अनुभव - 8
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
" श्री "
गजानन महाराज की जय( अनुभव 8 🌺)
*भक्तांचे हितचिंतक गजानन महाराज. *
माझा मोठा मुलगा आज एका नामवंत कंपनीत टेस्टिंग डिपार्टमेन्ट मधे चांगल्या हुद्यावर काम करतो पगार तर चांगला आहेच पण त्याही पेक्षा आज तो त्याच्या क्षेत्रात चांगलं नाव कमावून आहे.त्याचा अधिकार,त्याच्या शब्दाला वजन आहे. वास्तविक पाहता सुरवातीला त्याला या डिपार्टमेन्ट मधे काम करण्यात अजिबात रुची नव्हती त्याचा इंटरेस्ट होता डिझाईनिंग मधे!तिथे त्याला काम हवं होतं. खरं सांगायचं तर त्याच्या आवडीचं डिपार्टमेन्ट तर खूप दूरची गोष्ट पण तो हुशार असला तरी बाजारात असलेल्या मंदीच्या परिस्थिती मुळे त्याला नोकरीच मिळण्याची मुश्किल होती. मला आठवतं तो इ.स.2005 साली B.E.(इले. टेली. )पास झाला आणि त्याचा नोकरीचा शोध सुरू झाला. रोज सकाळी वर्तमान पत्र,एम्प्लाॅयमेन्ट एक्सचेन्ज,नोकरी डाॅटकाॅम,ऑनलाईन शोध,अर्ज आणि रिझ्यूम आणि काय काय. सर्व मार्गांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण नोकरी लागण्याचे नाव नाही. असं होत होत 2006 चा मार्च उजाडला,एक वर्ष पूर्ण झालं आता नोकरी सोबत एक चिंता अजून अशी निर्माण झाली की जर 2006 ची बॅच बाजारात उतरली तर जुन्या लोकांची किंमत स्वाभाविकपणेच कमी होणार त्यामुळे अजुनच नाराज झाला उदास झाला आणि त्याला त्याच्या बाबांची आणि गजानन महाराजांची आठवण झाली. तो मला म्हणू लागला बाबा तुम्ही लहानपणापासून गजानन महाराजांचं एवढं करता आणि सारखं त्यांच्या विषयी सांगता तर एकदा माझ्या साठी तुम्ही त्यांना साकडे घाला एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. मग रोज त्याची माझ्या मागे एकच भूण भूण सुरू झाली आणि माझ्याच मनावर दडपण यायला लागलं मनात वाटु लागलं पोरानी तर माझ्याच कसोटीची वेळ आणली,त्यातच एक असा योग घडून आला की माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं आणि साक्षगंध 30 मार्च गुढीपाडवा मुहूर्तावर श्री क्षेत्र शेगांव येथे करण्याचं निश्चित झालं. प्रत्यक्ष शेगांव ला जाऊन प्रार्थना करण्याची संधी चालून आली. मला अजूनही स्पष्ट आठवतं, गुढीपाडव्याच्या दिवशी मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली,विनवणी केली आणि पोरासाठी साकडं घातलं आणि नागपूरला परतलो. चारच दिवसात पुणे रांजणगाव MIDC येथील JABIL (जाबील) कंपनीतून फोन आला. ताबडतोब टेस्टिंग डिपार्टमेन्ट मधे रुजू व्हावे! मुलाला पत्राचा आनंद झाला पण संधी डिझाईनिंग मधे नाही म्हणून तो थोडा खट्टू झाला. मी म्हटलं हे बघ महाराजांना विनंती केली आहे आता मागे हटायचं नाही आणि शक्य आहे यातच तुझं हित असेल!तु लक्षात घे. माऊलींनी हरीपाठात म्हटलं आहे 'मनो मार्गे गेला तो तेथे मुकला : हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. संतांना आपलं हित जास्त चांगलं समजतं,त्यामुळे आपल्या वाटण्यापेक्षा त्यांच्या म्हणण्याला मान दे!त्यानी ते ऐकलं आणि पुढे तो 6एप्रिल 2006 रोजी राम नवमी च्या मुहूर्तावर नोकरीवर रुजू झाला.
गुढीपाडवा ते रामनवमी एवढ्या काळात माझी प्रार्थना फळास आली. पुढे त्याच्याच बाबतीत महाराज कृपेने एक छान गोष्ट घडली. इ.स.2013 ची ही घटना आहे. त्यावेळी त्यानी ETON ( इटाॅन) कंपनीत नोकरी धरली होती आणि त्याला कंपनीतर्फे अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र त्यावेळी व्हिसा देण्याच्या बाबतीत अमेरिकन पाॅलिसी प्रमाणे त्याला दोनदा व्हिसा नाकारण्यात आला त्यामुळे तिसर्यांदा जेव्हा पुन्हा मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याचं ठरलं त्यावेळी तो दडपणाखाली आला आणि चेहरा पाडून मला म्हणाला ' बाबा तुम्हाला शेगांवला जावं लागतं!' मी ज्या वेळी मुंबईला मुलाखत देईन साधारण त्याच वेळी तुम्ही शेगांवला महाराजांसमोर रहा म्हणजे माझं काम होईल. मग काय मुलगा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि त्याचे आई. बाप, शेगांवला हजेरी लावण्यासाठी निघाले. तिकडे त्याची मुलाखत पार पडली आणि इकडे आम्ही मनापासून गजानन महाराजांना प्रार्थना केली अर्थातचपुढे व्हिसाचे काम यशस्वी झाले आणि तो महाराजांच्या कृपेने अमेरिकेत जाऊन आलाआणि महाराजांनीच त्याला निवडून दिलेल्या टेस्टिंग डिपार्टमेन्ट मधे अधिक अनुभव समृद्ध झाला.
आता जेव्हा केव्हा त्याला म्हटल्या जातं की 'सर तुमच्या या क्षेत्रातील अधिकाराला सलाम करायलाच हवा 'तेव्हा तेव्हा तो मनोमन मान्य करतो की आपलं हित कशात आहे हे आपल्या पेक्षा गजानन महाराजांनाच जास्त कळतं '
शेवटी काय 'संत हेच भूमीवर..चालते बोलते परमेश्वर..तयांचा आधार ज्यासी मिळे,तोची मोठा..
जय गजानन! अनुभव-- मोहन वराडपांडे. नागपूर
शब्दांकन..जयंत वेलणकर. 9422108069
🌺 आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comentários