अनुभव - 66
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 66🌺)
*'माझ्या माऊलींची सारी,योजनाच न्यारी'*
जय गजानन! मी रमेश साठे,भारतीय वायुसेनेत बरीच वर्षे नोकरी केल्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. वायुसेनेतील नोकरी असल्यामुळे ,कर्तव्य आणि शिस्त या दोन्ही गोष्टी ज्या मला प्रिय होत्याच त्या शिकण्याची संधी मला त्या काळात प्राप्त झाली. तर दुसरीकडे माझ्या प्रापंचिक जीवनात,महाराष्ट्रातील गणपतींच्या मूर्तींसाठी सुप्रसिद्ध असणारे 'पेण 'येथील माझे सासरे श्री अण्णा घैसास यांच्याकडून मला 'कर्तव्य करीत असताना त्याला जर नामस्मरणाची जोड मिळाली तर कर्तव्याला अधिक बहार येते 'हे शिकायला मिळालं.
पेण येथील माझी सासुरवाडी,माझ्या सासर्यांना गजानन महाराजांची भक्ती,तो त्यांच्या निष्ठेचा विषय!इ.स.1975 ची म्हणजे साधारण 42/43 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. त्यावेळी शेगांवचं स्वरूप आजच्यापेक्षा पुष्कळच वेगळं होतं. अण्णा तेव्हा शेगांवला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेत दर्शन घेऊन त्या रात्री मंदिराच्या लगतच्या परिसरात ते निजलेत, रात्री त्यांच्या स्वप्नात गजानन महाराज आले आणि त्यांनी अण्णांना सांगितलं की 'पेणच्या हद्दीत अमुक एक सर्व्हे नंबर असलेल्या जागेत माझी बसण्याची सोय कर!' एवढं बोलून महाराज अदृश्य झालेत. प्रत्यक्ष महाराजांनी आपल्याला मंदीर निर्मितीचा आदेश दिला या आनंदात अण्णा पेणला परतले. त्यांनी सर्व्हे नंबर शोधून,पुढे 1975,76,व77 या सुमारास पुढाकार घेऊन ट्रस्ट स्थापन केला,जागेचा ताबा मिळविला व पेण जवळील तो सर्व्हे नंबर असलेल्या जागेत म्हणजे 'रामवाडी खाचरखिंड येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गा लगत श्री गजानन महाराजांचं मंदीर बांधलं आणि 24 एप्रिल 1977रविवार रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. त्याच वेळी ट्रस्टने ठरवून टाकलं की यापुढे दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या रविवारी या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येईल.
अण्णांनी मला त्यांच्या स्वप्नापासून तर प्राणप्रतिष्ठेच्या तारखे पर्यंत सर्व कार्यक्रम कळविला होता . त्या वेळचं माझं वय,माझा स्वभाव,माझ्या नोकरीचं स्वरूप,हे सर्व लक्षात घेता,माझ्या मनात काही किंतु- परंतू होते,पण ते सर्व बाजूला सारून व व्हेकेशन पिरेडचा लाभ घेऊन,सुटी मिळाल्यामुळे मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित होतो.
पाहता पाहता मंदिराला एक वर्ष पूर्ण झालं,एप्रिल महिना जवळ आला,अण्णांना वाटू लागलं की मी,पत्नी आणि दोन लहान मुलींसह कार्यक्रमाला उपस्थित रहावं. ते योग्यही होतं पण माझ्या समोर दोन मोठ्या अडचणी होत्या. एक तर गेल्याच वर्षी व्हेकेशन पिरेडला सुटी घेतल्यामुळे मला यंदा सुटी मिळणार नव्हती आणि दुसरं म्हणजे रिझर्व्हेशन!गाड्यांना इतकी तोबा गर्दी होती की रिझव्हेर्शन मिळणं केवळ अशक्य कोटीतील गोष्ट होती, त्यामुळे मी स्वस्थ होतो,पण त्यातून अण्णांना वाटलं जावयांना काही अडचण आहे की काय आणि त्यांनी तिकिटासाठी म्हणून काही पैसे पाठविले व कळविलं की जावईबापू तुमची जी काही अडचण असेल ती तुम्ही गजानन महाराजांना सांगा आणि त्यांचं स्मरण करून काम करा,तुमची अडचण ते निश्चितच समजून घेतील.
त्यानंतर मात्र मी ठरविलं की चला त्यादिशेने पाऊल उचलून तर बघू!तेव्हा मी दिल्लीला पालम येथे वायुसेनेच्या तळावर कार्यरत होतो,त्यामुळे सुटी मिळाली तरी दिल्ली ते मुंबई व पुन्हा परत मुंबई ते दिल्ली अशा दोन रिझर्व्हेशनचा प्रश्न होता. मुंबईहून पेण पर्यंतचा प्रवास होता पण तिथे तेवढी अडचण नव्हती.
मी गजानन महाराजांचं स्मरण केलं,मनाची हिम्मत बांधली आणि ऑफिसमधे बाॅसची भेट घेतली,आश्चर्य म्हणजे त्यांनी सहजपणे पाच दिवसांची सुट्टी मंजूर केली. मग रिझर्व्हेशन साठी रेल्वे स्टेशन गाठलं,पाहतो तर सर्व गाड्या फुल्ल! कुठेही जागा शिल्लक नव्हती,रिझर्व्हेशनच्या खिडकीशी लांब लचक रांग,म्हणजे रिझर्व्हेशन मिळणार नाही हे नक्की होतं. तरीही मनात विचार केला,अण्णांचे शब्द आहेत नं,बघुया काय होईल ते आणि मी लाईनीत उभा राहिलो, मनात गजानन महाराजांचं स्मरण सुरू होतं, बराच वेळ उभा राहिलो तेव्हा एकदाचा नंबर लागला,योगायोगअसा की माझ्याच समोरच्या माणसाने मुंबईची दोन तिकिटं कॅन्सल केलीत,पाठोपाठ मी त्या क्लार्कच्या समोर उभा झालो. त्यानं माझ्याकडे पाहिलं म्हणाला 'वैसे कानूनन देखा जाय तो ये दो तिकट वेटींग वालोंको देना चाहिये 'लेकीन मुझे लगता है की ये मै आपको दे दूं.त्याने मला दोन रिझर्व्हेशन देऊ केलीत आणि महाराजांच्या कृपेने मुंबईला जाण्याचा माझा मार्ग मोकळा झाला!
आम्ही चौघं मुंबईला उतरलो,म्हटलं आधी परतीच्या रिझर्व्हेशनची चौकशी करावी पण पुन्हा पाहतो तर कुठेही रिझर्व्हेशन उपलब्ध नाही. मग पुन्हा सर्व महाराजांवर सोपवून आम्ही पेणच्या दिशेने निघालो.
पेणला वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरेख पार पडला,सर्व वातावरण गजाननमय झालं होतं. परत निघताना अण्णांना नमस्कार केला,म्हणालो,परतीच्या प्रवासात आमचे हाल होणार ही दगडावरची रेष दिसते आहे. त्यावर अण्णा शांतपणे म्हणाले ,जावईबापू गजानन महाराजांचं नामस्मरण करा सर्व ठीक होईल,मिळेल रिझर्व्हेशन!अण्णांचा निरोप घेऊन आम्ही परत दादरला आलो. परतीच्या प्रवासाला एक दिवस बाकी होता,मी बाॅम्बे सेन्ट्रलला गेलो,पुन्हा महाराजांचं स्मरण करीत रांगेत उभा राहिलो,माझी वेळ आल्यावर मी माझे मिलीटरी वाॅरंट खिडकीतून आत सरकविले. आतल्या क्लार्क महाशयांनी फक्त 'पालम एअर फोर्स स्टेशन 'चा स्टॅंम्प बघितला आणि विचारलं 'क्या आप साठे सहाब को जानते हो?'मी क्षणभर बुचकळ्यात पडलो,म्हटलं 'मै खुद साठे हूँ !'त्याने खाली वाकून माझा चेहरा पाहिला आणि मला आत बोलावले. बसायला खुर्ची दिली,माझ्यासाठी चहा मागविला आणि त्यानं खुलासा केला,त्यावरून मला आठवलं. तीन चार वर्षांपूर्वी मी वायुसेनेच्या पिंटोपार्क काॅलनीत माझ्या घरून खाली जिना उतरताना खालील मजल्यावर श्री सूद यांच्याकडे हा चंदीगडहून भेटायला आला होता,तेव्हा ते घरी नव्हते. त्यांना यायला वेळ होता त्यामुळे या गृहस्थाला मी घरी नेऊन चहा नाश्ता असा व्यवस्थित पाहुणचार केला होता. सूद साहेब घरी येई पर्यंत हा माझ्या घरी विसावला होता. म्हणूनच त्यांनं माझं असं स्वागत केलं होतं. त्या दिवशी मी 'अतिथी देवो भव ' या भावनेने जे सत्कृत्य केलं होतं,त्याचं फळ आज जणू महाराजांनी माझ्या पदरात घातलं.त्या दिवशी मला स्पेशल कोट्यात रिझर्व्हेशन मिळालं.अण्णांनी जे म्हटलं ते खरं झालं होतं!महाराजांनी माझी काळजी घेतली होती.
याच क्रमात अजून एक घटना इथे सांगितली नाही तर हा घटनाक्रम पूर्ण होणार नाही. 1979 साली मी दिल्लीला असताना एकदा अण्णा आमच्या घरी आले आणि आम्ही सर्व काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी काशीला गेलो. एक रात्र तिथे मुक्काम करायचा होता. पण काही कारणानं त्या दिवशी तिथे प्रचंड गर्दी होती. हाॅटेल्स, धर्मशाळा,कुठेही जागा उपलब्ध नव्हती. आम्ही दशअश्वमेध घाटावर असताना अण्णांची नजर "श्री तनपुरे महाराजांची धर्मशाळा "असं लिहिलेल्या फलकावर गेली, ते म्हणाले हे आपल्या महाराष्ट्रातील संत पुरूष इथे आपल्याला जागा मिळेल.आम्ही चौकशी केली तेव्हा उद्या सकाळी सहा वाजता खोली सोडावी लागेल या अटीवर दुसर्या मजल्यावर आम्हाला खोली मिळाली. मी आणि अण्णा खोली बाहेर पॅसेजमधे उभे असताना समोर पहिल्या मजल्यावर,एका खोलीबाहेर काही माणसं रांगेत उभी दिसली,चौकशी केली तेव्हा समजलं की आदरणीय श्री तनपुरे महाराज स्वतः आले आहेत .त्यांच्या दर्शनार्थ लोक उभे आहेत. मग मी आणि अण्णा त्यांच्या दर्शनासाठी गेलो.मी समोर आणि माझ्या मागे अण्णा उभे होते. मी वाकून नमस्कार केला आणि बाजूला झालो,अण्णा नमस्कारार्थ वाकणार तोच माननीय तनपुरे महाराजांनी हात वर केला,त्यांना वाकू दिलं नाही आणि स्पष्ट शब्दात म्हणाले 'तू येथे कशासाठी आला आहेस? ज्यांची बसायची सोय केली आहेस त्यांची सेवा कर म्हणजे झालं!'
ते वाक्य ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तरीही माझ्या स्वभावाला अनुसरून खोलीच्या बाहेर येताच अण्णांना विचारलं, 'हे' पेणला आले होते कां?'यांची आणि तुमची आधी भेट झाली होती का?'यावर अण्णा उद्गारले 'मी त्यांना आयुष्यात प्रथमच पाहतो आहे!ते ऐकताच मात्र माझ्या मनातील सर्व किंतु - परंतू गळून पडले. आज त्या घटनेला अनेक वर्ष झालीत पण त्यानंतर जेव्हा जेव्हा ही घटना मला आठवली तेव्हा तेव्हा आपसूकच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडलेत श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--रमेश साठे
डोंबिवली
शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-- !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या-- 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments