top of page

अनुभव - 70

"श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 70🌺)

*गजानन महाराज आमच्या मनात हवेत*


जय गजानन! श्री गजानन महाराजांचे भक्त जेव्हा केव्हा एकत्र येतात आणि त्यांच्या गप्पा रंगतात,तेव्हा त्यात शेगांव आणि महाराजांची प्रचिती,या दोन गोष्टींचा उल्लेख

हमखास निघाल्या शिवाय रहात नाही. मध्यंतरी आम्ही काही लोक याच संदर्भात बोलत असताना,कुणी तरी प्रश्न उपस्थित केला की शेगांवची शिस्त,तेथील वातावरण याचा मूलाधार काय?तेव्हा सर्वांचं त्यावर एकमत झालं " श्री गजानन महाराजांचं अधिष्ठान!" आमच्या मनात गजानन महाराज असणं गरजेचं आहे. कारण मनात जर गजानन महाराज असतील तर आचरणात ते प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाही.

याच अनुषंगाने एक गोष्ट मला तेव्हा आठवली आणि मी ती तेथे कथन केली .आपण स्वच्छतेसाठी झटणारे हात तिथे नेहमीच पहातो. आपल्या दृष्टीसमोर घडणार्या घटनांची आपण बरेचदा नोंद घेतो,पण आपल्या नजरेआड एखादी उल्लेखनीय घटना घडते,तेव्हा तिथे महाराजांचं अधिष्ठान आहे,या गोष्टीला आपलं मन आपल्या कळत न कळत मान्यता देतं.

त्याचं असं झालं ,एप्रिल 2016 ची ही घटना असावी. तेवढ्यातच माझा मुलगा जो पुण्यात 'मित्सुबिशी 'कंपनीत कामाला आहे. त्याला कंपनीतर्फे ट्रेनिंगसाठी स्वित्झरलॅन्ड जाण्याचा योग आला. योगायोगाने माझा वाढदिवस त्याच सुमारास येत होता म्हणून तो तिथून येताना 'बाबांसाठी' काही आणावं या विचारानं माझ्यासाठी स्वीसमेड उत्तम क्वालिटीचं बारा हजार रुपये किंमतीचं एक घड्याळ घेऊन आला.

आम्ही सर्वांनी 20एप्रिल 2016 ला शेगांवला जाण्याचा निर्णय घेतला. श्रींच्या दर्शनासाठी नागपूरहून सर्व एकत्र निघू असं ठरल्याने,तो पुण्याहून नागपूरला पोहोचला,सोबत नवीन घड्याळ घेऊन आला. शेगांवसाठी निघताना मी त्याला म्हटलं तूच हे नवीन घड्याळ घालून शेगांवला चल. त्यावेळी आम्हाला भक्त निवास क्रमांक पाच मधे दुसरे मजल्यावर खोली मिळाली. आमचं दर्शनादी काम व्यवस्थित पार पडलं. परतीची बस रात्री दहाची होती त्यामुळे आनंद सागर भेट पण शक्य झाली. परत येऊन खोलीत विसावलो,थोडा नाश्ता केला आणि बसची वेळ साधण्यासाठी खोली सोडली. आम्ही नागपूरला परतलो आणि मुलगा पियुष दुपारी चारच्या बसने पुण्याला रवाना झाला. आमचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. साधारण वीस बावीस दिवसांनी पुण्याहून मुलाचा फोन आला,बाबा मी नवीन घड्याळ तुमच्याकडे दिलं नं? मला तसं काही आठवत नव्हतं ,तरीही म्हटलं,मी घरी शोध घेतो तुही पुन्हा शोध घे. पाच सहा दिवस गेलेत पण घड्याळ काही सापडलं नाही. मी महाराजांच्या फोटो समोर उभा राहून घड्याळ कुठे असावं?या गोष्टीचा विचार करू लागलो आणि डोक्यात एक विचार चमकून गेला की घड्याळ कदाचित शेगांवला खोलीतच राहिलं. महाराजांना म्हटलं घड्याळ सापडू द्या!मी भक्त निवासाची पावती कुठे सापडते का याचा शोध घेऊ लागलो नशिबाने पावती मिळाली,त्यावर फोन नंबर पाहून शेगांव संस्थानला फोन केला,त्यांना सर्व सविस्तर सांगितलं .घड्याळाचं पूर्ण सविस्तर वर्णन केलं. त्या गोष्टीला अठ्ठावीस दिवस झाले होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी लगेच प्रतिसाद देऊन तुमचं घड्याळ आहे,उद्याच पुरावा दाखवून घेऊन जा,असं म्हटलं. रात्रीच मी आणि माझी पत्नी शेगांवसाठी निघालो. तिथे पोहोचून कागद पत्र दाखविल्यावर अक्षरशः पाच मिनिटात घड्याळ आमच्या हाती होतं. माझ्या दृष्टीने,घड्याळाविषयी खरं तर कुणालाही माहिती नव्हतं,तरीही घड्याळ मिळण्याचं कारण महाराजांचं अधिष्ठान,महाराजांशी प्रामाणिकता हे होतं. अशा गोष्टी शेगांवला वारंवार घडतात असं ऐकलं होतं.त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा होता.

आम्हा भक्तांच्या जीवनात बरेचदा काही गोष्टी अशा घडतात की तेव्हा पुरत्या त्या मनाविरुद्ध असल्यातरी पुढे जाऊन लक्षात येतं की यात महाराजांची योजना काही वेगळी होती. पण असं वारंवार घडलं तरी आपण महाराजांवर पूर्ण श्रध्दा टाकून निवांत का होत नाही याची मनाला नेहमीच खंत वाटते. असाच एक प्रसंग मला आठवतो. 1996 ची गोष्ट,आमची प्रियंका तेव्हा चार वर्षांची होती. ती बालक मंदिरात जात असे,तिची आई तिला सायकलवर बसवून बाल मंदिरात पोहोचवायची. एकदा शाळेतून परत येताना वाटेत सायकल अचानक थांबली आणि प्रियंका रडायला लागली. हिला प्रथम समजेना एका एकी काय झालं? उतरून पाहिलं तर प्रियंकाचा पाय चाकात अडकला होता. हिने तो काळजीपूर्वक बाजूला केला. घरी आल्यावर आमच्या फॅमिली डॉक्टरकडे आम्ही तिला घेऊन गेलो,त्यांनी मलमपट्टी करून काही गोळ्या दिल्या आणि आमची सुटका केली. आम्हाला दुसरे दिवशी शेगांवला जायचे होते. डाॅक्टर म्हणाले काही हरकत नाही,तुम्ही जाऊ शकता. आम्ही त्याप्रमाणे शेगांवला दर्शनासाठी निघालो. शेगांवच्या जवळच एका खेड्यात माझी मावस बहीण रहाते,यावेळी तिच्याकडे जाण्याचा व दोन दिवस रहाण्याच्या माझा निर्धार पक्का होता. आमचं शेगांव दर्शन शांतपणे पार पडलं,प्रियंकाचा पाय कदाचित थोडा दुखत असावा असं तिच्या चेहर्यावरून भासत होतं.पूर्ण वेळ ती आईच्या कडेवरच होती. तिचं दुखणं दोन दिवसात गोळ्या घेऊन कमी होणार होतं. आम्ही दर्शन घेऊन मुख्य प्रवेशद्वाराशी उभे होतो. वास्तविक तिथे फारशी गर्दी नव्हती,तेवढ्यात एक गृहस्थ प्रियंकाच्या अगदी जवळून पुढे गेले,त्यांचा धक्का तिच्या पायाला लागला आणि प्रियंकाने जोरात टाहो फोडला. अगदी कळवळून ती रडायला लागली. ते ऐकून आम्हा आई बापांच्या मनात कसतरीच होउन, डोळ्यात करूणा दाटून आली, काहीही केल्या प्रियंका रडायचं थांबेना,त्या अचानक बसलेल्या धक्क्याने,खेड्यावर जाण्याच्या आमच्या निर्णयाला देखील धक्का बसला. मी मनातल्या मनात महाराजांना म्हटलं, महाराज दोन दिवसांचा प्रश्न होता. तुमच्या दारात उभे असतानाच तिला असा धक्का का लागावा?

आम्ही लागोलाग नागपूरला परतलो. येताच रामदासपेठ येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डाॅ. काळे यांचा दवाखाना गाठला,त्यांनी तपासून लगेच एक्सरे काढायला सांगितला, एक्सरे पाहून ते संतापले,त्यांनी विचारलं हे केव्हा झालं?त्यावर मी म्हणालो दोन तीन दिवस झालेत. म्हणाले देवाचे आभार माना की आज तुम्ही येथे आलात. दोन दिवस जरी उशीर झाला असता तरी पायाचं काय झालं असतं सांगता येत नाही. फ्रॅक्चर आहे,जखमेत विष पसरू शकलं असतं! त्यांनी योग्य उपचार करून पायाला प्लॅस्टर लावून आम्हाला घरी पाठविलं. एक महिन्यात प्रियंका पूर्ण दुरूस्त झाली.

महाराजांच्या दाराशीच प्रियंकाला कुणाचा धक्का लागून,आम्हाला नागपूरसाठी निघावं लागलं याचं महत्त्व मला कळलं होतं आणि दोन दिवसांचाच तर प्रश्न आहे असं जे माझ्या मनात आलं होतं,त्यापेक्षा त्या दोन दिवसांचं महत्व महाराजांच्या योजनेत किती वेगळं होतं याची जाणीव डाॅक्टरांच्या मुखातून निघालेल्या वाक्याने मला झाली होती. मी मनोमन महाराजांना हात जोडून म्हटलं 'महाराज तुमची करणी आमच्या समजुतीच्या पलीकडे आहे 'आम्ही फक्त तुम्हाला प्रार्थना करू शकतो आणि तुमच्या स्मरणार्थ म्हणू शकतो.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!

अनुभव-- गिरिश/पुरुषोत्तम वझलवार

नागपूर

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !! श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page