top of page

अनुभव - 78

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 78🌺)

*'जन म्हणती मेला, मेला,उंचावरूनी खाली पडला'*

जय गजानन! दि. 11 ऑगस्ट, शनिवार,2018 चा अमावस्येचा तो दिवस, त्या दिवशीचा तो अपघात, तो जीवघेणा प्रसंग, ती चिंताग्रस्त करणारी घटना, आम्ही विसरू शकत नाही!आम्ही म्हणजे, 'सद्गुरू धाम गजानन महाराज मंदीर, त्रागड अहमदाबादचे सर्व विश्वस्त 'आणि संबंधित लोक!

इ.स.2012 ला अहमदाबाद येथे 'त्रागड' या भागात आम्ही काही लोकांनी, श्री गजानन महाराज मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला, महाराजांच्या कृपेने मंदिराची उभारणी झाली, त्या मंदिरात आम्ही श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्रेय, अशा सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराच्या गाभार्यात प्रसन्नता विलसू लागली. मंदिराचे सभागृह प्रशस्त झाले, सभागृहास जोडून पुढे असलेला ओटा, त्या ओट्यावर , लोखंडी बार, लोखंडी पट्ट्यांची चौकट आणि त्या वर फायबर शीटस्, असं साधारण बारा फूट उंचीचं छत घालण्यात आलं. त्या औरस चौरस छताला समोर रस्त्याच्या बाजूने पाऊसाची सर आत येऊ नये म्हणून वर एक साधारण दोन बाय अठरा आकाराची जाड पत्र्याची शीट लावण्यात आली. छत चांगलं मजबूत पध्दतीनं उभं झालं.

आमच्या मंदिरात जे जे काही फेब्रिकेशनचं काम झालं आहे, ते श्री उदयभाई यादव यांच्या हातून झालेलं आहे. उदयभाई एक भाविक माणूस!मंदिरात आल्यावर प्रथम महाराजांना नमस्कार नंतर काम सुरू. बरीच वर्षे मंदिराचं काम करीत असल्याने, आम्हा सर्वांशी चांगलेच परिचित झालेले. अलीकडील काही दिवसांपासून त्यांचा मुलगा 'पप्पूभाई 'काम शिकणे आणि पुढे वडिलांना मदत करणे या हेतूने त्यांच्या कामात सोबत असतो.

तर झालं असं की इ.स.2012 ला उभारलेलं ते शेड, ते छत, इ.स.2018 पर्यंत म्हणजे सहा वर्षं डौलानं उभं राहीलं परंतू इ.स.2018 ला कार्पोरेशनने रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला आणि मंदिराला एक नोटीस वजा आदेश प्राप्त झाला, ज्यानुसार शेड काढणं आवश्यक झालं आणि मंदिराच्या विश्वस्त मंडळाने शेड काढण्याचा निर्णय घेतला, शेड काढण्याचं ते काम उदयभाईंना देण्यात आलं. दि. 11ऑगस्ट, शनिवार, 2018रोजी हे काम करण्यात यावं असं ठरलं.

त्या शनिवारी सकाळी ठरल्याप्रमाणे, मंदिरासमोर असलेले ते शेड काढण्याचं काम सुरू झालं. स्वतः उदयभाई कामावर हजर होते. त्यांच्या देखरेखीखाली, क्रमशः एकेक फायबरची शीट नट बोल्ट काढून खाली उतरविण्याचं काम होत होतं, वरून एकानं शीट द्यावी आणि दुसर्यानं ती खाली उतरवून घ्यावी, असं काम होत होतं. दुपार होत आली होती. उदयभाईंना दुसरीकडे काही काम होतं, म्हणून काही सूचना देऊन ते दुसरीकडे कामाला गेलेत. पप्पूभाई आणि एक कामगार असे दोघं काम करीत होते .आता एखाद दुसरीच फायबर शीट काढणे बाकी होते. पप्पूभाई वरून शीट देण्याचं काम करीत होते, एक शीट पप्पूभाईंनी देण्यासाठी उचलली, त्या शीटला ती जाड पत्र्याची शीट जी पाऊस आत येऊ नये म्हणून लावली होती ती एकीकडून जुळलेली होती. नेमकं शीट उचलताना तो भाग वर होता, वरून हाय टेंशनची विजेची तार गेलेली आहे. त्या टीन पत्र्याचा हलकासा स्पर्श वर तारेला झाला आणि क्षणार्धात त्यात विद्युत प्रवाह प्रवाहित होऊन काही कळायच्या आत पप्पूभाईंना जोरदार शाॅक लागला आणि नशिबानं त्यांच्या हातून ती फायबर शीट सुटली आणि धाडकन पप्पूभाई चक्क बाराफूट वरून खाली फेकल्या गेले.

हे दृश्य ज्यांच्या डोळ्यासमोर घडले त्यांना क्षणात पुढील स्थितीची जाणीव झाली. ते पाहून जे गुजराती भाषिक होते त्यांनी गाभार्याच्या दिशेने नमस्कार केला, त्यांच्या तोंडून उद्गार निघाले 'जय गुरुदेव, बचाओ पप्पू भाईं ने!' आणि जे गजानन विजय वाचणारे भाविक होते त्यांच्या मनात स्वाभाविकपणेच शब्द आलेत, 'जन म्हणती मेला मेला, उंचावरूनी खाली पडला, आता कशाचा वाचे तो. ' सर्वांनीच अंतर्मनातून गजानन महाराजांना आर्ततेने प्रार्थना केली 'वाचवा देवा या भक्ताला '.जोरदार आवाज झाल्याने आजूबाजूच्या अनेकांचं लक्ष त्या दिशेने वेधल्या गेले. सगळ्यांनी घटना स्थलाकडे धाव घेतली, आपल्याला आता काय दृश्य पहायला मिळणार, या शंकेने महाराजांचा धावा करीत सर्व तिकडे धावले. पप्पूभाई खाली निपचित पडले होते, तिथे खाली काही तुळशीची झाडं होती आणि एक लहान ओटा होता पण नशीबानं पप्पूभाईंचं डोकं तुळशीवर पडल्यानं डोकं वाचलं होतं, एकच हाहाकार झाला, केवळ काही मिनीटात शे दीडशे लोक तिथे जमा झाले, सर्व विश्वस्तांना घटना कळविण्यात आली, ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि जवळ असलेल्या पुखराज हाॅस्पिटल मधे पेशंटला दाखल करण्यात आलं परंतु तिथे सिनियर डॉक्टर त्यावेळी नव्हते, म्हणून पप्पूभाईंना पंचशील हाॅस्पिटल मधे नेण्याचा निर्णय घेऊन अॅम्ब्युलन्स त्या दिशेने निघाली. एव्हाना सर्वच विश्वस्त, उदयभाई, असे सर्व लोक दवाखान्यात दाखल झाले होते.

दवाखान्यात पोहोचलो तेव्हा पप्पूभाई जिवंत होते. हात पायही शाबूत होते, म्हणजे निदान तुर्तास प्राणहानी झालेली नाही या करीता सर्वांनी महाराजांचे आभार मानले. डाॅक्टरांनी सर्व प्रकारच्या मेडीकल टेस्ट सुरू केल्या आणि सभोवतालच्या भक्तांनी महाराजांचा धावा! 'हे गजानन बाप्पा कृपा करीने!पप्पूभाईने जल्दी सारू कर जो! पप्पूभाई आय. सी यू. मधे भरती होते आणि बाहेर सर्व अस्वस्थपणे महाराजांना साद घालीत होते.उदयभाई बेचैन होऊन कधी बसायचे कधी उठायचे, मधेच आय. सी. यू .मधून डाॅक्टर काय म्हणतात याचा अंदाज घ्यायचे, जणू विजय ग्रंथातील ओळी अंधुक आठवत असावेत, 'देवा माझे मुल, तझ्या दारात मृत तर, तुझी नाचक्की होईल सर्वत्र. '

दोन दिवसात सर्व तपासण्या झाल्या, डाॅक्टर सकट सर्वांनाच आश्चर्य वाटलं, सगळे रिपोर्टस् पूर्ण नाॅर्मल आले होते. इतक्या वरून पडल्यावर कुठेही फ्रॅक्चर नाही आणि मोठा शाॅक लागुनही जणू काही झालंच नाही, इलेक्ट्रिक बोर्डाचा स्टाफही तिथे हजर झाला होता, त्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या हाय टेंशन लाईनचा करंट लागल्यावर माणूस वाचणं शक्य नाही, निदान काही ना काही स्वरुपात एखादं व्यंग तरी रहातंच, पण तसं काहीही झालं नाही. खरोखरच 'पडत्या मजूरा झेलीयले, बघती जन आश्चर्य भले!'अशी स्थिती झाली.

पप्पूभाईंच्या मते गुरूकृपेने झालेला त्यांचा तो पुनर्जन्म होता. दवाखान्यात भरती करताना, ही आपली नैतिक जबाबदारी आहे या भावनेने मंदिरातर्फे रुपये वीस हजार जमा करण्यात आलेत.पेशंटला डिसचार्ज मिळताना जवळपास तेवढीच उर्वरित रक्कम देण्यास मंदीर तयार होते परंतू पाणावलेल्या डोळ्यांनी उदयभाई तिथे असलेल्या सर्वांना म्हणाले 'महाराजांनी त्यांच्या दारात आज माझं मूल वाचवून माझ्यावर कृपा केली आहे. अहो मी एवढा कृतघ्न कसा होऊ? तसंही मी तुमच्या ऐवजी इथे पैसे देणं म्हणजे एका अर्थी मंदिरात पैसे देणंच नाही का?तेव्हा नाही म्हणू नका.'त्यांच्या या म्हणण्याचा सर्वांनीच मान ठेवला.

पप्पूभाईंना घेऊन उदयभाई त्यांच्या घराकडे निघाले आणि बाकी उपस्थित आपल्या मार्गाकडे वळले, पण सगळे वेगवेगळ्या दिशेने गेले तरी, ज्याच्या त्याच्या मनात भावना एकच होती, ती होती.. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- रामनाथ जोशी

विश्वस्त, सद्गुरू धाम गजानन महाराज मंदीर

त्रागड, अहमदाबाद.

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्री गजानन अनुभव !!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page