अनुभव - 62
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 13, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
* *तुझ्या कृपेची न ये सरी,जगत्रयी कवणास* *
जय गजानन! सांगवी पुणे येथे गजानन महाराज सर्व सेवान्यास तर्फे संचालित, श्री गजानन महाराजांचं एक भव्य आणि सुंदर मंदिर आहे. गजानन महाराजांच्या कृपेने आज मला तिथे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.विश्वस्त मंडळातील आम्ही सर्वच कार्यकर्ते आज मंदिराच्या प्रगतीसाठी आणि नित्य नियमाने होणार्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी,महाराजांच्या प्रेरणेने एकजुटीने कार्यरत आहोत.
मंदिरासाठी कार्य करीत असताना आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना गजानन महाराजांविषयी ,काही ना काही अनुभव येत असतात आणि त्यातून आम्ही अधिक श्रध्दाशील होऊन पुढील कार्य करण्यासाठी प्रेरीत होत असतो.
मला आठवतं, याच वर्षीच्या म्हणजे 2018 च्या प्रकटदिनाच्या तयारीच्या निमित्ताने,आम्ही ऑक्टोबर महिन्यात विश्वस्तांची एक मिटींग बोलावली होती आणि प्रकट दिन अधिक चांगला होणे,त्याच प्रमाणे मंदिराचं पावित्र्य वाढून भक्तीभाव दृढ होण्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल,असा विषय चर्चेला होता. आमचे एक विश्वस्त श्री. साऊरकर यांनी असा विषय मांडला की,शेगांवला जसे महाराजांचे चांदीचे मुखवटे आहेत तसा चांदीचा मुखवटा आपण तयार करवून घेतला तर? हा विषय आम्हा सर्वच उपस्थितांना भावला. पण मग दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एकतर त्या साठी आवश्यक असणारी चांदी आणि दुसरं म्हणजे मुखवटा सुंदर पध्दतीने तयार करणारा कारागीर.
मंदिरात भक्त लोक वेळोवेळी महाराजांच्या चरणी समर्पित भावनेने,कधी पैसे कधी चांदीच्या लहान वस्तू अर्पण करीत असतात. अशी सर्व बारीक सारीक चांदी एकत्र करून,तिला गाळून योग्य पध्दतीने,मंदिराने मुखवट्यासाठी तयार करवून घेतली. त्या चांदीचं वजन साडेसात किलो भरलं,म्हणजे बर्याच अंशी चांदीचा प्रश्न आटोक्यात आला. आता प्रत्यक्षात कारागीर जेव्हढी चांदी सांगेल तेव्हा काय करायचं ते महाराजांवर सोपवून आम्ही योग्य कारागीराचा शोध घेऊ लागलो.
'गरज ही शोधाची जननी आहे 'या उक्ती प्रमाणे आम्ही मुखवटा तयार करणार्या कारागीराचा शोध घेऊ लागलो आणि एक खूप छान आणि आमचा उत्साह वाढविणारी माहिती आमच्या हाती आली. सोलापूरला श्री अनंत एरणकोल्लू म्हणून एक कारागीर आहेत,ते चांदीच्या मुखवट्याचं काम करतात,इतकंच नाही तर,त्यांच्या घराण्यातच हे काम पूर्वापार चालत आलं असून त्यांचे आजोबा दत्तात्रेय एरणकोल्लू यांनी प्रत्यक्ष गजानन महाराज संस्थान शेगांव साठी चांदीचा मुखवटा तयार केला आहे आणि आजपर्यंत त्यांच्या घराण्यातून शेगांवला पाच चांदीचे मुखवटे तयार करून देण्यात आले आहेत.
आमची जेव्हा अनंत एरणकोल्लू यांच्याशी भेट झाली, तेव्हा त्यांनी सांगितलं की 'आम्ही आज पर्यंत तुम्ही म्हणता तसे चांदीचे एकूण दहा मुखवटे विविध ठिकाणी दिले आहेत आणि तशा प्रकारचा मुखवटा तयार करायचा तर त्याला निश्चितपणे साडेतीन किलो चांदी लागते. तुमच्या मंदिरासाठी आम्ही जर मुखवटा तयार केला तर तो आमच्या हातून घडणारा अकरावा मुखवटा असेल.' त्यांनी आम्हाला विचारलं,तुम्हाला काय काय हवं आहे? आम्ही त्यांच्याकडे यादी देऊ केली, चांदीचा मुखवटा,एक चांदीचा तांब्या,चवरी (वारा घालण्याच्या चवरीचा दांडा),चौरंगावर चढविण्यासाठी चांदीचा पत्रा आणि महाराजांच्या कमळ पाकळ्यात पादुका. या यादीसह नोव्हेंबर 2017 मधे आम्ही त्यांच्याजवळ साडेसात किलो चांदी सूपूर्त केली आणि एरणकोल्लूंचा निरोप घेतला. निरोप देताना त्यांनी आम्हाला सांगितलं , आपण हे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू पण आमचा एक नियम आहे. महाराजांचं हे काम आम्ही शुचिर्भूत होऊन स्नान करूनच करतो. मधल्या काळात संडास बाथरूमला जाण्याचा प्रसंग आला तर काम त्यादिवशी बंद,ते दुसरे दिवशी स्नानानंतरच सुरू होणार! ते ऐकून,एका चांगल्या ठिकाणी काम दिल्याचं समाधान आम्हा सर्व मंडळींना मिळून आम्ही पुण्याला परतलो.
पुढील महिन्यात कामाची प्रगती पाहण्याच्या हेतूने आम्ही सोलापूरला भेट दिली तेव्हा पादुकांचं काम पूर्ण झालं होतं. त्या झाल्या होत्या छान! पण आम्हाला त्यांचा आकारही लहान वाटला आणि फारच हलक्या व पातळ वाटल्या. म्हणून आम्ही त्यांना त्या नव्याने करण्याची विनंती केली. त्यावर ते गंभीर होऊन म्हणाले,करायला हरकत नाही,पण मग तुम्हाला निदान नऊशे ग्रॅम म्हणजे जवळपास एक किलो चांदी जास्त लागेल. ते ऐकून आम्हीही गंभीर झालो,कारण चांदी आणि घडणावळ वगैरे लक्षात घेता जवळपास पाऊण लाख रुपये जास्तीचा खर्च लागणार होता,पण लगेचच महाराजांचं स्मरण करून आम्ही असा निर्णय घेतला की हा जास्तीचा भार आपण सर्व विश्वस्तांनी वाटून घ्यावा,म्हणजे कुणाला म्हणावे लागणार नाही. आम्ही अनंतरावांना म्हटलं ठीक आहे सध्या तुमच्या जवळून नऊशे ग्रॅम चांदी त्यात घाला आम्ही वस्तू घेण्यास येऊ तेव्हा आवश्यक पैसा तुम्हाला देऊ! असा शब्द त्यांना देऊन आणि महाराज सर्व बघून घेतील असं म्हणून,मात्र तरीही सामान्य माणूस म्हटला की चिंता करणारच या न्यायाने काहीसे चिंतित होऊन पुन्हा पुण्यास परतलो.
2018 चा जानेवारी उगवला..अनंत एरणकोल्लू यांच्या कडून सर्व वस्तू तयार असल्याचा निरोप आला. 26 जानेवारीला आम्ही सर्वांनी मुखवटा घेण्यासाठी सोलापूरला जाण्याचे ठरले. सोबतच सर्वांचीच इच्छा अशी होती की प्रथम मुखवटा शेगांवला नेण्यात येऊन नंतरच पुण्यात आणावा. त्याप्रमाणे आदरणीय शिवशंकर भाऊंशी योग्य माध्यमातून बोलणं करून घेतलं. भाऊ म्हणाले, 'तुम्ही या,महाराजांची इच्छा असेल तसं होईल. '
सोलापूरसाठी निघताना प्रत्येकालाच जास्तीच्या नऊशे ग्रॅम चांदीची मनातून कल्पना असल्याने,आपला काही सहभाग असावा,असं ज्यानं त्यानं ठरविलं होतं.माझ्या मनात विचार आला,आपल्याला हा भार उचलणं महाराजांच्या कृपेने जर शक्य आहे तर आपणच हा भार उचलण्यास काय हरकत आहे?या विचाराने मी एक कोरा चेक खिशात ठेवला. आम्ही सर्व एरणकोल्लू यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी सर्व वस्तू समोर आणल्या. सर्वच वस्तू सुंदरच दिसत होत्या. त्यांना सात्विकतेचा स्पर्श होता. मुखवटा आम्हाला विलोभनीय वाटला,सर्व प्रथम त्यांनी पादुकांचं वजन केलं,ते सांगितल्या प्रमाणे जास्त भरलं ,आता पादुका छान झाल्या होत्या. नंतर बाकी वस्तूंचं वजन करून मुखवटा वजन करण्यासाठी ठेवला आणि ते आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. मुखवट्याचं वजन भरलं,दोन किलो सहाशे ग्रॅम!अर्थात अपेक्षित साडे तीन किलो पेक्षा नेमकं नऊशे ग्रॅम कमी!आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो,त्यांना म्हटलं अहो पादुका वजनी करा असं आम्ही म्हटलं होतं पण त्या साठी मुखवटा कमी वजनाचा करा,असं अपेक्षित नव्हतं ,त्यावर अनंत एरणकोल्लू भावविवश झालेत,,त्यांचे डोळे भरून आले,ते म्हणाले 'अहो हा माझा अकरावा मुखवटा,मी त्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही. जसे बाकी दहा तसाच हा! याचं वजन का आणि कसं कमी भरलं ते महाराजांनाच माहिती. आमचेही डोळे पाणावले,माझ्या तोंडून वाक्य बाहेर पडलं,महाराजांना भक्तांची काळजी,त्यांना आम्हा विश्वस्तांची काळजी,त्यांना अध्यक्षांचीही काळजी!ते ऐकून सर्व माझ्याकडे पाहू लागले,मी त्यांना कोरा चेक दाखवून पुन्हा खिशात ठेवला.
एरणकोल्लूंचा निरोप घेऊन आम्ही शेगांवसाठी निघालो. महाराजांच्या कृपेने जास्तीची चांदी तर नाहीच लागली,उलट तीनशे ग्रॅम चांदी शिल्लकच राहिली.
आम्ही शेगांवला पोहोचलो,भाऊ म्हणाले होते,'महाराजांची इच्छा!'त्या दिवशी शेगांवला पहाटे प्रथम अभिषेकाच्या स्थळी आणि वेळी मुखवट्यावर अभिषेक झाला,नंतर खाली समाधी मंदिरात आणि नंतर वर गादीवर आम्ही सर्वांनी बराच वेळ तो मुखवटा तिथे विराजमान असलेला याची देही याची डोळा पाहिला.
शुक्रवार दिनांक 2.2.2018 ला सांगवी येथे मुखवट्याची रीतसर स्थापना झाली,तेव्हा अनेक लोकांसह आम्ही सर्व तेथे उपस्थित होतो आणि सर्वच मनातून जाणून होतो की नऊशे ग्रॅम कमी भरलेलं वजन आणि शेगांवला अनपेक्षित शांतपणे पार पडलेले सोपस्कार,हा गजानन महाराजांच्याच कृपेचा भाग होता.
मी पाणावलेल्या डोळ्यांनी महाराजांना हात जोडले. म्हटलं,मंदिरात येणार्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी असू द्या आणि तुमचं नाव सतत त्यांच्या मुखी असू द्या! .....
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- शरद ढोरे
अध्यक्ष , श्री गजानन महाराज सर्व सेवान्यास .
श्री गजानन महाराज मंदीर ,सांगवी पुणे 27
शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त.
Komentarze