top of page

अनुभव - 74

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 74🌺)

*श्रीगजानन योगीराज*


जय गजानन! मी व्हेटरनरी डाॅक्टर!डाॅ. सुधाकर त्र्यंबक सदावर्ते, माझ्या काॅलेज जीवनापासूनच म्हणजे 1956 सालापासून माझ्या अभ्यासाच्या टेबलावर, श्री गजानन महाराजांचा एक लहान फोटो होता, तो आजही म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी आमच्या देवघरात विराजमान आहे. म्हणजे तो फोटो निदान बासष्ट वर्षे जुना आहे. पण हे झालं फोटोचं, अनुभवाविषयी बोलायचं तर श्री गजानन महाराजांविषयीचा अनुभव मी इ.स.1949-50 म्हणजे मी जेव्हा नऊ,दहा वर्षांचा होतो तेव्हाच अनुभवला आहे.

त्यावेळी माझे वडील अमरावती जिल्ह्यातील नांदगाव- खंडेश्वर या छोट्या गावी 'सब रजिस्ट्रार 'होते. माझ्या आईची प्रकृती अधून मधून ठीक रहात नव्हती, तिला पोटदुखीचा त्रास होता. औषधं घेत होती, पण एकदा साधारण रात्री आठ वाजताच्या सुमारास आईला पोटदुखी उमाळून आली. तिला गावातील सरकारी दवाखान्यात बाबा घेऊन गेले, तेथील डाॅक्टर पांगारकर यांनी आईला तपासून 'ह्यांना ताबडतोब अमरावतीला न्या अपेन्डिक्सची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे!'असा सल्ला दिला.

आजपासून 68 वर्षांपूर्वीचा तो काळ,तेव्हा आजच्या इतकी वाहनांची संख्या नव्हती. अॅम्ब्युलन्स नव्हत्या. साधनांची कमतरता होती. नांदगावहून अमरावतीला जाणारी शेवटची बस निघून गेली होती. कुणाकडून खाजगी वाहनही मिळू शकणार नव्हतं, घरात, मी,माझे दोन लहान भाऊ आणि मोठी बहीण. म्हणजे आमची तशी वडिलांना काहीच मदत होणार नव्हती, ना शारीरिक, ना मानसिक. इकडे आई प्राणांतिक वेदनांनी विव्हळायला लागली, आईचं पोट नगार्या सारखं फुगून आलं. ती जोरजोरात ओरडते आहे, वडील हतबल झाले आहेत, आम्ही भावंडं भेदरल्या सारखे एकीकडे उभे राहून वडिलांची अस्वस्थता पाहतो आहे, हे सर्व दृश्य रात्रीच्या अंधारात अधिकच भयाण वाटत होतं.

शेवटी वडिलांनी 'आता सर्व भार श्री गजानन महाराजांवर आहे!'असं म्हणून त्यांचा अंगारा आईला लावला आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण सुरू केलं. त्यांनी सुरुवातीलाच महाराजांना हात जोडून प्रार्थना केली. 'महाराज तुम्ही सर्व जाणता, मी याशिवाय काहीही करू शकत नाही ,आता हिचं जिवंत रहाणं अथवा जाणं सर्व काही तुमच्या साक्षीनं होऊ द्या!तुम्हाला आळवणं एवढंच काय ते माझ्या हाती आहे. हे पारायण तुमच्या चरणी अर्पण आहे!'असं म्हणून वडिलांचं पारायण सुरू झालं. एकेक अध्याय पुढे सरकत होता, प्रत्येक अध्यायानंतर वडील आईच्या पोटाला आणि कपाळाला उदबत्तीचा अंगारा लावत होते. अक्षरशः प्रत्येक अध्यायाला आईच्या वेदना कमी कमी होत गेल्या. पोथी जसजशी पूर्णत्वाला जात होती, तिच्या पोटाचा फुगवटा कमी होऊन त्रासही कमी कमी होत गेला.

वडील सकाळीच आईला अमरावतीला घेऊन गेले, तेथील तज्ञ डाॅक्टर, ज्या स्त्री रोग तज्ञही होत्या त्या म्हणाल्या, अपेन्डिक्स 'बर्स्ट 'कसं झालं नाही, हे खरोखर आश्चर्यच आहे,ताबडतोब आईचं ऑपरेशन करण्यात आलं, आई वाचली!ऑपरेशन नंतर डाॅक्टर हॅन्ड ग्लोव्ह्ज काढता काढता वडिलांना म्हणाले 'या मरणाच्या दारातून परतल्या आहेत असं समजा!'वडिलांनी गजानन महाराजांना मनोमन नमस्कार केला, थोड्या वेळानं आईला बाहेर आणलं, ती वडिलांना म्हणाली, 'तुमचं काल पारायण सुरू झाल्यापासून, आता ऑपरेशन होईपर्यंत सतत एकच भास होत होता!'महाराज सोबत आहेत आणि मला धीर देताहेत!' ते ऐकून वडिलांचे डोळे पाणावले.

महाराजांविषयी जे काही अनुभव भक्तांच्या जीवनात येतात त्या अनुभवांचा मी साकल्याने विचार करतो, तेव्हा बरेचदा असं जाणवतं की कुठलीही गोष्ट करताना महाराजांचं मार्गदर्शन घेऊन, त्यांचं स्मरण करून ती गोष्ट केली तर आपल्याला योग्य दिशादर्शन होतं. या संदर्भात माझा एक अनुभव ऐकण्यासारखा आहे. मला आठवतं मी 1962 ला व्हेटरनरी डाॅक्टरची परीक्षा पास करून नोकरीच्या शोधात होतो. तेव्हा व्हेटरनरी डाॅक्टरांना मिळणारा पगार मध्यप्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत थोडा जास्त होता. स्वाभाविकपणेच नोकरी कुठे करावी?हा प्रश्न समोर आला, घरच्यांना मनातून महाराष्ट्रातच नोकरी करावी असं वाटत होतं. आईचा गजानन महाराजांवर विश्वास, ती म्हणाली, आपण गजानन महाराजांचं मार्गदर्शन या बाबतीत घेऊ. तिने एकसारख्या दहा कागदी चिठ्ठ्या घेऊन, त्यातील पाचवर म.प्र. व पाचवर महाराष्ट्र असं लिहून घडी घालून त्या दहा चिठ्ठ्या एका भांड्यात मिक्स केल्या, त्यातील तीन चिठ्ठ्या उचलून, तीन पैकी दोनवर जे येईल, तिथे नोकरी धरावी असे ठरले .त्याप्रमाणे महाराजांना प्रार्थना करून, एका अगदी लहान मुलाकडून चिठ्ठी उचलण्यात आली, तीनही चिठ्ठ्या मध्यप्रदेशच्याच निघाल्या. याचा अर्थ महाराजांचा स्पष्ट संकेत 'मध्यप्रदेश ' होता. मग आईने महाराजांसमोर हात जोडले, म्हणाली, महाराज मध्यप्रदेशात इंदोरला महाराष्ट्रीयन वस्ती बरीच आहे. इंदोर डिव्हीजनला सुधाकरला नोकरी मिळेल तर हा संकेत अधिक आनंददायी ठरेल. आश्चर्य म्हणजे मला पंधरा दिवसांतच पत्र आलं, त्यात 'इंदोर मुख्यालयात जाॅईनिंग रिपोर्ट द्या!' असा उल्लेख होता. अर्थातच मी मध्यप्रदेशात व्हेटरनरी डाॅक्टर म्हणून रुजू झालो. पुढे, महाराजांनी माझ्यासाठी मध्यप्रदेश आणि इंदोर ची निवड, योजनाबध्द पध्दतीने केली होती, हे अजून एका घटनेतून अधिकच स्पष्ट झालं. मला 'खरगोन ' येथे प्रभारी पशु चिकित्सक, म्हणून पाठविण्यात आले, तिथे माझ्या शेजारच्या क्वार्टरमधे श्री कमलाकर गंगेले नावाचे कृषी अधिकारी रहात होते, त्यांनी मला इंदोर येथील 'श्री प्रभाकर मराठे ' यांच्या मुलीविषयी सुचविलं आणि महाराजांच्या योजनेतून 'इंदोर' माझं सासर झालं. इ.स.1962 ला महाराजांनी जो कौल मध्यप्रदेश आणि इंदोर साठी दिला होता, तो मार्ग त्यांच्या आशिर्वादाने मी स्वीकारला आणि आज इ.स.2018 म्हणजे छप्पन वर्ष झालीत मी इंदोर येथे स्थायिक आहे. इंदोरचाच रहिवासी आहे. म्हणजे महाराज संकेत देतात. प्रश्न असतो आपल्या निष्ठेचा.

असाच एक सांकेतिक अनुभव सांगून थांबतो, इ.स.2005 च्या जून महिन्यात मी नागपूर येथे धरमपेठ झेंडा चौकातील गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो होतो, मूर्ती समोर नमस्कार करीत असताना एका गृहस्थांनी तिथे मला गजानन बावन्नी भेट म्हणून दिली. म्हणाले वाचा कामात येईल!मी ती पादुकांना स्पर्श करून घरी पत्नीच्या सुपूर्द केली, तिने ती बाकी पोथ्यांसोबत ठेवून दिली. पुढे लगेच 1 सप्टेंबर 2005 ला इंदोर येथे माझी बायपास सर्जरी करणे आवश्यक झाले. ऑपरेशन जोखमीचं होतं. डाॅक्टर म्हणाले आपण प्रयत्न करणारच पण करता करविता तो आहे! मला ऑपरेशन थिएटर मधे नेलं आणि इकडे माझ्या चुलत भावाच्या पत्नीने माझ्या सौभाग्यवतीला नवीन बावन्नी भेट देऊन 'महाराजांची प्रार्थना कर काळजी घेतील असं म्हणून धीर दिला. जेवढा वेळ ऑपरेशन होत होतं तो पूर्ण वेळ माझा भाऊ, पत्नी आणि तीन मुली हाॅस्पिटल मधे बावन्नी वाचत होत्या. महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झालं!

ऑपरेशन नंतर मी आणि 'ही' बोलत असताना, दोन तीन महिने आधीच प्रत्यक्ष महाराजांच्या समोर माझ्या हाती बावन्नी आली होती आणि भक्ती करण्याचा संदेश मिळाला होता. असा निष्कर्ष आम्ही काढला आणि सहजपणे माझ्या तोंडून दोहा बाहेर पडला..

दुखमे सुमिरन सब करे. सुख मे करे न कोय

सुखमे सुमिरन जो करे, तो दुख काहेको होए.!

त्याला जोडून म्हटलं 'बेटर लेट दॅन नेव्हर ', महाराजांनी देऊ केलेलं हे बोनस आयुष्य आता तरी महाराजांच्या भक्तीत व्यतित करूया! त्याला जोडून ही म्हणाली आणि मुखाने नामस्मरण करुया श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन !

🌺अनुभव-- डाॅ. सुधाकर त्र्यंबक सदावर्ते

इंदोर

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page