top of page

अनुभव -75

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 75🌺)

*तुझ्या कृपेचे महिमान, आगळे सर्व साधनाहून*


जय गजानन! श्री गजानन विजय ग्रंथाच्या अठराव्या अध्यायात भाऊ कवरांना झालेल्या फोडाची कथा ह.भ.प. दासगणू महाराजांनी वर्णन केली आहे. व्याधीने त्रस्त झालेल्या भाऊ कवरांना महाराजांच्या कृपेने दिलासा मिळाला हे सांगताना दासगणू महाराज म्हणतात,

"फोडास लाविता अंगारा/ तो तात्काळ फुटला खरा/ येऊ लागला भराभरा/ पूर्ण त्या श्रोते फोडातून/ एक घटका गेल्यावर/ पू गेला निघून पार/ पहा किती आहे जोर/ समर्थांच्या अंगार्याचा? भाऊस निद्रा लागली/व्याधी पुढे बरी झाली/ हळूहळू शक्ती आली/ भाऊ झाला पुर्वव्रत!!"

हे जे वर्णन आहे, ते मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवलं आहे!साधारण 1962-63 चा हा अनुभव आहे. तेव्हा मी इयत्ता सातवीत होतो. कोकणातील देवगड तालुक्यात 'सौंदाळे ' हे आमचं गाव. तिथून आठ किलोमीटर अंतरावरील 'पडेल' येथे माझ्या मामांच्या घरी मी शिकण्यासाठी राहत होतो. एक दिवस माझ्या डाव्या पायाच्या पोटरीवर, एक लहान 'पुरळ' किंवा अगदी बारीक फोड होऊन, त्या भागात खूप खाज सुटली. वाटलं, बारीकसा पुरळ आहे ठीक होईल, पण प्रत्यक्षात ते दुखणं आणि त्याचा आकार वाढत गेला आणि दोन चार दिवसातच पोटरीवर त्या ठिकाणी चांगलं लिंबाच्या आकाराचं गळू झालं. अजिबात चालता येईना, पूर्ण पाय आखडल्या सारखा होऊन, पायात खूप वेदना व्हायला लागल्यात. हालचाल अशक्य होती, व सातवीची परीक्षा सुरू झाली, कशीबशी परीक्षा पूर्ण केली, वडिलांनी सौंदाळे येथे नेण्यासाठी डोली करून त्यातून मला ते घरी घेऊन आले. त्या काळात तिथे रस्तेच नव्हते त्यामुळे वाहन असण्याचा प्रश्नच नव्हता.

मी गजानन महाराजांकडे आकर्षित होऊन त्यांची भक्ती करावी, हे नियतीनं जणू लिहून ठेवलं होतं.माझ्या पायावर गळू होऊन आता दोन आठवडे लोटले होते, उपाय सुरू होते पण सर्व हतबल झाले होते आणि मी निराश!त्याच सुमारास माझी आत्या कै चंपुताई फाटक जी खामगावला असायची, आमच्या घरी आली,आत्या शेगांवच्या गजानन महाराजांची भक्त! नियमाने गजानन विजय वाचण्याचा तिचा नियम. तिनं माझ्या वेदना पाहिल्या, आत्या म्हणाली, मी तिथे महाराजांचा अंगारा लावते, तो फोड फुटेल!आत्याने रात्री महाराजांना प्रार्थना करून, अंगारा गळूला लावला नंतर मी रात्री झोपलो, सकाळी मला जाग आली, पहातो तो ते गळू फुटलं आणि त्यातुन पू बाहेर येऊ लागला, पूर्ण पू बाहेर पडला आणि मला आराम वाटला. त्या दिवसापासून मी श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय रोज वाचतो आहे .प्रवासात देखील पोथी बरोबर असते. अध्याय वाचन होत नाही तो पर्यंत मी घराबाहेर पडत नाही. आज या गोष्टीला पंचावन्न-छप्पन वर्षे झालीत पण त्या पंधरा दिवसांत मी ज्या वेदना भोगल्यात त्या आठवणी आजही ताज्या आहेत आणि गळू

झालेल्या त्या जागेवर जेव्हाही नजर जाते तेव्हा गजानन महाराजांविषयी श्रध्दा माझ्या मनात अधिक दृढ झाल्याशिवाय राहत नाही.

माझ्या मनात असलेली श्रध्दा अधिक वाढीस लावणारा अजून एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला. 1974 च्या सुमारास मी लग्नाच्या बेडीत अडकलो. माझी पत्नी सौ.उर्मिला लक्ष्मण ताम्हणकर, ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. मला एकूण तीन मुलगे, मोठा प्रमोद, डाॅक्टर आहे!नंबर दोन विनोद इंजिनियर आहे आणि तिसरा आणि सर्वात लहान मुलगा सागर याने वाणिज्य विषयात शिक्षण घेतलं आहे.

मला आठवतं इ.स.1982 सालची गोष्ट, सागरच्या वेळेस उर्मिलाला दिवस होते ,कणकवली येथे डाॅ.नवरे यांचा दवाखाना होता, डाॅ. नवरे यांची ख्याती 'गरिबांचे डाॅक्टर म्हणून होती. अत्यंत सात्त्विक वृत्तीचे डाॅक्टर होते. रोग्यांविषयी कनवाळू, पैशाचा मोह नाही. हल्ली असे डाॅक्टर दुर्मिळ झाले आहेत. असो. तर डाॅक्टर नवरे यांच्याकडे सौ.उर्मिलाचं नाव नोंदविलं होतं. सातव्या आठव्या महिन्यात डाॅक्टरांना उर्मिलाच्या तब्येतीत बिघाड वाटून त्यांनी डाॅ. मोघे यांच्या पॅथाॅलाॅजी लॅब मधे तपासणी करीता रेफर केलं आणि उर्मिलाला कावीळ झाल्याचं निदान झालं!

उर्मिलाला पुन्हा एकदा तपासून, डाॅ. नवरे काहीसे गंभीर होत मला म्हणाले, 'मला असं वाटतं की हे बाळंतपण आपण मुंबईला करावं, कारण बाळंतपण कठीण आहे, मूल अथवा आई कुणीतरी एक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्मिलाला रक्त देणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही तिला मुंबईला घेऊन जा!' ते ऐकून मी ही उदास झालो, पण विचारपूर्वक डाॅक्टरांचे दोन्ही हात हातात धरून त्यांना म्हटलं, डाॅक्टर हे बाळंतपण तुमच्या सारख्या सत्वशील आणि माणुसकी जपणार्या व्यक्तीच्या दवाखान्यातच व्हावं असं मला वाटतं, शिवाय महत्वाचं म्हणजे माझा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास आहे!आणि महाराज कुठे नाहीत?ते शेगांवला आहेत!मुंबईला आहेत!पण इथे सुद्धा आहेतच की!तेव्हा नाही म्हणू नका, ते ऐकून डाॅक्टरही भावूक झालेत, म्हणाले ठीक आहे तुमचा एवढा विश्वास आहे तर करुया आपण. मी तुम्हाला शब्द देतो की, मी प्रयत्नात कुठलीही कसूर करणार नाही आणि तुम्हीही गजानन महाराजांजवळ आपल्या सर्वांसाठीच प्रार्थना करा!

मी घरी येऊन लगेच महाराजांच्या समोर आसनस्थ झालो, माझ्या नजरेसमोर विसाव्या अध्यायातील रामचंद्र पाटलांच्या कन्येविषयीच्या ओव्या आल्यात. ही असता गरोदर/प्रसंग आला दुर्धर/प्रसुतिची वेळ फार /कठीण स्त्री जातीला/मोठ्या कष्टाने प्रसुती/झाली तिची निश्चिती..

मी महाराजांना हात जोडले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना म्हटलं 'महाराज आज तसाच काहीसा प्रसंग उदभवला आहे ,या लेकरावर कृपा करा. उर्मिला माझी पत्नी आहे, तिला तुम्ही तुमची सून किंवा मुलगी समजा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा भरवसा रिक्त जाऊ देऊ नका, सर्व काही योग्य पध्दतीने होऊन जाऊ द्या!

माझी प्रार्थना महाराजांच्या चरणी रुजू झाली. 26 ऑगस्ट 1983 रोजी, रात्री 11.30 वाजता सुखरूप प्रसुती होऊन आम्हाला मुलगा झाला. प्रसुतीनंतर डाॅ. नवरे आनंदानं मला म्हणाले, काविळीचा जराही त्रास बाळ बाळंतिणीला झाला नाही. तुझी श्रध्दा अपार आहे. महाराजांनी तुझी हांक ऐकली, दोन्हीही सुखरूप आहेत.

प्रसुती नंतर सौभाग्यवतीला सातव्या दिवशी वांत्या झाल्या व जणू संपूर्ण कावीळ बाहेर पडली. त्यानंतर तिला कसलाही त्रास झाला नाही. गजानन महाराज हाकेला धावले.

त्या दिवसापासून जणू दरवर्षी शेगांवची वारी करण्याचा माझा अलिखित नेम होऊन तो मी आज अठ्ठावीस वर्षे नेमाने पाळतो आहे. शक्यतो सोबत कुणाकुणाला घेऊन जाण्याचाही प्रयत्न करतो आहे.

मी लक्ष्मण ताम्हणकर, ज्या माझ्या खामगावच्या आत्यामुळे मी गजानन महाराजांचा भक्त झालो, ती आज हयात नाही. ती जर आज असती तर तिला हे सर्व पुन्हा ऐकून खूप आनंद झाला असता आणि तिने मला भरभरुन आशीर्वाद देत म्हटलं असतं ' लक्ष्मण, तुझा फोडा पासून तर बाळंतपणा पर्यंत सर्व वृत्तांत ऐकला!खर तर तुझा गळू चा जो अनुभव आहे, तो म्हणजे वास्तविक माझ्या हाकेलाच महाराज धावल्याची कथा आहे, तुला सांगते त्या रात्री मी महाराजांसमोर तुझ्यासाठी रडले होते, वेदना तुझ्या होत्या पण अश्रू माझ्या डोळ्यात होते. बाळा कितीही मोठा झालास तरी महाराजांना विसरू नकोस! त्यांच्याच कृपेने हे सर्व आहे, तेव्हा त्यांचं नामस्मरण सतत करीत रहा आणि म्हणत रहा.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव--लक्ष्मण चिंतामण ताम्हणकर

सौंदाळे, ता.देवगड, सिंधुदुर्ग

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.

9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page