top of page

अनुभव - 7

"श्री "

गजानन महाराज की जय.(अनुभव 7 🌺)

* इथे जो धरील अविश्वास. तो बुडेल निःसंशय....*


साधारण पणे प्रत्येकच मुला मुलीचं आपल्या भावी आयुष्याविषयी,सुखी संसाराविषयी एक स्वप्न असतं. तसं ते माझंही होतं. मी एका संस्कारशील कुटुंबात लहानाची मोठी झाली. माझे वडील.. एक श्रध्दाळू आणि सात्विक वृत्तीचा माणूस. गजानन महाराजांवर श्रध्दा. गजानन विजय ग्रंथाचे नियमित वाचन,आणि नेमाने महाराजांचे दर्शन आणि हे सर्व लहान पणा पासून पहात आल्यामुळे सहाजिकच गजानन महाराजच माझं दैवत.! दि. 16 नोव्हेंबर 1993 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी माझं लग्न रीतसर ठरलं आणि झालं. मी देशमुखांच्या घरची सून झाली.

लग्न काय झालं,वास्तविक सुरू झाला माझ्या आयुष्यातील अत्यंत खडतर काळ .लहान पणा पासून लाडात वाढलेली मी आणि अचानक सगळं काही बदललं. मिस्टरांची वागणूक काहिशी चमत्कारिक आणि गूढ वाटत होती पण वाटलं असतो एखादा स्वभाव,होईल पुढे ठीक.

नोव्हेंबर महिन्यात लग्न म्हणजे पहिला सण संक्रांतीचा. आई वडील घरी रीतसर आमंत्रण द्यायला आले. मिस्टरांनी आमंत्रण स्विकारले. मी आई बरोबर घरी गेले. दुसरे दिवशी घरी आईने सर्व तयारी केली. पानं मांडली रांगोळ्या घातल्या आणि वाट पाहता पाहता आता येतील नंतर येतील करत संध्याकाळ झाली कुणिही फिरकलं नाही. काय झालं असेल कळायला मार्ग नाही, तेव्हा आता सारखी फोनची सोय नव्हती ,तर्क वितर्क झालेत. संध्याकाळी वडिलांनी मला घरी सोडलं, मिस्टरांनी अगदी तुटक पणे वडिलांना बाहेरच्या बाहेर या तुम्ही! म्हणून निरोप दिला आणि धाडकन दरवाजा बंद झाला आणि सुरू झाली माझी नजर कैद!

थोडा वेळ अस्वस्थ शांततेत गेल्यावर मी सासूबाईंना विचारले (सासरे नव्हतेच सगळं राज्य मिस्टरांचं होतं) हे काय तुम्ही आलेच नाही कुणी? मी विचारलेल्या प्रश्नाचे ऊत्तर मात्र दिले. मिस्टरांनी हो हो नाही आलो,मला नाही आवडत तुझा तो देवा धर्माचं करणारा बाप! त्यावर मी म्हटलं अहो असं काय म्हणता काल तर तुम्ही आमंत्रण घेतलं? त्या सरशी जास्त बोलायचं कारण नाही असं म्हणून खाडकन माझ्या गालावर थापड बसली. आणि वरून जोरात एक धक्का. मी पलंगावर कोसळली आणि जोरात कळवळली , आई गं! गजानन महाराज वाचवा मला! गजानन महाराजांचं नाव जसं कानावर गेलं तसा कमरेचा पट्टा काढून सपकन माझ्या डाव्या मांडीपासून गुडघ्या पर्यंत भागावर मारला आणि जोरात उच्चारलेले वाक्य माझ्या कानावर आदळले 'खबरदार जर त्या नंग्या पीराचं नाव घेतलं तर. अंगावर कपडा नाही आणि म्हणे महाराज? या पुढे ते गजानन महाराज वगैरे प्रकरण बंद. मला विचारल्या शिवाय बाहेर जायचं नाहीआणि महाराजांच्या मंदिरात तर नाहीच नाही. त्यानंतर सुरू झाला भीषण अत्याचार. हातात एक पैसा मिळणार नाही, बाहेर जाताना मिस्टरांच्या सोबतच बाहेर जायचं. मानसिक आणि शारीरिक छळ ! काळ नाही वेळ नाही दारू प्यायची आणि वाट्टेल तसा अत्याचार. आईला देखील गुंडाळून ठेवलं. एखाद्या आईच्या तोंडून मुलासाठी वाक्य निघावं की 'हा मरेल तेव्हाच मला वाटतं मला शांती मिळेल. ! या पेक्षा दुर्दैव ते कोणतं? कुठे पळून जाण्याची सोय तर नव्हतीच पण वरून होत असलेल्या अत्याचाराचा परिणाम शरीरावर व्हायचा तो होणारच...मला 12 ऑगस्ट 1994 ला पहिली मुलगी स्वप्ना झाली आणि 14 मे 98 ला दुसरी मुलगी स्वागता झाली आणि काही अन्य करण्याच्या विचारांना स्वल्पविराम मिळाला आणि हाती शिल्लक राहिला एकच मार्ग गजानन महाराजांची निर्गुण (?) भक्ती. कारण फोटो नव्हताच डोळ्यासमोर सगुण रूप आणायचंआणि आतल्या आत रडत महाराजांना म्हणायचं...महाराज जानकीराम सोनार तुम्हाला वाटेल तसं बोलला त्याची तुम्ही नोंद घेतली नं? नारायण आसराजी ला तुम्ही शिक्षा केली नं? मग का परीक्षा पाहता आहात? मग मला कुठेतरी संकेत मिळायचा की हे भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. योग्य वेळ येईल पण काही काळ सहन करावेच लागेल. मग मी म्हणायची माझे भोग मी समजू शकते पण तुम्हाला दिलेल्या शिव्या,तुमच्या साठी वापरलेले अपशब्द ऐकण्याची मला का शिक्षा? मग एक मन म्हणायचं 'थांब थोडी थांब ' पापाचा घडा भरायचा असेल आणि मग शरीर आणि मन अत्याचार सहन करण्या साठी उसनं अवसान बांधून तयार व्हायचं..

वास्तविक घराच्या मागेच गजानन महाराजांचं मंदिर होतं. इतकं जवळ की आरती घंटा स्पष्ट ऐकू यायची पण महाराजांनी मला जवळ करण्याचा योग येत नव्हता. काळ हळूहळू समोर सरकत होता, मोठी मुलगी शाळेत जाऊ लागली होती,तिला समज येत होती. अत्याचारातून जन्माला आलेला जीव अत्याचाराच्या विरूद्ध उभे होण्यासाठी माझ्या जीवाला जीव देण्यास सज्ज होत होता. बाप दारूच्या नशेत तर्र असेल तर मला मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर पडता येत होतं, इ.स. 2004 चा तो काळ होता फोनची संख्या वाढीस लागली होती. गावातच असलेल्या मोठ्या बहिणीशी कधी संपर्क साधण्याची संधीही मिळू लागली होती. माझ्या दोन्हीही बहिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभं राहण्याचं आश्वासन वारंवार देत होत्या.

मला आठवतं 14 फेब्रुवारी 2004 चा तो महाराजांचा प्रगटदिन होता.मंदिराच्या कळसा कडे पहात मी गॅलरीत उभी होती. मनात म्हणत होती महाराज तुमचा प्रसाद तर माझ्या नशिबात दिसत नाही पण मला निदान आशीर्वाद तरी द्या! त्या दिवशी महाराजांच्या मनात काही वेगळीच योजना असावी,मला घरातून मिस्टरांनी आवाज दिलाआणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला हुकूम करण्यात आला. ' जा तुझ्या त्या महाराजांचा प्रसाद घेऊन ये ' मी घाई घाईने मंदिरात गेली दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आली. माझ्या हातून प्रसाद हिसकावून घेतलाआणि त्यांनी एकट्यानेच सर्व प्रसाद खाल्ला. आम्ही पहातच राहिलो पुन्हा मला आदेश झाला ' जा पुन्हा प्रसाद घेऊन ये. ' मी पुन्हा प्रसाद आणण्यासाठी गेले,प्रसाद घेऊन घरी आले तर मिस्टर दारू पीत बसलेले माझ्या हातून प्रसाद हिसकावून एक घास आमच्या हातावर ठेवला आणि पुन्हा सर्व प्रसाद खाऊन वर दारू ढोसून वाटेल तशी बडबड सुरू झाली. मग मात्र माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. मी प्रसाद हातात घेऊन जोरात ओरडली..' गजानन महाराजांच्या प्रसादाचा असा अपमान करणारा नवरा मला नको ' इथे जो धरील अविश्वास तो बुडेल निःसंशय..ज्यानी महाराजांचा असा अपमान केला त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या संध्याकाळी महाराजांजवळ खूप रडली, म्हटलं एकतर अनाथालयाचा रस्ता धरते नाहीतर अंबाझरी तलावात दोन्ही मुलींसह जीव देते. पण नंतर मनात विचार आला आपलं एक ठीक पण मुलींचा काय दोष? त्यांना जगण्याची ताकद देणे गरजेचे आहे. मग सासुबाईंना विश्वासात घेतले आणि मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. बहिणीनी सल्ला दिला अंगावरील कपड्यानिशी तिघी माझ्या कडे या बाकी पुढे पाहू आणि एक दिवस संधी चालून आली. नवरा काही कामानी घराबाहेर गेला. मी आणि माझ्या मोठ्या मुलीनी घाई घाईने इकडे तिकडे शोध घेऊन घरातुन पैसे गोळा केले मोठ्या मुश्किलीने 40 रुपये चिल्लर जमली. ऑटो नी बहिणी कडे जायला 60 ते 70 रुपये लागणार,बहिणी कडे जाऊन पैसे देणं शक्य होतं पण मला शक्यतो गेल्या गेल्या तिथे हात पसरणे प्रशस्त वाटत नव्हते. आम्ही तिघी घाई घाईने खाली उतरलो,मंदिरासमोर आलो महाराजांना म्हटलं तुम्ही जाणता 40 रुपयेच मिळाले आहेत आता मी निघते आमचं सर्व आता तुमच्या हाती आहे. मुली म्हणायला लागल्या आई वेळ करू नको,बाबा आले तर आपण पुन्हा अडकलो. तोच समोरून एक ऑटो आला त्याला रामनगर चा पत्ता सांगितला,विचारलं किती रूपये घेणार?तो म्हणाला फार जास्त नाही घेत 40 रूपये देऊन द्या. जय गजानन महाराज म्हणून आम्ही आत बसलो आणि माझा प्रवास सुरू झाला नवर्याच्या विरुद्ध दिशेनी. महाराजांच्या आशीर्वादाने माझा प्रवास आणि महाराजांचा रोष पत्करून त्याचा प्रवास.

त्या घरात महाराजांना रोज शिव्या दिल्या जात,पण मी रोज रात्री त्याबद्दल त्यांची माफीही मागायची. मी घर सोडलं आणि घराचे वासे फिरले. काही महिन्यांनी बाजूच्या लोकांकडून कळलं , त्याच्या डोक्यावर परिणाम झाला,फ्लॅट मधील लोकांशी भांडण झालं ,त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिस पकडायला आले तेव्हा भ्रमिष्ट अवस्थेत अंगावरील कपडे त्यानी काढून टाकले होते,एकानी त्याच्या अंगावर लुंगी फेकली तीही नाकारली. त्याच अवस्थेत पोलिस ठाण्यात घेऊन गेले, तिथे त्याला पोलिसांनी बेदम चोप दिला.

अंगावर कापड नसूनही माझ्या महाराजांना महाराज का म्हणतात याचं उत्तर मला देता येणार नाही पण गुर्मीत येऊन स्वतःला राजा समजणार्याला वेळ येताच महाराजांनी पार नंग करून सोडलं आणि इतकी वर्षे माझ्या अंगावर ओढलेल्या फटक्यांचा हिशेब पोलिसांकडून पूर्ण केला. पुढे त्याच भ्रमिष्ट अवस्थेत कधी तो लोकांना दिसला पण पुढे दिसेनासा झाला. आणि सरकारी नियमानुसार योग्य काळ मध्ये गेल्यावर त्याला मृत घोषित केल्या गेलं.!

आता या गोष्टीला खूप वर्षे झालीत. महाराज माझ्या कडून यथाशक्ती त्यांची भक्ती करून घेताहेत. माझी मोठी मुलगी सीए होऊ घातली आहे. लहानी हाॅटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करते आहे.

प्रत्येकच जीवन एक स्वतंत्र कादंबरीचा विषय असतो, तसंच माझही जीवन आहे. आज संधी मिळाली म्हणून एक छोटा भाग तुमच्या समोर उलगडून दाखविला.

...काही चुकलं असेल तर मोठ्या मनानी मला माफ करा आणि महाराजांच्या चरणी दृढ विश्वास असू द्या. महाराज सर्व चांगलच करतील....जय गजानन...!

अनुभव... स्वाती जकाते (देशमुख) वर्धा.

शब्दांकन...जयंत वेलणकर..9422108069....

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.


"श्री."

गजानन महाराज की जय. ( अनुभव.7 भाग 2)....🌺

*.इथे जो धरील अविश्वास तो बुडेल नि:संशय 🌺 (भाग 2) *


गजानन महाराज विषयक हे अनुभव जे वाचत आहेत त्या सर्वांना नमस्कार. आपण मागील ' इथे जो धरील अविश्वास तो बुडेल नि:संशय '(अनुभव क्र. 7)या शीर्षकाखाली लिहीलेला ' स्वाती ' चा शारीरिक मानसिक कैदेतून सुटकेचा अनुभव वाचला असेल, मी ही वाचला आणि माझ्या जुन्या स्मृती जागृत झाल्या. नको असलेल्या त्या आठवणी उफाळून वर आल्या आणि एक बहीण म्हणून मला असं वाटलं की या कहाणीचा अजून थोडा भाग मी तुम्हाला सांगावा.

इ.स.1993 ला आमच्या लहान बहिणीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या विक्षिप्त वागणुकीमुळे,संशयी स्वभावामुळे ती काही दिवसांतच आमच्या साठी अज्ञात वासात गेली. आमच्या नातेवाईकांना आणि परिचितांना देखील तिच्याशी संबंध ठेवणं दुरापास्त झालं. प्रचंड मानसिक दडपणाखाली ती तिकडे होती आणि आम्ही इकडे हतबल झालो होतो.

2004 च्या एप्रिल महिन्यात एक दिवस दुपारी मी माझ्या ऑफिसात असताना फोनची घंटी खणाणली आणि मला साहेबांनी बोलावलं ,रिसिव्हर माझ्या हातात देत मला म्हणाले 'स्वाती चा फोन आहे. 'क्षणभर माझ्या कानावर माझाच विश्वास बसेना,मी नखशिखांत शहारली.किती तरी वर्षा नंतर बहिणीचा आवाज कानावर पडत होता. रडत रडत पलीकडून बहिण म्हणत होती ताई दादांकडून(आम्ही वडिलांना दादा म्हणतो) दोन लाख रुपये मला मिळतील का गं? सुरवातीला असे बरेच पैसे वडिलांनी दिले होते पण परिस्थिती काही सुधारली नव्हती,आताही सुधारणार नव्हतीच. तिच्या खोल गेलेल्या आवाजावरून मला परिस्थितीची जाणीव झाली,काही मिनीट समजावणीचा सूर लावल्यावर मला कुठून बळ आलं माहित नाही गजानन महाराजांचं नाव घेतलं आणि तिला निक्षून सांगितलं की चार दिवसाच्या आत तू अंगावरील कपड्यानिशी मुलींसह माझ्या घरी यायचं,मात्र तिला हेही सांगायला विसरले नाही की मधील दिवसांत न जमलं तर केवळ एक फोन करून हॅलो करायचं ती मी तू जिवंत असण्याची खूण समजीन आणि फोन ठेवला. एक दिवस,दुसरा दिवस,तिसरा दिवस. तिचा फोन आला मात्र चौथ्या दिवशी फोन आला नाही आणि त्या दिवशी ऑफिसात अस्वस्थ बसली असताना अचानक मुलाचा फोन आला 'आई मावशी घरी आली आहे.' मी साहेबांची परवानगी घेऊन घाईने घरी निघाले. खूप वर्षांनी बहिण भेटणार होती. मिस्टरांना कळवलं,वर्ध्याच्या बहिणीकडे कळविण्याची सोय केली. दादा ऑफिसात होते त्यांना निरोप पठवला आणि घरी पोहोचली बहिणी कडे पाहून एकदम भडभडून आलं. तिला ओळखूच शकत नव्हती. खोल गेलेले डोळे. कृष झालेलं शरीर. केव्हाही उन्मळून पडेल असं ते झाड होतं. तिच्या मुलींना तर पहिल्यांदाच पहात होते. शुन्यात हरवलेली नजर आणि दयनीय परिस्थिती. तिघिंना प्रथम आतल्या खोलीत सुरक्षित केलं कारण नवरा केव्हाही येऊ शकत होता. त्यामुळे तसं करणं क्रमप्राप्त होते. आता मी वडिलांची वाट पाहू लागली पण बराच वेळ झाला तरी ते आले नाही कुठे असतील?मग अचानक जाणवलं गजानन महाराजांच्या मंदिरात पहा तिथे असतील. आमचा अंदाज बरोबर होता त्यांनी गजानन महाराजांना पेढ्याचा नैवेद्य दाखविला होता. आम्ही त्यांना म्हटलं अहो हे काय तुमची मुलगी 'परत 'आली आहे आणि हे पेढे? त्यावर ते म्हणाले हो माझी मुलगी 'जिवंत परत आली ' म्हणून हे पेढे! तुम्ही माझ्याशी फार बोलत नव्हते पण माझं मन सांगत होतं,माझी मुलगी प्रचंड संकटात आहे. जाऊ द्या 'इथे माझा त्राता कोण गजानना तुज वाचून?' तो माझ्या आणि गजानन महाराजांच्या मधला विषय आहे.

दादांचे शब्द अक्षरशः खरे होते. कारण पुढे एकेका गोष्टीचा उलगडा होत गेला,पहिले काही दिवस तर प्रचंड दडपणात होते. कोर्ट कचेऱ्या झाल्या,उरला सुरला मानसिक त्रास झाला आणि मग हळू हळू जे कळत गेलं ते सगळं अक्षरशः हादरवून सोडणारं होतं.

सर्व प्रथम प्रश्न होता मुलींचा! लहानी तर बोलतच नव्हती,भिती वाटत होती ही बोलू शकेल की नाही?घरी आली तेव्हा तिचे दोन पेपर बाकी होते,मग मी आणि माझी दुसरी बहीण तिला शाळेत घेऊन गेलो शाळेत मॅडमनी आम्ही कोण म्हणून चौकशी केली म्हणाल्या अहो ही रोज डब्यात समोसा आणायची कधी खाण्यायोग्य कधी शिळा

बरेचदा मी माझ्या डब्यातून दोन घास खाऊ घालायची. आम्ही विचार केला घरात जर दोन दोन दिवस अन्न शिजत नसेल,घरातील बाई काही करण्याच्या अवस्थेत नसेल तर कोण काय करणार?सारंच सगळं विचित्र होतं.

मुलींनी आईला संपुर्ण दिवस अंगावर ओले

कपडे,खोलीतील पलंग ओला अशा अवस्थेत एकदा नाही अनेकदा पाहिलं. क्रूर कर्माच तो. त्याच्यात ना नवरा होता ना बाप होता. बायकोला देवा धर्माचं वेड आहे नं?मग एखाद्या मंदिराच्या परिसरात नेऊन दारू जबरदस्तीनी तोंडात ओतून मग आई सुस्त पडली आहे आणि लहान लहान मुली बाजूला आहेत या गोष्टीचा आसुरी आनंद घ्यायचा.

देवा धर्माचा द्वेष तर इतका पराकोटीचा होता की घरातील देव मोडीत विकून टाकले. हे करीत असताना घरी एक पितळ्याची घंटी होती त्यावर नागाचं सुंदर डिझाईन होतं. त्याकडे पाहिले मात्र आणि जाणीव झाली आपल्या सासऱ्याच नाव नागेश आहे. ते सात्त्विक आहेत,देवा धर्माचं करतात,झालं आतला राक्षस जागा झाला. एका मोठ्या हातोड्यानी ती सुंदर वस्तू विद्रूप करून टाकली. मनात विचार आला की त्या लाचार माणसाला पैसे मागताना तो सासरा ठीक होता.

एखादा माणूस घाबरला की अधिकच गलीत गात्र होतो. अशा घाबरलेल्या आईला वरून मारझोड होताना पाहून कोणतं मूल भेदरणार नाही पण त्याही पेक्षा क्रौर्याची सीमा तेव्हा झाली जेव्हा प्रत्यक्ष बाप त्या लहान जीवाला गॅलरीतून खाली फेकायला तयार झाला,नव्हे जवळ जवळ सोडलंच पण आई - आजी ची विनवणी आणि मनात गजानन महाराजांचा धावा मुलीला तारायला समर्थ ठरला.

आता या पार्श्वभूमीवर सर्व घडी नीट बसविणे आवश्यक होते आणि आम्ही उभयतांनी ठरविलं सर्व गजानन महाराजांच्या चरणी सोपवायचं.

आमच्या ऑफिसमधील साहेब या सर्व गोष्टींकडे सुरवाती पासून लक्ष ठेवून होते.. त्यांनी आम्हाला सुचविलं मानसोपचार तज्ञाकडे जा. हे शांतपणे म्हणाले गजानन महाराज करतील सगळं ठीक. ठीक झालं की जाऊन

येऊ शेगांवला. त्यावर साहेब म्हणाले..'जब देखो शेगांव. गजानन महाराज बोलते रहते हो. क्या हैं ऐसा वहापर ?' तो विषय तिथे संपला..

पुढे यांनी शांतपणे महाराजांसमोर बसून संकल्प सोडला आणि गजानन विजय ग्रंथाचा एक एक अध्याय रोज वाचायचा आणि तिघींनी अंगारा लावायचा असा क्रम सुरू झाला मुलींना प्रथमच असं भक्तीमय वातावरण जवळून अनुभवण्याचा योग येत होता.त्यांच्या मनात घर करून असलेली भिती हळू हळू शांत होत गेली. वेळ लागला,पण यथावकाश सगळं बदललं. ज्या घरात गजानन महाराजांना प्रचंड विरोध होता तिथून त्या अशा ठिकाणी आल्या की पूर्ण वातावरण असं होतं 'जय हो गजाननमय हो. ' पुढे मुली एकदम चुणचुणीत झाल्या स्वत:च्या पायावर उभं राहण्यास समर्थ झाल्या. आमच्या साहेबांनी हे सगळं जवळून पाहिलं अनुभवलं आणि एक दिवस हळूच म्हणाले. 'एकबार शेगांव जानेकी इच्छा है '. आणि ते जाऊन आले. आता ते आमच्या पेक्षा जास्त वेळा शेगांवला जात असतात आणि ज्याला त्याला सांगत असतात..'कुछ भी कहो लेकीन शेगांव मे जो बात है वो शेगांव मे ही है! '

असो विषय मोठा आहे पण कुठेतरी थांबायला हवं. बोलली नसती तर मनाला रुख रुख लागून राहिली असती तेव्हा माझे हे बोल समजून घ्या आणि गजानन महाराजांकडे जगाच्या भल्या साठी प्रार्थना करा.

जय गजानन.

अनुभव. स्वाती जकाते (देशमुख)भाग 2

शब्दांकन..जयंत वेलणकर. 9422108069.

आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसतीलतरस्वागतआहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

1 commentaire


Sachin Katariya
Sachin Katariya
13 juin 2020

"माला जपूँ ना कर जपूँ ,मुख से कहूँ ना राम

राम हमारा हमें जपे है ,हम पायो विश्राम ।"


Kabir

J'aime

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page