अनुभव १२९
- Jayant Velankar
- Jun 18, 2020
- 4 min read
Updated: Aug 2, 2020
"श्री"
श्री गजानन महाराज की जय
महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव
जय गजानन! सद्गुरूंसमोर हात जोडून आपण प्रार्थनेसाठी उभे झालो की त्यांना काही ना काही मागत असतो. असं म्हणतात की, सद्गुरूंना प्रार्थना करताना एक ठरलेली प्रार्थना असावी, पण आपण सामान्य माणसं! आपल्या मनातील विचारांचा वेळोवेळी आपल्या प्रार्थनेवर, मागण्यावर परिणाम होणारच. त्या दिवशी असंच झालं, मी महाराजांसमोर हात जोडले आणि नकळत ओळी आठवू लागल्या ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया.'
अर्थात असं होण्यास कारणही तसंच होतं. मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी गजानन महाराजांना पाच महिने शेगांवची वारी करीन असं बोलले होते. त्याप्रमाणे मी चार महिने सलग शेगांवला दर्शन घेऊन आले होते. मला आठवतं तो २०१८ चा नोव्हेंबर महिना होता. ती पाचवी वारी! पण सतत काही तरी अडचण येऊन शेगांवला जाण्याचा योग सारखा टळतच गेला. अनेक वेळा निघण्याची तयारी व्हावी अन् ऐन वेळेवर अडचण यावी असं झालं. मला आतून रडायला यायला लागलं. नोव्हेंबरची २७ तारीख आली. मिस्टर रेल्वेत नोकरीला आहेत. त्यांना मंगळवार ऑफ असतो. मंगळवारी आम्ही शेगांवला जाण्याचं ठरविलं ,गीतांजलीत दोन जागा सांगून ठेवल्या. पण मिस्टरांना ऐन वेळेवर मिटींग असल्याचं सांगण्यात आलं. अशा वेळी आपल्याला नेमकं काही सुचतही नाही. मी बहिणीला विचारलं, ती बोलली, ठीक आहे आपण सकाळी निघू .पण रात्री साडेदहाला तिच्या मुलाला अस्थम्याचा जोरदार अटॅक आला. अर्थातच तिचं येणं बारगळलं. आता रात्र खूप झाली होती. सकाळीच गीतांजली होती एवढ्या रात्री कुणाला विचारणार?, माझ्या मनाचा निर्धार झाला की एकटंच शेगांवसाठी निघायचं. मी महाराजांसमोर उभी झाले. त्यांना म्हटलं महाराज माझ्या सोबत शेगांवला चला. उद्या सकाळी निघायचं आहे. सकाळी लवकर मिस्टर रेल्वे स्टेशनवर सोडणार होते. त्या प्रमाणे आम्ही निघालो. मी महाराजांसाठी गाडीचं मागील दार उघडलं, म्हटलं महाराज बसा,मग दार लावलं. स्टेशनवर कार थांबली मी उतरले, पुन्हा गाडीचं मागील दार उघडलं, म्हणाले, चला महाराज. आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलो थोड्या वेळात गाडी आली. आम्ही ठरलेल्या डब्यात पोहोचलो. सांगितल्याप्रमाणे दोन सीट्स होत्या. मी खिडकीशी बसले. बाजूच्या सीटवर एक उशी टेकवून ठेवली होती. महाराजांसाठी ती सीट आहे, या अर्थाने मी त्या सीटकडे एक कटाक्ष टाकला. प्रवासात त्या सीटवर अन्य कुणी आलच नाही. शेगांवला आॅटो केला. एका बाजूला मी बसले. चार पावलं पुढे जाताच एका बाईने ऑटोला हात दाखविला.माझ्या बाजूनेच ती असल्याने मी बाजूला सरकण्याचा विचार करणार तोच ती दुसरे बाजूने ऑटोत आली आणि ऑटोत जणू दोन व्यक्ती असाव्यात अशा बेताने दुसरे बाजूला कोपर्यात बसली. आम्ही मंदिरात पोहोचलो. छान दर्शन झालं. मी महाप्रसादासाठी रांगेत लागले. माझ्या समोर एक तरूण भक्त होता. आम्ही दोन तीन नंबरवर आले असू. अचानक तो तरूण बाजूला झाला आणि बुजुर्ग माणसाला मान द्यावा, तसं म्हणाला, तुम्ही आधी प्रसाद घ्या मी नंतर घेतो.मला आश्चर्य वाटलं. मी प्रसाद घेऊन टेबलकडे गेले, एक जागा घेऊन समोर प्रसादाचं ताट ठेवलं. ज्यांनी शेगांवला महाप्रसादालयात प्रसाद घेतला आहे त्यांना कल्पना आहेच की तिथे सेवेकरी मधे एकही जागा रिकामी सुटू देत नाहीत. पण त्या दिवशी माझ्या बाजूला अन्य कुणीही बसलं नाही. त्या संपूर्ण काळात आणि प्रवासात मला सतत महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होत राहिली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा गीतांजलीत माझ्या बाजूला अन्य कुणीही आलंच नाही. नागपूर पर्यंतचा प्रवास सुखरूप पार पडला..प्रवासात एकटेपणा अजिबात जाणवला नाही. सतत कुणाची तरी सोबत आहे अशी जाणीव होत राहिली.पाचवी वारी पूर्ण करून मी घरात पाऊल ठेवलं तेव्हा समाधानानं अंतःकरण भरून गेलं होतं.
महाराजांना सोबतीचं आवाहन केलं आणि त्यांनी साथ दिली, असाच अनुभव पुढे अजून एकदा आला, मात्र यावेळी महाराजांनी माझ्या प्रार्थनेवरून माझ्या मुलाला काहीसा सुखद अनुभव दिला. मी सौ. संगीता उघाडे, माझा मुलगा निशांत त्याच्या तीन चार मित्रांसह २०१९च्या जून महिन्यात ट्रीपसाठी म्हणून बंगलोरला जायला निघाला. बंगलोर पर्यंत प्लेननी जायचं आणि तिथून पुढे 'झूम ' कार घेऊन कोईम्बतूर, मुन्नार असं फिरून यायचं असा त्यांनी बेत आखला. त्याप्रमाणे ते बंगलोरहून कार घेऊन निघाले. निशांत स्वतः गाडी चालवित होता. घनदाट जंगल, रस्त्याच्या बाजूला खोल खाई , रस्ता खराब अशा परिस्थितीत ते गुगल मॅपच्या सहाय्याने पुढे सरकत होते. नुकताच पाऊस पडून गेलेला. रस्त्यावर खड्डे. एका चिंचोळ्या जागी गाडीचं चाक अचानक खड्ड्यात फसलं. रस्ता सुनसान. आजूबाजूला कुणी नाही. मुलं गाडीतून खाली उतरलीत. सर्व खूप घाबरले.गाडी तिथून काढायची कशी? हा यक्ष प्रश्न होता. किंचीतशी चूक गाडी खाईत नेण्यास पुरेशी होती.
त्या दिवशी गुरुवार होता. एकादशी होती. इकडे का कुणास ठाऊक? परक्या गावात अनोळखी ठिकाणी, मुले दुसरीच गाडी घेऊन जाणार, या कल्पनेनं माझं मन अस्वस्थ होतं. साधारण तीच वेळ असावी, माझं पारायण पूर्ण झालं होतं. महाराजांचा नामजप करीत होते. महाराजांना विनंती केली. ' महाराज मुलांसोबत असा. त्यांची काळजी घ्या.
तिकडे मुलं हतबल होऊन चिंता करीत होती. तो अचानक पांढरे शुभ्र कपडे घातलेले एक गृहस्थ तिथे आले. त्यांनी मुलांना धीर देत म्हटलं काळजी करू नका. निशांतला ते म्हणाले आत बस गाडी सुरू करून रिव्हर्स घे. एक पाय क्लच वर आणि दुसरा ब्रेकवर असू दे. त्याप्रमाणे निशांतने गाडी रिव्हर्स घेतली आणि गाडी सुरळीत बाहेर आली. गाडी बाहेर आल्यावर काही मिनिटातच मुलं भानावर आली की त्या गृहस्थांचे आभार मानायला हवेत. पण मुलं आभार मानू शकली नाहीत कारण तिथे कुणी नव्हतंच. निशांतने मनातल्या मनात गजानन महाराजांचं स्मरण केलं.
मुलं नागपूरला परतली. तरूण वयाचा एक गुणधर्म असतो. ते सहसा अशा गोष्टी आई वडिलांच्या कानावर घालतीलच असं नाही. निशांत या संदर्भात माझ्याशी काही बोलला नाही. मधे दोन दिवस गेलेत. मला आठवतं तो २० जूनचा दिवस होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास आमच्या घरासमोर दोन वासुदेव आले .या आधी कित्येक वर्षात मी वासुदेव पाहिले नव्हते. मी निशांतला काही पैसे देऊन त्यांना देण्यासाठी बाहेर पाठविलं आणि पाठोपाठ मीही बाहेर गेले. निशांतकडून पैसे घेतले तेव्हा वासुदेव त्याला म्हणाला ' आताच गाडीचं खूप मोठं संकट येऊन गेलं पण तू वाचला. ' ते ऐकून निशांत आश्चर्य चकित झाला आणि नंतर मला सर्व कहाणी समजली.
ते सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. तो तोच दिवस होता की ज्या दिवशी मी महाराजांना म्हटलं होतं, ' महाराज मुलांसोबत असा. त्यांची काळजी घ्या. ' मी धावतच आत गेले. महाराजांसमोर मला ओळी आठवू लागल्या. ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया. चालो वाटे आम्हा तुझाची आधार, चालविशी भार सवे माझा. ' ओळी म्हणून मी महाराजांसमोर गुडघ्यावर खाली टेकले हात जोडले आणि आपसूकच शब्द बाहेर पडले. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ संगीता गजेन्द्र उघाडे ,नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत. फक्त रुपये पन्नास .
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
Comments