अनुभव १३२🌺
- Jayant Velankar
- Aug 13, 2020
- 4 min read
Updated: Sep 10, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय
*अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन*
जय गजानन! संत कवी श्री दासगणू महाराजांनी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची स्तुती करणारं ' श्री गजानन अष्टक ' लिहून त्याद्वारे महाराजांना, आम्हा भक्तांवर कुठलाही रोष न धरता दया करा अशी वारंवार विनंती केली आहे. हे श्री गजानन अष्टक आपल्या बहुतेकांना परिचित आहेच. त्यात एका ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात ' अलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन ' अर्थात गजानन माऊलीचं हे ब्रीदच आहे की भक्तांनी मनापासून भक्ती केली तर त्यांना सुमार्गावर सांभाळून ठेवतात . मग त्यासाठी कधी भक्तांची अगदी लहान इच्छा पूर्ण करून तर कधी भक्तांच्या उदास मनावर फुंकर घालण्यासाठी योग्य घटनाक्रम आखून, भक्ताला भक्तीतील समाधान प्राप्त करून देतात आणि भक्ताचा हात धरून सुमार्गावर चालवितात.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणाल तर गोष्ट अगदीच लहान पण अध्यात्मिक आनंद देणारी. त्या दिवशी असं झालं, आमच्या घरी मोगर्याची खूप फुलं येतात. माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की ही फुलं महाराजांच्या शिरावर वहावीत. मी तसं सासुबाईंना म्हटलं आणि एक दिवस सकाळी फुलं घेऊन मठात पोहोचले.मनातून आनंद होत होता. महाराजांना म्हटलं, महाराज फुलं स्वीकारा! असं म्हणून मी फुलं वाहणार तोच तिथल्या ताई मला म्हणाल्या फुलं मूर्तीवर वहायची नाहीत. असं म्हणून त्या ताई निघून गेल्यात. मी थोडं खिन्नपणेच फुलं महाराजांच्या समोर ठेवलीत आणि शांतपणे महाराजांना प्रार्थना करू लागले. इतक्यात अचानक एक लहान मुलगा मागून आला त्याने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले, समोरील फुलं उचललीत, शांतपणे एकेक फुल महाराजांना वाहिलं अगदी जसं मला हवं होतं! पुन्हा माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं, त्याच्या चेहर्यावरील भाव जणू मला विचारून गेलेत, झालं समाधान? मी काही बोलणार तर तो निघूनही गेला.
असंच एकदा मागे पुण्यात सहकार नगर मंदिरात महाराजांची पालखी आली असताना आत्मिक समाधान प्राप्त करून देणारा अनुभव महाराजांनी मला प्राप्त करून दिला .मी मंदिरात दर्शनाला गेले तिथे पालखीचा विश्राम होता. पालखीतील सर्व वारकरी अल्पोपहार करीत होते.
माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण या सर्वांना पाणी वाटपाची सेवा द्यावी. त्या इच्छेने मी तिथे गेले, एका काकांना मला पाणी वाढायला द्या असे सांगितले व पाणी घेऊन पुढे जाणार इतक्यात दुसरे गृहस्थ मला म्हणाले इथे बाई माणसाचं काही काम नाही. असं म्हणून त्यांनी माझ्या हातून पाण्याचा जग परत घेतला. मला वाईट वाटलं, माझा चेहरा उतरला.पण ही महाराजांची इच्छा अशी मनाची समजूत घालून मी घरी परतले. पुढे दोन दिवसांनी मी काॅलेज मधून परतताना चतुश्रुंगीच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. गाडी व्यवस्थित पार्क केली. थोड्या वेळाने दर्शन घेऊन आले तो माझ्या कारच्या मागे कुणीतरी विचित्र पध्दतीने गाडी पार्क करून ठेवलेली! त्यामुळे मला गाडी काढता येईना. मग मी तिथे एका कारमधे बसलेल्या ड्राइव्हरला माझी गाडी बाहेर काढून देण्याची विनंती केली. त्यानं गाडी तर काढली पण तिचं तोंड मला ज्या बाजूला जायचं त्याच्या विरूद्ध दिशेला केलं. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने आता मला त्याच बाजूला जाणं भाग पडलं. म्हटलं थोडं लांबून वळण घेऊ, म्हणून मी थोडं समोर गेले तो ट्रॅफिक जाम. चौकात चौकशी केली तेव्हा समजलं की गजानन महाराजांची पालखी जाते आहे म्हणून ही गर्दी झाली आहे. मग मी चौकातून उजवीकडे वळू शकत नव्हते म्हणून डावीकडे वळले. पुढील चौकात पालखीचे वारकरी एका ठिकाणी अल्पोपहारासाठी थांबले होते. मी बाजूला कार थांबवली. खाली उतरून पुढे गेले, दारात उभी राहून आतील सोहळा न्याहाळू लागले. इतक्यात तिथे असलेले एक वयस्कर सेवेकरी म्हणा किंवा वारकरी म्हणा, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, त्यांनी मला पुढे बोलावलं, मला म्हणाले माऊली आत ये, हे घे सर्वांना पाणी वाढ! असं म्हणून त्यांनी मला पाण्याचा जग देऊ केला. मी मनसोक्त पाणी वाढलं. सेवा देताना माझ्या डोळ्यातही पाणी दाटून आलं होतं. घुमवून फिरवून महाराज मला बरोबर तिथे घेऊन आले.
महाराजांवर विश्वास ठेवला की ते तुमचा सांभाळही करतात आणि योग्य मार्गही दाखवितात. इ.स.२००४ ची गोष्ट. माझी भाची डाॅक्टर आहे. ती तेव्हा कामाच्या निमित्ताने अबू धाबीला होती. तिच्याकडे दुसरेंदा गुड न्यूज होती. पण तिथल्या डाॅक्टरांनी, ' तिला कसलंसं इन्फेक्शन झालं असून बाळास धोका होऊ शकतो ' अशी बॅड न्यूज दिल्यामुळे, तिच्यावरील मानसिक दडपण वाढलं होतं. तिच्या मिस्टरांना कुठलीही रिस्क नको होती. म्हणून पुढं जायचं नाही असं ठरवून पुण्याला डाॅक्टर गुप्ते यांची पुढील कारवाई साठी अपाॅईन्टमेन्ट घ्यायला मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे भाची माझ्याकडे पोहोचली.
मी कालिंदी भट, निवृत्त प्राचार्य. पुण्याला आपटे रोडला राहते. डाॅ गुप्ते यांचा दवाखाना मला अगदी जवळ, म्हणजे गाडीने मोजून चार मिनिटे. माझ्या गाडीत ' श्री गजानन विजयची कॅसेट' कायम लागलेली असायची .म्हणजे गाडी सुरू झाली की लगेच पोथी पुढे सुरू! मी आणि भाची डाॅक्टरांकडे निघालो अन् पोथी सुरू झाली. अध्याय एकोणविसावा.. कुटुंब गोपाळ बुटीचे/ जानकाबाई नावाचे/ परम भाविक होते साचे/ गृहलक्ष्मीच होती जी/ तिने केली विनवणी / महाराजांचे चरणी/ माझा हेतू मनीच्या मनी/ बसू पाहतो गुरूराया/ तई महाराज बोलले/ तुझ्या मना मी जाणितले/ ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास/ आणखी एक पुत्र तूला/ परम सद्गुणी होईल भला.
साडेपाच सहा तास चालणार्या त्या पोथीतील, त्या चार मिनीटात नेमक्या या संबंधित ओव्या, म्हणजे मी महाराजांचा शुभसंकेत समजले पण मी मौन बाळगलं. आम्ही डाॅक्टरांकडे पोहोचलो. त्यांनी भाचीला तपासलं, मग मलाही आत बोलावून आम्हाला म्हणाले ' माझ्या मते सर्व ओ के आहे .याउपर तुम्ही ठरवा. ' नंतर मी भाचीला महाराजांचा संकेत समजावून सांगितला. मग काय? सर्व सुरळीत होऊन तिला उत्तम कन्यारत्न प्राप्त झाले.
या सर्व घटनांचा मी साकल्याने विचार करते, तेव्हा मला तरी एकच लक्षात येतं ते म्हणजे महाराजांच्या योजना अनाकलनीय असतात. त्यामुळे त्याविषयी आपल्या मनात तर्क न करता त्यांच्यावर पूर्ण भार सोपवून आपण भक्तगण चिंतामुक्त होऊ तो क्षण आपल्यासाठी भाग्याचा ठरेल आणि तो क्षण आपल्या जीवनात यावा असं वाटत असेल तर आपल्यापाशी एकच मार्ग आहे. तो म्हणजे महाराजांचं नामस्मरण! श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- डाॅ. कालिंदी भट पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
*भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास.
*भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ ते१०४)
फक्त रुपये पन्नास
...........................................
...........................................
*समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज उपासना*
शांतीरस आणि भक्तीरसपूर्ण मनःशांती प्रदान करून गजानन महाराजांची भक्ती प्रदान करणारी उपासना. ऐका आणि सोबत स्वतः म्हणा. संध्याकाळी सातच्या सुमारास अनेक ठिकाणी ही उपासना सुरू आहे. गुरुवारी आणि एकादशी ला तर मोठीच पर्वणी.ऐका ... उपासना लिंक... https://youtu.be/WxKZ91xsve8
...........................................
Khup chan anubhav
अनुभव वाचताना खूप बर वाटत जय गजानन श्री गजानन 🙏🙏