अनुभव १३१🌺
- Jayant Velankar
- Jul 30, 2020
- 4 min read
Updated: Sep 10, 2020
" श्री " गजानन महाराज की जय (अनुभव १३१🌺) *प्रापंचिक आणि पारमार्थिक आघाड्यांवरील भक्तांचे मार्गदर्शक, माझे गजानन बाबा!*
जय गजानन! आमच्या लहानपणी आम्ही कथा वाचन करायचो, त्यात कुठलसं आटपाट नगर असायचं. त्यात कधी अत्यंत गरिबीत जगणारं एखादं कुटुंब असायचं. परमेश्वरावर श्रध्दा ठेवून निष्ठेने आणि सचोटीने जीवन जगताना, भगवंताच्या कृपेने पुढे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हायची. पुढे मी लहानाचा मोठा झालो आणि गोष्टीत ऐकलेला असा प्रसंग माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडताना मी पाहिला.
कामती बुद्रुक. ता. मोहोळ जिल्हा सोलापूर हे माझं गाव. तेव्हा आमच्या गावातून श्री गजानन महाराजांची आषाढ पायदळ वारी पंढरपूरला जायची म्हणून मला ' गजानन महाराज ' हे नाव कानावर येऊन माहित झालं होतं. आमच्या घराजवळ एक राम मंदिर होतं. मंदिराची देखभाल करणारं एक ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेतास बात होती. म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब कुटुंबा सारखी! कधी दिव्यात टाकायला तेल नाही तर कधी अगरबत्ती घेण्यासाठीही पैसे नाहीत.त्या कुटुंबातील मुलगी नित्य नियमाने ' गजानन विजय ' चं पारायण करायची. काहीही परिस्थिती असो, तिचं पारायण कधी चुकलं नाही. पुढे ती मोठी झाली. लग्नाचं वय झालं आणि गजानन महाराजांच्या कृपेने पंढरपूरला एका गर्भ श्रीमंत घरात, चक्क चांदीच्या दुकानदाराच्या घरात तिचा सून म्हणून प्रवेश झाला. हे सर्व मी ऐकलं, पाहिलं आणि माझ्या मनात गजानन महाराजांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली.
आता लक्षात येतं की माझ्या मनात निर्माण होणारी ओढ ही महाराजांचीच योजना होती .कारण पुढे मी माझ्या सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा साठी उस्मानाबादला आलो. तिथेही गजानन महाराजांची आषाढ वारी येणे हा योग. नंतर मला काही शैक्षणिक अडचण उद्भवली तेव्हा ' त्या ' च ताईशी बोलून, तिच्याच गजानन विजयचा आधार मी पारायणा साठी घेतला. माझं शिक्षण पूर्ण झालं. मला अगदी अल्प पगाराची का होईना पण नोकरी मिळाली. मी पुण्याला सांगवी भागात रहायला गेलो. आज तिथे महाराजांचं भव्य मंदिर आहे, पण तेव्हा चार बाय चारच्या जागेत केवळ एक फोटो आणि पादुका होत्या. तेव्हा स्कूटर तर जाऊ द्या, साधी सायकल घेण्यासाठी माझ्या जवळ पैसे नव्हते. तीन किलोमीटर दूर साईटवर मी चालत जात असे. माझ्या जवळ पैसे नव्हते म्हणून मित्र माझ्या कडून किरायाचे पैसे घेत नसत. मला खूप वाईट वाटायचं. त्यावेळी त्या फोटो समोर बसून माझी व्यथा महाराजांसमोर मांडायचो. गुरूपुष्यामृत योगाला पहाटे साडे तीन वाजता उठून आठ पर्यंत मांडी न बदलता पारायण करायचो. भाजी भाकरीचा नैवेद्य महाराजांना अर्पण करण्यात आनंद मिळायचा. एकदा सुटीत गावी गेलो, परत येताना आई ज्वारीची भाकरी आणि भाजी करून देणार होती. मी सकाळच्या एस टी ने पुण्यासाठी निघालो पण काही कारणाने आईला भाकरी देणं शक्य झालं नाही. ती महाराजांची इच्छा असं मनाचं समाधान करून मी गाडीत बसलो. प्रसिद्ध लेखक श्री भा. द.खेर यांचं ' गजानन दर्शन ' हे पुस्तक मी वाचीत होतो. वाचता वाचता माझा डोळा लागला. साडे बारा एकचा सुमार असेल, हातातील पुस्तक पडलं ,मी खडबडून जागा झालो. पुस्तक घेण्यासाठी खाली वाकलो, तो पुस्तका शेजारी एका रुमालात काही बांधून ठेवलेलं आढळलं. मी पुस्तक आणि रुमाल दोन्ही उचललं. रुमाल कुणाचा म्हणून चौकशी केली पण कुणीही त्यावर दावा सांगितला नाही. मी रुमाल उघडून बघितलं, आत दोन ज्वारीच्या भाकरी आणि भाजी होती. संध्याकाळी आम्ही त्यातील थोडा भाग गाईला अर्पण करून बाकी प्रसाद ग्रहण केला. सकाळी भाकरी देता न आल्याने आईला खूप वाईट वाटलं होतं ते आठवून माझे डोळे भरून आले. तो भाकरीचा रुमाल मी अजूनही जवळ सांभाळून ठेवला आहे.
गजानन महाराजांनी माझा आर्थिक आणि व्यावहारिक पातळीवर असा सांभाळ केला की किरायाचे पैसे देण्यास असमर्थ असलेला मी पुढे सर्वांसाठी ' भाडे ' एकटाच देऊ लागलो. कालांतराने स्वतःचं घरही झालं. त्या घरात एक छान महाराजांची चांदीची मूर्तीही आणू शकलो आणि शेगांवला जाऊन तिथे भक्त निवासात, आनंद विसाव्यात एका खोलीसाठी देणगीही देऊ शकलो.
चांदीच्या मूर्तीवरून एक छान अनुभव आठवला. चांदीच्या मूर्तीसाठी मी पुण्यात पु.ना. गाडगीळ, रांका ज्वेलर्स मधे अनेकदा विचारणा केली पण कामाला मुहूर्त लागत नव्हता. पण पुढे महाराजांनी असा काही योग जुळवून आणला की सोलापूरच्या सुप्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्ती तयार झाली. फक्त काही कारणाने मूर्तीला मशीन पाॅलीश झालं नाही. बाकी मूर्ती सुरेखच झाली, पण माझ्या मनाला मात्र विनाकारणच ती गोष्ट खटकत राहिली. २०११, गुरुवार रथसप्तमीला आमच्या सांगवी मंदिरात मुखवट्याला अभिषेक करणारे कुलकर्णी काका आहेत, त्यांच्या हातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. बघता बघता त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. पुढील रथसप्तमीला मूर्तीला अभिषेक करण्यासाठी काका आलेत. माझ्या मनात पुन्हा पाॅलीशचा विचार डोकावत होता. अभिषेक सुरू झाला. पुन्हा माझ्या मनात विचार आला आणि कुलकर्णी काका मंत्र म्हणताना अचानक थांबले आणि मोठ्या आवाजात म्हणाले ' खूप सुंदर मूर्ती आहे ही! सार्या जगात अशी मूर्ती नाही! ' एवढं बोलून काकांचे पुढील मंत्र सुरू झाले. ते ऐकून मी दचकलो . अंगावर शहारे आलेत . यथावकाश मी काकांना तुम्ही मधेच असं काय बोललात म्हणून विचारलं, त्यावर त्यांनीच मला उलट प्रश्न केला. मी असं बोललो कां? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळून माझ्या विचारांना लगाम लागला होता.
तर असा मी सुहास मोतीचंद कस्तुरे. मी दिगंबर जैन आहे. माझी गजानन महाराजांवरील भक्ती पाहून घरची काही मंडळी मला म्हणू लागली, अरे आपण जैन. तू फक्त गजानन महाराजांचं करतोस. आपल्या देवाचं पण करत जा. त्यांच्या या वाक्याने मी अस्वस्थ झालो.माझ्या मनाची द्विधा परिस्थिती झाली. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. काही दिवस तशा अवस्थेत गेलेत आणि एका रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं, शाल पांघरलेले महाराज माझ्या समोर आहेत. लगेच दिगंबरावस्थेतील चिलीम ओढणारे महाराज आहेत. मग महाराज अदृश्य झालेत आणि समोर जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ पाच नागाच्या फण्यासह दिसू लागले. मग पुन्हा ते दिसेनासे झाले. पुन्हा महाराज दिसू लागलेत.
म्हणजे आपण पोथीत वाचतो नं, नवव्या अध्यायात बाळकृष्ण बुवांना गजानन महाराजांनी रामदास स्वामींच्या रुपात दर्शन दिल्याचं... ' पुन्हा त्याने हताश व्हावे/ तो रामदास स्वामी दिसावे/ पुनः जो निरखून पहावे / तो मागुती गजानन!' ऐसी स्थिती झाली खरी/ सिनेमाच्या खेळापरी/' अगदी तसं झालं आणि ते पाहून पुढे माझं मन शांत झालं. नंतर आश्चर्य म्हणजे सांगवीला जैन मंदिर झालं आणि तिथे भगवान पार्श्वनाथांचीच मूर्ती स्थापन झाली. मला जी मंडळी या विषयावर बोलत होती, ती ही पुढे गजानन महाराजांचं करू लागून परम भक्त झालीत.
तर असे आहेत माझे ' गजानन बाबा ' .प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आघाड्यांवर भक्तांचं मार्गदर्शन करण्यात सदैव सज्ज! आवाज मात्र त्यांना मनापासून देणं आवश्यक आहे आणि आवश्यक आहे, अगदी आतून केलेलं नामस्मरण! श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सुहास मोतीचंद कस्तुरे , सांगवी पुणे
शब्दांकन- जयंत वेलणकर ‘9422108069’
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-!!श्रीगजानन अनुभव!!
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास *भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत
( ५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
माऊली थोर आहात आपण ..
परमेश्वर आपल्या जवळ आहे.
जय गजानन श्री गजानन 🙏🙏
अतिशय हृद्य अनुभव . गण गण गणात बोते....प्रसन्न वाटल.