्याचा विचार करीत आहेत, तुम्ही ते काम कराल का?मी त्या गोष्टीला होकार दिला. महाराजांच्या भक्तांना जेव्हा अशी काही संधी चालून येते तेव्हा ते प्रथम त्याच अनुषंगाने विचार करतात. मला वाटलं शेगांवला आपल्या नावे खोली होऊन,एखाद्या भक्त निवासात आपणही खारीचा वाटा उचलू शकू. प्रथम महाराजांसमोर उभा झालो आणि त्यांना वृत्त निवेदन केलं. मात्र पुढे झालं असं की डाॅक्टर बडगे यांच्या एका डाॅक्टर मित्राने ते काम परस्पर एका वेगळ्याच माणसाला देउ केलं. स्वाभाविकच मी तिथून बाजूला पडलो. खारीच्या हाताने सेतू बांधण्याचा माझा विचार माझ्या मनातच जिरून गेला. मी पुन्हा महाराजां समोर हात जोडले,वृत्त निवेदन करून म्हटलं. जे व्हायचं ते तुमच्या इच्छेने होऊ द्या. माझं हित तुम्हाला अधिक चांगलं कळतं. डाॅ. बडगे यांनी माझ्याजवळ खेद व्यक्त केला आणि तो विषय बाजूला पडला.

इ.स.2014 ची गोष्ट,एक दिवस मला डाॅ. उदय बडगे यांचा फोन आला. मी जय गजानन! म्हणून फोन घेतला. आवाजावरून मला डाॅक्टर जरा चिंताग्रस्त वाटले,ते म्हणाले 'सुहासराव जरा भेटायला येऊ शकाल का?' मी म्हटलं का नाही?मी भेटायला गेलो चारही डाॅक्टर माझी वाट पहात होते. चौघांच्याही चेहर्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हाॅस्पिटलचं काम ज्या माणसानी स्वीकारलं होतं तो माणूस त्यांच्या कडून पैसे घेऊनही काम न करता आपली जबाबदारी टाळत होता,कामगारांना आणि मटेरीयल सप्लायर्सनाही पैसे न दिल्याने कामगारांनी कामावर येणं बंद केलं होतं. बाजारात त्याची पत उडाल्याने सर्व काम ठप्प झालं होतं. बॅन्केकडून मंजूर झालेलं कर्ज विशिष्ट काळात न उचललं तर तिथेही अडचण येणार होती .अशा सर्व परिस्थितीत त्यांना माझा फार मोठा आधार वाटत होता. त्यामुळे मी काम स्वीकारावं हे सांगण्यासाठीच त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनी चक्क दहा लाख रुपयांचा चेक मला देऊ केला आणि उद्याच खर्चाचा अंदाज सांगून,ताबडतोब काम सुरू करा असा आग्रह धरला.

चेक घेऊन मी घरी परतलो,घरी आल्या आल्या लगेच, लोचनी आनंदाश्रू आणि हात जोडलेले अशा स्थितीत महाराजांसमोर वृत्त निवेदनार्थ उभा झालो. महाराजांची योजना थोडी थोडी लक्षात आली होती. डाॅक्टरांपैकी काहींच्या मनात नसताना मला ते काम मिळण्यापेक्षा,सर्वानुमते मला ते काम मिळावे ही ती योजना होती. इतकेच नाही तर आधीच्या माणसाच्या तुलनेत माझ्या कामाची पध्दत आणि गती पाहून डाॅक्टरलोक खूष झालेत आणि त्यांनी भराभर मी न मागताही माझ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा उत्साह दाखविला. आता माझ्या अंतर्मनात खोलवर रुजलेली ती खोलीची गोष्ट पुन्हा वर आली आणि महाराजांची पुढील योजना पाहून तर माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. एक दिवस मला डाॅक्टरांनी सांगितलं की,आम्ही तुमच्या आय. डी.बी.आय.बॅन्केतील खात्यात रक्कम डिपाॅझिट करीत आहोत. ते ऐकून माझ्या मनात उठलेले आनंदाचे तरंग गोल फिरत असतानाच,व्हाट्सअॅप वर कुणी तरी शेगांव संस्थानबाबत पेपरमध्ये आलेली पोस्ट टाकली. त्यात लिहिलं होतं 'आनंद सागर विसावा येथे भक्त निवासाचे काम सुरू असून कुणाला आपल्या नावे रूम द्यावयाची असल्यास रूपये तीन लाख एकावन्न हजार देणगी देऊन आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. रक्कम सहा महिन्यात टप्याटप्यानं द्यावयाची आहे. ' ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना. लगेच महाराजां समोर हात जोडले , त्या दिवशी महाराज जणुकाही म्हणत होते,झालं तुझ्या मनासारखं? आधी पैसे पाठविले ,त्याला जोडून बातमी पाठवली! तथास्तु!

मी लगेच त्या दृष्टीने कामाला लागलो. आमचे मित्र डाॅ. ब्राह्मणकर जे महाराजांचे परम भक्त आहेत,त्यांची शेगांव कार्यालयात कार्यरत असलेल्या श्री गोपाळ गीते यांच्याशी ओळख असल्याने त्या माध्यमातून गीते साहेबांशी बोलून एका रुमचं फायनल केलं आणि त्यांच्या सांगण्यावरून या कामासाठी शेगांवला जाण्याचं ठरविलं. पत्नीच्या म्हणजे सौ सुकांताच्या कानावर हे सर्व घातलं तिनेही उत्साह दाखवून साथ दिली. आम्ही शेगांवला जाऊन रुमचे पूर्ण पैसे एकरकमी जमा केले. महाराजांच्या कृपेने ते सहज शक्य होते. आनंद सागर विसावा भक्त निवास 4ब-419 या क्रमांकाची खोली महाराजांच्या आशीर्वादाने बुक झाली. दुग्ध शर्करा योग म्हणजे पाटीवर 21-3-2015 ही सुकांताच्या वाढदिवसाची तारीख येऊन,महाराजांनी तो आनंद द्विगुणीत करून दिला.

पुढे साधारण एप्रिल महिन्यात आम्ही शेगांवला 'आनंद विसावा 'येथे गेलो. आम्हाला आमचीच खोली मिळाली, पण त्या 4 ब-419 वर त्या दिवशी पाटी मात्र दिसत नव्हती,लावणे बाकी होते. मुलानी मला त्या विषयी प्रश्न केला म्हटलं बेटा आपण दर्शनासाठी जाऊन येऊ,शक्य आहे मधल्या काळात पाटी लागलेली असेल. आम्ही दर्शन घेऊन परतलो आणि आश्चर्य म्हणजे खोलीवर पाटी लागली होती. सुहास कस्तुरे,सुकांता कस्तुरे,संयुक्ता कस्तुरे आणि अथर्व कस्तुरे. पाटी पाहून मनात विचार आला,आपल्या कडून मुलांना पुढे काय मिळायचे ते मिळो पण या रुपाने त्यांना गजानन महाराजांची भक्ती मिळाली तरी जीवन धन्य होईल.

खिशातून खोलीची किल्ली बाहेर काढून कुलूप उघडलं,सगळ्यांना म्हटलं क्षणभर थांबा,आता माझ्या मनातील इच्छेला पूर्णत्व आलं आहे. खोलीत शिरण्यापूर्वी सर्व महाराजांचं स्मरण करून आत पाऊल ठेवू या! मग आम्ही चौघांनीही घोष केला... श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव-- सुहास कस्तुरे, सांगवी पुणे

शब्दांकन -- जयंत वेलणकर

9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

🌸 अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page