top of page

अनुभव - 67

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 67 🌺)

**माझे गजानन बाबा* *


जय गजानन! शेगांव पासून साधारण शंभर किलो मीटर अंतरावर बुलडाणा जिल्ह्यात एक 'अंत्री देशमुख' नावाचं लहान खेडं आहे. तेच माझं गाव! पांडुरंग गिरी हे माझं नाव. आज शेगांवचं नाव श्री गजानन महाराजांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज महाराजांच्या भक्तांमधे महाराजांची ओळख 'गजानन महाराज 'या नावाने मोठ्या प्रमाणात आहे आणि अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण मुळात शेगांवचे संस्थानच 'गजानन महाराज संस्थान 'आहे. पण हे जरी खरं असलं तरी 'गजानन माऊली ' 'माऊली गजानन' असाही उल्लेख केल्या जातो,मात्र आम्ही गावकरी जेव्हा शेगांवला जातो तेव्हा आम्ही 'गजानन बाबाच्या ' दर्शनाला जातो. आजूबाजूच्या खेड्यांमधून,गावांमधून,लहान सहान,छोटा मोठा,श्रीमंत गरीब,श्रध्देने शेगांवला जाऊन गजानन बाबाचं दर्शन घेतो आणि त्या दर्शनाने समाधान पावतो.

बंकटलालाने अगदी सुरवातीच्या काळात जेव्हा बाबाच्या हातावर नाणं ठेवलं तेव्हा गजानन बाबानी त्याला बोध केला,अरे हे नाणे तुमचे व्यवहारी/मला न त्याची जरूरी/भावभक्तीच्या नाण्यावरी/संतुष्ट मी रहातसे/. गजानन विजय पोथीत मी जेव्हा ही ओळ वाचतो तेव्हा मला माझ्या आयुष्यात लहानपणी घडलेला एक प्रसंग आठवतो. एकदा माझ्याच चुकीने व्यवहारी नाणे माझ्या पोटात गेले आणि हाती उरले 'भाव भक्तीचे नाणे ' त्या विषयीची ही कथा आहे.

साधारण इ.स.2003-04 ची ही घटना आहे. म्हणजे मी आठ नऊ वर्षांचा असतानाची गोष्ट. आमच्या लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची नसली तरी तरी साधारण गरिबीचीच म्हणावी लागेल अशी होती. मी नुकतीच सायकल चालविणं शिकलो होतो. तेव्हा आजच्या सारख्या घरोघरी सायकली नव्हत्या. सायकलच्या दुकानात किराया देऊन चालवण्यापुरती सायकल एक रुपया एक तासासाठी या पध्दतीने मिळत असे.वडील त्यासाठी आठवड्यात एकदा एक रुपया खर्च करू शकत होते. तो रविवार असावा,वडिलांच्या मागे हट्ट करून एक रुपया मिळविला. त्यांनी ते त्या काळातील एक रुपयाचं वजनदार नाणं माझ्या हातावर ठेवलं. चड्डीचा खिसा फाटका असल्यामुळे मी ते हातात घट्ट धरून,गावातील 'आकाश सायकल स्टोअर्स 'गाठलं..पण सर्व लहान सायकल कुणी कुणी घेऊन गेले होते. एक तास म्हटलं तरी पाच सात मिनिटे उशीर व्हायचाच,सायकल नाही म्हटल्यावर मन जरा खट्टू झालं. तेवढ्यात दुकाना समोरून एक मुलगा सायकल चालवित पुढे गेला,दुकानदाराने त्याच्याकडे बोट दाखवून मला म्हटलं,याची वेळ पूर्ण झाली आहे,तो येईलच इतक्यात. ते ऐकून मी आणि माझ्या सोबत असलेला माझा मित्र धनंजय देशमुख,आम्ही त्या मुलाच्या मागे धावू लागलो,मला काय बुद्धी झाली तर मी हातातील नाणं पडू नये म्हणून तोंडात धरलं,पण धावता धावता वेंधळेपणा होऊन नाणं माझ्याकडून गिळल्या गेलं. घशात क्षणभर अडकून लगेच खाली सरकलं आणि दुसर्याच क्षणात मला परिस्थितीतील गांभीर्याची जाणीव झाली. माझ्या आनंदावर विरजण पडलं होतं. सायकल चालविण्याचा आनंद तर दूरच,आता पुढे काय?हा प्रश्न समोर उभा झाला

वडिलांचा स्वभाव रागीट,त्यामुळे त्यांना सांगावं की नाही? ही भिती,पण सांगणं तर आवश्यक अशी परिस्थिती!

वडिलांना हे सगळं समजताच त्यांनी मेहेकरला धाव घेतली आणि डाॅ उमाळकर यांच्याकडे मला घेऊन गेलेत. त्यांनी बुलडाणा येथील डाॅक्टरांकडे मला न्यावे असा सल्ला दिला. आम्ही बुलडाण्याला पोहोचलो तेथील डाॅक्टरांनी तपासलं,एक्सरे काढून रूपया अडकल्याची खात्री केली आणि दहा बारा दिवसांचं औषधं देऊ केलं . बहुधा ते पोट साफ करणारं औषधं असावं. दहा बारा दिवसात याचा फायदा झाला तर ठीक अन्यथा ऑपरेशन करून ते नाणं काढावं लागेल असा सल्ला दिला. वडिलांनी लक्षपूर्वक ती बाटली क्रमशः माझ्या पोटात रिकामी केली. आई-वडिलांना मुलांसाठी काय काय करावं लागतं याची जाणीव आता होते. तो पूर्ण काळ वडील शौच्यावाटे नाणं जातं की नाही या कडे लक्ष ठेवून होते. औषधं संपलं बारा दिवस उलटून गेलेत पण नाणं पोटातच राहिलं! दोन चार दिवस वर उलटून गेलेत,पण फाटक्या खिशाची चड्डी घालणारा मी,वडिलांच्या खिशात ऑपरेशनसाठी पैसा यावा कुठून?एक रुपयाचं नाणं काढण्यासाठी काही हजार रुपये खर्च करण्याचा तो व्यवहार होता. व्यापारी दृष्टीने तोट्याचा असलेला तो सौदा मायेच्या दृष्टीनं पाहता लाख मोलाचा जीव वाचवणार होता. पण तरीही पैसा जवळ नाही ही वस्तुस्थिती होतीच. सगळेच चिंताग्रस्त झालेत.

लहान गावात अशा गोष्टींची फार झपाट्याने चर्चा होते. वडिलांच्या मित्र मंडळात तोच आता चर्चेचा विषय झाला होता. 'गजानन बाबा 'हा त्या सर्वांचाच आस्थेचा विषय होता. मला आठवतं वडिलांचा एक सहा जणांचा ग्रुप होता. सर्वांचीच गजानन बाबावर निष्ठा,सगळ्यांचीच शेगांवला जाण्याची इच्छा पण 'पैसा' हा सगळ्यांसाठीच अडचणीचा प्रश्न होता, पण म्हणतात ना 'इच्छा तिथे मार्ग ' त्या सहा मित्रांनी एक योजना आखली,,त्या नुसार ते दर महिन्याला प्रत्येकी तीस रुपये एकत्र करायचे,त्यातून कुणीतरी एकाला शेगांवला जाण्याची संधी मिळायची,अर्थात एक वर्षात एकेकाच्या दोन शेगांव वार्या व्हायच्या.

माझ्या पोटातील नाणं हलण्याची काहीच चिन्ह दिसेनात,तेव्हा सहा मित्रांनी ही गोष्ट गजानन बाबाच्या कानावर घालून,त्यांचा प्रसाद मला प्रार्थनापुर्वक खाऊ घालावा असा निर्णय घेतला. त्या महिन्यात वडिलांचे मित्र दिगंबर शामराव देशमुख हे शेगांवला जाणार होते. देशमुख काका शेगांवला रवाना झालेत आणि वडील घरी बाबाच्या फोटो समोर बसले,ते आर्ततेने गजानन बाबाला हाक मारू लागले. एका मुलाच्या काळजीने,त्याच्या वडिलांनी,गजानन बाबाला केलेली ती विनवणी होती. संध्याकाळ झाली आणि देशमुख काका शेगांवहून प्रसाद घेऊन परतले. वडिलांनी मला आवाज दिला,पांडुरंग इकडे ये. गजानन बाबाला हात जोड आणि हा प्रसाद खा!खेळण्या बागडण्याचं माझं ते वय होतं. ऑपरेशनची धास्ती माझ्या मनात होतीच,मी प्रसाद हाती घेऊन भितीयुक्त मनानं गजानन बाबाकडे पाहिलं आणि प्रसाद खाऊन तिथून बाजूला झालो.

थोडा वेळ मधे गेला आणि माझं पोट दुखू लागलं,मी रडतच वडिलांकडे गेलो. आतापर्यंत निदान पोट दुखत तरी नव्हतं ,आता त्यांचा चेहरा उतरला,ते स्वाभाविकच होतं,कारण पोटदुखी वाढली तर ऑपरेशन लगेच करणं क्रमप्राप्तच होतं.

वडिलांना भिती होती तसंच झालं,माझं पोट अजूनच तीव्रतेनं दुखायला लागलं. मी वडिलांजवळ संडासला जाण्याची इच्छा व्यक्त केली,त्या दिवशी मला स्पष्ट जाणवलं की काहीतरी शरीरातून बाहेर पडतय,ती काही मिनिटं माझ्यासाठी प्रचंड त्रासाची ठरलीत ,पण नाणं बाहेर पडल्याची जाणीव झाली आणि बटन बंद करावं तसं पोटदुखी थांबली.

पोटदुखी थांबली आणि माझा चेहरा निवळला, चेहर्यावर हास्य फुललं ते पाहून घरातील सर्व लोकांसह बाबांच्या मित्रांनी एकच जल्लोष केला,गजानन बाबाचा विजय असो! श्री गजानन!जय गजानन!,श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- पांडुरंग गिरी

अंत्री देशमुख जि. बुलडाणा

शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page