top of page

अनुभव - 68

"श्री"

गजानन महाराज की जय! (अनुभव 68🌺 )

*माझा शेगांव दर्शनाचा योग*


जय गजानन! मी जयंत दत्तात्रेय मोडक,माझा जन्म इंदोरला,शिक्षण भोपाळला,नोकरी अहमदाबादला,आणि माझी निष्ठा शेगांवला! आई,वडील,तिघं भाऊ आणि दोन बहिणी,असं आमचं मोठं कुटुंब!वडील उत्तम हार्मोनियम वादक होते,ते गायचे देखील छान. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून आम्ही सर्वच भावंडं भजन,भावगीत गाण्याचा आनंद लुटत लुटत मोठे झालो. गजानन महाराजांची भजनं गाऊन आम्ही सर्व कुटुंबीय गजानन विजय ग्रंथाचं पारायणही करायचो,गेली कित्येक वर्षं करतोय!कुटुंबातील शिकवण एकच,गजानन महाराजांचं नित्य स्मरण करा ,पूजन करा ते सर्व ठीक करतील. त्या प्रमाणे मी नित्य नियमाने महाराजांचं स्मरण करीत होतो पण प्रत्यक्षात शेगांव दर्शनाचा योग मात्र येत नव्हता.

मी जेमतेम अठरा वर्षांचा झालो होतो. मध्य प्रदेश शासनाने 'पंचावन्न वय पूर्ण होताच सेवानिवृत्ती 'चा आदेश काढला.आमच्या वडिलांनी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केली होती त्यामुळे वडील सेवानिवृत्त झाले,घरात अचानक परिस्थिती बदलली,बहिणींची लग्न,मोठा भाऊ नोकरीच्या शोधात अशा परिस्थितीत मला नोकरी शोधणं आवश्यक झालं. एखादी गोष्ट महाराजांना साक्षी ठेवून केली की कशी फलप्रद होते याचा मला लगेच अनुभव आला. आमच्या वेळी अकरावी मॅट्रीक होते. त्याला हायर मॅट्रीक म्हणत. आम्हाला वर्ग नववी व दहावीत अर्थशास्त्राऐवजी हिन्दी शाॅर्ट हॅन्ड आणि टायपिंग हा विषय घेण्याची सोय होती,मी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हिन्दी शाॅर्टहॅन्ड कोर्सला प्रवेश घेतला होता आणि वर्ग अकरावीत इंग्लिश शाॅर्टहॅन्ड शिकलो होतो. त्याचा फायदा झाला आणि वृत्त पत्रातील जाहिरातीवरून मला अहमदाबाद येथे पोलीस कमिशनर यांच्या कार्यालयात नोकरी प्राप्त झाली.

माझ्या नोकरीचे सहा महिने पूर्ण झाले होते,नशिबाचा भाग कसा असतो पहा!गुजरात राजभवनात हिन्दी व इंग्लिश दोन्ही शाॅर्टहॅन्ड जाणणारा माणूस तातडीने नियुक्त करणं आवश्यक झालं,राजभवनातून अशी कुणी व्यक्ती असल्यास ताबडतोब पाठविण्यात यावी असा आदेश निघाला आणि मी एकटाच त्या कॅटेगरीत बसत असल्याने गुजरात राजभवनात नियुक्ती झाली. मी त्यावेळचे राज्यपाल डाॅ श्रीमन्रारायण यांचा पी ए झालो.

इ.स.1972 चा तो काळ ,स्वातंत्र्योत्तर भारताने पंचविशी गाठली होती. शिक्षणात नवीन वारे वाहू लागले होते. भारत सरकारने शिक्षणावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची एक काॅन्फरन्स घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या विषयीची जबाबदारी गुजरात राज्यपालांवर टाकण्यात आली,तर महाराष्ट्राचे राज्यपाल त्यात सहजबाबदार म्हणून होते. डाॅ. श्रीमन्नारायण हे अत्यंत हुशार,शिक्षणात रस असणारे असे होते,शिवाय त्यांच्या मनात आचार्य विनोबा भावे यांच्या विषयी अतिशय आदर होता त्यामुळे 19,20,21ऑक्टोबर 1972 ला जिल्हा वर्धा,पवनार येथे 'आॅल इंडिया एज्युकेशन काॅन्फरन्स 'आयोजित केल्या गेली.

नोकरीत माझे वरिष्ठ सहकारी श्री पनीकर ,मी आणि राज्यपाल महोदयांचं जाण्या येण्याचं आरक्षण प्रथम श्रेणीत करण्यात आलं. त्यावेळी आजच्या इतकी विमानांची संख्या नव्हती,गाड्यांचीही संख्या कमीच होती. सोबतच गव्हर्नरस् सेकंड टीम म्हणतात (ज्यात केयर टेकर स्वयंपाकी,कपडे आदीची सोय पहाणारे अशा काही लोकांचा समावेश असतो)त्याही लोकांचे आरक्षण निश्चित झालं. माझ्यासाठी या काॅन्फरन्स इतकीच किंबहुना त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही होती की अहमदाबाद-वर्धा याच मार्गावर माझ्या सद्गुरूंचं स्थान श्री क्षेत्र शेगांव येत होतं. माझ्यासाठी आयुष्यात प्रथमच ,कदाचित शेगांव दर्शनाचा योग येण्याची शक्यता होती. अर्थात तशी परवानगी नव्हती,पण माझ्या डोक्यात तो विचार फेर धरून नाचू लागला. 18ऑक्टोबरच्या पहाटे गाडी शेगांवच्या आजूबाजूला असताना तीव्र भावनेने महाराजांना प्रार्थना केली की परतीच्या प्रवासात दर्शन द्या आणि काहीही करून या लेकरास सहाय्य करा. मग माझ्या मनानं ठरवून टाकलं की परतताना शेगांवला उतरायचंच.

काॅन्फरन्सचे ते दोन तीन दिवस माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचे आणि उल्लेखनीय ठरले,अनेक विद्वतजनांना ऐकण्याचा योग आला,आचार्य विनोबा भाव्यांना ऐकण्याने मी फार प्रभावित झालो. पंतप्रधानांना जवळून पाहण्याचा योग तर आलाच,पण मला आठवतं, ती 20 ऑक्टोबरची रात्रअसावी,राज्यपाल आणि पंतप्रधान बर्याच वेळपर्यंत अधिवेशनातील मुद्दांवर चर्चा करीत होते,ती ऐकण्याचा योग आला. रात्री दोन वाजेपर्यंत ती चर्चा सुरू होती. दुसरे दिवशी म्हणजे 21तारखेला परतीचा प्रवास होता. माझ्या मनात शेगांव असल्या कारणाने,पुढील संभाव्यता हेरून,त्यारात्री न झोपता मी त्या चर्चेतील सर्व बाबी टाईप करून महामहीम राज्यपालांसाठी सकाळीच तयार ठेवल्या.

21 तारखेला आमची गाडी संध्याकाळी सहा वाजता,वर्धा येथून निघून शेगांवला साधारण रात्री नऊ वाजता पोहोचणार होती. तर सेकंड टीमची गाडी रात्री नऊ वाजता सुटून साधारण रात्री साडेबारा वाजता शेगांवला पोहोचणार होती. मी विचार केला,नऊ वाजता शेगांवला उतरून पुढील गाडीत बारा वाजता बसून अहमदाबादला पोहोचलो तर दर्शनाचा योग येऊन कार्यभाग उरकता येईल,तसा मी राज्यपालांच्या गुडबुक्स मधे होतोच,शिवाय महाराजांच्या चरणी शरण गेलो तर सांभाळणारे तेच आहेत,या विचाराने मी श्री. पनीकरांच्या कानावर घालून शेगांवला रात्री नऊ वाजता गाडी सोडली आणि दर्शनाला गेलो. भुयारात उतरून मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मंत्रमुग्ध होऊन दोन चार वेळा दर्शन घेता झालो. मंदीर बंद होण्याची वेळ झाली मग लक्षात आलं,की आपण प्रसाद घेतला पण नारळ फोडला नाही मनात अपराधी भावना निर्माण झाली आणि मनानं निर्धार केला की उद्या सकाळी मंदीर उघडताच प्रसाद नारळ करीन तेव्हाच येथून जाईन. सोबत असलेला रिक्षावाला माझी वाट पहात होता,तो मला लगेच स्टेशनवर सोडणार होता. त्याला म्हटलं उद्या पहाटे येऊन मला उठवण्याचं काम तुझं

गाडी निघून गेली तर जाऊ दे महाराज पहातील काय करायचं ते!मधल्या काळात त्याच्याच रिक्षाने पोलीस स्टेशन,एस टी स्टॅंड आदी ठिकाणी जाऊन माझं राजभवनातील ओळख पत्र दाखवून एखादी गाडी उद्या सकाळी भुसावळला सोडू शकेल का?याची चौकशी केली कारण भुसावळ पासून अहमदाबाद साठी गाडी मिळणं शक्य होतं. पण तशी काही सोय होऊ शकली नाही.

आता रात्र बरीच झाली होती,रिक्षावाल्याने निरोप घेतला,मंदिराच्या बाजूलाच गादीवर पहुडलो. 'मन चिंती ते वैरी न चिंती 'बिगर परवानगी शेगांवला आलेला मी!अक्षरशः नोकरी डावावर लावून दर्शनाला आलो. वास्तविक दर्शनही व्यवस्थित पार पडलं,पण केवळ माझ्या हट्टापोटी आता मी गजानन महाराजांनाच एक प्रकारे संकटात टाकू पहात होतो. 'महाराज हे माझं पहिलंच शेगांव दर्शन ' उद्या जर काही कमी जास्त झालं तर तुम्हाला वृथा दोष लागेल. माझी भावंडं यासाठी 'मी' चुकीचा असलो तरी तुम्हालाही म्हणतील,त्यांनीही अजून शेगांव पहायचं आहे. रक्षण करा,रक्षण करा,म्हणत केव्हा तरी उशीरा महाराजांच्या नामस्मरणात झोपी गेलो. आदल्या रात्रीचं जागरण असल्याने गाढ झोप लागली,पहाटे पाच सव्वापाचच्या सुमारास,कुणी तरी माझा खांदा हलवून मला जागं केलं,कानावर शब्द आलेत सहाब उठो! डोळे उघडून बघितले तर समोर रिक्षावाला होता,म्हणाला,सहाब उठो! महाराजने आपकी सून ली. आपकी गाडी सात घंटे देरीसे चल रही है!

मी शुचिर्भूत होऊन महाराजांना पेढा नारळ केलं. त्यांनी माझ्या मनात,ह्रदयात,डोक्यात खोलवर कुठेतरी एक जागा निर्माण केली. मी त्यांना तिथे विराजमान करून तातडीने स्टेशनकडे निघालो. मी आणि माझी गाडी दोघांनी एकाच वेळी स्टेशनात प्रवेश केला. मी सेकंड टीमच्या कम्पार्टमेन्ट मधे प्रवेश करता झालो. ते माझ्याकडे आश्चर्याने पहाते झाले,मी त्यांच्या हातावर प्रसादाचा पेढा ठेवला,त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं,मी म्हटलं 'कुछ नही जोरसे बोलो 'त्यांनीविचारलं क्या बोलो? म्हटलं श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--जयंत दत्तात्रेय मोडक

भोपाळ

शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

🌸अवश्य वाचा ... !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page