अनुभव - 9
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय...( अनुभव 9 🌺 )
* बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. *
माझा मोठा मुलगा कौंत्येय आणि लहान मुलगी रेणुका. रेणुका च्या जन्माच्या वेळी आम्हाला मुलगी व्हावी अशी आमची इच्छा होती म्हणून मी गजानन महाराजांना नवस बोलली की जर मुलगी होईल तर मी गुरूवारचा उपास करीन,मी गजानन महाराजांना असं म्हटलं याचं कारण माझी आई! मी लहान पणापासून आईला कधी गजानन विजय ग्रंथ वाचताना तर कधी महाराजांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालताना पहात आली. एकदा तर आईला इतकं डिप्रेशन आलं की जीवन निरस झाल्या सारखी तिची वागणूक होती पण गजानन विजय ग्रंथ पारायणाने ती त्या संकटातून बाहेर आल्याचं मी जवळून अनुभवलं आहे. पुढे आईने धार्मिक विषयावर लिखाणही सुरू केले.
असो,माझ्या नवसाला महाराज तर पावले आम्हाला मुलगी झाली,पण मी मात्र त्या आनंदात गुरूवारचे उपास विसरली. माझ्या शब्दाला जागली नाही. असं विस्मरण भक्ताला जेव्हा केव्हा होतं तेव्हा महाराज तशी जाणीव करून देतात. निदान असे काही संकेत आपल्याला मिळतात की आपल्याला केलेल्या नवसाची जाणीव व्हावी. जसे आपण पोथीत एकोणविसाव्या अध्यायात वाचतो कि तुकारामाला महाराजांनी नवसाची जाणीव करून दिली...
.......दोन तीन मुले झाली/परी नवसाची न राहिली/ आठवण तुकारामा भली/संतती च्या मोहाने/...
दासगणूंनी म्हटलं आहे संकट आल्यावर महाराजांचा नवस चुकवू नये या गोष्टीची जाणीव तुकारामाला झाली. पण हे सर्व असलं तरी विस्मरण हा मानवी स्वभाव आहे.मी त्याला कशी अपवाद असेन? रेणुका तीन वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट,आमच्या विदर्भात महालक्ष्म्यांचा सण मोठ्या प्रमाणात केल्या जातो. आम्ही सजावटीसाठी मोठे लोखंडी राॅड आणले होते. भिंतीला टेकून ठेवले होते. ते राॅड घसरून रेणुका च्या डोक्याला मार लागला,जखमेला दोन टाके घालावे लागले पण तेवढ्यात निभावलं तेव्हा गजानन महाराजांना प्रार्थना केली पण नवसाची आठवण तरिही झाली नाही. नंतर असेच किरकोळ आजार तिला होत राहीले पण केलेला नवस काही आठवला नाहीआणि मग काही दिवसांनी तिला कुठलंही दृष्य कारण नसताना जोरदार सर्दी झाली आणि काही केल्या ती सर्दी काही कमी होइना. घरगुती इलाज झाले,वेगवेगळे डाॅक्टर झाले,कान नाक घसा तज्ञ झाले,एक्सरे झाला, वेगवेगळ्या टेस्ट्स रिपोर्ट्स झाले पण सर्दी थांबण्याचे लक्षण दिसेना आणि मग मी त्या विचाराने हैराण झाले आणि एक दिवस पोथीत एकोणविसाव्या अध्यायात वर उल्लेख केलेल्या ओव्या वाचताना अचानक महाराजांना गुरूवारच्या उपवासाचे बोलल्याचे स्मरण झाले आणि लगेच क्षमा मागून संकल्प सोडून उपास सुरू झाला..अर्थातच काहीच दिवसांनी तिची तब्येत ठणठणीत झाली.
या सर्व घटना क्रमाचा मी विचार केला तेव्हा मला विस्मरणाचा पश्चात्ताप निश्चितच झाला पण कुठेतरी एक विचार हाही आला की रेणुकाकडे महाराजांचं लक्ष आहे.
मला आठवतं काही वर्षा पुर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी ची गोष्ट,मी कौंत्येय आणि रेणुका आम्ही घरा जवळील गजानन महाराज मंदिरात वर्षाचा पहिला दिवस म्हणून संध्याकाळी दर्शनासाठी गेलो. त्या वेळी अगदी तुरळक लोक तिथे होते ,तेही परतण्याचा स्थितीत. सहसा आम्ही दोन तीन मिनिटं शांत बसतो नंतर अकरा प्रदक्षिणा पूर्ण करून प्रार्थना करून परततो. त्या दिवशी आम्ही प्रदक्षिणा सुरू करणार तोच तिथे एक बाई दर्शन घेऊन पेढे वाटू लागल्या,रेणुका ला पेढा खूप आवडतो. मोठ मोठ्यांना प्रसादाचा,पेढ्याचा मोह आवरत नाही रेणुका तर लहानच होती,तिचं लक्ष पेढ्याकडे गेलं आणि ती अधीर झाली,मी तिला दटावून म्हटलं 'आधी प्रदक्षिणा नंतर उरला तर पेढा ' .आमच्या सहा सात प्रदक्षिणा झाल्या असतील,त्या पेढे वाटणार्या बाई तिथून निघून गेल्या रेणुकानी माझ्या कडे रागाने पाहिलंआणि तणतणत नाराजी व्यक्त करत बाकीच्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रसाद न मिळाल्याची खंत तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. आमची प्रार्थना झाली आणि आम्ही बाहेर पडलो मी आणि कौंत्येय गाडी पर्यंत पोहोचलो पण रेणुका आली नाही आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं कुठे गेली?आणि दोनच मिनिटांत हसत मुखाने ती बाहेर आली पाहिले तर तिच्या हातावर 'पेढा ' आई मला त्या आजोबांनी पेढा दिला! कोण आजोबा कुठले?आम्ही दोघे ही आत जाऊन पाहू लागलो आम्हाला आत कुणीही दिसले नाही. काही असो रेणुका ला महाराजांचा प्रसाद मात्र मिळाला आणि महाराजांचं तिच्याकडे लक्ष आहे हे माझ्या लक्षात आलं.
अगदी मागच्याच महिन्यातील अजून एक घटना!रेणुका तिच्या टिप टाॅप काॅन्व्हेन्ट शाळे कडून खो खो खेळते,मागील वर्षी शाळे कडून खेळाडूंना खेळताना वापरण्यासाठी ड्रेस देण्यात आला आणि शाळेनी स्पष्ट सूचना दिली की हा ड्रेस दोन वर्ष वापरावयाचा आहे ड्रेस गहाळ झाल्यास पूर्ण जबाबदारी विद्यार्थीनीची असेल. मागील वर्षी रेणुकाचा खेळ खूप छान झाला. मुली प्रॅक्टीस ला ड्रेस घेऊन शाळेत जायच्या. ते वर्ष संपलं,मॅचेस संपल्या मधे काही महिन्यांची गॅप गेली आणि नवीन वर्ष आलं शाळेत खेळा संबंधी नोटीस आली आणि विशिष्ट तारखेला ड्रेस सह हजर राहण्याची सूचना आली आणि घरी ड्रेस चा शोध सुरू झाला पण ड्रेस काही सापडेना म्हटलं शाळेत विचारून पहा,पण शाळेनी नाही आहे म्हटलं मग घरी सर्व कपाटे रिकामी केली पण ड्रेसचा पता नाही शाळेत पुन्हा विचारलं तर टीचरनी चिडून आमच्या जवळ नाही असं सांगितलं. मग आता ड्रेस गेला कुठे?घरी आम्ही सगळे बेचैन. डोक्यात सारखा एकच विचार ,मग काय आपली धाव महाराजांपाशी.मला आठवतंय गुरूवार होता मी रेणुकाला म्हटलं तू गजानन महाराजांना म्हणून बघ,रेणुकानी महाराजांना हात जोडून म्हटलं 'माझा ड्रेस सापडत नाही आहे. मला मदत करा मी मंदिरात 108 प्रदक्षिणा घालीन ' दुसरे दिवशी शुक्रवारी शाळेतून घरी आली ते आई आई,ओरडतच पाहिलं तर तिच्या हातात ड्रेस. मला पहाताच ड्रेस बाजूला ठेवलाआणि मला बिलगून सांगू लागली अगं आज शाळेतील मावशी दोन नंबरचा ड्रेस कुणाचा आहे?विचारत वर्गात आल्या नजर चुकीने तो सापडत नव्हता, कागदा खाली झाकून गेला होता. अचानक आज तो सापडला. मी रेणुका ला म्हटलं जाऊ दे मिळाला नं , दे टाळी 'जय गजानन 'तिनी पण मला टाळी देत जोरात म्हटलं ' जय गजानन ' आणि मग एकदम गंभीर झाली,म्हणाली आई मी तयार होते आपल्या ला मंदिरात जायचं आहे , 108 प्रदक्षिणांचं लक्षात आहे नं? लगेच मी म्हटलं चल बाई, बोलिलेला नवस कोणी / महाराजांचा चुकवू नये .त्या दिवशी प्रदक्षिणा घालताना रेणुकाच्या चेहर्यावरील आनंद पाहून मनोमन महाराजांचे आभार मानून मन जयघोष करु लागले..'जय गजानन ''जय गजानन '
🌺अनुभव-- श्रध्दा देशपांडे ..नागपूर.
शब्दांकन-- जयंत वेलणकर. 9422108069
आपल्याजवळगजाननमहाराजांविषयीकाहीअनुभवअसल्यासस्वागतआहे.
Comments